पॅसिफिक महासागर : पृथ्वीवरील सर्वांत मोठा महासागर, क्षेत्रफळ १६,६०,००,००० चौ. किमी. सभोवतालचे समुद्र मिळून एकूण क्षेत्रफळ १७,९६,७९,००० चौ. किमी. असून ते जगाच्या क्षेत्रफळाच्या जवळजवळ निम्मे भरते. याच्या पश्चिमेस आशिया खंड, पूर्वेस उत्तर आणि दक्षिण अमेरिका ही दोन खंडे, उत्तरेस बेरिंगची सामुद्रधुनी व दक्षिणेस अंटार्क्टिका खंड आहे. अटलांटिक व पॅसिफिक यांमधील सीमा केप हॉर्नवरून दक्षिणेस सरळ रेषेने समजली जाते, तर पॅसिफिक व हिंदी महासागर यांतील सीमा मलाया, सुमात्रा, जावा, तिमोर, ऑस्ट्रेलिया (केप लंडनडेरी) व टास्मानिया यांच्या पूर्व किनाऱ्याने व दक्षिणेस १४७° पू. रेखावृत्ताने ठरविली आहे. महासागराचा आकार स्थूलमानाने त्रिकोणाकृती असून शिरोबिंदू उत्तरेस बेरिंग सामुद्रधुनीजवळ आहे. या त्रिकोणाचा पाया बराचसा दक्षिणेस असला तरी त्याची कमाल रुंदी विषुववृत्तावर आढळते. बेरिंग सामुद्रधुनी ते केप अडॅरपर्यंतच्या (अंटार्क्टिका खंड) या महासागराची दक्षिणोत्तर लांबी सु. १६,०९३ किमी.असून त्याची विषुववृत्तावरील रुंदी १७,००० किमी. पेक्षा अधिक आहे. या महासागराची खोली ४,२६७ मी. असून पाण्याचे आकारमान ७२·३७ कोटी घ. मी. आहे. पॅसिफिकच्या किनाऱ्यांवर पर्वतराजी असल्याने त्यात केवळ १∕७ जलवहन होते.  

पॅसिफिकला जोडून खंडांच्या किनाऱ्यांना अनुगामी असे अनेक अरुंद समुद्र आहेत. हे समुद्र बव्हंशी याच्या पश्चिम भागात आढळतात. महत्त्वाच्या समुद्रांत बेरिंग, अल्यूशन, ओखोट्स्क, सेलेबीझ, जपानी समुद्र, पीत समुद्र, पूर्व आणि दक्षिण चिनी समुद्र, बांदा समुद्र यांचा समावेश होतो.पीत समुद्र सोडल्यास इतर सर्व समुद्रांची खोली १,५०० फॅदमपेक्षा जास्त आहे. या महासागराच्या पूर्व भागातील समुद्रांत प्रामुख्याने कॅलिफोर्नियाचे आखात आणि ब्रिटिश कोलंबियाचा समुद्र याचा समावेश होतो.  

निर्मिती : या महासागराच्या निर्मितीचा इतिहास अजूनही वादग्रस्त आहे. पृथ्वीला आजची घनस्थिती प्राप्त होण्यापूर्वी तिच्या काही भागांतील द्रव्य बाहेर पडून तेथे खळगा तयार झाला पुढे त्या खळग्यात पाणी साचून हा महासागर निर्माण झाला आणि पृथ्वीपासून बाहेर पडलेले द्रव्य गोठून चंद्राची निर्मिती झाली. ही कल्पना जॉर्ज डार्विन यांनी मांडली होती, पण या सर्व कल्पना केव्हाच (१९५०) त्याज्य ठरविण्यात आल्या आहेत.  

पॅसिफिकच्या निर्मितीविषयीच्या कल्पना पुढीलप्रमाणे व्यक्त करण्यात येतात : (१) खंडे आणि सागरतळ यांची संरचना अगदी विभिन्न असून, समुद्रतळाची घनता जमिनीपेक्षा जास्त आहे. पृथ्वीचे हे दोन घटक भूशास्त्रीय काळाच्या अगदी प्रारंभापासून आजपर्यंत आहेत त्या ठिकाणी स्थिर राहिले आहेत. त्यांची स्थिती शाश्वत आहे तीत फारसा बदल झालेला नाही.  

