पाणबुडी : प्रामुख्याने पूर्णपणे जलपृष्ठाच्या खाली गुप्तपणे संचार करून शत्रूंच्या जहाजांवर हल्ला करणाऱ्या नाविक दलातील युद्धनौकेला पाणबुडी असे म्हणतात. पाणबुड्या जलपृष्ठावरही संचार करू शकतात. पहिल्या महायुद्धात (१९१४–१८) जर्मनीने प्रथमतः मालवाहू जहाजांचा विनाश करण्याकरिता पाणबुड्यांचा वापर केला व नाविक युद्धनीतीमध्ये पाणबुडीला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. दुसऱ्या महायुद्धात (१९३९–४५) अटलांटिक व पॅसिफिक महासागरांमध्ये नाविक युद्धात पाणबुड्या मोठ्या प्रमाणावर उपयोगात आणल्या गेल्या. १९५५ साली अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी तयार झाली व पाण्यात दीर्घकाल राहण्याची तिची क्षमता खूपच वाढली. अण्वस्त्रांचे प्रक्षेपण करणारी पाणबुडी आता अस्तित्वात आल्यामुळे पाणबुडी ही नौदलातील एक अत्यंत प्रभावशाली घटक झाली आहे.
इतिहास: प्राचीन काळापासून शास्त्रीय संशोधनासाठी, बुडालेल्या जहाजातील माल काढण्यासाठी व शत्रूच्या जहाजावर हल्ला करण्यासाठी सागरी पृष्ठाखाली जाण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले पण सतराव्या शतकापर्यंत ते अयशस्वीच ठरले. १६२० ते १६२४ च्या दरम्यान कॉर्नेलिस व्हान ड्रेबेल या डच शोधकांनी प्रथम पाण्याच्या आत चालणारी नौका तयार केली. ह्या नौकेची काया लाकडाची होती व त्यावर पाणी आत झिरपू नये म्हणून कातड्याचे आवरण बसविलेले होते. वल्ही बाजूच्या भोकांतून बाहेर काढलेली होती. ही नौका पाण्याच्या खाली ४ ते ५ मी. खोल चालू शकत असे.
इ. स. १७७६ मध्ये डेव्हिड बुशनेल या अमेरिकेतील शोधकाने ‘टर्टल’ नावाची पाणबुडी तयार केली. तिचा आकार नासपतीच्या (पेअरच्या) फळासारखा होता व गतीही अत्यल्प होती. ह्या पाणबुडीत एकच माणूस बसू शकत असे. प्रचालनासाठी हातांनी फिरविण्याच्या दोन स्कू-प्रचालकांची (मळसूत्री पंख्यांची) योजना केलेली होती. एक प्रचालक मागे-पुढे जाण्याकरिता व एक वर-खाली जाण्याकरिता उपयोगात आणीत असत. अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धात इंग्लंडच्या जहाजाला बाहेरून स्फोटक द्रव्य बांधून जहाजाचा विनाश करण्याचा प्रयत्न या पाणबुडीच्या साहाय्याने करण्यात आला, परंतु त्यात अपयश आले.
यानंतर १८८७ साली रॉबर्ट फुल्टन यांनी तयार केलेल्या पाणबुडीत पूरक भार टाकीचा उपयोग करण्यात आला. पाण्यात बुडण्याकरिता टाकीमध्ये पाणी घेण्यात येत असे व पृष्ठभागावर येण्यासाठी पाणी बाहेर सोडून देण्यात येते असे. आधुनिक पाणबुडीमध्ये याच तंत्राचा उपयोग केला जातो. या पाणबुडीला सागराच्या पृष्ठभागावरून जाण्याकरिता शिडाचा उपयोग करीत व पाण्याखालून जाण्याकरिता हातांनी चालणारा स्क्रू-प्रचालक असे.
अमेरिकेतील यादवी युद्धात १८६४ मध्ये दक्षिणेकडील राज्यांनी ‘हन्ली’ या नावाने बांधलेल्या (एच्. एल्. हन्ली यांनी आर्थिक साहाय्य दिलेल्या) पाणबुडीच्या साहाय्याने उत्तरेकडील राज्यांची ‘हूसटॉनिक’ ह्या नावाची युद्धनौका बुडविली. नाविक युद्धाच्या इतिहासातील पाणबुडीने बुडविलेली ही पहिलीच युद्धनौका होती.
स्वयंचलनक्षम पाणबुडी जॉन पी. हॉलंड या अमेरिकन तंत्रज्ञांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीस तयार केली. तीमध्ये सागराच्या पृष्ठभागावर प्रचालन करण्याकरिता पेट्रोल एंजिन आणि पाण्याखालील प्रचालनासाठी पुन्हा विद्युत् भारित करता येणाऱ्या विद्युत् घटांवर चालणाऱ्या चलित्रांचा (मोटरींचा) उपयोग केला होता. प़ृष्ठभागावर ही पाणबुडी ताशी १३ किमी. व पाण्यात ताशी ११ किमी. या वेगाने संचलन करू शकत असे. या पाणबुडीतील नतिनियंत्रक (पाणबुडीचा कल किंवा तोल नियंत्रित करणाऱ्या) टाक्यांपैकी एक पुढच्या भागात व एक मागच्या भागात बसविलेली होती. पूरक भार टाक्या मध्यभागात असत.
