पामीर : आशियातील महत्त्वाचे पाणलोटक्षेत्र व मध्य आशियाच्या दक्षिणेकडील पर्वतमय भागातील पठारी प्रदेश. मध्य आशियातील, विशेषतः रशियाच्या ताजिकिस्तान या प्रजासत्ताकामधील, गोर्नोबदक्शान या स्वायत्त विभागात तसेच सिंक्यांग-ऊईगुर (चीन), जम्मू व काश्मीर (भारत) आणि अफगाणिस्तान यांच्या सीमाभागांत पामीरचा विस्तार आढळतो. हे पर्वतरांगांनी वेढले असून याच्या उत्तरेकडे ट्रान्स-आलाय रांग, पूर्वेकडे सरिकोल रांग, दक्षिणेकडे झोर्कुल सरोवर, पामीर नदी व पांज नदीचे उगमप्रवाह, पश्चिमेकडे पांज नदीचे खोरे याप्रमाणे याचा पुर्व-पश्चिम विस्तार ४०२ किमी. व दक्षिणोत्तर २२५ किमी. आहे. एकंदरीत चौकोनाकार असणाऱ्या या प्रदेशाने सु. ५६,९७९.८ चौ. किमी. क्षेत्र व्यापले आहे. येथील मूळचे लोक ‘बाम-ई-ड्युन्या’ (जगाचे छत वा छप्पर) या नावाने पामीरला ओळखतात. पर्शियन भाषेत ‘पामीर’ म्हणजे पर्वताचा पायथा. पामीर हा शब्द सर्वसाधारणपणे या पर्वतमय प्रदेशातील दर्‍याना लावतात.

भूवर्णन : ‘पामीर नॉट’ (जगाचे छप्पर) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पर्वतराजींच्या केंद्रबिंदूपासून अनेक लहानमोठ्या पर्वतरांगा निरनिराळ्या दिशांनी विस्तारलेल्या आढळतात. आग्नेयीकडे जाणारी हिमालय पर्वतश्रेणी, पूर्वेकडे जाणाऱ्या कुनलुन व काराकोरम या रांगा, ईशान्येकडे जाणारी तिएनशान रांग, नैर्ऋत्येकडे जाणारी हिंदुकुश पर्वताची रांग वगैरे याच पर्वत समुच्चयबिंदूपासून दूर जातात. पामीरमध्ये ६,००० मी. उंच असलेली अनेक शिखरे आहेत. या भागातील ‘अकॅडेमी ऑफ सायन्सेस’ या रांगेत ‘मौंट कम्युनिझम’ शिखर ७,४९५ मी. उंच असून हे पामीरमधील सर्वांत उंच शिखर आहे. त्याखालोखाल ‘लेनिन’ शिखराची उंची ७,१३४ मी. असून ते ट्रान्स-आलाय या पर्वतरांगेच्या मध्यभागी आहे. यांशिवाय ‘मौंट कार्ल मार्क्स’ (६,७२६ मी.) याचीसुद्धा येथील उंच शिखरांत गणना होते. पामीरचे सर्वसाधारणपणे त्याच्या ठळक वैशिष्ट्यांनुसार ‘पूर्व पामीर’ व ‘पश्चिम पामीर’ असे दोन विभाग करण्याची प्रथा आहे. पूर्व भागात बेताचा उंचसखलपणा आढळतो. पश्चिम भागात मात्र उंच पर्वतरांगांमधील खोल दर्‍या सापेक्ष उंचसखलपणा फारच वाढवितात.

अलेक्झांडर हंबोल्ट १८२९ मध्ये ज्या वेळी या प्रदेशात आला होता त्या वेळी त्याचा असा समज झाला की, पामीरचा विस्तार हा उत्तर-दक्षिण असावा परंतु बर्‍याच संशोधनानंतर हा भाग मुख्यतः पूर्व-पश्चिम पसरलेला आहे, याच्याशी भूगर्भशास्त्रज्ञ सहमत झाले आहेत. या भागातील पर्वतश्रेणींच्या रुंद दर्‍याना पामीर म्हणून संबोधतात. या दर्‍यात वितळलेल्या बर्फापासून निर्माण होणारे पाणी पूर्व-पश्चिम वाहते. परस्परांशी तुलना करता या दर्‍या वेगवेगळ्या धाटणीच्या आढळतात. विशेषतः त्यांची रुंदी व उंची ही भिन्नभिन्न आहे. तसेच त्यांच्या तळांशी साठलेला हिमोढाचा थर हासुद्धा वेगवेगळ्या जाडीचा आहे. भूगर्भशास्त्रज्ञ पामीरचे तीन ठळक विभाग करतात. दक्षिणेकडील भाग कँब्रियन-पूर्व काळातील नीस, क्वार्टझाइट यांसारख्या रूपांतरित खडकांचा बनलेला असून मध्य भाग जुरासिक, ट्रायासिक आणि पर्मियन काळांतील चुनखडी, वालुकाश्म, पंकाश्म यांसारख्या गाळाच्या खडकांचा बनला आहे. उत्तर भाग अगदी अलीकडील निक्षेपांनी तयार झाल्याचे आढळते.

