पापुआ न्यू गिनी : नैर्ऋत्य पॅसिफिकमधील, इंडोनेशियाच्या पूर्वेस व ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेस असलेला राष्ट्रकुलाचा सदस्य व सप्टेंबर १९७५ मध्ये स्वतंत्र झालेला देश. तो २० द. ते ११० ४०’ उ. व १४० पू. ते १५८० पू. यांदरम्यान असून त्याचे क्षेत्रफळ ४,६२,८४० चौ. किमी. व लोकसंख्या २८,२९,००० (१९७६ अंदाज) आहे. या देशात मुख्यतः न्यू गिनी या प्रचंड बेटापैकी १४१० पू. रेखांशाच्या पूर्वेकडील ३,९५,७३० चौ. किमी. क्षेत्राचा समावेश होतो. याशिवाय बिस्मार्क द्वीपसमूह, न्यू ब्रिटन व न्यू आयर्लंड सॉलोमन द्वीपसमूह- बूगनव्हील व बुका – व लूईझीअँद, डँट्रकास्टो, उ. ट्रोब्रिआंड इ. अन्य बेटांचा समावेश होतो. पूर्वीचा ऑस्ट्रेलियाचा पापुआ न्यू गिनी प्रदेश व संयुक्त राष्ट्रांचा न्यू गिनी विश्वस्त प्रदेश मिळून पापुआ न्यू गिनी देश बनला आहे. पोर्ट मोर्झबी ही याची राजधानी आहे (लोकसंख्या १,१३,४०० – १९७६ अंदाज).
भूवर्णन : न्यू गिनी बेटाचा पूर्वेकडील सु. निम्मा भाग या देशात येतो. हा भाग पश्चिम भागाप्रमाणेच अत्यंत डोंगराळ आहे. मध्यभागी आग्नेय-वायव्य दिशेने जाणारी उत्तुंग पर्वतरांग असून ती पुढे पश्चिमेस ईरीआनमध्ये जाते. या पर्वतरांगेच्या पापुआ न्यू गिनीमधील मध्य पर्वतरांगेस सेंट्रल पर्वतरांग, आग्नेयीस बिस्मार्क पर्वतरांग व आग्नेय टोकास ओवेन स्टॅन्ली पर्वतरांग अशी नावे आहेत. सामान्यतः ही पर्वतरांग ३,००० मी. पेक्षा उंच असून मौंट व्हिल्हेल्म (उंची ४,५०९ मी.) हे सर्वोच्च शिखर आहे. ओवेन स्टॅन्ली पर्वतरांग पुढे पुर्वेस समुद्रात बुडाल्याने अनेक बेटे निर्माण झाली आहेत. उत्तर किनार्यावर बिस्मार्क रांगेच्या समोर एक पर्वतरांग असून मौंट बांगेता हे ४,१०७ मी. उंचीचे शिखर या भागात आहे. हीच रांग समुद्रातून पुढे न्यू ब्रिटनमध्ये पसरली आहे. ह्या रांगा वलीकरणामुळे – २५ लाख ते ६.५ कोटी वर्षांच्या दरम्यान समुद्रतळाच्या गाळास वळ्या पडल्याने – निर्माण झाल्या आहेत. उत्तर किनार्याजवळ ज्वालामुखी भूरूपेही बरीच आहेत. देशातील ४० जागृत ज्वालामुखींपैकी ३२ येथेच आहेत. १९५१ साली मौंट लॅमिंग्टनचा भयानक उद्रेक होऊन ४,००० माणसे मृत्यू पावली. उत्तर किनारपट्टी खडकाळ, डोंगराळ व अरूंद आहे. त्यामानाने दक्षिण किनारपट्टी मात्र विस्तीर्ण व सपाट आहे. दक्षिण किनारपट्टी हळूहळू खचत असावी, असा अंदाज आहे. बेट अत्यंत अर्वाचीन असल्याने मृदा फारशा विकसित झालेल्या नाहीत. भरपूर पाऊस व तीव्र उतार यांमुळे रेतीयुक्त भरड मृदा बनल्या आहेत. गाळाच्या जलोढीय मृदा किनार्याजवळ जास्त आहेत. त्यांत चुनखडक व प्रवाळ चूर्ण जास्त