पेगू : ब्रह्मदेशातील याच नावाच्या जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण. लोकसंख्या २,५४,७६१ (१९७३). हे रंगूनच्या ईशान्येस सु. ७६ किमी. पेगू नदीकाठी वसले आहे. जुन्या चौरसाकृती तटबंदीचे व खंदकांचे अवशेष शहराभोवती आढळतात. पेगूची स्थापना मॉन लोकांनी केली असली, तरी स्थापनेचे वर्ष इ. स. ५७३ की ८२५ याबद्दल अनिश्चितता आहे. ८५० पूर्वी अरब भूगोलज्ञ इब्न खुरदाझबिह याने या राज्याचा ‘रामन्नादेस’ असा उल्लेख केलेला आढळतो. १०५६ मध्ये पगानच्या ब्रह्मी लोकांनी, तर १२८७ मध्ये मोगलांनी ते घेतले. १३६९ मध्ये मॉन लोकांनी पुन्हा आपले स्वातंत्र्य प्रस्थापित करून आपल्या नवीन राज्याची पेगू ही राजधानी केली. सोळाव्या शतकातील सयामवरील स्वारीच्या वेळी ब्रह्मी लोकांचे ते प्रमुख लष्करी केंद्र होते. १६१३ ते १६३४ दरम्यान संयुक्त ब्रह्मी राज्याची येथे राजधानी होती. १६३५ मध्ये ब्रह्मी राज्यकर्त्यांनी आव्हा येथे राजधानी हलविली १७४० मध्ये मॉन लोकांनी बंड करून पेगू अल्पकाळ ताब्यात घेतले परंतु १७५७ मध्ये ब्रह्मी राजा अलाँग्पेया याने स्वारी करून पेगू उद्ध्वस्त केले मात्र त्यातील धार्मिक इमारती सुस्थितीत राहू दिल्या. १८५२ मध्ये ब्रिटिशांनी पेगू विभाग खालसा करून १८६२ मध्ये ब्रिटिश बर्मा प्रातांची निर्मिती केली व राजधानी पेगूहून रंगूनला हलविली. १८८३ मध्ये पेगू जिल्ह्याची स्थापना होऊन त्याचे पेगू हे प्रमुख केंद्र झाले.
आसमंतातील भात व लाकडाचे हे संग्रहकेंद्र असल्यामुळे येथे अनेक भातसडीच्या व लाकूड कापण्याच्या गिरण्या आहेत. शहरात मातीची भांडी व ब्राँझचे पुतळे तयार केले जातात. पेगू हे रस्ते व लोहमार्ग यांचे प्रमुख केंद्र तसेच लहानसे नदीबंदरही आहे. १९३० मध्ये भूकंपाने त्याची बरीच हानी झाली. येथे श्वेमावदाव हा ८८ मी. उंचीचा प्राचीन पॅगोडा असून त्यात गौतम बुद्धाचे दोन केस ठेवले आहेत, असे म्हणतात. महाझेदी, श्वेगुगाले, क्याइकपिएन हे पॅगोडे व जवळच असलेली कल्याणी सीमा ही पंधराव्या शतकातील धार्मिक दीक्षागृहाची वास्तू उल्लेखनीय आहे. आधुनिक शहराच्या पश्चिमेस गौतम बुद्धाची महानिर्वाण अवस्थेतील एक प्रचंड मूर्ती सापडली असून ती ५५ मी. लांब आहे.
चौधरी, वसंत