पामीर प्रदेशाचे एकूण तीन प्रमुख विभाग व त्यांचेच आठ उपविभाग केले जातात :  (१) दक्षिण पामीर – (अ) ताघडुंबश पामीर, (ब) वाखान पामीर (२) मध्य पामीर – (अ) लघू पामीर, (ब) भव्य पामीर, (क) अल्यीचूर पामीर (३) उत्तर पामीर – (अ) खरगोश पामीर, (ब) रंग-कुल पामीर, (क) सर्येस पामीर. या प्रदेशातून अबी-ई-परजा, चुंद-दर्या, आक्सू आणि मुरघाट यांसारखे अमुदर्याचे उगम प्रवाह वाहतात. ताघडुंबश, खरगोश आणि रंग-कुल वगळता बाकी सर्व भागांतील पामीर दर्‍या अमुदर्याच्या (ऑक्सस) उपनद्यांच्या स्वरूपात पाण्याचा निचरा करतात. ताघडुंबशचे पाणी ताश्कुर्गानच्या पूर्वेला मोठ्या खोल दरीतून वाहत जाऊन पुढे यार्कंदला मिळते. खरगोश आणि रंग-कुल या भागांतील पाणी बाहेर नेणारा दृश्यमार्ग कोठेच आढळत नाही. या प्रदेशात पूर्वेकडे यार्कंद नदी उगम पावते आणि वालुकाश्म तारीम प्रदेशातून चीनमध्ये वाहत जाते. दक्षिणेकडील नद्या आणि उपनद्या हुंझा या सिंधू नदीच्या उपनदीद्वारे समुद्रास मिळतात. या प्रदेशात १,०८५ हिमनद्या असून त्यांनी सु. ८,०४२ चौ. किमी. क्षेत्र व्यापले आहे. जास्तीतजास्त बर्फसंचय अकॅडेमी ऑफ सायन्सेस, ट्रान्स-आलाय, रूशन, नॉर्दर्न अल्यीचूर (बझारबारा), पीटर द फर्स्ट इ. पर्वतरांगांत आढळतो. फेडचेंको ही सर्वात लांब हिमनदी (सु. १४४ किमी.) अकॅडेमी ऑफ सायन्सेस पर्वतरांगेत उगम पावते. हिच्याशिवाय या प्रदेशात ग्रम-ग्रझ्यिमायलो (३६ किमी.), गार्मो (२७ किमी.), सॅग्रॅन (२४ किमी.) आणि जिऑग्रफिक सोसायटी (सु. २० किमी.), तर ट्रान्स-आलाय पर्वतश्रेणीमध्ये सौक-दारा (२६ किमी.), कोर्झेन्येव्हस्की (सु. २१ किमी.), ऑक्टोबर (सु. १८ किमी.) व लेनिन (१० किमी.) या महत्त्वाच्या हिमनद्या आहेत. त्याचप्रमाणे काराकुल (खारे सरोवर), रंग-कुल, शोर्कुल, झोर्कुल, यशील-कुल, सर्येस इ. सरोवरेही आहेत.