हॉलंड यांच्या पाणबुडीचा अभिकल्प (आराखडा) यशस्वी ठरल्याने ब्रिटिश आरमाराने १९०२ सालापासून या रचनेच्या पाणबुड्या बनविण्यास सुरुवात केली. रशिया, जर्मनी व जपान यांनीही अशा पाणबुड्या बनविल्या. या पाणबुड्या पाण्याखाली फार वेळ राहू शकत नसत. पाण्याखाली असताना या पाणबुडीतील हवा शुद्ध आहे की अशुद्ध आहे, हे ठरविण्यासाठी पांढऱ्या उंदरांचा उपयोग करीत असत. हे उंदीर मरू लागले की, हवा अशुद्ध आहे असे समजून पाणबुडी पृष्ठभागावर आणीत असत.
पहिल्या महायुद्धात पाणबुड्यांची बरीच झपाट्याने प्रगती झाली. त्यांना अटलांटिक महासागर पार करता येऊ लागला व पाण्याच्या पृष्टभागावर इतर नाविक जहाजांच्या बरोबरीने फिरता येऊ लागले. जर्मनीच्या यू-बोट या नावाने ओळखण्यात येणाऱ्या पाणबुड्यांनी युद्धाच्या सुरुवातीच्या काळात ब्रिटिश युद्धनौकांविरुद्ध स्पृहणीय कामगिरी केली होती परंतु वेगवगळ्या देशांच्या पाणबुड्यांना एकमेकांचा विशेष संहार करता येण्यापूर्वीच पहिल्या महायुद्धाचा शेवट झाला. यानंतर व्हर्सायच्या तहानुसार घातलेल्या बंदीला न जुमानता जर्मनीने अनेक पाणबुड्या बांधण्याचे काम सुरू केले. दुसऱ्या महायुद्धात मात्र पाणबुड्यांचा संहारासाठी निर्णायक उपयोग केला गेला. डीझेल एंजिनातील इंधनाच्या ज्वलनासाठी व वायुवीजनासाठी (हवा खेळती राहण्यासाठी) हवा पुरविणाऱ्या स्नॉर्कल (किंवा स्नॉर्ट) या साधनाचा जर्मनीत शोध लागल्यानंतर पाणबुडीत डिझेली एंजिनाचा वापर सुरू झाल्यावर पाणबुडीच्या कार्यक्षमतेत वाढ झाली, तथापि पाण्यात बुडाल्यावर या पाणबुडीला विद्युत् घटांचा उपयोग करावाच लागतो, तसेच तिचे स्थानही ओळखता येते हा तिचा तोटा आहे. संहत (विद्रावातील प्रमाण जास्त असलेले) हायड्रोजन पेरॉक्साइड पाण्यात मिसळल्यावर जी उष्णता निर्माण होते तिच्या साहाय्याने चालणाऱ्या वॉर टरबाइनाचा उपयोग पाणबुडीच्या प्रचालनासाठी करण्याचा प्रयत्न जर्मनीत करण्यात आला. हे टरबाइन जांगले कार्यक्षम असले, तरी खर्चाच्या दृष्टीने परवडण्यासारखे नव्हते. १९५५ सालानंतर प्रचारात आलेल्या आणवीय पाणबुडीत अणुशक्तीचा उपयोग केल्यामुळे तिला हवेची जरूरी लागत नाही व त्यामुळे या पाणबुड्या जरूर लागल्यास पाण्याखाली तीन वर्षांपर्यंत अखंडपणे राहू शकतात.
वर्गीकरण: मूलभूत लष्करी वा इतर कामगिरीनुसार पाणबुड्यांचे वर्गीकरण करता येते. आक्रमक पाणबुड्या या शीघ्र गतीने व दूरच्या अंतरावर जाऊ शकणाऱ्या असून शत्रूची मालवाहू जहाजे, नाविक जहाजे व पाणबुड्या ओळखण्यासाठी व त्यांचा नाश करण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो. या पाणबुड्यांवर सामान्यतः पाणतीर (टॉर्पेडो) ठेवलेले असतात परंतु काही पाणबुड्यांवर पाणसुरुंगही असून ते पाणतीरांच्या प्रक्षेपण नळ्यांतून सोडण्यात येतात. शत्रूच्या जहाजांचे स्थान ओळखण्यासाठी पाण्याखाली ध्वनीचे अभिज्ञान करणारी (अस्तित्व ओळखणारी) जटिल व संवेदनशील सोनार [⟶ सोनार व सोफार] यंत्रणा या पाणबुड्यांवर बसविलेली असते. प्रक्षेपणास्त्रयुक्त पाणबुडीवर दीर्घ पल्ल्याची व घन इंधनयुक्त प्रक्षेपणास्त्रे बसविलेली असून पाणबुडी पाण्याचा पृष्टभागाखाली असताना ती सोडता येतात. या प्रक्षेपणास्त्रांना संहारक अण्वस्त्रे जोडण्याची व्यवस्थाही असते. या पाणबुड्या त्यांचे अस्तित्व न ओळखले जाता अनेक दिवस पाण्याखाली राहू शकतात आणि ४,००० किमी. त्रिज्येच्या क्षेत्रातील कोणत्याही लक्ष्यावर त्या प्रक्षेपणास्त्र सोडू शकतात. पृष्ठभागावरील जहाजांतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी अथवा शत्रूच्या पाणबुड्यांचे अभिज्ञान व विनाश करण्याच्या