(२) अगदी सुरुवातीस फक्त दोनच खंडे होती आणि ती जलमग्न होती. कालांतराने ती समुद्रसपाटीवर उचलली जाऊन त्यांच्यापासून आजची भूखंडे तयार झाली. हिल ह्याचा खंड-निर्मितीचा सिद्धांत या कल्पनेवर आधारलेला आहे.  

(३) तिसरी प्रमुख कल्पना म्हणजे वॅगनरचा खंडविप्लव सिद्धांत होय. या सिद्धांताप्रमाणे अगदी प्रारंभी एक मोठे खंड –पॅनजिआ– होते. ते भंग पावून त्यापासून लॉरेंशिया आणि गोंडवनभूमी ही महाद्वीपे निर्माण झाली. पुढे सु. २५ ते ३० कोटी वर्षांपूर्वी ही दोन महाद्वीपे भंग पावून जेव्हा एकमेकांपासून दूर सरकत गेली, तेव्हा महासागरांच्या निर्मितीस प्रारंभ झाला. पॅसिफिक महासागराच्या पूर्व भागात जो सागरतळ पठाराचा भाग आहे, त्यात चाललेल्या भूभौतिक संशोधनावरून असे स्पष्ट झाले आहे की, खंडांच्या एकमेकांपासून दूर सरकण्याच्या हालचाली अजूनही चालू आहेत. या हालचालींमुळे सागरतळाशी लांब, चिंचोळ्या गर्ता (खोलवा) आणि विस्तृत विदारण विभंग निर्माण झालेले आहेत. या गर्ता व कातरभ्रंश प्रामुख्याने अमेरिकेची दोन खंडे आणि आशियाचा आग्नेय भाग यांच्या किनाऱ्यांजवळ तसेच न्यूझीलंड व टाँगा-सामोआ द्वीपसमूह यांना जोडणाऱ्या रेषेजवळ दिसून येतात.

पॅसिफिक महासागर


तळरचना: समुद्रसपाटीपासून वाढत्या खोलीनुसार महासागराचे स्थूलमानाने चार विभाग पडतात : (१) भूखंड मंच – ० ते १०० फॅदम किंवा २०० मी. खोलीचा तळभाग, (२) भूखंड उतार – २०० ते २,०००मी. खोलीचा तळभाग, (३) गभीर सागरी मैदान – २,००० ते ६,००० मी. खोलीचा मैदानी प्रदेश आणि (४) सागरी खंदक (ट्रेंच) व गर्ता – ६,००० मी. पेक्षा अधिक खोलीचा सागरतळ.

पॅसिफिक महासागरात सभोवतालच्या समुद्रांचा अंतर्भाव केल्यावर त्याच्या निरनिराळ्या खोलींवरील तळभागांचे एकूण क्षेत्रफळाशी शेकडा प्रमाण खाली दिल्याप्रमाणे आढळते:

 

खोली (मीटरमध्ये) 

एकूण क्षेत्रफळाशी शेकडा प्रमाण 

० – २००

५·७

२०० – २,०००

७·०

२,००० ते ६,०००

८५·५

६,००० पेक्षा अधिक

१·८

(१)पॅसिफिक महासागराचा भूखंड मंच : समुद्र किनाऱ्यालगतच्या १०० फॅदमपर्यंत खोली असलेल्या उथळ सागरतळाला भूखंड मंच म्हणतात. भूखंड मंचाचे या महासागरातील शेकडा प्रमाण ५·७ भरते. अटलांटिक महासागरात ते १३·३ टक्के आहे. या सागरतळाच्या उताराचे सरासरी प्रमाण सु. १° आहे पण ठिकठिकाणी ते कमी-अधिक प्रमाणात बदललेले दिसते. ऑस्ट्रेलिया आणि आशिया या दोन खंडांच्या पूर्व किनाऱ्यालगतचा भूखंड मंचाचा भाग बराच रुंद म्हणजे १६० ते १,६०० किमी. आहे. या मंचाचे जास्त उंचीचे प्रदेश सागर-पृष्ठावर येऊन तेथे कूरील, जपान, फिलिपीन्स, इंडोनेशिया,न्यूझीलंड इ. द्वीपसमूह तयार झाले आहेत. पॅसिफिक महासागराच्या पूर्व किनाऱ्यालगतचा भूखंड मंचाचा भाग बराच अरुंद (सरासरी रुंदी ८० किमी.) आहे.  

