पाटणकर, राजाराम भालचंद्र: (९ जानेवारी १९२७ – ). आधुनिक सौंदर्यमीमांसक. जन्म विदर्भातील खामगाव येथे. त्यांचे एम्.ए.पर्यंतचे शिक्षण नासिक  येथे झाले. त्यांचे वडील भालचंद्र लक्ष्मण पाटणकर हे नासिकच्या हं. प्रा. ठा. महाविद्यालयात इंग्लिशचे प्राध्यापक व प्राचार्य होते. बालकवींच्या समग्र कवितेचे ते पहिले संपादक होत. मराठी विनोदाचार्य, श्रेष्ठ समीक्षक व नाटककार श्रीपाद कृष्ण कोऱ्हटकर हे रा. भा. पाटणकरांचे आजोबा. १९५१ ते १९६४ या काळात पाटणकरांनी भावनगर, अहमदाबाद, भूज आणि अमरावती येथील सरकारी महाविद्यालयांमध्ये इंग्लिशचे प्राध्यापक म्हणून काम केले. या काळातच त्यांनी ‘कम्यूनिकेशन इन लिटरेचर’ या विषयावर प्रबंध लिहून पीएच्.डी. पदवी संपादन केली. १९६४ साली मुंबई विद्यापीठात ते इंग्लिशचे प्रपाठक म्हणून रुजू झाले. १९७८ पासून ते तेथे इंग्लिशचे प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून काम करीत आहेत. १९६५ पासून इंग्रजीच्या बरोबरीने सौंदर्यशास्त्र हाही त्यांच्या अध्यापनाचा विषय आहे.

१९६९ साली इस्थेटिक्स अँड लिटररी क्रिटिसिझम  हे त्यांचे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यानंतर सौंदर्यमीमांसा (१९७४), क्रोचेचे सौंदर्यांशास्र : एक भाष्य(१९७४) व कांटची सौंदर्यमीमांसा (१९७७) ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली. यांपैकी सौदर्यमीमांसा हा ग्रंथ विशेष महत्त्वाचा असून त्यास साहित्य अकादेमीचा पुरस्कार व इतरही काही पुरस्कार प्राप्त झाले. यांखेरीज इतरही स्पुट समीक्षात्मक लेखन त्यांनी केलेले आहे. 

सौंदर्यशास्त्र हा पाटणकरांच्या व्यासंगाचा व लेखनाचा खास विषय होय. क्रोचे व कांट यांच्या सौंदर्यशास्त्रीय विचारांचा चिकित्सक परिचय करून देणारे ग्रंथ ज्याप्रमाणे त्यांनी लिहिले त्याचप्रमाणे स्वतःची स्वतंत्र सौंदर्यमीमांसा विस्तृतपणे त्यांनी सौदर्यमीमांसा  या मौलिक ग्रंथात मांडली. सौंदर्यशास्त्रीय विचारात पाटणकरांनी जी भर घातली, तिचे वर्णन थोडक्यात पुढीलप्रमाणे करता येईल : कलाव्यवहार (कलाकृतींची निर्मिती आणि आस्वाद) हा पृथगात्म आणि स्वायत्त असा व्यवहार असतो, हा कांट आणि हेगेल, क्रोचे, बोझांकेट इ. तत्त्ववेत्त्यांनी स्वीकारलेला सिद्धांत ज्या संकल्पनांच्या व्यूहावर आधारलेला आहे, त्या त्यांनी स्पष्ट केल्या. हा सिद्धांत म्हणजे सौंदर्यशास्त्रीय विचाराचा आणि त्यावर आधारलेल्या समीक्षेचा एक ‘ध्रुव’ आहे, असे ते मानतात. सौंदर्यशस्त्रीय विचाराचा दुसरा ‘ध्रुव’ म्हणजे कलाव्यवहार, हा सर्वसामान्य जीवनव्यवहाराचा एक अविच्छेद्य भाग आहे, हा सिद्धांत. ह्या दोन परस्परविरोधी पण परस्परपूरक ध्रुवांच्या ताणातून आणि त्यांचा समन्वय साधण्याच्या प्रयत्नांतून वेगवेगळ्या सौंदर्यशास्त्रीय उपपत्ती उद्‌भवतात, असे दाखवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या दृष्टीने त्यांनी अनेक नव्याजुन्या सौंदर्यसिद्धांतांचा चिकित्सक परामर्श प्रस्तुत ग्रंथात घेतलेला आहे. साहित्यसमीक्षेच्या संकल्पनात्मक विवेचनाला त्यांची सौंदर्यमीमांसा अत्यंत उपयुक्त ठरते. पाटणकारंच्या सौंदर्यमीमांसेचे गुण व मर्यादा दाखवून देण्याचे कार्य प्रभाकर पाध्ये यांनी स्वतंत्र ग्रंथ लिहून केले आहे (पाटणकरांची सौंदर्यमीमांसा, १९७७).

रेगे, में.पुं. जाधव, रा.ग.