नवनवीन पद्धतींचा विकास करण्यासाठी वेगळ्या लहान पाणबुड्या उपयोगात आणतात. पाणबुडीच्या कायेचा नवीन आकार, खोली नियंत्रक सामग्री, उच्च गतीकरिता नवीन शक्ती संयंत्रे इत्यादींची चाचणी घेण्यासाठी वेगळ्या प्रायोगिक पाणबुड्या बांधतात. संशोधनाकरिता वापरण्यात येणाऱ्या पाणबुड्या लहान, खोलवर जाणाऱ्या व मर्यादित क्षेत्रातच वावरणाऱ्या असतात. त्यांचा मुख्य उद्देश समुद्रतळाची खनिजे, वनस्पती, प्राणी इ. दृष्टीने अथवा महासागरवैज्ञानिक पाहणी करणे किंवा एखाद्या यंत्रसामग्रीची चाचणी करणे एवढाच असतो. या पाणबुड्यांचे आकारमान लहान असल्यामुळे व त्यांतील विद्युत् घटांची क्षमताही कमी असल्याने त्यांची क्षैतिज (क्षितिजसमांतर) पातळीतील हालचाल मर्यादितच असते व उभ्या पातळीतील त्यांची हालचाल गुरुत्वाकर्षण व उत्प्लावकता (उच्चालक प्रेरणा) यांवर अवलंबून असते. यामुळे या पाणबुड्या त्यांच्या कामाच्या ठिकाणी दुसऱ्या जहाजाच्या साहाय्याने वाहून न्याव्या लागतात किंवा ओढून न्याव्या लागतात [⟶ बॅथिस्कॅफ]. सागराचे सर्वंकष संशोधन करण्याकरिता पाण्यात खोलवर बुडी मारण्यासाठी लागणाऱ्या व्यक्तिगत सामग्रीचे वर्णन ‘सागरी निमज्जन साधने’ या नोंदीत दिले आहे.
डीझेल पाणबुडी: आ. २ मध्ये डीझेल पाणबुडीतील विविध मुख्य विभाग दाखविलेले आहेत. या विभागांचे वर्णन व कार्य खाली दिले आहे.
पाणतीर प्रक्षेपण कक्ष व पाणतीर भांडार: सहा किंवा अधिक पाणतीर प्रक्षेपण नळ्यांमध्ये असतात व राखीव सहा पाणतीर भांडारात असतात. काही पाणबुड्यांमध्ये मागल्या बाजूस आणि मधे अशीच प्रक्षेपणाची सोय असते. पाणबुडी बंदरात असताना पाणतीर भांडार विवरातील दरवाज्यातून नाविक आत वा बाहेर जातात. या दरवाजातून पाणतीर यारीच्या साहाय्याने भांडारात ठेवले जातात. हा कक्ष जलनिरोधी विभागक व दरवाजा यांमुळे इतर विभागांपासून अलग केलेला असतो.
सोनार: पाण्यातून प्रवास करीत असताना मार्गात येणारे अडथळे व इतर पाणबुड्या यांचा सुगावा या यंत्रणेने लागतो.
जलनिरोधी विभागक: हे विभागक पाच ठिकाणी बसविलेले असतात. त्यामुळे पाणबुडीच्या अंतर्भागात सहा कक्ष तयार होतात. त्यांतील दरवाजे जलनिरोधी असतात. त्यामुळे एखाद्या कक्षात पाणी आल्यास तो कक्ष इतरांपासून अलग करता येतो व इतर कक्षांत पाणी येत नाही. विभागकामुळे पाणबुडीच्या प्राकृतिक जलविरोधी नौकायेचे बल वाढते.
भोजन कक्ष: अधिकारी आणि नाविक यांचे भोजन गृह. यातच खाद्यपदार्थांचे भांडार समाविष्ट असते.
विद्युत् घट, विद्युत् चलित्रे व स्विच फलक: पुन्हा विद्युत् भारित करता येणारे विद्युत् घट तीन ठिकाणी ठेवलेले असतात. पाणबुडी पाण्यातून जात असताना हवेच्या अभावी डीझेल एंजिनावर चालू शकत नाही. त्या वेळी विद्युत् घटांच्या साहाय्याने चलित्रे वापरतात. दोन दंडांवर प्रचालक असतात. प्रत्येक दंडावर दोन दोन विद्युत् चलित्रे असतात. ही चलित्रे एकसरी पद्धतीने किंवा अनेकसरी पद्धतीने विद्युत् घटांना जोडता येतात. एकसरी पद्धतीने जोडल्यास वेग कमी असतो व अनेकसरी पद्धतीने जोडल्यास वेग जास्त असतो. जितका वेग जास्त असतो तितक्या लवकर विद्युत् घट उतरतात. एक प्रचालक चलित्रापासून विलग करून डीझेल एंजिनाने चलीत्र चालविल्यास त्याचा जनित्र (विद्युत् ऊर्जा उत्पन्न करणारा घटक) असा उपयोग होऊन विद्युत् घट भारित करता येतात. विद्युत् घट भारित करण्यासाठी मात्र पाणबुडीला पाण्याच्या पृष्ठभागावर यावे लागते. सर्व विद्युत् चलित्रांची मिळून शक्ती ३,००० किवॉ. पर्यंत असू शकते. ताशी ९ किमी. वेगाने विद्युत् घटांवर पाणबुडी ९० तास व ताशी ३० किमी. वेगाने १ तासच जाऊ शकते.
