पार्सेक : ताऱ्यांमधील प्रचंउ अंतरे मोजण्यासाठी वापरण्यात येणारे प्रमुख एकक. ⇨ प्रकाशवर्षा प्रमाणेच या एककाचा वापर केला जातो. इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनने पार्सेक एककाला १९२२ साली मान्यता दिली आहे. सूर्य व पृथ्वी यांच्यातील सरासरी अंतराएवढी पायारेषा धरून ज्या अंतरावरील पदार्थाचा ⇨ पराशय (निरीक्षकाच्या स्थानामध्ये बदल झाल्याने खस्थ पदार्थाच्या भूगोलावरील स्थानामध्ये होणारा भासमान बदल) १ सेकंद असेल, त्या अंतराला एक पार्सेक म्हणतात. यामुळे ताऱ्याचे पार्सेकमध्ये दिलेले अंतर हा सेकंदामध्ये दिलेल्या ताऱ्यांच्या वार्षिक पराशयाचा व्यस्तांक असतो. Parallax (पराशय) शब्दातील Par व Second शब्दातील Sec घेऊन Parsec (पार्सेक) हा शब्द बनविण्यात आला आहे. एक पार्सेक म्हणजे ३०,८४० अब्ज (३०.८ x १०१२ ) किमी. अथवा २,०६,२६५ ज्योतिषशास्त्रीय एकक (ज्योतिषशास्त्रीय एकक म्हणजे सूर्य व पृथ्वी यांतील सरासरी अंतर) किंवा ३.२६ प्रकाशवर्षे होत (उलट १ प्रकाशवर्ष = ०.३०६९ पार्सेक). अतिशय प्रचंड अंतरांसाठी किलोपार्सेक (१,००० पार्सेक) व मेगॅपार्सेक (दहा लाख पार्सेक) ही एकके वापरतात. आल्फा सेंटॉरी या सर्वांत निकटवर्ती ताऱ्याचे अंतर १.३ पार्सेक असून त्याचा पराशय सर्वांत जास्त म्हणजे ०.७६ सेकंद आहे, तर सर्वांत दूरची ज्ञात दीर्घिका (तारामंडळ) कित्येक अब्ज पार्सेक अंतरावर आहे.