कोजागरी पौर्णिमा : आश्विनी पौर्णिमेस हे नाव असून ह्या दिवशी पाळावयाच्या व्रताला ‘कोजागरव्रत’ म्हणतात. दिवसा उपवास करून रात्री लक्ष्मी व ऐरावतारूढ इंद्र यांची पूजा करावी पूजेनंतर देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावेत तसेच ते आप्तेष्टांसह स्वतःही सेवन करावेत, असा ह्या व्रताचा विधी सांगितला आहे. रात्री चंद्रपूजा करून त्याला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवितात. या दिवशी द्यूत खेळावे, असेही सांगितले आहे. या रात्री लक्ष्मी ‘को जागर्ति’ (कोण जागा आहे?), असे विचारत घरोघर फिरते आणि जो जागा असेल, त्याला धनधान्य देऊन समृद्ध करते. लक्ष्मीच्या स्वागतार्थ रात्री रस्ते, घरे, मंदिरे, उद्याने, घाट इ. ठिकाणी असंख्य दीप लावावेत. सनत्कुमार संहितेत ह्या व्रताची कथा दिली आहे. प्राचीन काळी याच दिवशी ‘कौमुदी महोत्सव’ साजरा करीत. ‘कौमुदी पौर्णिमा’ व ‘शरत्पौर्णिमा’ अशीही नावे ह्या दिवसास आहेत. पावसाळ्यानंतर प्रसन्न अशा शरद ऋतूतील ही पौर्णिमा असल्यामुळेही तिला उत्सवाचे महत्त्व आले असावे.

जोशी, रंगनाथशास्त्री