दारूगोळा भांडार: तोफा व विमानविरोधी तोफ यांना लागणारा दारूगोळा या ठिकाणी साठविला जातो.
भांडार : या भांडारामध्ये सर्वसाधारणपणे लागणारे अभियांत्रिकी सामान व हत्यारे असतात.
डीझेल एंजिन कक्ष: या ठिकाणी दोन डीझेल एंजिन संच असतात. त्यांची शक्ती पाणबुडीच्या टनभार वेगाप्रमाणे सु. १२,००० किवॉ. (१६,००० अश्वशक्ती) किंवा त्याहून अधिक असू शकते परंतु जसजशा मोठ्या पाणबुड्या बांधण्यात येत आहेत तसतशी एंजिनांची शक्तीही वाढत आहे. हा कक्ष इतर कक्षांपासून जलनिरोधी विभागकांनी अलग केलेला असतो. या कक्षातील विवर सर्वांत मोठे असते कारण एंजिने व एंजिनाचे भाग सहज बसविता व काढता यावे लागतात.
सुकाणू कक्ष: पाणबुडीची दिशा नियंत्रित करणाऱ्या सुकाणूचे संचालन या कक्षातून होते आणि त्यामुळे पाणबुडी इच्छित मार्गावर चालविता येते.
आडवे सुकाणू: पाणबुडीच्या बाहेरच्या दोन्ही बाजूंना पुढे व मागे आडव्या सुकाणूंची योजना केलेली असते. बुडी मारण्याकरिता किंवा पाण्यातून बाहेर येण्याकरिता त्यांचा उपयोग करतात.
बाह्य पाणतीर: पाणबुडीच्या बाह्य अंगावर तीन ठिकाणी काही पाणतीर ठेवण्याची सोय असते. बाह्य पाणतीर एकदा वापरल्यावर तेथील नळ्यांमध्ये पुन्हा पाणतीर घालता येत नाहीत.
सुरक्षा विमोचन विवरे: संकटकाळी ही उघडून पाणबुडीच्या बाहेर पडता येते.
तोफ: समुद्राच्या पृष्ठभागावर असताना स्वसंरक्षणासाठी व शत्रूवर हल्ला करण्याकरिता तोफ वापरतात. मालवाहू जहाजे बुडविण्यापूर्वी तोफगोळा उडवून शत्रूच्या जहाजास ताकीद देता येते.
विमानविरोधी तोफ: समुद्राच्या पृष्ठभागावर असताना हवाई हल्ल्यापासून संरक्षण करण्याकरिता या तोफेचा उपयोग होतो. इतर वेळी ही तोफ नौकायेच्या आत घेता येते.
परिदर्शक: पाणबुडी साधारण १० मी. खोल पाण्यात असताना पृष्ठभागावरील टेहळणी करण्याकरिता ⇨ परिदर्शकाचा उपयोग होतो. १० मी. खोल पाण्यात पाणबुडीच्या वरून सर्वसाधारणपणे इतर पृष्ठ भागावरील जहाजे जाऊ शकतात व त्या ठिकाणी बाहेरील पाण्यात शांतता असते. पाणबुडीत दोन परिदर्शक असतात. एक उच्च विवर्धन शक्तीचा आणि दुसरा नीच विवर्धन शक्तीचा असतो. उच्च विवर्धन शक्तीचा पारदर्शक द्विनेत्री असतो व त्याने लांब अंतरावरील टेहळणी करता येते. नीच विवर्धन शक्तीचा परिदर्शक हल्ल्यातील शेवटच्या टप्प्यात वापरतात.
दिशाशोधक: सागराच्या पृष्ठभागावर असताना पाणबुडीचे भौगोलिक स्थान ठरविण्याकरिता किनाऱ्यावरील विशिष्ट (कमीत कमी दोन) केंद्रांशी रेडिओ संदेशाद्वारा संपर्क साधाण्याच्या या यंत्रणेच्या साहाय्याने दिक्स्थिती मिळविता येते.
रडार: ज्या वेळी शक्य असेल तेव्हा विशेषतः रात्रीच्या वेळी आणि दृक्मर्यादा कमी असताना रडारचा उपयोग करून पृष्ठभागावर टेहळणी करता येते व सागरी रणांगणावरील वस्तुस्थिती समजते. रडारचा उपयोग करत असताना त्याचा आधारस्तंभ पाण्याबाहेर काढावा लागतो. त्यामुळे शत्रूच्या रडारला पाणबुडीचा ठावठिकाणा लागणे सोपे जाते.
टेहळणी मनोरा: समुद्राच्या पृष्ठभागावर असताना या मनोऱ्यावरून टेहळणी करता येते.
मुख्याधिकारी कक्ष: या ठिकाणी पाणबुडीच्या मुख्य अधिकाऱ्याची (कप्तानाची) बसण्याची जागा असते. तसेच या कक्षामध्ये परिदर्शक, रडार, मार्गनिर्देशन, अस्त्रक्षेपण इत्यादींची नियंत्रक उपकरणे असतात.
रचना: आ. ३ मध्ये पाणबुडीची सर्वसाधारण रचना दाखविलेली आहे. पाण्याचा दाब सहन करण्याच्या दृष्टीने पूर्ण गोल आकार सर्वांत उत्तम पण प्रत्यक्षात हे शक्य नसल्यामुळे दंडगोल (लांबोळक्या, सिगारच्या) आकाराचा उपयोग पाणबुडीच्या रचनेत करतात आणि दोन्ही टोकांना गोल घुमटाकर देतात.
