पाणतीर: शत्रूच्या नौकांची हानी करणारे विध्वंसक साधन, पाणतीर हा शब्द ‘टॉर्पेडो’ या इंग्रजी शब्दाचा पर्याय आहे. टॉप्रेडो म्हणजेच क्रँप नावाचा मासा. हा मासा भक्ष्याला विजेप्रमाणे धक्के देऊन गलितगात्र करतो. त्यावरून एकोणिसाव्या शतकात दारूस्फोटाने जहाजांचा नाश करणाऱ्या कोणत्याही उपकरणास ‘टॉर्पेडो’ म्हणण्याचा प्रघात पडला. १८७० नंतर मात्र नौकाविध्वंसन करणाऱ्या स्वयंचलित उपकरणासच पाणतीर हे नाव रूढ झाले. सोळाव्या शतकापासून नौकायेच्या मर्मभागावर म्हणजे तिच्या पाण्याखाली बुडालेल्या भागावर आघात करून नौकेला कसे बुडविता येईल याचे संशोधन चालू होते. त्यातूनच पाणसुरुंगाचा शोध लागला. तथापि पाणसुरुंग हा संरक्षणासाठी ठीक होता परंतु पाणसुरुंगाजवळ जहाज आले, तरच पाणसुरंग उपयोगी ठरत. त्यामुळे शत्रूच्या नौकांचा पाठलाग करून त्यांनी केलेल्या तोफांच्या माऱ्यात न सापडता त्यांना कसे बुडवावे, हा यक्षप्रश्न शिल्लकच राहिला. १८४८ साली ऑस्ट्रियाचे फ्रांट्स पफायफर व योहान ऊर्फ लूपिस यांना स्वयंचलित पाणतीराची कल्पना सुचली. या कल्पनेचा पाठपुरावा करून रॉबर्ट ह्वाइटहेड या स्कॉटिश अभियंत्याने पाणतीराला मूर्तरूप दिले. हा प्रारंभीचा पाणतीर ४·५ मी. लांब ३५ सेंमी. व्यासाचा, ९ किग्रॅ स्फोटक पदार्थ असलेला व सु. १३९ किंग्रॅ. वजनाचा होता. तथापि पाण्याखालील सदोष स्वयंचलन व पर्यटनखोली यामुळे हा प्रारंभीचा पाणतीर विश्वासार्ह नव्हता. याच पाणतीराला ‘मासा’ किंवा ‘लोकोमोटिव्ह’ असे म्हणत. पूर्वींच्या नौकांकडून खेचून नेल्या जाणाऱ्या किंवा नौकांवरील आडव्या बांबूवर खाली टांगलेल्या पाणतीरापेक्षा हा लोकोमोटिव्ह पाणतीर अधिक परिणामकारक होता. एकाच आसावर एकमेकांच्या उलटसुलट फिरणारे दोन परिचालक व जलांतर्गत खोली-नियंत्रक बसविल्यामुळे लोकोमोटिव्ह पाणतीरामध्ये काही दोष दिसून आले परंतु १८९० साली घूर्णी यंत्राचा शोध लागल्यामुळे पाणतीराच्या रचनेत सुधारणा झाल्या. तथापि मारा अचूक व परिणामकारक होण्यासाठी शत्रूच्या नौकेजवळ (सु. २५ ते २६ मीटर) जाणे भाग पडे. १८९० सालच्या अखेरीस १५० किंग्रॅ. स्फोटक, सु. १,००० मी. पल्ला असलेले व दर तासाला ३० नॉट वेगाने जाणारे पाणतीर बनू लागले. तसेच जलपृष्ठाखालूनही पाणतीर सोडता येऊ लागले, परिणामतः पाणतीर अत्यंत धोकादायक अस्त्र ठरले. पाणबुड्या खात्रीच्या नसल्यामुळे वेगवान पाणतीर-नौका प्रचारात आल्या. तथापि तुफानी समुद्रावर त्या २० टनी पाणतीर-नौका निकामी ठरल्याने त्यांना मोठ्या नौकांवर ठेवून हल्ल्याच्या वेळी समुद्रावर सोडत. तरीपण भर लढाईत त्यांना परत नौकांवर घेण्याचा प्रश्न सुटला नाही. ब्रिटिशांनी ३० मी. लांबीच्या व १९ नॉट वेगाच्या पाणतीर-नौका बांधण्यात आघाडी मारली. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी लॅटिन अमेरिकेत चिली व ब्राझील या राष्ट्रांत झालेल्या बंडात पाणतीरांनी महत्त्वाची कामगिरी बजाविली होती. पाणतीर-नौकांना शह देण्यासाठी तीव्र वेगाच्या व पाणतीर आणि तोफा असलेल्या नौकांचा म्हणजे ⇨ विनाशिकांचा उदय झाला. पहिल्या महायुद्धापूर्वी भारी युद्धनौकांची बांधणी सुरू झाली. त्यामुळे भारी युद्धनौकांना बुडविण्यासाठी पाणतीरांची विध्वंसक शक्ती आणि त्यांचा पल्ला वाढविणे आवश्यक ठरले. १९०५ पर्यंत ४५ सेंमी. व्यास, ४,००० मी. पल्ला व १९ ते ३३ नॉट वेगाचे पाणतीर