हवामान : खंडांतर्गत स्थानामुळे हवामान कोरडे व विषम असणे स्वाभाविकच आहे. पश्चिमेकडील उघड्या भागात ते काहीसे सौम्य आहे परंतु पर्वतरांगांनी बंदिस्त केलेल्या पूर्वेकडील खोऱ्यांत ते अधिक विषम आढळते. पश्चिम भागात जानेवारी व जुलैमधील सरासरी तपमान अनुक्रमे – ७.४ से. व २२.५ से. असते. पूर्वेकडील भागात जानेवारीतील सरासरी तपमान – १७.८ से. असते व उन्हाळ्यात ते २० से. च्या वर चढत नाही. पाऊस जरी सर्व भागांत कमी असला, तरी पश्चिम भागात त्याचे प्रमाण १०-२५ सेंमी. व पूर्व भागात ते केवळ ५-१० सेंमी. असते. पर्वत उतारांवर उठावांमुळे पर्जन्यमानाचे प्रमाण ८०-१०० सेंमी. पर्यंत वाढते. अशा प्रकारचे कडक हवामानच लोकवस्ती अतिशय विरळ असण्यास कारणीभूत असून ते विकासाच्या मार्गातील प्रमुख अडचण आहे. शिवाय एकूण वृष्टिप्रमाण कमी असल्यामुळे हिमरेषेची उंची (४,५०० मी.) अपेक्षेपेक्षा अधिक आहे.


वनस्पती व प्राणिजीवन : पर्जन्यमान अतिशय कमी असल्यामुळे या भागात खुरटे व विरळ वनस्पतीजीवन विशेषत्वाने आढळते. पूर्वभागात तर ते अधिकच विरळ आहे. उंचीनुसारदेखील वनस्पतीजीवनात फरक पडतो व हा फरक बदलत्या तपमानामुळे होतो. पर्वतीय उतारांवर तसेच दऱ्यांमधील प्रदेशात वर्मवुड व हॅलॉक्झायलॉन हे वृक्षप्रकार आढळतात. सु. ३,५०० मी. उंचीपर्यंत वृत्तीय व उपवृत्तीय वनस्पतीजीवन (उदा., अकँथस, काटेरी ॲस्ट्रॅगलस या प्रकारच्या वनस्पती), तर ३,५०० ते ४,००० मीटरमध्ये शीत कटिबंधीय व पर्वतीय जीवन आढळते (उदा., युगान, कॅमोल, फेस्क्यू व फेदर ग्रास या प्रकारची गवते, तसेच अल्पीय गवताळ कुरणे). ४,००० मीटरवर मात्र वनस्पतीजीवन अतिशय विरळ होते. पश्चिम पामीरमधून वाहणार्‍या नद्यांकाठच्या प्रदेशात विलो (वाळुंज), पॉप्लर, बर्च (भूर्ज), सी बकथॉर्न, हॉथॉर्न या वृक्षांची दाटी आढळते.

प्राणिजीवनही फार मोठ्या प्रमाणात आढळत नाही. पूर्वभागात अरखार नावाची पर्वतीय मेंढी, मार्मोट नावाचा लांब शेपटीचा खारीसारखा प्राणी आणि लांब कानाचा तिबेटी लांडगा हे प्राणी प्रामुख्याने आढळतात तर पक्ष्यांमध्ये तिबेटी टर्की, डोमकावळा, शिंगांचा भारद्वाज व गृध्र हे मुख्यत्वे आढळतात. पश्चिम भागात शेळी, तपकिरी, अस्वल, लांडगा, कोल्हा, बिबळ्या, रानमांजर (बिडाल), वीझल, मार्टेन, ससा, रानउंदीर आणि उडता उंदीर यांसारखे प्राणी आणि पक्ष्यांमध्ये भारतीय हळदी पक्षी, नीलपक्षी, तितर, कवडा इ. प्रामुख्याने आढळतात. नद्यांमध्ये कटला आणि तिबेटी लोच या दोन प्रकारचे मासे आढळतात.

आर्थिक व सामाजिक स्थिती : प्राकृतिक दृष्ट्या प्रतिकूल असलेल्या या भागात कायमची वस्ती फारच थोड्या ठिकाणी आढळते. एकूण लोकवस्ती अंदाजे ९८,००० असून लोकवस्तीची घनता चौ.किमी. ला दोनपेक्षादेखील कमी आहे. सु. ९० टक्के लोक ताजिक असून ते पश्चिम भागात राहतात. त्यांची भाषा इराणी भाषासमूहापैकी असून धर्माने ते शियापंथीय मुस्लिम आहेत. पूर्वभागात राहणारे किरगीझ लोक सुन्नीपंथी मुस्लिम असून त्यांची भाषा तुर्की आहे. ताजिक लोक अतिशय निकृष्ट शेती आणि शेळ्या-मेंढ्या पाळण्याचा धंदा करतात. किरगीझ लोक शेळ्या-मेढ्यांबरोबर याकही पाळतात. लागवडीस उपयुक्त अशी जागा अत्यल्प असून तीत अन्नधान्ये, घेवडा, भोपळा, बटाटे, यांसारखी पिके काढली जातात. नद्यांच्या खोऱ्यात पाणीपुरवठ्याच्या सोयी उपलब्ध झाल्यामुळे सफरचंद, पेअर, जरदाळू, अक्रोड आणि तुती यांच्या बागा वाढीस लागल्या आहेत.

