पॉलिगोनेसी : (चुका अथवा चुक्र कुल). फुलझाडांपैकी (आवृतबीज, द्विदलिकित) पॉलिगोनेलीझमध्ये (चुका गणात) समाविष्ट केलेले एक कुल. या गणाचे कॅरिओफायलेलीझ [पाटलपुष्प गण⟶कॅरिओफायलेसी] या गणाशी काही लक्षणांत साम्य असून दोन्हींत आप्तभावही आहे. जे. हचिन्सन यांच्या मते पॉलिगोनेलिझ हा गण कॅरिओफायलेलिझपासून र्हास पऊन बनला असावा. पॉलिगोनेसी कुलात सु. ४० ते ८०० जाती (जी. एच्. एम्. लॉरेन्स यांच्या मते ३२ वंश व ८०० जाती) अंतर्भूत असून बहुतेकांचा प्रसार समशितोष्ण कटिबंधात व काही थोड्यांच्या उष्ण कटिबंधात आहे. या वनस्पती बहुतेक⇨औषधी व क्षुपे (झुडपे) क्वचित वेली व वृक्ष आहेत. पाने साधी, एकांतरित (एकाआड एक) व सोपपर्ण (उपपर्णे असलेली) उपपर्णे नलिकाकृती[⟶पान]. खाडावर फुगीर पेरी असतात. फुलोरा विविध फुले बहुधा द्विलिंगी, लहान, अवकिंज, त्रिभागी व नियमित परिदलांची प्रत्येकी तीनची दोन मंडले असतात,क्वचित पाच दलांचे एकच मंडल असते परिदले संदलसम, क्वचित प्रदलसम कधी बाहेरची संदलसम व आतील प्रदलसम, सुटी, परिहित व दिर्घस्थायी केसरदले सुटी ६-९, क्वचित ६ पेक्षा कमी किंजदले २-३ व जुळलेली किंजपुट ऊर्ध्वस्थ व एकबिजी [⟶फुल] फळ त्रिधारी कृत्स्नफल आणि बी सपुष्प (गर्भाबाहेर अन्नांश असलेले) असते.⇨अँटिगोनॉन लेप्टोपसची वेल व ⇨मुहलेनबेकियाचे क्षुप बागेत शोभेकरिता लावतात.⇨चुका भाजीकरिता पिकवतात. कुटू (कट्टक, केटू इं. बक व्हीट लॅ. फॅगोपायरम एस्क्युलेंटम) व पॉलिगोनमच्या अनेक जाती हिमालयात आढळतात. कुटूच्या बियांचे पिठ खाद्य असून ते भाकरीत, वड्यांत, पावात तसेच सार, खीर व इतर पिठे यांत घलतात. कोवळ्या पानांची भाजी करतात ह्याकरिता व हिरवे खत बनविण्यास त्याची उत्तर भारतात लागवड करतात फुलांपासून मधाचा पुरवठा होतो.⇨रेवंदचिनी औषधी आहे.
गाडगीळ, सी. ना परांडेकर, शं. आ.