पाणबुडीच्या नौकायेवर पाण्याचा दाब येतो व त्याकरिता तिच्या दंडगोल आकाराच्या आतील बाजूस दाबनिरोधी नौकाया असते. यामध्ये विभागक बसवून नौकायेस बल प्राप्त होते तसेच विभागक जलविरोधी असल्यामुळे प्रत्येक कक्ष इतर कक्षांपासून संकटसमयी बंद करता येतो. बाह्य नौकाया व अंतर्गत नौकाया यांच्या मधे पूरक भार टाक्या असतात. तळाला दोन कणे असतात व त्यांमधील जागेमध्ये डीझेल तेल आणि पाण्याच्या टाक्या असतात. अंतर्गत नौकायेमध्ये पुढील आणि मागील बाजूस नतिनियंत्रक पाण्याच्या टाक्या असतात. हवानळाचा (स्नॉर्कलचा) उपयोग करून १० मी. खोल पाण्यात पाणबुडी असताना डीझेल एंजिनाकरिता बाहेरील हवा कशी घेतली जाते, हे आकृतीमध्ये दाखविले आहे. हवा-नळाच्या वरच्या तोंडावर स्वयंचलित झडप असते व तीमुळे हवा-नळाचे वरचे तोंड पाण्याखाली गेल्याबरोबर झडप मिटते व पाणी आत येत नाही. हवा-नळ वापरात नसताना तो पाणबुडीच्या वरच्या बाजूला आडवा ठेवला जातो (१२). बाहेर पृष्ठभागावर असताना एंजिनाचा निष्कास-म्हणजे एंजिनातून बाहेर पडणारे वायू – (१३) या नळीतून हवेत जातो. क्लचमुळे डीझेल एंजिन व चलित्र आणि चलित्र व प्रचालक यांचा संबंध तोडता अथवा जोडता येतो.
पाण्यात बुडण्याची व परत पाण्याच्या बाहेर येण्याची प्रक्रिया: पाणबुडी पाण्याच्या पृष्ठभागाच्या खाली बुडण्याची प्रक्रिया आ. ४ मध्ये स्पष्ट केली आहे.
आडव्या सुकाणूंपैकी (१) हे मागील टोकाला व (२) हे पुढील टोकाला आहे. बुडण्याच्या सुरुवातीस पुढील आडवे सुकाणू तिरके केलेले असते आणि मागचे क्षैतिज स्थितीत असते. पाणबुडीच्या मध्यभागाच्या अनुप्रस्थ छेदामध्ये दाखविल्याप्रमाणे पूरक भार टाक्यांच्या वरील मुख्य झडपा या वेळी उघड्या असतात.टाक्यांच्या खालील बाजूस पाणी शिरण्याकरिता मोठी भोके असतात. टाक्यांमध्ये पाणी शिरू लागताच त्यांतील हवा वरच्या झडपांतून बाहेर बडू लागते. पूरक भार टाक्यांमध्ये पाणी आत घेतल्यामुळे पाणबुडी जड होते व ती पाण्यामध्ये बुडू लागते. त्या वेळी प्रचालकाने पाणबुडीस नेहमीच्या निम्म्याने गती दिली जाते. पुढील आडवे सुकाणू वळविल्यामुळे पाणबुडी पाण्यामध्ये तिरकी घुसते. घुसण्याचा कोन मागील आडव्या सुकाणूच्या साहाय्याने नियंत्रित करतात (आ. ४ आ). पाणबुडी पृष्टभागावर असताना मागील बाजूचे सुकाणू क्षैतिज स्थितीमध्ये असते व पुढील बाजूचे सुकाणू उभे ठेवतात. आ. ४ (इ) मध्ये (१, २ व ३) या ठिकाणी नतिनियंत्रक टाक्या दाबनिरोधी कायेमध्ये दाखविल्या आहेत. अपेक्षित खोलीवर पाणबुडी गेल्यावर नतिनियंत्रक टाक्यांतील पाण्याचे वजन नियंत्रित करून पाणबुडी क्षैतिज स्थितीत आणतात. या अवस्थेत दोन्ही आडवी सुकाणे क्षैतिज स्थितीत असून पूरक भार टाक्यांवरील झडपा बंद झालेल्या असतात. या अवस्थेत पाणबुडीचे वजन तिच्या भोवतालच्या पाण्याइतकेच होऊन ती मुक्तपणे पाण्याखाली तरंगू शकते.
आ. ५ मध्ये पाणबुडी पाण्यातून बाहेर येण्याची प्रक्रिया दाखविली आहे.
