पाय : प्राणिशरीर ज्या शरीरभागाच्या आधाराने उभे राहू शकते त्याला ‘पाय’ म्हणतात. दैनंदिन व्यवहारात श्रोणि-संधीपासून (धडाच्या तळाजवळील हाडांच्या संरचनेशी असलेल्या जोडापासून) खालच्या संपूर्ण मानवी शरीरभागाला म्हणजे अधःशाखेला पाय ही संज्ञा वापरतात. शरीररचनाशास्त्रदृष्ट्या मात्र गुडघा आणि घोटा यांच्या दरम्यानच्या शरीरभागालाच पाय म्हणतात. दैनंदिन भाषेत त्यालाच ‘तंगडी’ किंवा ‘टांग’ म्हणतात. प्रस्तुत नोंदीत फक्त गुडघ्यापासून घोट्यापर्यंतच्या शरीरभागांचीच माहिती दिली आहे.
अस्थिरचना : पायात किंवा तंगडीत दोन लांब हाडे असतात. त्यांपैकी अभिमध्य (आतल्या) बाजूच्या हाडाला ‘अंतर्जंघास्थी’ (नडगीचे हाड) म्हणतात. त्याची अग्र कडा म्हणजेच नडगी असते. पार्श्व बाजूस असणार्या (बाहेरच्या बाजूकडील) हाडाला व बहुतांशी स्नायूंनी आच्छादिलेल्या हाडाला ‘बाह्य जंघास्थी’ म्हणतात.
अंतर्जंघास्थी : मांडीतील उर्वस्थीच्या (श्रोणीपासून गुडघ्यापर्यंतच्या हाडाच्या) खालोखाल लांब आणि बळकट असलेल्या या हाडाचा आकार त्रिकोणी असून त्याचे (१) वरचे टोक, (२) दंड किंवा मधला भाग आणि (३) खालचे टोक असे तीन भाग वर्णितात.
वरचे टोक : खालच्या टोकापेक्षा हे बरेच रुंद व मोठे असून त्याच्या ऊर्ध्वस्थ (वरच्या) पृष्ठभागावर दोन उथळ खळगे असतात. त्याच्या दोन्ही बाजूंस असलेल्या जाड गाठीसारख्या भागांना ‘अंतर्जंघ स्थूलके’ म्हणतात व त्यांच्या दरम्यान असलेल्या उंचवट्याला ‘आंतरस्थूलक उंचवटा’ म्हणतात. या खळग्यामध्ये ऊर्वस्थीच्या खालच्या टोकावरील दोन स्थूलके टेकलेली असतात. अंतर्जंघास्थीचा हा पृष्ठभाग, ऊर्वस्थीची दोन्ही स्थूलके आणि जान्वस्थी (गुडघ्याची वाटी) मिळून जानुसंधी (गुडघ्याचा सांधा) बनतो. स्थूलके आणि खळगे यांच्या दरम्यान दोन अर्धचंद्राकृती उपास्थी (कूर्चा) असतात. त्यांना ‘अभिमध्य’ आणि ‘पार्श्व’ अर्धचंद्राकृती उपास्थी अशी नावे आहेत. या उपास्थींमुळे अंतर्जंघास्थीचा संधानिक पृष्ठभाग अधिक खोलगट बनतो व त्या त्याचा जवळजवळ दोन तृतींयांश भाग व्यापतात. जानुसंधीच्या हालचालींच्या वेळी या उपास्थींचा आकार आणि जागा यांत अल्पसा बदल होतो. जानुसंधीच्या काही अपसामान्य हालचालींमुळे या उपास्थी फाटण्याची शक्यता असते. अंतर्जंघास्थीचा या टोकावर आणि त्याच्या अगदी खालीच अग्रभागी असलेल्या गाठीवजा उंचवट्यावर जानुसंधीचे संधिबंध जोडलेले असतात. या उंचवट्याला ‘अंतर्जंघ ग्रुलिका’ म्हणतात व त्यावर खालच्या भागावर
‘जानु-संधिबंध’ नावाचा मांडीतील ऊरुचतुःशिर स्नायूंचा बळकट संधिबंध जोडलेला असतो. वरच्या टोकाच्या थोडेसे खाली व बाहेरच्या (पार्श्व) बाजूवर बाह्य जंघास्थीचे डोके (वरचे टोक) घट्ट जोडलेले असते.
