पामेलीझ : (अँरेकेलीझ ताल गण). ए. एंग्लर व के. प्रांट्ल यांच्या वर्गीकरणाप्रमाणे फुलझाडांपैकी [→वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एकदलिकित वर्गातील या गणाला ‘प्रिन्सिपेस’ हे नाव असून त्यात ताड-माडांचा समावेश केला आहे इंग्रजीत या सर्व वनस्पतींना ⇨ पाम म्हणतात व त्यांचा अंतर्भाव ⇨ पामी या एकमेव कुलात केला जातो. प्रिन्सिपेस हे जुने नाव आंतरराष्ट्रीय वनस्पतिनामाभिधाननियमांप्रमाणे बरोबर नसले, तरी पारंपारिक म्हणून अद्यापही कोणी (उदा., जी. एच्. एम्. लॉरेन्स) वापरतात. या नियमाप्रमाणे पामेलीझऐवजी ‘अँरेकेलीझ’ हे नाव अधिक योग्य आहे. कारण पामीपेक्षा ‘अँरेकेसी’ हे (अँरेका या सुपारीच्या वंशनामावरून बनविलेले) कुलनाम विशेष पसंत केले जाते. जे. हचिन्सन यांनी पामेसी हे नाव पामीऐवजी वापरून फक्त त्याचाच अंतर्भाव पामेलीझ गणात केला आहे. जी. बेंथॅम व जे. डी. हुकर यांच्या वर्गीकरण पद्धतीत पामी कुलाचा अंतर्भाव इतर दोन कुलांसह ‘कॅलिसिनी’ या श्रेणीत केला असून इतर काहींनी (ए. बी. रेंडेल, ई. स्ट्रासबुर्गर इ.) अँरेसी [→अँरॉइडी] व लेग्नेसी [→डकवीड] यांसह पामीचा समावेश ‘स्पॅडिसिफ्लोरी’ (महाछदयुक्त) या गणात केलेला आढळतो. प्रस्तुतच्या वर्णनात पहिल्याने स्पष्ट केलेल्या अर्थी ही संज्ञा वापरली आहे.
पामेलीझ गणातील बहुतेक वनस्पती (एक-दोन अपवाद सोडल्यास) उष्ण कटिबंधात सापडतात. भारतात छिंदवाडा येथे या वनस्पतींचे काही जीवाश्म (शिळारूप अवशेष) सापडले आहेत. उत्तर क्रिटेशस खडकांत (सु. ९ कोटी वर्षांपूर्वीच्या कालखंडात), तसेच तत्पूर्वी ट्रायासिक (सु. २३-२० कोटी वर्षांपूर्वीच्या) आणि जुरासिक (सु. १८.५-१५.५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील खडकांतही ताल वृक्षांचे जीवाश्म आढळले असल्याने या कुलाचा क्रमविकास (उत्क्रांती) फार प्राचीन काळी सुरू झाला असावा हे उघड आहे [→पामी].
या वनस्पती लहान-मोठे वृक्ष (क्वचित वेली) असून त्यांना मोठी संयुक्त पाने व महाछदयुक्त स्थूलकणिश [→पुष्पबंध] फुलोरा असतो फुले नियमित, त्रिभागी, बहुधा एकलिंगी, एकत्र किंवा विभक्त झाडांवर असतात. किंजपुट ऊर्ध्वस्थ, संयुक्त किंवा मुक्त (सुट्या) भागांचा असून बीजके तीन असतात. मृदुफळात किंवा आठळी फळात १-३ बीजे (सपुष्क) असतात. [→फूल].
द पाम सोसायटी ही जागतिक संघटना ह्या वनस्पतींचे संवर्धन व संशोधन यांस उत्तेजन देते ती प्रिन्सिपेस या नावाचे नियतकालिकही प्रसिद्ध करते.
पहा : पाम पामी पुरावनस्पतिविज्ञान वनस्पतिनामपद्धति.
संदर्भ : 1. Blatter, E. Palms of British India and Ceylon, London. 1926.
2. Lawrence, G.H.M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.