पाटील, शंकर: (८ ऑगस्ट १९२६ – ). सुप्रसिद्ध मराठी कथाकार. संपूर्ण नाव शंकर बाबाजी पाटील. जन्म हातकणंगले तालुक्यातील (जि. कोल्हापूर) पट्टण–कोडोली येथे. शिक्षण तारदाळ (ता. हातकणंगले), गडहिंग्लज व कोल्हापूर येथे बी.ए.बी.टी.पर्यंत. रयत शिक्षण संस्थेच्या शाळांतून अध्यापन. त्यानंतर आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर त्यांची नियु्क्ती झाली (१९५७). १९५९ मध्ये एशिया फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळवून ग्रामजीवनाचा अभ्यास केला आणि त्यावर त्यांनी टारफुला (१९६४) ही कादंबरी लिहिली. १९६० ते १९६८ या काळात त्यांच्या कथालेखनाला बहर आला. ग. वि. अकोलकर, ग. प्र. प्रधान यांच्या सहकार्याने इयत्ता ८ वी ते १० वी साठी ‘साहित्य सरिता’ या वाचनमालेचे संपादन केले (१९६८). महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळात मराठी भाषा विषयासाठी विशेष अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १९७२ पासून मराठीशिवाय अन्य सहा भाषांतील पाठ्यपुस्तकांसाठी विद्यासचिव म्हणून नियुक्ती.

पाटलांचा पहिला कथासंग्रह वळीव १९५७ मध्ये प्रसिद्ध झाला. नंतर भेटीगाठी (१९६०), आभाळ (१९६१), धिंड (१९६२), ऊन (१९६३) , वावरी शेंग (१९६३), खुळ्याची चावडी (१९६४), पाहुणी (१९६७), फक्कड गोष्टी (१९७३), खेळखंडोबा (१९७४), ताजमहालमध्ये सरपंच (१९७७) इ. कथासंग्रह प्रसिद्ध झाले. वळीव  ते ऊनपर्यंत त्यांच्या प्रत्येक कथासंग्रहाला त्या वर्षातील उत्तम कथासंग्रह म्हणून महाराष्ट्र राज्याची परितोषिके मिळाली. निवडक शंकर पाटील (१९६६) हा त्यांच्या प्रातिनिधिक कथांचा संग्रह. त्यांच्या कथांचे भारतीय पाश्चात्त्य भाषांत अनुवादही झाले. 

गल्ली ते दिल्ली, कथा अकलेच्या कांद्याची, लवंगी मिरची कोल्हापूरची  इ. त्यांची वगनाट्ये लोकप्रिय ठरली. वावटळ  ही पटकथा लिहून त्यांनी चित्रपटक्षेत्रात पाऊल ठेवले. युगे युगे मी वाट पाहिली, गणगौळण, भोळीभाबडी, चोरीचा मामला  इ. चित्रपटांच्या उकृष्ट पटकथा-संवादलेखनाबद्दल त्यांना शासकीय पुरस्कार लाभले. याशिवाय पिंजरा, केला इशारा जाता जाता, एक गाव बारा भानगडी, डोंगरची मैना, छंद प्रीतीचा, भोळीभाबडी, पाहुणी, लक्ष्मी  इ. चित्रपटांच्या कथा, पटकथा आणि संवाद त्यांनी लिहिले.

शंकर पाटलांनी ग्रामीण जीवनाचा आणि तेथील माणसांचा वेध घेणारी कथा लिहून मानाचे स्थान मिळविले. ग्रामीण परिसरातील माणसे असोत, की नागरी परिसरातील माणसे असोत, पाटील आपल्या कथांतून व्यक्तिमनाचे पदर न्‌ पदर सहजपणे उलगडतात. त्यांची भाषा ही त्या कथांतून व्यक्त होणाऱ्या अनुभवांची भाषा आहे. पाटील कथालेखनात सतत प्रयोग करीत राहिले, त्यामुळे त्यांच्या कथेतील चैतन्य कधीच संपले नाही. कथेच्या अंगभूत घाटाची एक विलक्षण जाण त्यांच्या कथांतून प्रतीत होते.

फडके, भालचंद्र