पीर पंजाल : भारताच्या वायव्य विभागातील जम्मू व काश्मीर आणि हिमाचल प्रदेश या राज्यांत पसरलेली लेसर हिमालयातील एक प्रमुख पर्वतश्रेणी.
झेलम व अपर चिनाब या दोन नद्यांदरम्यान सु. ३२५ किमी. वायव्य-आग्नेय दिशेत पसरलेल्या या पर्वतरांगेची उंची ३,५०० मी. पासून ५,००० मी. पर्यंत आढळते. रांगेत सु. बारा शिखरे ३,५०० मी.पेक्षा जास्त उंचीची आहेत. पैकी टाटाकुटी (४,७४२ मी.), ब्रह्म साकली (४,७०५ मी.) आणि अफार वात (४,१४३मी.) ही प्रमुख शिखरे असून गुलमर्ग व खिलनमर्गपासून यांवर जाता येते. या पर्वतश्रेणीतील पीर पंजाल (३,४९४ मी.), बुंदील पीर (४,२०० मी.) व बनिहाल (२,८३२ मी.) या प्रमुख खिंडी होत. त्यांपैकी बनिहाल ही काश्मीरमधील सर्वांत कमी उंचीवरील खिंड असून जम्मू-श्रीनगर रस्ता या खिडींखाली सु. ५०० मी. वरून काढलेल्या जवाहर बोगद्यातून जातो. ही रांग उत्तरेकडे किशनगंगा नदीपासून हिमाचल प्रदेशातील धौलधारपर्यंत पसरली असून पुढे ती ग्रेटर हिमालयात विलीन होते. किशनगंगा नदीच्या उत्तरेकडील पर्वतीय भाग म्हणजे याच पर्वतश्रेणीच्या रांगा, असे समजले जाते. झेलम व चिनाब नद्यांनी या रांगेमधील अनुक्रमे उरी व किश्तवार येथे खोल निदऱ्या तयार केल्या असून किश्तवार येथील निदरी जास्त खोल (१,००० मी.) प्राकृतिक दृष्ट्या उल्लेखनीय आहे.
भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते भूरचनात्मक दृष्ट्या ही श्रेणी हिमालयापासून भिन्न व आधुनिक असून तिची सध्या असणारी कमाल उंची ही प्लाइस्टोसीन काळात निर्माण झालेली असावी. विशिष्ट प्रकारची भूरचना असलेल्या या रांगेत पुराण आणि कार्बोनिफेरसपासून आदिनूतन काळापर्यंतचे तसेच ज्वालामुखीय खडक आढळतात. हिमयुगामध्ये हा भाग अतिशय थंड व हिमनद्यांचे उगमस्थान होता. उत्तरेकडील काश्मीर खोऱ्याकडील मंद उतारावर हिमनदीने केलेल्या गाळाच्या संचयनाचे अवशेष आढळतात. या पर्वतरांगेचा तीव्र उतार दक्षिणेकडील मैदानी भागाकडे, तर मंद उतार उत्तरेकडील काश्मीरच्या खोऱ्याकडे असलेला आढळतो.
मैदानी भागाला जवळ असलेल्या, हिवाळयात बर्फाच्छादीत असणाऱ्या या रांगेचे पंजाबच्या मैदानातून व काश्मीरच्या खोऱ्यातून मुख्यत: मेमध्ये दिसणारे दृश्य विशेष रमणीय वाटते. या श्रेणीच्या दक्षिणेकडील उतारावर पाइन, चिनार, ओक, देवदार या समशीतोष्ण कटिबंधीय वनस्पती, तर उत्तरेकडील उतारावर सूचिपर्णी वनस्पती आढळतात.
चौधरी, वसंत
“