प्रत्येक पाणबुडीमध्ये संपीडित (दाबाखालील) हवेचे १८–२० हवाधारक (टाक्या) असतात. त्यांत हवेचा दाब २६०–२७० किग्रॅ./सेंमी.२ इतका असतो. पाणबुडी पाण्यातून बाहेर येण्याच्या प्रक्रियेतील पहिल्या अवस्थेत (आ. ५ अ) हवा-धारकांतील हवा पूरक भार टाक्यांच्या वरच्या भागात सोडली जाते. त्यामुळे पूरक भार टाक्यांच्या खालील भागात असलेल्या भोकांतून पाणी बाहेर फेकले जाते. पाणबुडी हलकी झाल्यामुळे ती पाण्याच्या पृष्ठभागाकडे यावयास सुरुवात होते. या वेळी तिची गती नेहमीच्या गतीच्या निम्म्याने असते. आडवी सुकाणे वापरून पाणबुडीचा वर येण्याचा कोन नियंत्रित केला जातो. टेहळणी मनोरा पृष्ठभागाच्या वर आल्यावर (आ. ५ आ) त्यातील दरवाजे उघडून बाहेरील वातावरणातील हवा आत घेतली जाते. त्यानंतर उच्च दाबयुक्त हवा-धारकातील हवा बंद केली जाते व नीच दाबाचा हवा – संपीडक (दाबयुक्त हवा देणारे साधन) चालू केला जातो व पूरक भार टाक्यांतून पाणी बाहेर टाकले जाते. आ. ५ (इ) मध्ये पाणबुडी पूर्णपणे पाण्याच्या वर आलेली दाखविली आहे. युद्धात वा अन्य कारणाने नुकसान पोहोचल्यामुळे पूरक भार टाक्यांतील पाणी उपसून टाकता आले नाही, तरी खोटे नौकातल (समुद्रतळाला घासून पाणबुडीच्या तळाला नुकसान पोहोचू नये म्हणून बसविलेला भाग) टाकून देऊन पाणबुडी पृष्ठभागावर येऊ शकते.
पाणतीर प्रक्षेपण पद्धत: ही पद्धत आ. ६ मध्ये दाखविली आहे.
प्रक्षेपण नळीमध्ये पाणतीर ठासून बसविलेला (१) ह्या ठिकाणी दाखविला आहे. या वेळी प्रक्षेपण नळीचा पुढील दरवाजा (४) बंद असून आतील दरवाजा उघडा असतो. पाणतीर प्रक्षेपण नळीमध्ये बसविल्यावर आतले दार बंद करून त्यात पाणबुडीतील टाक्यांमधील पाणी सोडले जाते. या पाण्याच्या दाबामुळे बाहेरील दरवाजा (४) उघडतो व समुद्राचे पाणी आत घुसून पाणबुडीचा तोल बिघडत नाही. संपीडित हवेने पाणतीराचे प्रक्षेपण केले जाते. संपीडित हवेच्या प्रक्षेपण टाकील पाणबुडीतील मुख्य साठ्यातून संपीडित हवा मिळते व दुसऱ्या पाणतीराच्या प्रक्षेपणाची तयारी केली जाते. पाणतीर प्रक्षेपण नळीतून बाहेर पडल्यावर समुद्राचे पाणी प्रक्षेपण नळीत घुसून ती पूर्णपणे पाण्याने भरते. तरीसुद्धा पाण्याचे वजन व पाणतीराचे वजन यांमध्ये फरक असल्यामुळे पाणबुडीचा तोल बिघडतो. त्याकरिता नतिनियंत्रक टाक्यांतील पाणी वापरून स्वयंचलित यंत्रणेने तोल संभाळला जातो. प्रक्षेपण नळीचा पुढचा दरवाजा बंद केला जातो व आतील पाणी संपीडित हवेने बाहेर फेकले जाते. अशा तऱ्हेने प्रक्षेपण नळीमध्ये दुसरा पाणतीर ठासण्याची तयारी केली जाते.
आतील हवेचे नियंत्रण: पाणबुडी पाण्यावर असेतोपर्यंत टेहळणी मनोऱ्यातून वातावरणातील हवा घेता येते परंतु पाण्याखाली बुडाल्यावर पाणबुडीत असलेल्या हवेच्या साठ्यावरच अवलंबून रहावे लागते. पाणबुडीमध्ये ८०–९० नाविक असतात. त्यांच्या उच्छ्वासातील कार्बन डाय-ऑक्साइड हवेत मिसळत असतो. त्यामुळे हवेतील कार्बन डाय-ऑक्साइडाचे प्रमाण वाढत जाते व नाविकांना त्रास व्हावयास लागतो. साधारणपणे पंधरा तासांपर्यंत त्रास होत नाही. याकरिता ऑक्सिजनाचे प्रमाण नेहमीपेक्षा जास्त असलेल्या संपीडित हवेचा उपयोग करतात. जलीय विच्छेदन (पाण्याच्या विक्रियेने रेणूचे तुकडे करण्याची क्रिया) करून ऑक्सिजन तयार करण्याची यंत्रणा पाणबुडीत असते, तसेच कार्बन डाय-ऑक्साइड शोषून घेण्याकरिता रासायनिक द्रव्ये असतात. विद्युत् घट भारित करण्याची क्रिया चालू असताना हायड्रोजन वायू तयार होतो. त्यामुळे आगीचा भडका उडण्याचा धोका असतो परंतु योग्य तऱ्हेने वायुवीजन केल्यास हा धोका टाळता येतो. समुद्रातील खारे पाणी व विद्युत् घटातील सल्फ्यूरिक अम्ल यांचा संयोग झाल्यास क्लोरीन वायू तयार होतो. वायुमुखवटा वापरून व योग्य वायुवीजन करून या वायूपासून संरक्षण करता येते. पाणबुडी मधुनमधून पाण्याच्या वर आणून हवेच्या साठ्याची पूर्ती करावी लागते.
धोकादायक वायूंचे मापन करण्याच्या उपकरणांच्याद्वारे त्यांच्या धोक्याची पूर्वसूनचा मिळू शकते. त्याप्रमाणेच आगलाव्या वायूंचे मापन केले जाते. अग्निरोधक व्यवस्थाही असते.