प्रमाणात असून सेंद्रिय द्रव्ये अल्प आहेत. सु. ५% भागातच सुपीक गाळ मृदा आहेत. डोंगररांगांतील खोर्यांमध्ये काळी सुपीक मृदा आहे. इतर बेटांची भूरचना मुख्यतः डोंगराळ आहे. न्यू ब्रिटनवरील मौंट ऊलावान हे शिखर २,३०० मी. उंच आहे व बूगनव्हिलवर अनेक ज्वालामुखी आहेत. या देशातील अनेक छोटी बेटे म्हणजे प्रवाळभित्ती व प्रवाळकंकणद्वीपे आहेत. येथे अनेक खनिजे आहेत. बूगनव्हिलवर तांबे व जवळच्या समुद्रात खनिज तेल तसेच न्यू गिनीवर सोने आणि चांदी यांचे साठे आहेत. महत्त्वाच्या नद्या न्यू गिनी बेटावरील प्रदेशातच आहेत. पर्वतरांगेच्या उत्तरेस सेपिक ही महत्त्वाची नदी आहे, तर दक्षिणेस मध्य भागातून वाहणारी फ्लाय नदी सर्वात मोठी आहे. ती बिस्मार्क पर्वतरांगेत इमॅन्युएल भागात उगम पावते, पश्चिमेकडून दक्षिणेस वाहते व शेवटी पूर्वेस वळून गैमाजवळ पापुआ आखातास मिळते. तिची लांबी १,१२५ किमी. असून तिचा ४०० किमी. प्रवाह नौकानयनास उपयुक्त आहे. तिचे मुख ३३ किमी. रुंद असून मुखाशी विस्तीर्ण त्रिभुज प्रदेश निर्माण झाला आहे. स्ट्रिक्लंड ही फ्लायची प्रमुख उपनदी आहे. याशिवाय अनेक छोट्या नद्या उत्तर व दक्षिण किनाऱ्यांवर वाहतात. त्यांत रामू आणि पुरारी जलविद्युतविकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. न्यू गिनीच्या उत्तरेस बिस्मार्क समुद्र व डँपियरची सामुद्रधुनी आहे, तर बूगनव्हिल व न्यू गिनीमध्ये सॉलोमन समुद्र व दक्षिणेस ‘कोरल’ समुद्र आहे.
हवामान : देशाचे सर्वसाधारण हवामान विषुववृत्तीय सागरी स्वरूपाचे आहे पण मध्यभागी असणारी पर्वतरांग हिमरेषेपर्यंत उंच असल्याने या भागात थंड हवामान आढळते. समुद्रसपाटीस पोर्ट मोर्झबी येथे उन्हाळ्यात तापमान ३०० से. व हिवाळ्यात २३० से. इतके आढळते. ३,००० मी. पेक्षा जास्त उंच प्रदेशात हिवाळ्यात किमान तापमान ०० से. पेक्षा कमी आढळते. जानेवारी-फेब्रुवारी काळात उत्तरेकडून व वायव्येकडून उष्ण वारे येतात आणि ते उ. किनार्यावर पाऊस देतात. एप्रिलपर्यंत हवा उष्णच असते व उत्तरेस खूप पाऊस पडतो. मे-ऑगस्टमध्ये हवा थंड होते, वारे दक्षिणेकडून व आग्नेयीकडून वाहतात. द. किनारा व पर्वताचे द. उतार यांवर विपुल पाऊस पडतो. पाऊस सामान्यतः वर्षभर पडतो पण हवामानावर – प्रदेश मान्सूनच्या वाटेत असल्याने – मान्सूनचा प्रभावही आढळतो व म्हणून भूरचनेप्रमाणे पर्जन्य वितरणात खूपच भिन्नता आढळते. उदा. पोर्ट मोर्झबी येथे केवळ १०० सेंमी. तर मध्य पर्वतीय प्रदेशात ६०० सेंमी. पाऊस पडतो. मध्य पर्वतात हिवाळ्यात हिमवृष्टी होते. इतर बेटांतही पाऊस वर्षभर पडतो व त्याची सरासरी १५० सेंमी. पेक्षा जास्त असते.