जानुसंधी हा शरीररातील सर्वांत मोठा सांधा असून तो संधिकलाच्छादित (सायनोव्हियम नावाचा दाट द्रव स्त्रवणार्या पातळ पटलाने आच्छादित) बिजागरी प्रकारचा आहे. त्याच्या हालचालीत अंतर्नमन (पोटरी मांडीजवळ नेणे) आणि बहिर्नमन (मांडीजवळ आणलेली पोटरी लांब नेऊन पाय सरळ करणे) या प्रमुख हालचाली असून अत्यल्प परिभ्रमणही होते. शरीरगतीकरिता परिभ्रमण आवश्यक असून त्यामध्ये ऊर्वस्थीची दोन्ही स्थूलके अर्धचंद्राकृती उपास्थींवर तिथल्या तिथे फिरतात.
दंड किंवा मधला भाग : दोन्ही टोकांच्या मधल्या लांबट भागाला दंड म्हणतात. त्याचा आडवा छेद त्याचा त्रिकोणाकार स्पष्ट दर्शवितो.त्याचा वरचा भाग खालच्यापेक्षा अधिक जाड असतो. त्याला तीन कडा आणि तीन पृष्ठभाग असतात. त्यांपैकी अग्र कडा म्हणजेच नडगी होय. तीन पृष्ठभागांपैकी अभिमध्य पृष्ठभाग पुष्कळसा फक्त पृष्ठीय प्रावरणी (तंतुमय ऊतकाची – पेशीसमूहाची – पट्टी) व त्वचा यांनीच आच्छादिलेला असल्यामुळे हाताने सहज चाचपता येतो. बाकीचे पृष्ठभाग मांसाच्छदित असतात. बाह्य जंघास्थीकडे असणाऱ्या कडेला ‘अस्थ्यंतर कडा’ म्हणतात व तीवर पायाच्या दोन्ही लांब हाडांना जोडणारी ‘अस्थ्यंतर कला’ जोडलेली असते.
खालचे टोक : हे वरच्या टोकापेक्षा कमी रुंद असून त्याच्या अभिमध्य भागाचा काही भाग किंचित खाली वाढलेल्या जाड गाठीसारखा असतो. त्याला ‘अभिमध्य घोटा’ (आतला घोटा) म्हणतात. या घोट्याचा पार्श्व पृष्ठभाग, खालच्या टोकावरील अधःस्थ संधानिक पृष्ठभाग, बाह्य जंघास्थीच्या खालच्या टोकाचा काही भाग आणि घुटिकास्थीचा संधानिक कप्पी पृष्ठभाग (कप्पीशी सदृश असलेला पृष्ठभाग) मिळून गुल्फसंधी (घोट्याचा सांधा) बनतो [→पाऊल].
बाह्य जंघास्थी : पायाच्या पार्श्व (बाहेरच्या) बाजूस असलेले हे हाड अंतर्जंघास्थीच्या मानाने बारीक असून त्याचे (१) डोके किंवा वरचे टोक, (२) दंड आणि (३) खालचे टोक असे विभाग पाडता येतात.
डोके : हे गाठीसारखे असून त्याच्या वरच्या भागावर टोक असते. त्याच्या अभिमध्य भागावर छोटा संधानिक पृष्ठभाग असून तो अंतर्जंघास्थीच्या बाह्य स्थूलकाशी घट्ट सांधलेला असतो. या संधीला ‘ऊर्ध्वस्थ अंतर्बहिर्जंघसंधी’ म्हणतात. डोके जानुसंधीपासून सु. २ सेंमी. खाली असल्यामुळे ते त्या सांध्याशी संबंधित नसते. ते पृष्ठीय प्रावरणी आणि त्वचा यांच्या खालीच असल्यामुळे सहज चाचपता येते. त्या खालून पार्श्व जानुपृष्ठीय तंत्रिका (मज्जा) पायात खाली जाते आणि तीही चाचपून तपासता येते.
