पानलवंग : (पाणलवंग हिं. बनलौंगा क. कावाकुळ सं. भूलवंग, जललवंग, लॅ. जुसिया सफ्रुटिकोजा कुल-ऑनेग्रेसी). हे सु. ०.३-१.२ मी. उंच, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) व अनेक फांद्यांचे झुडूप भारतात बहुतेक सर्वत्र, पाणथळ जागी आढळते. शिवाय ते मलेशियात व आफ्रिकेतही आढळते. पाने साधी, एकाआड एक, विविध, फार लहान देठाची, केसाळ, रुंदट-दीर्घवृत्ताकृती असतात. फुले लहान, चतुर्भागी, एकाकी, पिवळी व पानांच्या बगलेत ऑगस्ट ते ऑक्टोबरात येतात. बोंड काहीसे चौकोनी (२.५-५ सेंमी. लांब), लवंगेसारखे असून बिया असंख्य, बारीक, अंडाकृती, पिंगट आणि चकचकीत असतात.
इतर सामान्य लक्षणे ⇨ ऑनेग्रेसी कुलात (शृंगाटक किंवा शिंगाडा कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. ह्या वनस्पतीचे सर्व अवयव (पंचांग) स्तंभक (आकुंचन करणारे), वायुनाशी, सारक (पोट साफ करणारे), मूत्रल (लघवी साफ करणारे) व कृमिनाशक असून सर्व वनस्पती वाटून तो लगदा ताकात मुरवून आमांशावर देतात मूळ उकळून त्याचा काढा ज्वरात देतात. या वनस्पतीच्या काढा रेचक असून जलसंचय (शोफ), पांढरी धुपणी, रक्तमिश्रित थुंकी इत्यादींवर गुणकारी असून आफ्रिकेत संधिवातावर ही वनस्पती वापरतात. मलेशियात पानांचा चहा घेतात.
पानलवंगेच्या वंशातील दुसरी जाती, केसर (जुसिया पेन्स), भारतात सखल प्रदेशांतील दलदलीत, डबक्यात किंवा पाण्यात तरंगणारी ⇨ आैषधी असून तरंगण्याकरिता तिला पानांजवळ ⇨ वायुतक असलेले तरंड (रूपांतरित मुळे) असतात त्यांचा श्वसनासाठी उपयोग होतो [→ जलवनस्पती] हे अवयव उपपर्णे असावीच असे काहींचे मत आहे. पाने एकाआड एक, व्यस्त अंडाकृती (तळाकडे टोकदार व टोकास गोलसर) फुले पांढरी, पानांच्या बगलेत व एकेकटी असतात बोंड लांबट, कठीण, दांड्यासारखे (१.२-३.६ मेंमी.) असून बिया विपुल असतात. कातडीच्या रोगांवर व जखमांवर ह्या वनस्पतीचे पोटीस किंवा लगदा लावतात.
परांडेकर, शं. आ.
“