वनस्पती व प्राणी : देशाचा ७५% भाग वनव्याप्त आहे. जंगलांत ८,००० जातींच्या वनस्पती असून हवामानाच्या भिन्नतेमुळे मोठी विविधता आढळते. किनाऱ्याजवळ विस्तीर्ण खाजणी जंगल, तर खोऱ्यांतून सदाहरित विषुववृत्तीय जंगल व मध्यम पावसाच्या भागात निमपानझडी अरण्ये आहेत. सागो ताड व वेतगवत सखल भागात विपुल आहे. डोंगराळ भागात गवत व १,५०० मी. पेक्षा उंचीवर ओक, बीच व जास्त उंचीवर सूचिपर्णी झाडे, खुरटे गवत व शेवाळ आढळते. नेचाच्या अनेक जाती सदाहरित झाडांवर आढळतात. लाकूडतोडीचा मोठा विकास व्हावयास येथे संधी आहे. भूवैज्ञानिक युगात हे बेट ऑस्ट्रेलियाचा भागच होते व त्यामुळे ऑस्ट्रेलियाप्रमाणेच ‘शिशुधान’ व ‘अंडजस्तनी’ प्राणी या बेटावरही आढळतात. त्यांत झाडावर चढणारा कांगारू व काटे असलेला ‘मुंग्याखाऊ’ हे प्राणी प्रसिद्ध आहेत. नद्यांतून विषारी व बिनविषारी साप व मगरी आहेत. रानडुक्कर व रानकुत्रेही आहेत पण अन्य हिंस्त्र प्राणी मात्र नाहीत. सु. २३० जातींचे सस्तन प्राणी व ३०० जातींचे सरपटणारे प्राणी आहेत.
पक्षिजीवन अत्यंत समृद्ध असून त्यांचे ८६० प्रकार आहेत. त्यांत अवर्णनीय सौंदर्याचे ‘पॅरडाइस’ पक्षी (नंदनवनातील पक्षी), आठ प्रकारचे पोपट तसेच अजस्त्र वटवाघळे आढळतात. त्यांस ‘उडते कोल्हे’ म्हणतात त्यांच्या पंखांची रुंदी १.५ मी. असते. ‘पॅरडाइस’ पक्ष्यांची पंखांसाठी खूप शिकार होई. आज तो संरक्षित पक्षी आहे.