युद्धकाळात पाण्याखाली जास्त काळ रहावे लागल्यास पाणबुडीमध्ये पिण्याच्या पाण्याचे योग्य प्रमाणातच वाटप (रेशन) करावे लागते. ऊर्ध्वपातन क्रियेने (अशुद्ध पाण्याची वाफ करून व मग ती थंड करून शुद्ध पाणी मिळविण्याच्या क्रियेने) पिण्याचे पाणी तयार करण्याची उपकरणे असतात परंतु त्यांच्यापासून मर्यादित साठा मिळतो. म्हणून अशा वेळी अनावश्यक हालचाल, धूम्रपान यांवर बंदी घातली जाते.
आणवीय पाणबुडी: अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी आ. ७ मध्ये दाखविली आहे.
आणवीय पाणबुडीची व डीझेल पाणबुडीची सर्वसाधारण रचना सारखीच असते परंतु प्रचालनाकरिता डीझेल एंजिनाच्या ऐवजी अणुशक्ती वापरतात. १९५५ साली अमेरिकन नौदलाने ‘नॉटिलस’ नावाची अणुशक्तीवर चालणारी पहिली पाणबुडी तयार केली. आणवीय विक्रियकामध्ये (अणुभट्टीमध्ये) यूरेनियम (२३५) किंवा युरेनियम (२३८) ही द्रव्ये वापरतात [⟶ अणुकेंद्रीय अभियांत्रिकी]. युरेनियमाच्या अणुकेंद्राच्या भंजनामुळे (अणुकेंद्रीय फुटण्यामुळे) उष्णता निर्माण होते. ह्या उष्णतेचा उपयोग पाणी तापवून त्याची वाफ तयार करण्यासाठी करतात. उष्णता शोषकात पोलादी नळ्यांच्या वेटोळ्यातून उच्च दाबयुक्त पाणी खेळविलेले असते. प्राथमिक शीतकातील वेटोळ्यांमधील पाणी विक्रियकातील किरणोत्सर्गाने (भेदक कण वा किरण बाहेर पडण्याच्या क्रियेने) प्रभावित झालेले असते म्हणून त्याची वाफ टरबाइनामध्ये येत नाही. पाण्यावरील दाब उच्च असल्यामुळे त्याची वाफ होत नाही. या उच्च दाबयुक्त पाण्यातील उष्णतेने द्वितीयक शीतकातील वेटोळ्यांमधील पाण्याची वाफ करतात. वाफेवर चालणारे टरबाइन पाणबुडीच्या प्रचालकास जोडलेले असते. टरबाइनातून निष्कासित झालेल्या वाफेचे संघनकामध्ये (वाफेचे द्रवीकरण करणाऱ्या साधनात) पाणी केले जाते. पंपाच्या साहाय्याने हे संघनित पाणी पुन्हा वाफ करण्याकरिता वापरतात.
प्राथमिक व द्वितीयक शीतक निरनिराळ्या कक्षांत असतात. त्यामुळे टरबाइन कक्षात काम करणाऱ्यांना किरणोत्सर्गापासून त्रास होत नाही. आणवीय पाणबुडी पूर्णपणे वातानुकूलित असते. डीझेल एंजिनावर आणि विद्युत् घटांवर चालणारी यंत्रणाही या पाणबुडीत असल्यामुळे आणवीय यंत्रणा बंद पडल्यास पाणबुडीला पाण्याच्या पृष्ठभागावर येण्यास अडचण पडत नाही. आणवीय विक्रियकाला हवा लागत नसल्यामुळे ही पाणबुडी पाण्यात प्रदीर्घ काळ राहू शकते. नॉटिलस या आणवीय पाणबुडीने १९५८ साली उत्तर ध्रुवावरील बर्फाच्या खालून ३,००० किमी. प्रवास केला. १९६० साली ‘ट्रायटन’ या आणवीय पाणबुडीने सर्वकाळ पाण्यात राहून इ. स. १५१९–२२ मध्ये फर्डिनंड मॅगेलन यांनी ज्या मार्गाने पृथ्वीप्रदक्षिणा केली होती त्याच मार्गाने पृथ्वीप्रदक्षिणा केली. १९६० साली अमेरिकन नौदलाने ‘पोलॅरीस’ पाणबुड्या तयार केल्या. त्यांमध्ये आणवीय प्रक्षेपणास्त्रे असल्यामुळे आणवीय पाणबुडी हे एक अतिशय प्रभावशाली युद्ध साधन बनले आहे. तसेच या पाणबुड्यांच्या साहाय्याने पाण्यातून जाऊन पूर्णपणे पाण्याखाली राहून शत्रूच्या प्रदेशावर हल्ला करता येतो, हा त्यांचा आणखी एक विशेष होय [⟶ अणुकेंद्रीय परिचालन].
संदेशवहन व्यवस्था: पाणबुडीला नौदल प्रमुख, पाणबुडीतळ व सागरी किनारा कार्यालय यांच्याशी रेडिओद्वारा संबंध ठेवावा लागतो. यासाठी अतिनीच व परानीच कंप्रता प्रेषक व ग्राही इलेक्ट्रॉनीय उपकरणे पाणबुडीत असतात. उच्च कंप्रता प्रेषक व ग्राही उपकरणेही पाणबुडीत असतात. शत्रूच्या पाणबुड्यांना व नौदलाला वा मधेच संदेशग्रहण करणाऱ्या रेडिओ यंत्रणेला सुगावा न लागू देण्याची काळजी घ्यावी लागते. नाहीतर शत्रूच्या आक्रमक पाणबुड्यांना कार्यान्वित होण्यास व पाणबुडीविरोधी कारवाया करण्यास सुलभ होते.
