खोगीर व लगाम : घोड्यावर स्वार होण्याची आवश्यक व उपयुक्त साधने. त्यांपैकी खोगीर हे घोड्याच्या पाठीवर पट्ट्याने बांधले जाते आणि त्यावर घोडेस्वार आरामशीर बसू शकतो. लगाम हे साधन घोड्याच्या तोंडात अडकवितात. लगामाच्या वाद्या घोड्याच्या मानेच्या दोन्ही बाजूंकडून घोडेस्वार आपल्या हातात घेतो. यामुळे घोड्यावर ताबा ठेवून त्याला आपल्या इच्छेप्रमाणे योग्य ती दिशा आणि गती देता येते.

 खोगीर व लगाम यांचा उल्लेख इ. स. पू. २००० वर्षांपासून आढळतो. घोडा हे जनावर पाळून त्यावर स्वार होऊ लागल्यापासून मानवाला खोगीर व लगाम यांसारख्या साधनांची आवश्यकता भासू लागली. कालांतराने या दोन्ही साधनांत फरक होत गेला. शेवटी त्यांना सध्याचे सुटसुटीत स्वरूप प्राप्त झाले.

 पूर्वीच्या काळी घोड्यावर बसण्यासाठी खोगिराचा वापर न करता कपडा वापरीत. चौथ्या शतकानंतर खोगिराचा वापर सुरू झाला असावा. मध्ययुगात उमराव लोक घोड्यावर बसून द्वंद्वे खेळत. त्या वेळी स्वाराप्रमाणे घोड्यालाही संरक्षणार्थ संपूर्ण पोट झाकणारे अवजड खोगीर असे. अशा प्रशस्त खोगिराला लांब रिकिबीही असत. त्यामुळे स्वाराला पाय ताठ ठेवून दौड करणे शक्य होई. तसेच घोड्याच्या छातीवर व तोंडावरही संरक्षणार्थ चिलखत असे. त्यानंतर मूर लोकांनी सुटसुटीत व हलके खोगीर आफ्रिकेतून पश्चिम यूरोपात आणले. तेथून स्पॅनिश, पोर्तुगीज व इंग्लिश वसाहतकारांबरोबर ते अमेरिकेत गेले. आता त्यात थोडी सुधारणा व फरक झाला आहे. हे सुधारलेले खोगीर अमेरिकेतील गुराखी व घोडदळातील लोक वापरतात. रेड इंडियन लोकांचे खोगीर हे निराळ्या बनावटीचे असते. मेक्सिकोतील घोड्यांची खोगिरे उत्तम कमावलेल्या कातड्यांची असून ती रेशीम व मूल्यवान धातूंनी सुशोभित केलेली असतात. 

खोगीर हे हलक्या लाकडाच्या सांगाड्यावर कातड्यांनी मढविलेले असते. याची पुढची बाजू कमानदार असून ती घोड्याच्या पाठीवर सोयीस्कर बसणारी असते ते मध्ये बाकदार आणि मागे किंचित उंच असते. पुढच्या बाजूला धरण्यासाठी उंच टोक असते. घोड्याला खोगीर घासून इजा होऊ नये म्हणून आत जाड गादी असते. खोगिराच्या दोन्ही बाजूंस खाली लोंबणारे दोन पट्टे असतात. त्याला पाय ठेवण्यासाठी दोन्ही बाजूंस रिकिबा अडकविलेल्या असतात. खोगीर घसरू नये, म्हणून त्याला असलेले लांब पट्टे घोड्याच्या पोटाखालून घेऊन आवळून बांधतात.

 रिकिबीचा प्रथम वापर भारतात इ. स. पू. दुसऱ्या शतकात केलेला आढळतो. नंतर तो पूर्व आशियातील देशांत भारतीय संस्कृतीच्या प्रसाराबरोबर गेला. तेथून तो चीन, जपान, कोरिया व मध्य आशियामार्गे पश्चिम आशियात आणि तेथून पुढे यूरोपात व अमेरिकेत गेला, असा पुरावा मिळतो.