इतिहास : न्यू गिनी बेटावर पहिली वस्ती सु. ३०,००० वर्षांपूर्वी आग्नेय आशियातून आलेल्या लोकांनी केली असावी, असा अंदाज आहे. त्यानंतर सु. ५,००० वर्षांपूर्वी अश्मयुगीन स्थलांतरित या बेटावर आले व त्यांनी डोंगरखोर्यांतून निर्वाह-भटकी शेती सुरू केली. पाश्चात्य प्रवासी व दर्यावर्दी यांनी हे बेट अनेक वेळा पाहिले होते पण घनदाट जंगल, अत्यंत रोगट हवामान व तेथील नरमांसभक्षक, क्रूर व युद्धखोर लोकांची भीती यांमुळे या बेटावर वसाहती फारच उशिरा स्थापन झाल्या. १८७० मध्ये ‘लंडन मिशनरी सोसायटी’ ने द. किनाऱ्यावर केंद्र स्थापन केले व ऑस्ट्रेलियाच्या आग्रहाने १८८४ मध्ये आग्नेय भागातील वसाहतीस मान्यता दिली. त्याच वर्षी जर्मनांनी ईशान्य किनार्यावर आपली वसाहत स्थापिली. १९०६ मध्ये ब्रिटीश न्यू गिनी ऑस्ट्रेलियाच्या नियंत्रणाखाली गेला व त्याचे ‘पापुआ प्रदेश’ असे नाव ठेवण्यात आले. पहिल्या महायुद्धाच्या वेळी ऑस्ट्रेलियाने जर्मन वसाहत जिंकली व १९१९ पासून हा भाग संयुक्त राष्ट्रांचा विश्वस्त प्रदेश म्हणून ‘न्यू गिनी प्रदेश’ या नावाने ऑस्ट्रेलियाच्या प्रशासनाखाली आला. दुसऱ्या महायुद्धामुळे या सर्व प्रदेशात अनेक महत्त्वपूर्ण बदल घडून आले. १९४२ मध्ये जपान्यांनी उत्तर न्यू गिनी बळकावले. हा प्रदेश त्यांच्या अंमलाखाली १९४६ पर्यंत होता इतर सर्व भाग मिळून ऑस्ट्रेलियाच्या नियंत्रणाखाली होता. दुसऱ्या महायुद्धात न्यू गिनी प्रदेशातून १० लक्षांहून अधिक ऑस्ट्रेलियन व अमेरिकन सैनिक नेण्यात आले. १९४९ साली हा विश्वस्त प्रदेश व आग्नेयीचा न्यू गिनी-पापुआ प्रदेश यांचे प्रशासनाच्या दृष्टिकोनातून एकीकरण करण्यात आले. १९५० पासून स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास करण्यात आला. १९६४ मध्ये निवडणुका घेऊन स्थानिक लोकांच्या विधिमंडळाची स्थापना करण्यात आली. १९६८ मध्ये प्रादेशिक मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले. १९६७ साली ‘पांगू पाती’ पक्षाची स्थापना झाली. १९७२ मध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. १८ वर्षांवरील सर्व प्रौढांस मतदानाधिकार आहे. १ डिसेंबर १९७३ रोजी मंत्रिमंडळाकडे अंतर्गत जबाबदारी सुपूर्द करण्यात आली व १६ सप्टेंबर १९७५ रोजी देशास पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले. त्यानंतर उद्भवलेल्या विभाजनवादी चळवळीस आळा घालण्यासाठी १९७६ पासून बूगनव्हिल व न्यू ब्रिटन भागांस प्रांतिक स्वायत्तता देण्यात आली आहे. मायकल सोमारे हे पापुआ न्यू गिनीचे पहिले पंतप्रधान झाले. देशाने एक-सनदी संसदीय घटना स्वीकारली आहे. ब्रिटनची राणी देशाची घटनात्मक प्रमुख आहे व ती मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने गव्हर्नर जनरलची नेमणुक करते. गव्हर्नर जनरल शासनप्रमुख असला, तरी सत्ता पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांच्याच हातात असते. देशाच्या विधिमंडळाचे १०९ सभासद असून ते सार्वत्रिक मतदानाने पाच वर्षांसाठी निवडले जातात. देशाची विभागणी १७ जिल्हे किंवा प्रशासकीय विभाग व दोन प्रांत यांमध्ये केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था १०% भागांत असून १६० परिषदा स्थानिक कारभार पाहतात. न्यू ब्रिटन व बूगनव्हिल हे दोन प्रांत असून त्यांचा कारभार स्वायत्त प्रांतिक मंत्रिमंडळाकडे आहे. ‘सर्वोच्च न्यायालय’ हे सर्वश्रेष्ठ न्यायपीठ आहे. प्रमुख न्यायाधीशाची नेमणूक ब्रिटनची राणी करते व इतरांच्या नेमणुका ‘न्याय व विधी सेवा आयोग’ करतो. याशिवाय राष्ट्रीय न्यायालय व मॅजिस्ट्रेट न्यायालये खालच्या स्तरांवरील न्यायदानाचे काम करतात. संरक्षणाची जबाबदारी १९७५ पूर्वी ऑस्ट्रेलियाकडे होती, परंतु स्वातंत्र्यानंतर (सप्टेंबर १९७५ नंतर) देशात स्वतंत्र सैन्यदले उभारण्यात आली त्यांत एकूण ३,५०० सैनिक असून दोन पायदळ तुकड्या, गस्ती बोटींची एक तुकडी, चार डी-सी विमाने असे युद्धसाहित्य १९७६ साली होते.
