पाठशाला : पाठ म्हणजे शिक्षण. शिक्षण देणारी संस्था म्हणजे पाठशाला विशेषतः संस्कृत विद्येचे शिक्षण देणारे विद्यालय म्हणजे पाठशाला होय. वेदपाठशाला, शास्त्रपाठशाला, वेदशास्त्रपाठशाला अशा प्रकारच्या शिक्षणसंस्था वेदकाळापासून ब्रिटिश राज्याच्या अखेरपर्यंत भारताच्या नगरांमध्ये आणि तीर्थक्षेत्रांमध्ये कमीजास्त प्रमाणात चालू होत्या. त्यांची संख्या आता कमी होऊ लागली आहे. या पाठशालांना वेदकाली गुरुकुल किंवा आचार्यकुल असे म्हणत. एक किंवा अनेक गुरू वा आचार्य पाठशाला चालवत असत. फार प्राचीन काली पाठशालेच्या प्रमुख आचार्याला कुलपतीही म्हणत. पाठ हा शब्द मूळच्या अर्थाने पठन किंवा पठन करण्याचा विषय याचा बोधक आहे. वेद किंवा इतर संस्कृत ग्रंथ स्पष्ट व शुद्ध स्वरूपात शिष्याकडून गुरूने म्हणवून घेणे, हा या शिक्षणपद्धतीतील कार्यक्रमाचा पहिला व मुख्य भाग होय. शिष्य हा पठक म्हणजे पठन करणारा व गुरू पाठक म्हणजे पठन करवून घेणारा. वेदाचा शुद्ध आणि स्पष्ट उच्चार करण्याची आवश्यकता वेदोत्तर काली भासत होती आणि संस्कृत भाषा ही लोकप्रचारातून गेल्यावर ही आवश्यकता अधिकच भासू लागली म्हणून पठनाला खूप महत्त्व आले.
वेद, स्मृती, पुराणे, काव्ये, धर्मशास्त्र, व्याकरण, ज्योतिष, षड्दर्शने आणि बौद्ध व जैन यांचे धर्मग्रंथ यांचे अध्यापन पाठशालांमध्ये चालत असे. संस्कृतबरोबर प्राकृत भाषेचेही अध्ययन – अध्यापन चालत असे. आधुनिक विद्यापीठांसारख्याही मोठमोठ्या शिक्षणसंस्था बुद्धोत्तर काली भारतात शेकडो वर्षे चालू होत्या. राजेरजवाड्यांकडून आणि सामान्य जनांकडून लहानमोठ्या पाठशाला आणि विद्यापीठे यांना तात्पुरत्या किंवा स्थिर स्वरूपाच्या देणग्या मिळत. मोठ्या प्रमाणातील विद्यापीठे मुसलमानी आक्रमणांपासून बंद पडली परंतु मध्यम व लहान प्रमाणातील विद्यालये आणि पाठशाला आतापर्यंत चालू राहिल्या. खाजगी रीतीने व्यक्तिशः वैदिक, याज्ञिक, शास्त्री-पंड़ित, मठपती व महंत स्वतःच्या हिमतीवर व सामान्य जन आणि श्रीमंत वर्गाच्या पाठिंब्यावर प्राचीन काळी व मध्ययुगात खाजगी पाठशाला चालवीत राहिल्यामुळे या देशात कितीही राजकीय व सामाजिक घडामोडी झाल्या, तरी परंपरागत विद्यांचे आणि ग्रंथांचे रक्षण झाले प्राचीन बौद्धिक संस्कृती सुरक्षित राहिली. काशी, प्रयाग, नासिक, पैठण, कांची, त्रिवेंद्रम इ. तीर्थक्षेत्रांत वा शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य इ. आचार्यांच्या व महंतांच्या मठांमध्ये पाठशाला आतापर्यंत चालू राहिल्या. इंदूर, बडोदे, दरभंगा, नवद्वीप, कोचीन, पुणे, सांगली इ. ठिकाणी राजांच्या, सरदारांच्या व श्रीमंतांच्या आश्रयाखाली किंवा स्वतंत्रपणे पाठशाला आतापर्यंत चालू होत्या.
