पुंसवन : (आयुर्वेद). मुलगा व्हावा म्हणुन करावयाचा संस्कार. गर्भाचे सर्व अवयव व्यक्त होण्याच्या पुर्वी म्हणजे दोन महिने पूर्ण होण्यापुर्वी पुष्प नक्षत्रावर हा संस्कार करावा. रानात ज्या वडाच्या खाली गाई बसतात त्या वडाच्या पुर्वेकडील वा उत्तरेकडील पारंब्या आणून, त्या दोन उडीद किंवा दोन मोहऱ्या इतक्या प्रमाणात पुष्य नक्षत्रात दह्याबरोबर प्याव्यात. तसेच जीवक, ऋषभक, आघाडा, मुद्रिका (चिकणा) यांची एकाची वा मिळतील तितक्यांची चटणी किंवा यांनी सिद्ध दूध दोनदा-तीनदा प्यावे. सोन्याची किंवा रुप्याची पुरुषी मूर्ती अग्नीत लाल तापवून दुधात दह्यात व पाण्यात विझवुन ते निःशेष प्यावे. शाली जातीच्या तांदुळाचे पीठ शिजताना त्याची वाफ हुंगावी. तेच पाण्यात कालवून उंबरठ्यावर मान ठेवून उजव्या नाकपुडीत चार-सहा थेंब टाकावेत. थुंकू नयेत.कुंभारीण किडा(कवडी गणा)किंवा लहान मासा पाण्याबरोबर प्यावा. सुश्रुताचार्यांनी लक्ष्मणा, वडाच्या पारंब्या, पिवळा व पांढरा चिकणा दुधात वाटून उजव्या नाकपुडीत ३-४ थेंब घालण्यास सांगितले आहे.

जोशी,वेणीमाधवशास्त्री.