आर्थिक स्थिती : देशातील २५% जमिनीत शेती होणे शक्य आहे. १९७३ मध्ये १,४९,९४१ हे. जमीन शेतीखाली होती. प्रमुख पिकांचे १९७५ साली पुढीलप्रमाणे उत्पादन होते (आकडे लक्ष टनांत) : केळी ९, रताळी ४.०८, ऊस ४.५, नारळ ७.९५, तारो २.१९, सुरण १.६८ व इतर कंद २ .८९. यांशिवाय कडधान्ये, खोबरे, कॉफी व कोको-बिया तसेच फळफळावळ यांचे उत्पादन होते. एकूण शेती विरळ असून ती मुख्यतः भटकी-निर्वाह प्रकारची आहे. दोन-तीन वर्षे एका ठिकाणी शेती केल्यानंतर दुसर्या ठिकाणी जमीन साफ करून शेती केली जाते व पहिली जागा सोडून देतात. काही भागांत यूरोपीय लोकांनी चहा, कोको, कॉफी, अननस यांचे मळे उभारले आहेत पण त्यांचे प्रमाण अल्प आहे. स्थानिक लोकही काही मळेशेती उत्पादने घेतात. जर्मन लोकांनी उत्तर किनार्यावर नारळीचे मळे लावले होते व ते चांगलेच यशस्वी झाले आहेत. १,८०० मी. पेक्षा जास्त उंचीवरील भागात ‘पायरेथ्रम’ची लागवड होत असून ही वनस्पती जंतुनाशके बनविण्यास उपयुक्त आहे. पाळीव प्राण्यांत वराह फारच महत्त्वाचे असून वराह संख्येवरून प्रतिष्ठा व श्रीमंती ठरते. १९७६ साली (आकडे लाखांत) : वराह ११.७३, कुक्कुट १०.८५ व गुरे १.५५ होती. शेळ्या (१५ हजार) व घोडे (१ हजार) फारच थोडे होते. एकूण शेती व ग्रामीण अर्थव्यवस्था अत्यंत मागासलेली व अल्पविकसित आहे.
