पार्श्विका : (प्रोफाइल). पार्श्विका किंवा पार्श्वरेखा म्हणजे भूपृष्ठाच्या एखाद्या भागाचा विशिष्ट दिशेने उंचसखलपणा कसा आहे, हे आकृतीत दर्शविणारी रेषा. ही काढण्यासाठी त्या प्रदेशाच्या समोच्चरेषा नकाशावर विशिष्ट दिशेने जाणारी अवश्य तेवढ्या लांबीची सरळ रेषा काढतात. आकृतीत तेवढ्याच लांबीची आडवी सरळ रेशा काढून तिच्यावर, नकाशावरील रेषेला समोच्चरेषा जेथे जेथे छेदतात ते ते बिंदू एकमेकांपासून त्याच त्याच अंतरावर दर्शवितात. प्रत्येक बिंदूतून, तो ज्या समोच्चरेषेवर असेल त्या रेषेने दर्शविलेल्या उंचीच्या प्रमाणात लंब काढतात.
या लंबांची वरची टोके सलग वक्ररेषेने जोडली म्हणजे ती वक्ररेषा इष्ट पार्श्विका होय. तो भूप्रदेश त्या विशिष्ट दिशेने उभा कापला, तर त्याची वरची कड कशी दिसेल हे या पार्श्विकेवरून समजते. वरीलप्रमाणे काढलेली आकृती त्या प्रदेशाचा त्या रेषेवर काढलेला ‘उभा छेद’ दाखविते. त्या भूप्रेदशाचा अभ्यास करताना, भूरूपिकित सडका, लोहमार्ग इ. बांधताना,
युद्धप्रसंगी दोन ठिकाणांची आंतरदृश्यता ठरविताना तसेच इतरही अनेक कारणांसाठी पार्श्विकांचा उपयोग होतो. एकाच समोच्चरेषा नकाशावरील अनेक समांतर सरळ रेषांच्या पार्श्विका एकाच आकृतीत दाखविल्या, तर ती अध्यारोपित किंवा अधिष्ठापित पार्श्विका किंवा गुणित पार्श्विका होय. अध्यारोपित पार्श्विकेतील प्रत्येक पार्श्विकेचा, दरम्यानच्या दुसऱ्या अधिक उंच भागाने न झाकलेला भाग फक्त आकृतीत दाखविला, म्हणजे ती प्रक्षेपित पार्श्विका होय आणि सर्व पार्श्विका मिळून जी एक क्षितिजरेषा तयार होते, ती संमिश्र किंवा एकीकृत पार्श्विका होय. प्रक्षेपित पार्श्विकेमुळे एखाद्या भूदृश्यत्वाजवळचा व कमीअधिक दूरचा भाग लक्षात येतो.
नदीच्या उगमापासून मुखापर्यंत किंवा तिच्या काही भागात निरनिराळ्या ठिकाणांची उंची व त्यांमधील अंतर प्रमाणात दाखवून वरीलप्रमाणे आकृती काढली, तर ती अनुगामी नदी पार्श्विका दाखविते. तिच्यावरून नदीच्या प्रवाहातील निरनिराळी भूवैशिष्ट्ये समजतात. नदीच्या एका काठापासून काटकोनात दुसऱ्या काठापर्यंत तिच्या तहाची रचना नदीच्या काटपार्श्विकेने समजते. तिचा उपयोग त्या ठिकाणी नदीतून किती पाणी वाहते, ते ठरविण्यासाठी होतो.
रस्ते करताना, विहिरी खणताना इ. प्रसंगी जमीन उभी खणली जाते, तेव्हा खणलेल्या भागाचे छायाचित्र किंवा रेखाचित्र तयार केले तर त्यात भूपृष्ठाखाली मातीचे वेगवेगळे थर कोणकोणते व किती जाडीचे आहेत ते दाखविता येते. अशा चित्रास त्या भागाची मृत्पार्श्विका म्हणतात.
कुमठेकर, ज.ब.
“