औद्योगिक दृष्ट्या हा भाग मागासलेला असणार हे उघड आहे. जलविद्युत्उत्पादनास सुरुवात झाली आहे. खनिजांमध्ये कोळसा व मीठ प्रमुख असून सोने, मौल्यवान खडे, अभ्रक, अँस्बेस्टस, संगजिरे यांसारखी खनिजेही आढळली आहेत. उष्ण पाण्याच्या खनिजयुक्त झर्‍यपासून औष्णिक ऊर्जा व खनिजे मिळविणेदेखील शक्य आहे. मात्र दुर्गमता हा मोठा अडसर आहे. अर्थात आता पायवाटांबरोबरच पक्क्या रस्त्यांच्या विकासास सुरूवात झाली असल्याने विकासास थोडीफार दिशा लागण्याची आशा आहे. खोरॉग-दूशान्बे-ऑश हा रस्ता, तसेच खोरॉगपासून दक्षिणेकडे पांज-पामीरसारख्या दुर्गम नदीखोऱ्यातून जाणारा रस्ता हे पक्के रस्ते असून त्यांनी वाहतूक सुकर झाली आहे.

पामीर प्रदेशात निरनिराळ्या देशांच्या सरहद्दी येत असल्यामुळे ऐतिहासिक व लष्करी दृष्ट्या पामीर फार महत्त्वाचा भाग आहे. १८९६ मध्ये पामीर सीमा मंडळाने अफगाणिस्तान व चीन या दोन प्रदेशांत मोडणार्‍या पामीर प्रदेशाच्या उत्तर सीमा ठरवून दिल्या होत्या. चीनमधून पश्चिमेकडील भागात याच प्रदेशातून रेशमाची निर्यात होत असे. जगप्रसिद्ध मार्को पोलो हा पहिला यूरोपीय प्रवासी या प्रदेशात हिंडून गेला आणि त्याचेच नाव येथील मेंढीला दिले जाते. पामीरचे समन्वेषण रशियन निसर्गशास्त्रज्ञ ए. पी. फेडचेंको याच्यापासून सुरू झाले. तो १९७१ मध्ये आलाय खोऱ्यातून पामीरच्या उत्तरेकडील टोकावर पोहोचण्यात यशस्वी झाला. १८७७-७८ मध्ये ए. एन्. सेव्हेर्टसॉव्ह या रशियन प्राणि-भूगोलवेत्त्याने पामीरच्या आतील भागापर्यंत जाऊन त्याचा रचना चार्ट तयार केला. १८७८ मध्ये व्ही. एफ्. ओशानिन ह्या निसर्गवैज्ञानिकाच्या नेतृत्वाखालील एका संशोधनमोहिमेत एका मोठ्या हिमनदीने तयार झालेल्या दरीचा शोध लागला. या हिमनदीलाच पुढे फेडचेंको असे नाव देण्यात आले. १८८४-८७ या काळात, प्राणिवैज्ञानिक जी. वाय्. ग्रम-ग्रझ्यिमायलो यांनी पामीरचे आणखी समन्वेषण करून त्याच्या ईशान्य व वायव्य भागांतील हिमनद्यांबाबत उपयुक्त माहिती मिळविली. १९२८ मध्ये रशियाच्या अकॅडेमी ऑफ सायन्सेस ह्या संस्थेद्वारा काढण्यात आलेल्या मोहिमेमुळे पश्चिम पामीरचे स्थलवर्णनविषयक अचूक नकासे प्रथमच तयार करणे शक्य झाले. १९३३ मध्ये फेडचेंको हिमनदी-प्रदेशात ४,५११ मी. उंचीवर जगामधील पहिली हिमनदीविज्ञान-प्रयोगशाळा उभारण्यात आली. १९३२ मधील ताजिक-पामीर मोहिमेमुळे पामीरचे भूविज्ञान, भू-आकृतिविज्ञान आणि जलीय भूविज्ञान यांसंबंधीचे महत्त्वपूर्ण संशोधनलेख प्रकाशित झाले.

खातु, कृ. का. फडके, वि. शं.