उद्योग : जलविद्युतशक्ती मोठ्या प्रमाणात निर्माण करता येण्यासारखी आहे. सांप्रत रामू नदीवर जलविद्युतकेंद्र बांधण्याचे काम सुरू आहे व पूरारी नदी जलविद्युत प्रकल्पाचे अन्वेषण चालू आहे. समुद्रात तेल मोठ्या प्रमाणात सापडण्याची शक्यता असून अनेक ठिकाणी नैसर्गिक वायू सापडला आहे. खनिज संपत्ती उत्पादनात तांबे सर्वांत महत्त्वाचे असून १९७५ साली १,७२,५०० मे. टन उत्पादन झाले. बूगनव्हिलवर पांगुनाजवळ तांब्याच्या खाणी आहेत. शिवाय प. पर्वतरांगांत खाणींचा विकास चालू आहे. १९,५७४ किग्रॅ. सोने (१९७५) आणि ३९ मे. टन चांदी (१९७४) यांचे उत्पादन झाले. मौल्यवान खनिजे त्याचप्रमाणे खनिज तेल, वायू आणि जलविद्युत यांच्या उत्पादनाबाबत जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशांची भांडवली गुंतवणूक अत्यंत महत्त्वाची आहे. वनसंपत्तीचा वापर त्याचप्रमाणे इमारती लाकडाची निर्यात वेगाने वाढत आहे. १९७५ साली ७१,००० घ. मी. सूचिपर्णी व ७.३३ लक्ष घ. मी. रुंदपर्णी तसेच ४६.९ लक्ष घ. मी. जळाऊ लाकूड ओंडक्यांचे आणि १७,००० घ. मी. सूचिपर्णी व १.१५ लक्ष घ. मी. रुंदपर्णी कापीव लाकडाचे उत्पादन झाले. मासेमारी सभोवतालच्या समुद्रात मोठ्या प्रमाणात विकसित होणे शक्य आहे. १९७५ साली माशांचे एकूण उत्पादन ३४,६०० मे. टन होते. मत्स्योद्योगात झिंग्यांपासून मोठे उत्पन्न मिळते. झिंगे, क्रे-फिश, ट्यूना, बॉरामुंडी यांची निर्यात वाढत आहे. उद्योगांचा विकास अल्प आहे. प्रमुख उद्योगांत रंगनिर्मिती, लाकूडसामान, तंबाखू वळणे, वायू उत्पादन, काँक्रीट, मद्यनिर्मिती, काड्यापेट्या कारखाने व होड्या बांधण्याचे कारखाने, तसेच वीज सामान निर्मिती यांचा समावेश होतो. १९७४ मध्ये देशात ७३८
कारखाने आणि १७,३२१ कामगार होते. १९७२ मध्ये देशातील श्रमबळ पुढीलप्रमाणे विभागलेले होते : प्राथमिक उत्पादन ३५,९९९ खाणकाम ४,१०१ निर्मितिउद्योग १०,१२१ बांधकाम ११,५५३ वाहतूक, संदेशवहन व साठवण ७,७१९ व्यापार ९,४१८ सेवाउद्योग (हॉटेले, कॅफे व मनोरंजन) ३,४९६ इतर ३७,६०७ एकूण १,२०,०१४.
व्यापार : आंतरराष्ट्रीय व्यापार १९७१ – ७२ पर्यंत तोट्याचा होता पण त्यानंतर तो अनुकूल झाला असून १९७६-७७ साली देशाने ३९.३२ कोटी ‘किना’ किंमतीची आयात केली, तर ५१.५१ कोटी किना किंमतीची निर्यात केली. आयात वस्तूंमध्ये सर्वात मोठी आयात यंत्रसामग्रीची असून त्याखालोखाल अन्नधान्य, प्राणी, पक्का माल, खनिज तेल व कोळसा, रसायने इत्यादींचा समावेश आहे तर निर्यातीत १९.१४ कोटी किना किंमतीची सर्वाधिक निर्यात तांब्याच्या खनिजाची होती यांशिवाय कोको-बिया, खोबरे, कॉफी, खोबरेल तेल, मासे व लाकूड इत्यादींची निर्यातही महत्त्वाची आहे. ऑस्ट्रेलियाकडून ४६% आयात होत असून त्याखालोखाल जपान (१० %), अमेरिकेची संयुक्त संस्थाने (९ %), ग्रेट ब्रिटन (५ %) व सिंगापूर हे देश महत्त्वाचे आहेत तर निर्यात मुख्यतः जपान (३० %), प. जर्मनी (२९ %), ऑस्ट्रेलिया (१४ %), ग्रेट ब्रिटन (६ %), अमेरिकेची संयुक्त संस्थाने (६%), स्पेन (५%) या देशांना होते.
