पिच्छतारा : हे फुलासारख्या एकायनोडर्म प्राण्यांचे [ ⟶ एकायनोडर्माटा] मोठे कुल असून ते लहानपणी महासागराच्या तळाला एक मांसल वृंताने (देठाने) चिकटलेले असतात परंतु पुढे देठ तुठून जातो. त्यांचे प्रौढ मोकळेपणाने हालचाल करू लागतात. त्यांच्या कोमॅट्युलिडी कुलाचा समावेश ⇨ क्रिनॉयडिया वर्गात होतो. त्यांच्या सु. ६०० जाती माहीत आहेत. बहुतेक पिच्छतारे इंडोपॅसिफिक महासागराच्या प्रदेशात आढळतात. पुष्कळ पिच्छतारे उथळ पाण्यात राहतात पण काही जातींचे पिच्छतारे बर्‍याचशा थंड व खोल पाण्यात राहणे पसंद करतात. 

पिच्छताराचे शरीर न दबणार्‍या (अनम्य) कपाच्या आकाराच्या भागाचे असून त्यामध्ये आतील इंद्रिये असतात. शरीराचा तोंडाकडील पृष्ठभाग लवचिक, सच्छिद्र आवरणाने आच्छादिलेला असतो व तोंड मध्याजवळ असते. तोंडाच्या पृष्ठभागापासून पिसासारखे हातपसरलेले असतात. मूळचे हात पाच असतात परंतु त्यांना पुष्कळ शाखा फुटतात त्यामुळे काही पिच्छतार्‍यांना २०० पर्यंत हात असू शकतात. प्रत्येक हातापासून पुष्कळ आखूड पिच्छिका (लहान पिसे) निघतात. तोंडाचा पृष्ठभाग वरच्या बाजूला करून पिच्छतारा राहतो व अन्न मिळविण्यासाठी आपले हात वर उचलतो. हातांवरील आणि पिच्छिकांवरील सकेसल व श्लेष्म्याने (गिळगिळीत द्रव्याने) भरलेल्या प्रसीता (खाचा) पाण्यातील अन्नकण पकडतात आणि तोंडामध्ये ढकलतात.

 

लहान पिच्छतारा देठाला ज्या ठिकाणी जोडलेला असतो तेथे प्रौढ पिच्छतार्‍याला रोम नावाने ओळखले जाणारे बारीक, टोकदार, चल इंद्रिय असते. त्यांच्यामुळे पिच्छतार्‍याला एखाद्या वस्तूवर किंवा सागराच्या तळावर विश्रांती घंण्यास मदत होते. थोडेसे अंतर पोहून जाण्यासाठी व रांगण्यासाठी हातांचा उपयोग होतो.

पिच्छतार्‍याचे लैंगिक पद्धतीने प्रजोत्पादन होते व निपेचन (फलन) सामान्यत: पाण्यात होते. अंडी फुटून लहान मुक्त पोहोणारे डिंभ (प्रौढाशी साम्य नसलेल्या स्वतंत्र अवस्थेतील प्राणी) जन्मतात. ते स्वत:ला सागराच्या तळाला चिकटवून घेतात व सवृंत शिशुरूपात विकास पावतात.

जमदाडे, ज.वि.