दंड : स्नायुंच्या ताणामुळे या भागाला पीळ पडल्यासारखा असून त्याचा वरचा तीन चतुर्थांश भाग चतुष्कोणी आणि खालचा भाग त्रिकोणी असतो. त्याचे पृष्ठभाग आणि कडा तेवढ्या स्पष्ट दिसणार्या नसतात. फक्त अस्थ्यंतर कडा (जिच्यावर अस्थ्यंतर कला जोडलेली असते) स्पष्ट दिसते.
खालचे टोक : याच्या पसरट गाठीसारख्या भागाचाच पार्श्व घोटा बनलेला असतो. घोट्याचा पार्श्वभाग त्वचेखालीच असल्यामुळे हाताने सहज चाचपता येतो. नेहमी मांडी घालून बसणार्याबहुसंख्य भारतीयांच्या बाह्य घोट्यांवर घट्टे पडलेले असतात. खालच्या टोकाचा संघानिक अभिमध्य पृष्ठभाग गुल्फ संधी बनविण्यात भाग घेतो. त्याच्या किंचित वर बहिर्गोल खडबडीत असलेला भाग आणि अंतर्जंघास्थीचा काही भाग मिळून ‘अधःस्थ (खालचा) अंतर्बहिर्जंघसंधी’ बनतो. वरच्या आणि खालच्या अंतर्बहिर्जंघसंधीच्या हालचाली जवळजवळ नसतातच.
स्नायू : पायाच्या स्नायूंची विभागणी तीन गटांत करतात : (१) अग्र गट, (२) पार्श्व गट आणि (३) पश्च गट.
(१)अग्र गटात अग्र अंतर्जंघ, दीर्घ पादांगुली प्रसारक आणि दीर्घ पादांगुष्ठ प्रसारक या तीन स्नायूंचा समावेश असतो. पावलाच्या आणि पादांगुलींच्या निरनिराळ्या हालचाली या स्नायूंमुळे होतात [→पाऊल].
(२)पार्श्व गटामध्ये दीर्घ आणि लघू बाह्यजंघ स्नायू याचा समावेश असून पावलाचे बहिर्वलन व पृष्ठीय अंतर्नमन या हालचाली ते करतात.
(३)पश्र्व गटाचे स्नायू मिळून पोटरीचा फुगीरपणा तयार होतो. ते दोन थरांत रचलेले असतात. त्यांपैकी पृष्ठीय थरातील स्नायूंचा पोटरी बनविण्यात मोठा हिस्सा असतो. ते गुडघ्याचे अंतर्नमन आणि पावलाचे पदतलीय अंतर्नमन करतात. या स्नायूंचे मोठे आकारमान हे मानवी स्नायू तंत्राचे वैशिष्ट्य असून ते त्याच्या ताठ उभे राहू शकण्याचे व क्रमविकासाचे (उत्क्रांतीचे)द्योतक आहे. या थरात उपरिस्थ-पिंडिका स्नायू (पोटरीत सर्वांत मागे असलेला मोठा स्नायू), जंघपिंडिका स्नायू व अनुपिंडिका स्नायू यांचा समावेश असून यांपैकी जंघपिंडिका स्नायू फक्त गुल्फसंधीच्याच हालचालीत भाग घेतो.
खोल थरांमध्ये जानुपृष्ठीय, दीर्घ पादांगुष्ठ आकुंचक, दीर्घ पादांगुली आकुंचक, आणि पश्च अंतर्जंघ या स्नायूंचा समावेश होतो. यांपैकी जानुपृष्ठीय स्नायू गुडघ्याच्या हालचालीत भाग घेतो. इतर सर्व गुल्फसंधी आणि पाऊल यांच्या हालचालीत भाग घेतात.
