पारपत्र : (पासपोर्ट). एका देशातील नागरिकास दुसऱ्या देशात जाण्यासाठी शासनातर्फे दिले जाणारे अनुज्ञप्तीचे पत्र म्हणजे पारपत्र. त्यात पारपत्रधारकाची ओळख पटेल अशी संपूर्ण माहिती, त्याचे राष्ट्रीयत्व, त्याचे छायाचित्र इ. गोष्टी दिलेल्या असतात. त्याचप्रमाणे परदेशात त्याची सुरक्षितता अबाधित रहावी व तेथे त्यास विनाहरकत संचार करता यावा, म्हणून शासनातर्फे परदेशातील शासनास केलेली विनंतीही त्यात अंतर्भूत असते. पारपत्र हे म्हणूनच एक प्रकारचे ओळखपत्र व विनंतीपत्रही असते. सामान्यपणे पारपत्राविना परदेशात प्रवास व स्वदेशात पुनरागमन करता येत नाही. जगातील बहुतेक सर्व देशांत पारपत्रासंबंधीचा हा संकेत रूढ आहे. विशेषतः पहिल्या महायुद्धानंतरच जगातील सर्व देशांनी पारपत्रपद्धतीचा स्वीकार केल्याचे दिसून येते. ज्या देशात प्रवेश करावयाचा आहे, त्या देशाच्या प्रतिनिधीचा शिक्का किंवा स्वाक्षरी पारपत्रावर घेणे आवश्यक असते. त्यालाच प्रवेशपत्र (व्हिसा) म्हणतात [→प्रवेशपत्र].
नेरलेकर, व. प्र. होनप, वा.रा.