देशाचे चलन किना आणि तोईआ ह्या मुद्रानामांनी बनले असून दशमान पद्धतीचा वापर आहे. १०० तोईआ = १ किना असे रूपांतर असून १, २, ५, १०, २० तोईआ व १ किना यांची नाणी, तर २, ५, १०, व २० किनांच्या नोटा वापरात आहेत. डिसेंबर १९७७ मध्ये १ पौंड = १.४० किना, १ अमेरिकी डॉलर = ०.७६ किना आणि १ ऑस्ट्रेलियन डॉ. = ०.८८ किना (सप्टेंबर १९७६) असा हुंडणाबळीचा दर होता. ३१ डिसेंबर १९७५ पर्यंत ऑस्ट्रेलियन चलन प्रचारात होते. ‘बँक ऑफ पापुआ न्यू गिनी’ ही देशाची मध्यवर्ती बँक १९७३ पासून देशाचे अर्थव्यवहार सांभाळत आहे. ऑस्ट्रेलियातील चार व्यापारी बँकांच्या शाखा पापुआ न्यू गिनीमध्ये आहेत. ‘पापुआ न्यू गिनी बँकिंग कॉर्पोरेशन’ ही बँक पूर्वीच्या ‘कॉमनवेल्थ बँकिंग कॉर्पोरेशन’ चे व्यवहार पाहते. ‘पापुआ न्यू गिनी डेव्हलपमेंट बँक’ या विकास बँकेची स्थापना करण्यात आली आहे. १९७६-७७ चे अंदाजपत्रक तुटीचे असून त्यात आय ४३.२२ कोटी किना व व्यय ४३.६० कोटी किना होता.
वाहतूक व संदेशवहन : एकूण वाहतूकसेवा अल्पविकसित आहेत. जलवाहतूक सर्वात महत्त्वाची असून ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, यूरोप व आशियाशी जहाजांनी वाहतूक चालते. नाऊरू, उ. अमेरिका यांच्याशी न्यू हेब्रिडीझ व न्यू कॅलेडोनिया यांद्वारा नौवहनसेवा उपलब्ध आहे. १९७४-७५ साली एकूण ४२.६ लाख टन मालवाहतूक जहाजांनी केली. देशात १३ प्रमुख बंदरे असून सु. ३०० जहाजांचा ताफा आहे. १९७६ मध्ये स्थूल टन वस्तुभार १५,३२९ होता. रस्त्यांचा विकास अद्यापि झाला नसून जून १९७५ पर्यंत १८,१८८ किमी. लांबीचे रस्ते – त्यांपैकी १,०१६ किमी. रस्ते नागरी–होते. अद्याप मध्यभागीचे पर्वत ओलांडून पलीकडे तसेच उत्तर आणि दक्षिण किनारा जोडणारे रस्ते नाहीत. ह्यामुळे रस्ता – दळणवळण पुरेसे विकसित झालेले नाही. डिसेंबर १९७६ मध्ये १७,७२६ मोटारी व स्टेशनवॅगन १९,२३० ट्रक ३,८६६ मोटारसायकली व १,७५३ ट्रॅक्टर होते. देशात रेल्वे वाहतूक नाही. दुर्गम पर्वत व घनदाट जंगले यांमुळे हवाई वाहतूक महत्त्वाची आहे. पोर्ट मोर्झबी आणि लाए येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ, तर इतर सर्व प्रमुख शहरांत विमानतळ असून ४०० खेड्यांत धावपट्ट्या आहेत. नॅडझॅब येथे बांधण्यात आलेल्या नव्या विमानतळावर लाए येथील हवाई वाहतूक यंत्रणा १९७८ च्या अखेरीस हलविण्यात येणार आहे. हवाई वाहतूकीसाठी १ नोव्हेंबर १९७३ रोजी ‘एअर न्यू गिनी’ कंपनी स्थापण्यात आली. १९७५-७६ साली देशांतर्गत विमान वाहतूकीचा ६,६६,५८८ प्रवाशांनी फायदा घेतला आणि २३,२६४ मे. टन माल व ८६४ मे. टन टपालवाहतूक झाली तर आंतरराष्ट्रीय मार्गावर १,४८,९९४ प्रवासी २,४३३ मे. टन माल व ३७२ मे. टन टपालवाहतूक झाली. देशात १९७६ मध्ये ३५,६०४ दूरध्वनी होते. ‘नॅशनल ब्रॉडकास्टिंग कमिशन’ ची मध्यम व लघुलहरींवर प्रक्षेपण करणारी केंद्रे पोर्ट मोर्झबी, राबाउल, वेवाक, गोरोका, लाए व मादांग येथे होती. त्यांशिवाय १० केंद्रे केवळ लघुलहरींवरून कार्यक्रमाचे प्रक्षेपण करतात. इंग्रजी, पिजिन, हीरीमोतू आणि दहा प्रमुख देशी भाषांमधून कार्यक्रम सादर केले जातात. १९७५ मध्ये १,१०,००० रेडिओ वापरात होते. शिवाय दूरचित्रवाणीही आहे.
