गजगा : (सागरगोटा हिं. कातकरंज, कातकलेजा गु. काचका क. गज्जिगे सं. कुबेराक्षी, पूतिकरंज, काकचिक्का इं. फीव्हर नट, फिझिक नट, निकर ट्री, बोंड्यूस नट, मोल्यूका बीन लॅ. सीसॅल्पिनिया बोंड्यूसेला कुल-लेग्युमिनोजी). ⇨ अशोक, आपटा, बाहवा इत्यादींचा समावेश असलेल्या फुलझाडांच्या उपकुलातील [सीसॅल्पिनिऑइ डी→लेग्युमिनोजी] ही मोठी आणि काटेरी शिंबावंत (शेंगा येणारी) वेल [→ महालता] कुंपणावर किंवा क्वचित दुसऱ्या मोठ्या झाडावर चढलेली आढळते. हिचा प्रसार पाकिस्तान, भारत आणि उष्ण कटिबंधातील इतर प्रदेश इत्यादींत आहे. हिच्या बहुतेक सर्व भागांवर कठीण, सरळ किंवा वक्र व पिवळसर काटे असतात पाने संयुक्त, सोपपर्ण (उपपर्णयुक्त), पिसासारखी, दोनदा विभागलेली (३०–६० सेंमी.) दले ६–८ जोड्या व दलके ६–९ जोड्या असतात. फांदीच्या टोकास किंवा पानांच्या बगलेत, जुलै-सप्टेंबरात मध्यम आकाराच्या पिवळ्या फुलांच्या मंजऱ्या येतात. संवर्त (पुष्पकोश) पिंगट पाकळ्या पिवळ्या, पाच व सुट्या केसरदले दहा व सुटी [→ फूल]. शिंबा लंबगोल (५–७·५ × ४·५ सेंमी.) फुगीर व काटेरी बिया १-२, टणक, गुळगुळीत. गोलसर (सु. १·५ सेंमी. व्यासाच्या) व करड्या असतात. मुळाची साल, पाने, फुले आणि बिया औषधी आहेत. या झाडात बोंड्यूसीन नावाचे कटुद्रव्य असते.

मुळाची साल दमा, पाळीचा ताप व मोठ्या आतड्याचे विकार यांवर उपयुक्त असून ती स्तंभक (आकुंचन करणारी), कृमिनाशक व ज्वरनाशक असते.

आ. १. गजगा : (१) फुलोर्‍यासह फांदी (२) फुलोरा, (३) तडकलेली शिंबा, (४) बी.

कोवळी पाने यकृताच्या विकारावर आणि तेल आचके व अर्धांगवायूवर गुणकारी कोवळी पाने एरंडेलात तळून सुजलेल्या व दुखणाऱ्या वृषणावर (पुं-जनन ग्रंथीवर) व मूळव्याधीवर लावल्यास वेदना कमी होतात. पाल्याच्या रसात आंबेहळद उगाळून व थोडी साखर घालून दिल्यास जंतविकार नाहीसा होतो.

आ. २. गजगा : शिंबा, एक तडकलेली शिंवा व बिया

फक्त पानांचा रस दातदुखीवर हिरडीस लावतात. बिया भाजून आणि कुटून पूड अंतर्गळावर पोटात घेण्यास व बाहेरून लावण्यास उपयुक्त. तसेच कुष्ठरोग, दमा, क्षय इत्यादींवर गुणकारी अग्निमांद्यावर पूड गरम ताकातून थोडा हिंग घालून देतात. तान्ह्या मुलास गजगा गुटीत उगाळून देतात. चेहऱ्यावरील मुरूम व पुळ्या जाण्यास बियांतील तेल लावतात, तेच तेल संधिवातावरही लावतात व कानातून पू वगैरे जात असल्यास त्याचे एकदोन थेंब टाकतात. पोटदुखीवर सुंठ, सैंधव, पादेलोण. भाजलेला हिंग व भाजलेल्या गजग्याची पूड गरम पाण्याबरोबर पिण्यास देतात.

परांडेकर, शं. आ.