पृष्ठीयथरातील तीन व खोल थरातील चार अशा एकूण सात स्नायूंमुळे पोटरीला भरीवपणा येतो. त्यांपैकी उपरिस्थ-पिंडिका, जंघपिंडिका आणि अनुपिंडिका हे तिन्ही स्नायू मिळून जाड, दोरीसारखी, शरीरातील सर्वात मोठी व बळकट⇨ कंडरा तयार होते. तिला गुल्फकंडरा किंवा घोडकंडरा किंवा घोडशीर किंवा आकिलीझ या ट्रोजन युद्धातील ग्रीक योद्ध्याच्या नावावरून आकिलीझ कंडरा अशी नावे आहेत. ती पार्ष्ण्यास्थीच्या (टाचेच्याहाडाच्या ) पश्च भागावर जोडलेली असते. एकूण १५ सेंमी. लांब असलेल्या या कंडरेचा खालचा भाग त्वचेखालीच असल्यामुळे हाताने सहज चाचपता येतो.
रक्त व तंत्रिका पुरवठा : मांडीतून खाली येणार्या प्रमुख ऊरुरोहिणीला जानुपृष्ठीय रोहिणी म्हणतात आणि ती पाय व पाऊल यांना शुद्ध रक्तपुरवठा करणारी प्रमुख व एकमेव रोहिणी आहे. तिच्यापासून एक अग्र भागात जाणारी व एक पश्च भागात जाणारी अशा दोन शाखा निघतात. पहिलीला अग्र अंतर्जंघ रोहिणी व दुसरीस पश्च अंतर्जंघ रोहिणी अशी नावे असून त्यांच्या उपशाखा पायातील सर्व ऊतकांना (समान कार्य व रचना असलेल्या पेशींच्या समूहांना) रक्तपुरवठा करतात.
पावलाकडून अशुद्ध रक्त घेऊन येणार्या नीला पायातून वर जाताना काही पृष्ठीय व काही खोल असतात. बहुतेक सर्व खोल नीला रोहिण्यांबरोबरच असतात. एक पृष्ठस्थ नीला पावलाच्या पृष्ठभागातील नीलांपासून सुरू होऊन थेट मांडीच्या वरच्या भागापर्यंत गेलेली असते. या लांब नीलेला ‘दीर्घ अधःशाखा नीला’ म्हणतात. पाऊल आणि पायातील अशुद्ध रक्त शेवटी मांडीतील ऊरूनीलेत येते. पायातील मागच्या भागातील अशुद्ध रक्त ‘लघू अधःशाखा नीले’ द्वारे जानुपृष्ठीय नीलेत नेले जाते. जानुपृष्ठीय नीलाच मांडीत वर गेल्यानंतर ऊरुनीला या नावाने ओळखली जाते.
अपस्फीत-नीला नावाची विकृती अधःशाखेतील विशेषेकरून पायातील नीलांमध्ये नेहमी आढळते [→अपस्फीत-नीला].
श्रोणी तंत्रिकेच्या मांडीच्या पश्च भागातून खाली येताना मांडीच्या मध्यावर अभिमध्य जानुपृष्ठीय तंत्रिका आणि पार्श्वजानुपृष्ठीय तंत्रिका अशा दोन मोठ्या शाखा होतात. या शाखांच्या उपशाखा पोटरीचे स्नायू, जानुसंधी, गुल्फसंधी, पावलाचे स्नायू, त्वचा इ. सर्व भागांना तंत्रिकापुरवठा करतात.
पायातील बहुसंख्य लसीकावाहिन्या (ऊतकांकडून रक्तात जाणारा व रक्तद्रवाशी साम्य असणारा द्रव पदार्थ वाहून नेणार्या नलिका) पृष्ठस्थ असून त्यांपैकी काही जानुपृष्ठीय लसीका ग्रंथींना मिळतात परंतु मांडीच्या वरच्या आणि अग्र भागातील वंक्षण लसीका ग्रंथींना त्या अधिक प्रमाणात मिळतात. [→लसीका तंत्र].
संदर्भ : 1. Hollinshead, W. H. Textbook of Anatomy, New Delhi, 1974. 2. Warwick, R. Williams, P., Ed. Gray’s Anatomy, London, 1973.
उचगांवकर, पां. व्यं. भालेराव, य. त्र्यं.
“