मार्गनिर्देशन: विस्तीर्ण सागरी क्षेत्रात पाण्यातून व पाण्याबाहेरून प्रवास करताना पाणबुडीला मार्गनिर्देशन व स्थाननिर्देशन यांकरिता निरूढी निर्देशन पद्धतीचा वापर करावा लागतो. यांशिवाय अतिनीच किंवा परानीच कंप्रता प्रेषकांद्वारे सागरातील भौगोलिक स्थान निश्चित करता येते [⟶ मार्गनिर्देशन]. प्रक्षेपणास्त्रे सोडण्यापूर्वी सागरी पृष्ठाशी पाणबुडीची अनुप्रस्थता व उदग्रप्रतलता (उभ्यव आडव्या अक्षांतील स्थिरता) तंतोतंत ठेवावी लागते. यासाठी ⇨ घूर्णी तत्त्वांवर आधारलेले उपकरण असते. पाणतीर व लघुपल्ल्याच्या प्रक्षेपणास्त्रांना मार्गनिर्देशन करण्याची व्यवस्था असतेच. पाणतीरामध्ये सोनार असल्याने त्याला युद्धनौकांच्या प्रचालकांच्या आवाजाचा वेध घेऊन स्वयंमार्गनिर्देशन मिळते.
बचाव : अपघातामुळे किंवा युद्धात पाणबुडीस पाण्यातून वर येणे अशक्य झाल्यास आत अडकलेल्या कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी मुख्यतः दोन पद्धतींचा अवलंब केला जातो. प्रत्येक पाणबुडीत एक पुढे व एक मागे याप्रमाणे दोन बचाव अक्ष असतात. या कक्षांत जाण्यासाठी व तेथून पाणबुडीच्या बाहेर जाण्यासाठी जलनिरोधी दरवाजे असतात. पहिल्या पद्धतीत दोन-तीन कर्मचाऱ्याना बचाव मुखवटे लावून या कक्षांत सोडतात. आतील दरवाजा बंद करून कक्षात पाणी सोडतात. नंतर कर्मचारी कक्षातून पाणबुडीच्या बाहेर पडण्याचा दरवाजा उघडून जलपृष्ठावर जातात. बचाव कक्षाचा बाहेरील दरवाजा पाणबुडीच्या आतून लांब अंतरावरून बंद करता येतो. तो बंद केल्यावर कक्षातील पाणी काढून टाकून परत कर्मचाऱ्यांचा दुसरा गट बचाव कक्षात सोडतात. बाहेर पडताना वापरावयाच्या मुखवट्यास डेव्हिस पाणबुडी सुरक्षा उपकरण म्हणतात. यात उच्छ्वसित कार्बन डाय-ऑक्साइड शोषून घेण्याची व ऑक्सिजनाच्या पुरवण्याची सोय असते. फार खोलीवरील पाण्याचा दाब लक्षात घेता ४५-६० मी. पेक्षा जास्त खोलीवर बुडालेल्या पाणबुडीतील कर्मचाऱ्यांचा बचाव या पद्धतीने करणे जवळजवळ अशक्य असते. अशा परिस्थितीत दुसऱ्या पद्धतीचा अवलंब होऊ शकतो. या पद्धतीत बुडालेल्या पाणबुडीच्या दरवाजावर एक खास तयार केलेला कक्ष (डायव्हिंग बेल) बसविण्यात येतो. पाणबुडीचा बचाव दरवाजा व त्यावर बसविलेल्या कक्षाचा दरवाजा हे दोन्ही उघडून पाणबुडीतील ८–१० कर्मचाऱ्यांना बाह्य कक्षात घेण्यात येते. दोन्ही दरवाजे बंद केल्यावर बाह्य कक्ष यारीच्या साहाय्याने उचलून घेऊन वाचविलेल्या कर्मचारी गटाला जलपृष्ठावर आणण्यात येते. पाणबुडी समुद्रतळावर सरळ विसावली असेल, तरच या पद्धतीचा अवलंब करता येतो. ती कलती विसावलेली असेल, तर तिच्यावर बाह्य कक्ष बसविणे अवघड जाते.
बुडालेली पाणबुडी कोठे आहे हे शोधता येण्यासाठी पाणबुडीतून तरंगणारे दर्शक बोयरे बाहेर ढकलण्यात येतात. त्यांना अंधारात चमकणारा रंग दिलेला असून त्यांना सु. १८० मी. लांबीची तार जोडलेली असते. या बोयऱ्यांवर मिचकणारा (ठराविक कालावधीने चमकणारा) दिवा, लाल बावटा, बिनतारी प्रेषक इ. सामग्री बसविलेली असते.
पहा : पाणतीर बॅथिस्कॅफ.
संदर्भ : 1. Blackman, R., Ed. Jane’s Fighting Ships, London, (Annually).
2. Kemp. P. K. H. M. Submarines, London, 1952.
3. Lipscomb, F. W. The British Submarine, London, 1954.
4. Polmar, N. Atomic Submarines, Princeton, 1963.
5. Rush, C. W. and others, The Complete Book of Submarines, Cleveland, 1958.
इनामदार, य. न. सप्रे, गो. वि.
“