पिलसूतस्की, यूझेफ : (५ डिसेंबर १८६७–१२ मे १९३५). पोलंडमधील एक क्रांतिकारक, मुत्सद्दी व लष्करी सेनानी (मार्शल). पोलंडच्या रशियाविरुध्द झालेल्या स्वातंत्र्यलढ्यात त्याचे स्थान अव्दितीय होते. तो एका खालावलेल्या सरदार घराण्यात विल्नो प्रांतातील झुलो या गावी जन्मला. विल्नो येथे शिक्षण घेऊन पुढे तो १८८६ साली खारकॉव्ह (रशिया) येथे वैद्यकीय शिक्षणासाठी गेला पण त्यास त्याच्या रशियाविरुध्दच्या कारवायांमुळे विद्यापीठातून हाकलले (१८८७). पुढे त्याने विल्नो येथे येऊन समाजकार्य करण्याचे ठरविले पण दरम्यान तिसरा अलेक्झांडर झार ह्याचा खून झाला. त्या कटात पिलसूतस्कीचा हात असावा, ह्या संशयावरून त्यास सायबीरियात पाच वर्षे हद्दपार करण्यात आले. तेथून सुटून आल्यावर १८९२ मध्ये त्याने पोलिश सोशॅलिस्ट पक्षाचे सभासदत्व घेतले आणि पोलंडच्या स्वातंत्र्यासाठी खटपट सुरू केली. त्याच वेळी Robotnik हे गुप्तपत्र त्याने प्रचारार्थ सुरू केले पण ते उघडकीस आल्यामुळे पुन्हा त्यास कैद झाली. तेथूनही तो शिताफीने सुटला व ऑस्ट्रिया, हंगेरी, इंग्लंड, जपान आदी देशांतून दौरे काढून आपल्या क्रांतीस मदत मिळावी, म्हणून त्याने प्रयत्न केले. पुढे त्याने ऑस्ट्रियाच्या गॅलिशिया प्रांतात रशियाविरुध्द लढण्यासाठी एक पोलिश मुक्तीसेना उभारली. पहिल्या महायुध्दात त्याने मुक्तिसेनेचा सेनापती म्हणून रशियाविरुध्द लढा दिला (१९१४). पिलसूतस्कीच्या सैन्याने ऑस्ट्रिया-हंगेरीच्या सैन्याबरोबर रशियावर हल्ला चढविला पण पुढे जर्मनीने १९१७ मध्ये पोलंड पादाक्रांत केले, तेव्हा पिलसूतस्कीने सेनापतिपदाचा राजीनामा दिला तथापि जर्मनीने त्यास कैद करून नेले. जर्मनीच्या पराभवामुळे त्याची मुक्तता झाली. रशियात ह्या वेळी क्रांती झाली (१९१७) तत्पूर्वी पोलंड स्वतंत्र झाला होता (५ नोव्हेंबर १९१६). हंगामी सरकारचे नेतृत्व पिलसूतस्कीकडे आले. १९१८ मध्ये पोलंडला संविधानात्मक गणराज्य मिळाले. नवीन घटनेने त्याचे कार्यकारी अधिकार कमी केले (१९२१). तत्पूर्वी १९१९ पासूनच त्याने पोलंडच्या सरहद्दी विस्तारास प्रारंभ केला होता. विस्तारकार्यात फ्रेंचांच्या मदतीने त्याने वॉर्साच्या लढाईत रशियाच्या सेनेचा पराभव केला (१९२०). तो फक्त सैन्याचा प्रमुख राहिला आणि पुढे १९२३ मध्ये या पदाचाही त्याने राजीनामा दिला. १९२६ मध्ये त्याने लष्करी क्रांती करून सर्व सत्ता आपल्या हाती घेतली. या वेळी राष्ट्रीय सभेने त्याला अध्यक्ष म्हणून निवडले पण १९२६–२८ व १९३० अशी पंतप्रधानकीची सु. ४ वर्षे सोडता तो अखेरपर्यंत संरक्षणमंत्रीच राहिला. त्याच्या मृत्यूपर्यंत खऱ्या अर्थी तो पोलंडचा हूकुमशाह होता. त्याने जर्मनीबरोबर दहा वर्षांचा अनाक्रमण करार केला. रॉक (१९२०) आणि हिस्टॉरिकल करेक्शन्स (१९३१) अशी दोन पुस्तके त्याने लिहिली. याशिवाय त्याची समग्र भाषेणही पुढे प्रसिध्द करण्यात आली. त्याने व अलेक्सांद्रा या त्याच्या पत्नीने आठवणी लिहून ठेवलेल्या आहेत.
संदर्भ : 1. Dziewanowski, M. K. y3wuoeph Pilsudski : a European Federalist, 1918–22, Standford (Calif.), 1969.
2. Reddaway, W. F. Marshall Pilsudski, London, 1939.
देशपांडे, सु. र.
“