कोंबडा-मासा : स्कॉर्पीनिडी मत्स्यकुलातल्या सगळ्या माशांना इंग्रजी भाषेत स्कॉर्पीयन फिश (वृश्चिक-मत्स्य) म्हणतात, पण महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळणाऱ्या या माशांच्या सर्व जातींना कोंबडा-मासा म्हणतात. हे मासे साधारणपणे समुद्राच्या तळाशी राहणारे आहेत. स्कॉर्पीनिडी मत्स्यकुल मोठे असून त्यात सु. १७ वंश आणि २५० जाती आहेत. या कुलातले मासे सर्व जगभर आढळतात.
या माशांच्या डोक्यावर अस्थिपट्टांचे (हाडांच्या तकटांचे) शिरस्त्राण असते याशिवाय पुष्कळांच्या डोक्यावर लहानमोठे तंतूही असतात. पक्ष-कंटक (हालचालीस उपयुक्त असणाऱ्या त्वचेच्या स्नायुमय घड्यांतील म्हणजे परांतील काटे) मोठे असतात अधर-पक्ष एकमेकांच्या अगदी जवळ असून त्यांत एक कंटक व तीन-पाच मृदू अर (परांना आधार देणाऱ्या कंटकांसारख्या लांब रचना) असतात पृष्ठ-पक्ष मोठा असतो गुद – पक्षात सामान्यतः तीन कंटक असतात. शरीरावर खवले असतात किंवा नसतात. शरीर बहुधा तांबड्या रंगाचे पण पुष्कळदा रंगीबेरंगी असते. या कुलातील पुष्कळ माशांचे रंग ते ज्या परिसरात राहतात तेथील खडकांच्या रंगाशी बेमालूम जुळणारे असतात इतकेच नव्हे तर सागरी तृणांशी साम्य असणारी त्वचाउपांगे (अवयव) त्यांच्या अंगावर असतात यामुळे हे मासे मुळीच दिसून येत नाहीत. या माशांपैकी एकात सहभोजिताही (दुसऱ्या प्राण्याबरोबर राहून त्यांच्या अन्नात सहभागी होणेही) आढळून आली आहे. भारतालगतच्या समुद्रात मायनस इनेर्मिस जातीचा वृश्चिक-मत्स्य आढळतो. याच्या शरीरावर स्टायलॅक्टिस मायनोई या हायड्रॉइडाचे निवह (वसाहत) वाढलेले दिसून येतात.
यांच्यापैकी काही मासे जरायुज (पिल्लांना जन्म देणारे) असून असंख्य लहान पिल्लांना जन्म देतात.
या माशांच्या पुष्कळ जातींचा खाण्याकरिता उपयोग करतात. स्कॉर्पीना, टेरॉइस, पेलॉर व सिनॅन्सिया या माशांच्या पृष्ठीय कंटकांच्या बुडाशी विषग्रंथी असल्यामुळे त्यांच्या दंशापासून होणाऱ्या जखमा अतिशय अपायकारक असतात.
भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर या कुलातील तीन जाती मुख्यतः आढळतात :टेरॉइस रसेलाय, स्कॉर्पिनॉप्सिस रोझियस आणि स्कॉर्पिनॉप्सिस सिरोसस. यांचे थवे नसल्यामुळे यांचा मच्छीमारीचा हंगाम असा केव्हाही नसतो व ते मोठ्या प्रमाणावर केव्हाही पकडता येत नाहीत.
टेरॉइस रसेलाय ही जाती त्रिवेंद्रम आणि मद्रास किनाऱ्यावरही पुष्कळ आढळते. या माशाची लांबी १८–३६ सेंमी. असून शरीर तांबूस असते शरीरावर रुंद व अरुंद उभे काळे पट्टे एकाआड एक असतात अंस-पक्ष (छातीच्या भागावरील पर) अतिशय पसरलेले असतात पृष्ठ-पक्ष उंच असून त्यात १२-१३ विषारी कंटक असतात. हा मासा जलजीवालयात (जलवासी प्राणी आणि वनस्पती यांच्या संग्रहालयात) ठेवतात.
कर्वे, ज. नी.
“