पालनपूर संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील जुन्या मुंबई इलाख्यातील एक संस्थान. क्षेत्रफळ ४५२८.६४ चौ.किमी. लोकसंख्या सु. ३,१५,८५५ (१९४१). वार्षिक उत्पन्न सु. ३४ लाख रुपये. जोधपूर व सिरोही ही उत्तरेस राजपूत संस्थाने, पूर्वेस सिरोहीचा काही प्रदेश व दांता संस्थान, दक्षिणेस बडोदे आणि पश्चिमेस पालनपूर एजन्सीमधील इतर संस्थाने यांनी ते सीमित झाले होते. संस्थानात एकूण ५११ खेडी होती ती एकमेकांपासून काही अंतरावर वसली आहेत. संस्थानातून बनास व सरस्वती या दोन नद्या वाहतात तसेच डोंगरीभागात चांगले गवत उगवते.
पालनपूरचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही. चौदाव्या शतकात अफगाणांच्या युसुफझाई लोहानी या जमातीतील मलिक खुर्रमखानने राजपुतांकडून झालोर विभाग जिंकला. त्यामुळे त्यांना झालोरी म्हणत. सुरुवातीस ते अहमदाबादचे मांडलिक होते. गझनीखान झालोर याने अहमदाबादच्या पतनकाळात तिसरा मुजफ्फर शाह या शेवटच्या राजास मदत केली. त्यामुळे अकबराने त्यास पकडले परंतु पुढे झालोरच्या गादीवर पुन्हा बसविले (१५८९ – ९०) आणि पुढे त्यास लाहोरची सुभेदारी व दिवाण हा किताब दिला. त्याने अफगाण टोळ्यांना परतवून लावले. त्याचा भाऊ मलिक फीरोझखानने याच काळात पालनपूर-दीसावर अंमल बसवून पालनपूर हे मुख्य ठाणे केले. गझनीखानानंतर त्याचा मुलगा पाहारखान (१६१४ – १६) गादीवर आला परंतु त्याने काही दिवसांतच मलिक फीरोझखान या पालनपूरच्या संस्थापकास वारसपद बहाल केले. औरंगजेबाने झालोर व साचोर हे त्याचे प्रदेश म्हणून १६८२ मध्ये मान्य केले पण १६९९ मध्ये ते त्या घराण्याकडून काढून घेऊन फक्त पालनपूर हे गाव त्यांच्याकडे राहिले. पुढे १८०९ मध्ये तेथील राजाचा खून झाला आणि ब्रिटिशांनी हस्तक्षेप करून तेथील बालराजास संमती दिली परंतु पुतण्या व कारभार पाहणारा चुलता यांत १८१७ पर्यंत झगडे झाले. त्या वेळी काकाने बंड केले. ब्रिटिशांनी ते शमविले आणि पालनपूर ताब्यात घेऊन तिथे तरुण राजास गादीवर बसविले. यानंतरची सर्व प्रशासनव्यवस्था ब्रिटिश पोलिटिकल सुपरिंटेंडेंटकडे सुपूर्त करण्यात आली आणि २५० शिपायांची फौज शांतता व सुव्यवस्था यांकरिता १८७४ पर्यंत ठेवण्यात आली. संस्थानला १८९१ मध्ये पुन्हा सर्व अधिकार मिळाले. पुढे नबाब ताले मुहम्मदखान १९१८ साली गादीवर आला. हिंदुस्थान सरकारतर्फे १९२८ मध्ये तो जिनीव्हा येथे हजर राहिला. त्याला १९३६ साली ले. कर्नलचा हुद्दा मिळाला. येथील संस्थानिकांस ११ तोफांच्या सलामीचा मान असून कोणतीही शिक्षा सुनावण्याचा अधिकार होता, तसेच वारसा हक्काबद्दलचे इस्लाम कायद्याप्रमाणे सर्वाधिकारही होते. हे संस्थान बडोदे संस्थानास सालिना सु. ३८,४६२ रु. खंडणी देत असे.
संस्थानात रेल्वे फार थोड्या भागात असली, तरी गुजरात व राजस्थान या प्रदेशांना ते पक्क्या सडकांनी जोडलेले होते. विसाव्या शतकात शिक्षण, आरोग्य या क्षेत्रांत थोडीशी प्रगती झाली. संस्थानाचे स्वतःचे सैन्य होते आणि त्याने १८५७ चा उठाव, अफगाण युद्धे, पहिले महायुद्ध यांत इंग्रजांना सक्रिय साहाय्य केले. हे संस्थान १९४८ मध्ये मुंबई राज्यात व पुढे राज्यपुनर्रचनेनंतर १ मे १९६० रोजी गुजरात राज्यात विलीन करण्यात आले.