पाँसे : वेस्ट इंडिजमधील प्वेर्त रीकोचे प्रमुख बंदर. लोकसंख्या १,७४,३४८ (१९७५). हे कॅरिबियन समुद्रकिनाऱ्यावर सॅन बॉन या प्वेर्त रीकोच्या राजधानीच्या नैर्ऋत्येस ७१ किमी.वर वसलेले आहे. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात (१६७० किंवा १६८०) त्याची स्थापना झाली. प्वेर्त रीकोचा पहिला स्पॅनिश गव्हर्नर हवान पाँसे व लेऑन याच्या नावावरून यास पाँसे हे नाव पडले. यास १६९२ मध्ये गावाचा, १८४८ मध्ये उपनगराचा (व्हिला) व १८७७ मध्ये शहराचा दर्जा मिळाला. १८९७ मध्ये हे दक्षिण भागाची राजधानी झाले. पाँसे उत्कृष्ट बंदर असल्यामुळे ते आयात-निर्यातीचे केंद्र बनले. डबाबंदीकरण व तेलशुद्धीकरण या प्रमुख उद्योगांशिवाय येथे साखर, सिमेंट, कागद, लोखंड, कातडी वस्तू, कापड, मद्ये इ. उद्योग चालतात. पर्यटन स्थळ म्हणूनही ते प्रसिद्ध आहे. येथील सांता मारीआ विद्यापीठ, कलासंग्रहालय, अवर लेडी ऑफ ग्वादलूप हे कॅथीड्रल इ. विशेष उल्लेखनीय आहेत.
शहाणे, मो.ज्ञा.