 लगाम हा कातडी पट्ट्यांचा बनविलेला असतो. तो घोड्याच्या कानांमागे अडकवितात व त्यास एका पट्ट्याने मानेला बांधतात. घोड्याच्या कपाळावरून येणारा एक पट्टा मूळ पट्ट्याला जोडलेला असतो व दुसरा घोड्याच्या नाकावर राहतो. त्याच्या टोकाच्या कड्यांचा भाग घोड्याच्या तोंडात अडकवितात व कड्यांना असलेल्या वर्तुळाकृती कड्यातून लगामाचे दोन पट्टे घोड्याच्या मानेच्या बाजूने स्वाराच्या हातात येऊ शकतात. या तोंडात अडकविल्या जाणाऱ्या धातूच्या सळ्या व कड्यांचे तीन प्रकार असतात. एक सरळ सळईचा, दुसरा मध्ये जोड असलेला व तिसरा बाकदार. हे भाग बहुधा पोलादी किंवा पितळी असतात. लगामाच्या दोऱ्या किंवा पट्टे ओढून घोड्याच्या जबड्यावर त्यांनी दाब आणता येतो. चौदाव्या शतकापर्यंत एका सरळ सळईचाच लगाम रूढ होता. नंतर जोडकड्यांचा लगाम प्रचारात आला व तो आजही वापरात आहे.

टांगा, बग्गी किंवा घोडागाडी यांना घोडे व खेचरे जुंपताना त्यांच्या पाठीवर घालावयाचे खोगीर वेगळ्या प्रकारचे असते. ते टांगा किंवा गाडीच्या लाकडी दांड्यांना बांधावे लागते व जाड कातडी पट्ट्यांनी जोडावे लागते. पुरातन काळातील रथापासून याला प्रारंभ झालेला दिसतो व त्यात बरीच प्रगती झालेली दिसून येते. घोडा, खेचर, बैल या प्राण्यांप्रमाणे उंट, हत्ती, वनगाई हे प्राणीही वाहतुकीसाठी विशिष्ट गाड्यांस जुंपतात आणि त्या त्या प्राण्याप्रमाणे त्यांचे खोगीर व बंधने वेगवेगळी असतात. याशिवाय शेतीच्या कामात जनावरांचा उपयोग करून घेताना वेगवेगळी साधने वापरतात. तसेच घाण्याच्या, गुऱ्हाळाच्या, चरकाच्या बैलांसाठी वेगवेगळी उपकरणे वापरतात. इंग्लंड, फ्रान्स इ. पाश्चिमात्य राष्ट्रांत घोडे नांगरालाही जुंपतात व त्यासाठी जूं-खोगीर, लगाम इ. सरंजाम विशिष्ट प्रकारचा असतो. मोटारगाड्यांच्या प्रचारापूर्वी मोठ्या घोडागाड्या असत. त्या ओढण्यासाठी घोड्यांच्या एक, दोन किंवा अधिकही जोड्या जुंपत. त्यासाठी जोड्या-जोड्यांचे खोगीरसरंजाम व वेगवेगळे लगाम असत. लष्करात अवजड सामान ओढण्यासाठी खेचरांच्या गाड्या किंवा तट्टांच्या गाड्या असतात. त्यांचेही खोगीरलगाम विशिष्ट पद्धतीचे असतात. घोड्यांच्या शर्यतीत अत्यंत सुटसुटीत व हलके खोगीर असते. त्याला बाजूस पिशव्या असून त्यात चपटी वजने भरतात. लगाम किंचित आखूड असतो. एस्किमो लोक कुत्र्याच्या घसरगाड्या वापरतात किंवा रेनडिअर, कॅरिबू या प्राण्यांनाही घसरगाड्यांना जुंपतात. त्यांचा सरंजाम विशिष्ट प्रकारचा असतो.

शहाणे, शा. वि.