पाठक, रामानारायण विश्वनाथ: (८ एप्रिल १८८७ – २१ ऑगस्ट १९५५). प्रसिद्ध गुजराती साहित्यसमीक्षक, कवी, कथाकार व निबंधकार. ‘शेष’, ‘द्विरेफ’ व ‘स्वैरविहारी’ ह्या टोपण नावांनी त्यांनी अनुक्रमे काव्य, कथा व लघुनिबंधलेखन केले असले, तरी ते लघुकथेचे एक प्रवर्तक व समीक्षक म्हणूनच गुजराती साहित्यात विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म अहमदाबाद जिल्ह्यातील गानोल या गावी झाला. शिक्षण मुंबई विद्यापीठात बी. ए., एल्एल्.बी. पर्यंत झाले. सुरुवातीस काही काळ त्यांनी वकिली व्यवसाय केला तथापि वकिलीत त्यांचे मन रमू शकले नाही आणि ते प्राध्यापक झाले. तत्त्वज्ञान हा त्यांचा मुख्य विषय होता त्यामुळे प्रमाणशास्त्रप्रवेशिका (१९२२) सारखे ग्रंथ त्यांनी सुरुवातीला लिहिले.
आपल्या चिंतनशील वृत्तीतून गुजराती साहित्यात अनेक दर्जेदार ललित व वैचारिक ग्रंथांची त्यांनी भर घातली. संस्कृत काव्यसिद्धांत आणि पाश्चात्त्य कलातत्त्वे यांचा त्यांच्या समीक्षेत सुरेख समन्वय साधलेला दिसतो. काव्यशास्त्राच्या अनेक मूलभूत प्रश्नांचे मौलिक विश्लेषण विवरण करणारे त्यांचे साहित्य विमर्श (१९३९), काव्यनी शक्ति (१९३९), आलोचना (१९४४), आकलन, मनोविहार (१९५६) इ. ग्रंथ होत. यांशिवाय अर्वाचीन गुजराती काव्यसाहित्य (१९३३), नर्मद : अर्वाचीन गद्यपद्यनो आद्य प्रणेता (१९४५), प्राचीन गुजराती छंदो : ऐतिहासिक आलोचन (१९४८), बृहत्पिंगळ (१९५५) इ. त्यांचे ग्रंथही मौलिक स्वरूपाचे असून गुजराती साहित्यात ते विशेष महत्त्वाचे मानले जातात. तर्कशुद्ध व शास्त्रीय विवेचन, सुस्पष्ट व सरल प्रतिपादन आणि समतोल विचार हे त्यांच्या समीक्षालेखनाचे विशेष होत. त्यांच्या समीक्षेने गुजराती समीक्षेला नवे वळण लागले. शेषनाँ काव्यो (१९३९) व विशेष काव्यो (१९५९) हे त्यांचे काव्यसंग्रह होत. भावनेपेक्षा बौद्धिक चमत्कृती त्यांच्या काव्यात विशेषत्वे जाणवते. त्यांनी लिहिलेल्या कथा द्विरेफनी वातो (३ भाग–१९२९, १९३४ व १९४२) नावाने संगृहीत आहेत. तंत्राच्या दृष्टीने त्यांच्या कथा महत्त्वाच्या असून गुजराती कथेच्या विकासात ‘धूमकेतूं’ च्या प्रमाणेच पाठकांच्या कथांनाही महत्त्वाचे स्थान आहे. ‘मुकुंदराय’, ‘जक्षणी’, ‘खेमी’, ‘उत्तरापथनो लोप’, ‘बुद्धिविजय’, ‘सौभाग्यवती’ इ. त्यांच्या कथा विशेष उल्लेखनीय होत. जीवनाचे सखोल आणि मार्मिक दर्शन त्यांच्या ह्या कथांतून घडते. त्यांची शैली सरळ व प्रसन्न आहे. गुजरातीत कथाकार म्हणून पाठकांचे स्थान धूमकेतूंच्या खालोखाल आहे.
त्यांनी केलेले विनोदी निबंधलेखन स्वैरविहार (२ भाग – १९३१, १९३८) नावाने संगृहीत आहे. मानवी स्वभावातील विसंगतींचा मार्मिक व चोखंदळ वेध त्यांनी यात घेतल्याचे दिसते. त्यांच्या सूक्ष्म, सदभिरुचिसंपन्न व चिंतनशील विनोदवृत्तीचे विलोभनीय दर्शन ह्या निबंधांतून घडते. अनेक वर्षे ते प्रस्थान ह्या मासिकाचे संपादक होते आणि ह्या मासिकातूनच त्यांनी आपले विनोदी निबंधलेखन केले.
प्राचीन गुजराती छंदो ह्या त्यांच्या ग्रंथास ‘कांटावाला पारितोषिक’ तसेच त्यांच्या बृहत्पिंगळ ह्या छंदःशास्त्रावरील ग्रंथास १९५६ मध्ये साहित्य अकादेमीपुरस्कार लाभला.
पेंडसे, सु. न.
“