पींतु, फॅर्नाव मेंदिश : (१५१० ? – ८ जुलै १५८३). एक साहसी पोर्तुगीज प्रवासी व लेखक. पींतूसंबंधी माहिती देणारी संदर्भासाधने पुढीलप्रमाणे आहेत : (१) त्याने लिहिलेला पेरेग्रिनासाउं (जीवितयात्रा) या नावाचा प्रवासवर्णनपर ग्रंथ. (२) जेझुइट पंथाशी त्याचा ज्या वेळी संबंध आला, त्या वेळी त्याने स्वत: लिहिलेली दोन पत्रे. (३) जेझुइट पाद्र्यांनी त्याच्यासंबंधी लिहिलेली काही पत्रे. या संदर्भसाधनांनुसार त्याचा जन्म पोर्तुगालमधील मोन्त-मॉर-उ-व्हॅल्यु या गावी झाला. १५३६ च्या आसपास तो भारतात म्हणजे गोव्यास आला होता आणि पुढील २१ वर्षे त्याने आशिया खंडातील सर्व देशांत प्रवास केला, असा त्याचा दावा आहे. या दीर्घ प्रवासकाळात व्यापार, झगडे, चाचेगिरी, भटकंती, प्रसंगी कैद वा गुलामी असे रोमांचकारी आयुष्य त्याने घालविले. चीनमधील राजांची थडगी लुटण्याच्या आरोपावरून त्याच्या हाताचे अंगठे तोडण्यात आले आणि चीनची जगप्रसिध्द भिंत बांधण्याच्या कामावर त्याला एक वर्षाची सक्तमजुरी शिक्षा झाली, असे म्हणतात.

आशिया खंडातील अतिपूर्वेकडील देशांमधील आपली भटकंती संपवून तो १५५४ च्या सुमारास गोव्यात परतला. याच काळात जेझुइट पंथाचे एक अनुयायी फ्रान्सिस झेव्हिअर–जो पुढे सेंट फ्रान्सिस झेव्हिअर म्हणून जगप्रसिध्द झाला– या पाद्र्याच्या व्यक्तिमत्त्वाने तो अतिशय भारावून गेला व त्यामुळे काही काळ पीतूंचा जेझुइट पंथाशी संबंध आला परंतु त्या पंथाची दीक्षा मात्र त्याने घेतली नाही.

पींतु १५५८ मध्ये मायदेशी परतल्यावर त्याने पेरेग्रिनासाउं हे प्रवासवर्णन लिहिले. ते त्याच्या मृत्यूनंतर म्हणजे १६१४ साली प्रकाशित झाले. त्यात सोळाव्या शतकातील चिनी लोकजीवनाचे अतिशय वेधक वर्णन आढळते. हा ग्रंथ वाङ्मयीन दृष्टीनेही उत्कृष्ट मानला जातो. पौर्वात्य लोकजीवनाकडे अपूर्व नवलाईने पाहणाऱ्या एका यूरोपीय व्यक्तिमनाचे आकर्षण संस्कारचित्र या प्रवासवर्णनात आढळते. या रंजक वर्णनाच्या बाह्य आवरणाखाली लेखकाने आपली काही मते मोठ्या खुबीने सूचित केली आहेत. पहिले म्हणजे पोर्तुगीज लोकांचे तथाकथित शौर्य व मर्दुमकी यांचा त्याने उपहास केला आहे दुसरे म्हणजे त्याच्या मते भारतातील लोक सुसंस्कृत असून पोर्तुगीज लोक त्या मानाने अगदी अशिक्षित व अडाणी आहेत आणि तिसरे म्हणजे दैवते अनेक आहेत, असे मानण्यापेक्षा ईश्वर एकच आहे, ही कल्पना फार श्रेष्ठ आहे. उत्तरायुष्यात तो आल्मादा येथे स्थायिक झाला. पोर्तुगालच्या फिलिप या राजाकडून त्याला निवृत्तिवेतन मिळत असे. आल्मादा येथेच तो निधन पावला.

संदर्भ :Collins, M. S. The Grand Peregrination, London, 1949.

कंटक, ग. वि