लोक व समाजजीवन : देशाची एकूण लोकसंख्या ३० जून १९७६ रोजी २८,२९,००० होती. जननमान दरहजारी ४४.६ आणि मृत्युमान १६.० असल्याने लोकसंख्येची वाढ फार वेगाने होत आहे. देशात लोकसंख्येचे वितरण विषम आहे. सु. ४ लाख लोक अन्य बेटांवर असून सु. २० लाख लोक न्यू गिनीमध्येच आहेत. जास्त वस्ती मध्यभागी, उच्च प्रदेशात व खोर्यात असून येथे लोकसंख्येची दाटी दर चौ. किमी. स ३१ इतकी आहे. पण संपूर्ण देशाची सरासरी घनता दर चौ. किमी. स ६ इतकी अल्प आहे. लोकसंख्येपैकी ३५,००० यूरोपीय असून उर्वरित एतद्देशीय ‘पापुअन’ आहे. वस्तुतः हे लोक निसर्गपूजक व भुतेखेते मानणारे आहेत पण १९६६ च्या जनगणनेप्रमाणे ९२% लोक ख्रिस्ती आहेत. त्यांत अँग्लिकन, रोमन-कॅथलिक आणि अन्यपंथीय आहेत. १९७१ साली सरासरी प्रौढ साक्षरतेचे प्रमाण ३२% होते. १९७५ साली १,८१५ प्राथमिक शाळांतून २,४३,९१७ विद्यार्थी व १८४ माध्यमिक, तांत्रिक व व्यावसायिक शाळांत ३९,५२३ विद्यार्थी होते. लाए येथील पापुआ न्यू गिनी तंत्र विद्यापीठात १२० प्राध्यापक व १,१५० विद्यार्थी होते पोर्ट मोर्झबी येथील पापुआ न्यू गिनी विद्यापीठात २०२ प्राध्यापक व २,२३१ विद्यार्थी होते. अद्यापि पर्यटन उद्योग हा अविकसित आहे. थंड हवामानाच्या खोर्यातून पर्यटन स्थळांचा विकास होण्याची शक्यता आहे. १९७६ साली देशाला २८,७२९ प्रवाशांनी भेट दिली.
प्रमुख शहरे : पोर्ट मोर्झबी हे सर्वात मोठे शहर व राजधानी न्यू गिनीच्या दक्षिण किनार्यावर असून तिची वस्ती १,१३,४०० आहे (१९७६). ह्याशिवाय लाए ३८,२०७; मादांग १६,८८५; वेवाक १५,०१५; गोरोका १२,०६५; मौंट हेगेन १०,६०० (१९७१); राबाउल २६,६१९ (न्यू ब्रिटन) आणि क्येटा, आरावा, पांगुना (बूगनव्हील) ही अन्य प्रमुख शहरे आहेत. (चित्रपत्रे २, १३)
डिसूझा, आ. रे.; गद्रे, वि. रा.