कालिंदीचरण पाणिग्राहीपाणिग्राही, कालिंदीचरण : (१९०१ – ). आधुनिक ओडिया कवी, नाटककार, कादंबरीकार आणि निबंधकार. जन्म पुरी जिल्ह्यातील विश्वनाथपूर येथे एका सुशिक्षित व श्रीमंत कुटुंबात. वडील स्वप्नेश्वर पाणिग्राही हेही कवी होते. बंधू भगवती पाणिग्राही हे क्रांतिकारक आणि उत्कल साम्यवादी पक्षाचे संस्थापक होते. कलिंदीचरण १९२५ साली पाटणा विद्यापीठातून बी. ए. झाले. १९३३–३८ या काळात मयूरमंज क्रॉनिकलच्या ‘भंज प्रदीप’ या ओडिया विभागाचे संपादक तसेच १९३८–४७ या कालावधीत पूर्वेकडील प्रांतांचे प्रसिद्धी अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. ते साहित्य अकादेमीचे व इतरही अनेक सांस्कृतिक संस्थांचे सभासद आहेत. १९५६ पासून ते ‘आकाशवाणी’ वर निर्माते म्हणून काम करीत आहेत. उत्कल साहित्य समाजाचे ते अध्यक्षही होते.

स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांचे लेखन क्रांतिकारी मानले जाई. त्या वेळी ‘आगबोल’ व ‘अरूप’ या टोपणनावांनी ते लिहीत असत. १९२० च्या दशकात ते ‘सबुज दल’ या साहित्यिक चळवळीचे सदस्य होते परंतु नंतर ते डाव्या विचारसरणीच्या लेखकांना जाऊन मिळाले. रवींद्रनाथ टागोरांना नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर त्यांच्या गीतांजलीने देशातील सर्व लोक, विशेषतः लेखक, प्रभावित झाले. त्या प्रभावानेच ओरिसातील काही तरुण लेखकांनी शांतिनिकेतन मधील सबुजपत्र या नियतकालिकातून प्रसिद्ध होणाऱ्या साहित्याच्या धर्तीवर साहित्य निर्मिण्यास सुरुवात केली. कालिंदीचरण हे ह्या लेखकांपैकी एक होत. लेखकांच्या या गटासच ‘सबुज’ (म्हणजे सदाहरित) व त्यांच्या साहित्यास ‘सबुज साहित्य’ म्हटले जाते. कालिंदीचरण यांनी या दलाचे प्रतिनिधी या नात्याने काव्य, नाटक, लघुकथा, कादंबरी, निबंध हे साहित्यप्रकार यशस्वीपणे हाताळले.

सबुज कविता (१९३१) या नावाच्या काव्यसंग्रहात त्यांच्या काही कविता संगृहीत आहेत. आगमिकालि (१९४७), मने नाहिं (१९४७), महादीप (१९४८), क्षणिक सत्य (१९४९), छुरिटिए लोडा (१९५०) हे त्यांचे उल्लेखनीय काव्यसंग्रह.

माटिर मणिष (१९३१), अमरचिता (१९३२), द्वादशी (१९३२), लुहार मणिष (१९४७), मो कथाटि सरि नाहिं (१९४८), शेषरश्मि (१९४८), राशिफळ (१९४९) व मुक्तागडर क्षुधा (१९५१) ह्या त्यांच्या कादंबऱ्या होत. त्यांपैकी माटिर मणिष ही त्यांची पहिली, वास्तववादी व सर्वोत्कृष्ट कादंबरी होय. ओरिसातील सामान्य माणासाचे प्रभावी चित्रण तीत आहे. संपूर्ण कादंबरी ओरिसातील बोलीभाषेत आहे. फकीरमोहन सेनापती यांच्या लेखनानंतर ग्रामीण जीवनाचे प्रभावी आणि जिवंत चित्रण करणारी ही पहिलीच कादंबरी म्हणावी लागेल. नंतरच्या त्यांच्या कादंबऱ्यांत मात्र माटिर मणिषची झेप आढळत नाही. त्यांच्या क्रांतिकारक बंधूंनी संपादित केलेल्या आधुनिक  ह्या नियतकालिकासाठी ते नियमित लेखन करीत असले, तरी त्यांच्या माटिर मणिष ह्या कादंबरीवर तसेच पियदश्शी  ह्या नाटकावर साम्यवादी विचारसरणीऐवजी गांधीजींच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो. साहित्य अकोदेमीने इतर भारतीय भाषांत अनुवाद करण्यासाठी माटिर मणिषची  निवड केली असून तिचा मराठी अनुवाद वामन कृष्ण चोरघडे यांनी मातीचा माणूस (१९६२) ह्या नावाने केला आहे.

सौम्या (एकांकिका – १९३२), पद्मिनी (एकांकिका – १९३३) व पियदश्शी (नाटक – १९३३) हे त्यांचे नाट्यवाङ्मय. साहित्यसमाचार (१९५४) आणि नेतृत्व ओ नेतृत्व (१९४९) हे त्यांचे निबंधसंग्रह आहेत. साहित्यिका (१९३३) व साहित्य समालोचना (१९३९) हे त्यांचे साहित्यसमीक्षापर लेखसंग्रह होत. त्यांनी काही लघुकथाही लिहिल्या असून त्या सागरिका (१९४७) नावाने संगृहीत आहेत. भक्तकवि मधुसूदन (१९२८) हे ⇨ मधुसूदन राव ह्या कवीचे चरित्रही त्यांनी लिहिले. त्यांचे इतर प्रकारचे संकीर्ण लेखनही विपुल आहे.

दास, कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र (इं.) ब्रह्मे, माधुरी (म.)