गंगानगर : श्रीगंगानगर. राजस्थान राज्यातील जिल्ह्याचे ठिकाण. लोकसंख्या ९०,०४२ (१९७१). हे बिकानेरच्या २१६ किमी. उत्तरेस पंजाब सीमेवर असून येथून पश्चिमेस काही किमी. अंतरावर पाकिस्तानची सरहद्द सुरू होते. हे पूर्वी बिकानेर संस्थानांतील एक खेडे होते. १९२०–२८ दरम्यान त्यावेळच्या गंगासिंह महाराजांनी गंगा कालवा हा महान जलसिंचन प्रकल्प पुरा करून ओसाड राजस्थानात नंदनवन निर्माण केले. त्या कालव्यानिमित्त उभ्या राहिलेच्या शहराला पुढे त्यांचेच नाव मिळाले. कालव्याने परिसर समृद्ध बनल्यामुळे गंगानगरची वाढ झपाट्याने झाली. येथे १९४५ साली साखर कारखाना उघडण्यात आला. साखरेशिवाय आज येथे अनेक उद्योग निर्माण झाले असून पाकिस्तान सरहद्दीवर असल्याने शहरास फार महत्त्व आले आहे.
शाह, र. रू.