गंडमाळा : (अपची). मानेतील लसीका ग्रंथींच्या (रक्तद्रवाशी साम्य असणारा द्रव म्हणजे लसीका वाहून नेणाऱ्या वाहिन्यांतील लसीका पेशींच्या ग्रंथिसद्दश समूहांच्या) चिरकारी (दीर्घकालीन) शोथाला (दाहयुक्त सूजेला) ‘गंडमाळा’ म्हणतात.
प्राकृतअवस्थेत (नेहमीच्या अवस्थेत) मानेतील लसीका ग्रंथी हाताला लागत नाहीत पंरतु गंडमाळा या विकारात सुरुवातीपासूनच त्या हाताला लागू लागतात त्यावेळी त्या गाठी दुखत नाहीत किंवा स्पर्शासह्यही नसतात. एकाच वेळी अनेक गाठी मोठ्या होऊन त्यांची एक साखळीच जणू हाताला लागू लागते. काही काळानंतर गाठी अधिकाधिक मोठ्या होऊन त्यांच्या अंतर्भागात पू तयार होतो. पुवाने भरलेला हा ग्रंथिविद्रधी (ग्रंथीतील गळू) कालांतराने फुटून त्वचेवर जखम तयार होते. गाठी एकमेकींना घट्ट चिकटल्यासारख्या होऊन त्यांचे झुपके मानेत दिसू लागतात. अनेक गाठी फुटल्यामुळे मानेत अनेक लहानलहान जखमा आणि नाडीव्रण (पन्हाळीसारख्या जखमा) दिसू लागतात जखमांतून पांढरट पिवळा स्राव वाहत राहतो. या गाठींमधील शोथ आपोआप बरा होण्याची प्रवृत्ती असल्यामुळे गाठींच्या भोवती तंत्वात्मक (तंतुमय) उतक (समान रचना व कार्य असलेल्या पेशींचा समूह) तयार होऊन मानेवर अनेक व्रण दिसू लागून त्वचा सुरकुतलेली दिसते. ज्वर अगदी थोडा वा मुळीच नसतो.
ढमढेरे, वा. रा.