साक्षीदार : ( विट्नेस ). आपण पाहिलेली, ऐकलेली किंवा अनुभवलेली सत्य गोष्ट न्यायालयात अगर सक्षम अधिकाऱ्यांसमोर येऊन शपथेवर सांगतो, तो साक्षीदार. मी सत्य सांगेन, संपूर्ण सत्य सांगेन आणि सत्याशिवाय काहीही सांगणार नाही अशी परंपरागत शपथ साक्षीदार न्यायालयात घेतात. न्यायालयाव्यतिरिक्त त्या प्रकारचे काम करणाऱ्या काही सक्षम अधिकाऱ्यांना आणि न्यायाधिकरणाससुद्घा शपथ देण्याचा व शपथेवर साक्षी नोंदवून घेण्याचा अधिकार आहे.

केवळ न्यायालयात साक्ष देणाऱ्यांना साक्षीदार म्हणता येते असे नाही. कायद्याने काही विशिष्ट दस्तऐवजावर तो दस्तऐवज करुन देणाऱ्याची त्यावर स्वाक्षरी झाल्यानंतर साक्षांकन ( अटेस्टेशन ) आवश्यक असते. असे साक्षांकन करणाऱ्या म्हणजे दस्तऐवजांवर साक्ष देणाऱ्यालाही साक्षीदार संबोधण्यात येते. ‘माझ्यासमोर या दस्तऐवजातील मजकूर वाचून-पाहून तो मान्य असल्याबद्दल संबंधित व्यक्तीने स्वाक्षरी केली आहे’ याची खात्री साक्षीदार आपली स्वाक्षरी खाली करुन पटवीत असतो. म्हणजे त्या अर्थाने तो साक्षच देत असतो. दस्तऐवजावर साक्ष देणारी व्यक्ती दस्तऐवजात जो करार नमूद करण्यात आला आहे, त्याची एक पक्षकार असून चालत नाही. जो करार करणारा आहे, त्याला साक्षीदार होता येत नाही. जसे दत्तक घेणारा व देणारा यांना त्याबद्दलच्या दत्तकपत्रावर साक्षीदार होता येत नाही. खरेदी करणारा व विकणारा यांना त्या खरेदीखतावर साक्षीदार होता येत नाही.

फौजदारी गुन्ह्यांच्या सुनावणीत फिर्यादीचे साक्षीदार व बचावाचे साक्षीदार अशी, ते कोणाकडून साक्षीला आले या गोष्टीवरुन वर्गवारी करण्याची पद्घत आहे. जो साक्षीदार दोन्ही पक्षाने न बोलाविता आवश्यक वाटल्यावरुन स्वत: न्यायाधीशांनीच बोलाविला असेल, तो न्यायालयाचा साक्षीदार संबोधण्यात येतो. ज्या व्यक्ती विशिष्ट ज्ञानक्षेत्रात तज्ज्ञ असतील आणि त्यांच्या ज्ञानामुळे एखाद्या गोष्टीबद्दलचे त्यांचे मत न्यायालयाला विचारात घेणे जरुर असेल, तर असे साक्षीदार तज्ज्ञ साक्षीदार ( इक्स्पर्ट विट्नेस ) म्हणून ओळखले जातात. असे साक्षीदार कोणत्याही एका पक्षाची बाजू घेणारे नसतात व त्यांचे तज्ज्ञपण आणि त्यांची तटस्थता यांवरुनच त्यांच्या साक्षीचे महत्त्व मानले जाते.

पहा : दस्तऐवज साक्षांकन.

चपळगावकर, नरेंद्र