या पाठशालांचे वैशिष्ट्य असे : विद्यार्ध्यांना मोफत शिक्षण दिले जाई. शक्य असल्यास विद्यार्थ्यांच्या निवास, भोजन, वस्त्रपात्र इ. गोष्टींचीही मोफत सोय होई. गुरूने विनामूल्य शिकविणे हा धर्म मानल्यामुळे गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत नसे.
एक किंवा अधिक विषयांचा विद्वान, कमीजास्त कितीही विद्यार्थी मिळोत, पाठशाला चालवीत असे. एक विद्वान, एक पाठशाला, अशाही पाठशाला चालत असत. ज्या विद्यार्थ्यांची चांगली प्रगती झालेली असे, ते विद्यार्थी प्राथमिक विद्यार्थ्यांना मुख्य गुरूच्या आधिपत्याखाली वा देखरेखीखाली शिकवीत असत. त्यामुळे त्या त्या विषयात प्रगत झालेल्या विद्यार्थ्यांना शिकविण्याकरता मुख्य गुरूला अधिक वेळ मिळत असे. काही विद्यार्थी शिक्षण पूर्ण झाल्यावर स्नातक म्हणून गुरूपाशी राहत त्यामुळे पाठशालेचा विस्तारही होत असे. उदा., वाईची प्राज्ञ पाठशाला जेव्हा विशेष जोमाने चालू लागली, तेव्हा ब्रह्मीभूत केवलानंदसरस्वती (नारायणशास्त्री मराठे) यांच्याच अनेक स्नातक शिष्यांनी प्राज्ञ पाठशालेचा विस्तार केला.
संस्कृतचे प्राथमिक शिक्षण झाल्यावर विद्यार्थिवर्ग एकत्र बसून गुरूने दिलेला पाठच आळीपाळीने एकमेकांना शिकवत. अर्थात या बाबतीत सक्ती नसे. अगोदर शिकलेल्या पाठांच्या आवृत्तीस चिंतनिका म्हणतात. झालेल्या विषयाच्या पुन्हापुन्हा केलेल्या अध्ययनास स्वाध्याय म्हणतात. गुरूपाशी जो पाठ घ्यावयाचा असतो. तो पाठ घेण्यापूर्वी त्या पाठाचे वाचन व चिंतन यांस पूर्वावलोकन म्हणतात. आठवड्यातून किंवा काही नियमित अशा कालखंडाच्या अंतराच्या नेमलेल्या दिवशी झालेल्या विषयाची उजळणी होण्याकरता सभा भरत असे. त्यात गुरूच्या अध्यक्षतेखाली चर्चा होत असे. नुसते वेदपठन करणारे विद्यार्थी असत त्यांच्या पठनाच्या स्पर्धा चालायच्या आणि जे शास्त्राभ्यासी विद्यार्थी असत, त्यांच्या वादी व प्रतिवादी या नात्याने पूर्वपक्ष व उत्तरपक्ष आलटून पालटून मांडण्याऱ्या विद्यार्थांच्या स्पर्धा चालत. काव्य शिकणारे विद्यार्थी कालिदासादी कवींचे श्लोक घेऊन त्या श्लोकांच्या गुणदोषांची चर्चा करीत. व्याकरण, न्याय, वेदान्तादी विषयांवर साधकबाधक असा विचारविनिमय होत असे. यास वाद म्हणतात. वादाने विषयाच्या ज्ञानाची खोली व तेज वाढत असे. मनुस्मृतीत म्हटले आहे, की बुद्धीची वृद्धी होण्याकरता शास्त्रांचे नित्य अवलोकन करावे. हे अवलोकन अशा चर्चेत होत असे आणि अशा या चर्चेत तयार झालेले वैदिक व पंडित निरनिराळ्या विद्यापीठांत जाऊन विजय मिळविण्याची आकांक्षा बाळगीत.
पहा : तक्षशिला विद्यापीठ नालंदा विद्यापीठ भारत (शिक्षणव्यवस्था) वलभी विद्यापीठ विक्रमशिला विद्यापीठ.
जोशी, लक्ष्मणशास्त्री