पाग्नोल, मार्सेल: (२८ फेब्रुवारी १८९५ – ). फ्रेंच नाटककार, चित्रपटकथाकार आणि चित्रनिर्माता, जन्म आग्नेय फ्रान्समधील ओबान्य ह्या गावी. दुय्यम शिक्षण मार्सेलीस येथील लिसे द्यु मार्सेय ह्या शाळेत, उच्च शिक्षण ॲक्स-आं-प्रॉव्हांस येथील विद्यापीठात. शालेय विद्यार्थी असताना मासीलिया ह्या नियतकालिकातून त्याच्या कविता प्रसिद्ध झाल्या. विद्यापीठात शिकत असताना फांताझियोनामक वाङ्मयीन नियतकालिकाची त्याने स्थापना केली. ह्याच नियतकालिकाचे नंतर ले काय्ये द्यु स्युद (इं. शी. न्यूज फ्रॉम द साउथ) ह्या नियतकालिकात रूपातंर झाले. १९१५ ते १९२७ पर्यंत तो महाविद्यालयीन अध्यापनाच्या क्षेत्रात होता. त्यानंतर मात्र त्याने पूर्णतः साहित्यसेवेस वाहून घेतले. ले मार्शा द् ला ग्लवार (१९२५, इं. शी. ट्रेडर्स इन फेम) हे त्याचे रंगभूमीवर आलेले पहिले नाटक. रणांगणावर मरण आलेल्या वीरांच्या कीर्तीचा सौदा करून काही लोक आपला स्वार्थ कसा साधून घेतात, त्याचे प्रभावी चित्रण त्यात आहे. तॉपाझ (१९२८), मारियुस (१९२९), फानी (१९३१) आणि सेझार (१९३६) ही त्याची त्यानंतरची उल्लेखनीय नाटके. मारियुस, फानी आणि सेझार ही एक नाट्यत्रयी आहे. मारियुस आणि फानी ह्या प्रेमी युगलाची ही कथा. विवाह होण्यापूर्वीच दर्यावर्दी होण्यासाठी मारियुस निघून जातो. फानीला त्याच्यापासून दिवस गेलेले असतात. आपली बेअब्रू टाळण्यासाठी ती एका वयस्क व श्रीमंत व्यापाऱ्याशी लग्न करण्यास तयार होते. ह्या कथेचा उत्तरार्ध फानी आणि सेझार ह्या नाटकांत रंगविलेला आहे. पाग्नोलच्या नाटकांतून समाजातील अन्यायाची आणि दंभाची जाणीव तीव्रतेने प्रकटली आहे. त्याने निर्माण केलेली पात्रे अत्यंत सजीव वाटतात. ती एका विवक्षित समाजातील असली, तरी त्यांना विश्वात्मकता प्राप्त झालेली आहे. पाग्नोलच्या नाटकातील भाषा अगदी बोलीवजा असून ती अनेकदा उच्चभ्रूंच्या अभिरुचीला मानवणारी नसते. पाग्नोल स्वतःच म्हणतो त्याप्रमाणे त्याची नाटके ग्रंथालयासाठी नाहीत किंवा ती ‘आव्हांगार्द’ (पुरोगामी) नाटके नव्हते, तर ती लोकांसाठी लिहिलेली नाटके आहेत नाट्यमयता हा त्यांचा आत्मा असून तो रंगभूमीवरच प्रकट होऊ शकतो. नाटककाराला जे सांगायचे ते सर्व काही रंगभूमीवर दाखविणे शक्य नाही, असेही त्याला वाटते म्हणूनच तो बोलपटाच्या माध्यमाकडे वळला. १९३१ मध्ये पानोग्नले मारियुस हा चित्रपट सादर केला व त्यानंतर विख्यात फ्रेंच कथाकार व कादंबरीकार आल्फाँस दोदे ह्याच्या कथांवर परिणामकारक चित्रपट काढण्यात यश मिळविले.
पाग्नोलच्या साहित्यात मुक्त विनोद, नर्म उपहास, कारुण्य व सहानुभूती यांचा संगम साधला गेला आहे. १९४६ मध्ये फ्रेंच अकादमीचा सदस्य म्हणून त्याची नियुक्ती झाली. पाग्नोलने आपल्या आठवणी लिहिल्या असून त्या ला गलवार द् माँ पॅर (१९५७, इं. शी. द ग्लोरी ऑफ माय फादर), ल शातो द् मॉ मॅर (१९५८, इं. शी. माय मदर्स पॅलेस) आणि ल् तां दे सके (१९६०, इं. शी. द टाइम फॉर सीक्रेट्स) अशा तीन खंडांत संगृहीत केलेल्या आहेत.
सरदेसाय, मनोहरराय