वापरात आले. साहिजिकच आरमारांना नौका-नौकांमधील अंतर वाढवावे लागले. नौकायेत एकाऐवजी दोन तळ व जलपृष्ठरेषेपाशी पाणतीरविरोधी उभार (अँटी टॉर्पेडो बल्ज) बांधण्याची प्रथा पडली. पहिल्या महायुद्धात ३५ सेंमी. व्यासाच्या आणि सु. ४०० किग्रॅ. वजनाच्या पाणतीरांना विमानातून सोडणे शक्य झाले. विसाव्या शतकाच्या आरंभी पाणबुडी ही भरवशाची नौका ठरली आणि तिच्यातून पाणतीर सोडणेही शक्य झाले. सागरपृष्ठावरील नौका, पाणबुडी व विमान यांतून पाणतीर डागणे शक्य झाल्यामुळे सागरी युद्धतंत्रात क्रांतीकारक बदल झाले. पाणतीरांच्या भीतीने पहिल्या महायुद्धात सागरी लढाया कधीही निर्णायकपणे झाल्या नाहीत. व्यापारी जहाजांना बुडविण्यासाठी पाणतीरांचा प्रामुख्याने वापर केला जाई. दुसऱ्या महायुद्धापूर्वी जपानने पाणतीराच्या क्षेत्रात उत्तम प्रगती केली. जपानच्या पाणतीराची एंजिने ऑक्सिजनवर चालत असल्यामुळे जलपृष्ठावर पाण्याचे बुडबुडे दिसत नसत. त्यांचा पल्ला २१ किमी. ते ४० किमी. व वेग दर ताशी ३६ ते ४९ नॉट असे. ५०० किग्रॅ. वजनाचे स्फोटक त्यांत असे. दुसऱ्या महायुद्धात जर्मनांनी नॅट ऊर्फ रेन नावाचे परिचालकाच्या आवाजाचा मागोवा घेत शत्रूनौकेवर आदळणारे लक्ष्यानुगामी (होमिंग) पाणतीर तयार केले. लक्ष्यानुगामी पाणतीरांना फसविण्यासाठी दोस्त राष्ट्र नौकांच्या अवतीभवती कृत्रिम नाद-निर्माणक (फॉक्सर) सोडत असत. दुसऱ्या महायुद्धानंतर अणुशक्ती, द्रव व घन परिचालक द्रव्ये आणि अणुस्फोटक यांचा अनुक्रमे युद्धनौकांचे परिचालन, अस्त्रांचे परिचालन व संहारशीर्षे यांकडे उपयोग होऊ लागला. सध्याही पारंपरिक नौकापरिचालन पद्धती प्रचारात असल्या, तरी पाणतीर क्षेपणाच्या व स्फोटाच्या ज्या तीन पद्धती प्रचलित आहेत त्या अशा : (१) या प्रकारातील पाणतीर पाणबुडीपासून शत्रुनौकेपर्यंत पर्यटन करतात आणि नंतर ते पाण्याखाली येतात व त्यांचा स्फोट होतो (२) या प्रकारातील पाणतीर काही वेळ पाण्यात असतात. नंतर ते पाण्याबाहेर येतात. त्यानंतर हवेत पर्यटन करतात व शेवटी ते पाण्यात सूर मारून शत्रूच्यां नौकेजवळ आदळून त्यांचा स्फोट होतो व (३) या प्रकारातील पाणतीर काही वेळ हवेतून पर्यटन करतात. नंतर ते शत्रूच्या नौकेजवळ पाण्यात सूर मारतात व त्यांचा स्फोट होतो. याशिवाय आणखीही काही मिश्र पद्धती आहेत. अणुबाँब किंवा महास्फोटके हे संहारद्रव्य अद्ययावत पाणतीरांत वापरले जाते. पाणतीरांचे पाणबुडीनाशक, जलपृष्ठनौकानाशक आणि उभयनाशक असे तीन प्रकार आहेत. लक्ष्याचा शोध व मागोवा घेऊन नंतर स्फोट घडवून आणणे, या सर्व क्रिया गणकयंत्राने केल्या जातात. अणुशक्तीवर चालणाऱ्या काही दूरगामी पाणबुड्यांतून हजारो किमी. अंतर असलेल्या भूप्रदेशावरील लक्ष्यांचा नाश करू शकणारी आंतरखंडीय प्रक्षेपणास्त्रासारखी अण्वस्त्रे अमेरिका व रशिया या देशांकडे आहेत. ही अस्त्रे पाण्यातून हवेत सोडली जातात किंवा ज्यांचा सर्व प्रवास हजारो किमी. पाण्यातूनच होतो, अशीही अस्त्रे तयार करण्यात आली आहेत. पाणतीरापासून बचाव करण्यासाठी पाणबुडी किंवा युद्धनौका यांनाच बुडविणे श्रेयस्कर ठरते.
पहा : पाणबुडी युद्धनौका.
संदर्भ : 1. Morris, E. & Others, Weapons & Warfare of the 20th Century, London, 1976.
2. Pretty, R. T. & Archer, D. H. Jane’s Weapon Systems: 1973-74, London, 1974.
दीक्षित, हे. वि.
“