पेगन : ख्रिस्ती धर्माच्या प्रारंभीच्या अनुयायांनी ख्रिस्ती न बनलेल्या आणि ग्रीक व रोमन लोकांप्रमाणे देवदेवतांवर श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांना दिलेला संज्ञा. पेगन लोक हे ख्रिस्ती लोकांप्रमाणे एकेश्वरवादी नव्हते ते अनेक देवतांची पूजा करीत असत. आफ्रिका, आशिया इ. ठिकाणच्या ज्या लोकांनी अजून ख्रिस्ती ज्यू व इस्लाम यांच्याप्रमाणे एकेश्वरवादी धर्माचा स्वीकार केलेला नव्हता, त्यांना पेगन म्हटले जाई. ‘खेडूत’ या अर्थाच्या ‘पेगॅनस’ या लॅटिन शब्दापासून ‘पेगन’ हा शब्द बनला आहे. बहुदेवतावादी, खेडवळ, ख्रिस्ती न बनलेला इ. अर्थांनी तो प्रारंभी वापरला जाई.
इ. स. चौथ्या शतकाच्या शेवटी म्हणजे पहिल्या थिओडोशियसच्या काळापासून ख्रिस्ती धर्म हा रोमन साम्राज्याचा अधिकृत धर्म बनला आणि पेगन धर्मावर बंदी घालण्यात आली. पाचव्या शतकापासून पेगन मंदिरांचे चर्चमध्ये रूपांतर करण्यास सुरुवात झाली. परंतु ख्रिस्ती धर्म स्थिरावल्यानंतरही पेगन धर्म, रूढी, तत्त्वज्ञान, साहित्य इत्यादींचा लोकांवर असलेला प्रभाव पूर्णपणे नाहीसा झाला नाही. ज्युलियन द ॲपोस्टेट (सु. ३३१-३६३) सारख्या रोमन बादशहांनी पेगन धर्म टिकविण्याचे प्रयत्नही केले होते.