(२)भूखंड उतार : पॅसिफिक महासागराच्या उथळ भूखंड मंचाची खोली २०० मी.पेक्षा अधिक वाढून जेथे उताराचे प्रमाण एकदम वाढल्याचे (३·५° ते ६° पर्यंत) आढळते, त्या सागरतळ भागास भूखंड उतार म्हणतात. या महासागरातील अशा तळभागाचे प्रमाण फक्त ७ आहे. तसेच या तळभागाची खोली २०० ते २,००० मी. पर्यंत वाढत गेलेली आढळते. पॅसिफिक महासागराच्या भूखंड मंच आणि उताराच्या तळभागातच बेरिंग, पीत, चिनी, जावा इ. समुद्र आणि जपानी समुद्र, ओखोट्स्कचा समुद्र, इ. भूवेष्टित समुद्र तयार झालेले आढळतात. 

(३) गभीर सागरी मैदान : पॅसिफिक महासागराच्या तळाचा बराच मोठा भाग (८५·५%) मैदानी स्वरूपाचा आहे. या भागाची सरासरी खोली ७,३०० मी. किंवा ४,००० फॅदम आहे. हा भाग अगदी सपाट नाही. त्यात मधूनमधून जमिनीस फुगवटा प्राप्त होऊन तेथे सागरी कटक किंवा सागरी पठार तयार झाल्याचे दिसून येते. उदा., मध्य पॅसिफिक पर्वत, ख्रिसमस बेटे, पूर्व पॅसिफिक इ. कटक. यांपैकी पूर्व पॅसिफिक कटक अंटार्क्टिका खंडाच्या उत्तरेस सुरू होऊन ती ईशान्येस मध्य अमेरिकेकडे वळत जाते. विषुववृत्ताच्या उत्तरेस ही कटक रुंद होऊन तेथे सागरी पठार बनले आहे. त्यास ॲल्बट्रॉस पठार म्हणतात. विषुववृत्ताच्या दक्षिणेस २३° ते ३५° अक्षवृत्तांच्या दरम्यान या कटकेची रुंदी वाढल्याने ती सागरी पठाराच्या स्वरूपात चिली देशाच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंत पसरलेली दिसून येते. ॲल्बट्रॉस व या पठाराची खोली सु. ४,००० मी. आहे. मध्य पॅसिफिक पर्वतश्रेणीचा काही भाग समुद्राच्या पृष्ठभागावर येऊन तेथे हवाई बेटे तयार झाली आहेत. या पर्वतश्रेणीची लांबी ३,००० किमी. व रुंदी १,००० किमी. आहे. या श्रेणीतच अनेक ठिकाणी ज्वालामुखीचे शंकू व पठारे दिसून येतात. मध्य पॅसिफिक श्रेणी ३५° उ. ते १७° उ. यांदरम्यान वायव्य-आग्नेय दिशेत सागरतळावर पसरली असून, तेथे पाण्याची खोली सु. १,००० फॅदम आहे.  

वरील दोन्ही महत्त्वाच्या सागरी कटकांशिवाय आणखी एक महत्त्वाची कटक सु. ४,००० मी. खोलीवर, उत्तरेस जपानपासून दक्षिणेस अंटार्क्टिकापर्यंत सागरतळावर पसरली आहे. मात्र ही कटक सलग नाही. ती १२° उ., १०° द. व ५३° द. या अक्षांशांवर खंडित झाली आहे. न्यू कॅलेडोनियाच्या पश्चिमेस २०°द. अक्षवृत्तावर २०० ते २००० मी. खोलीवर न्यूझीलंड श्रेणी सागरतळावर पसरली आहे. फिजी बेटांच्या उत्तरेस २,००० मी. खोलीवर फिजी पठार आहे. वरील सर्व सागरी पर्वतश्रेण्या किंवा सागरी कटक या गभीर मैदानी प्रदेशाचा फुगीर भाग होत.  

या सागरी पर्वतश्रेण्यांनी एकमेकींपासून विलग झालेल्या अनेक द्रोणी या महासागरात आढळतात. त्यांपैकी काही महत्त्वाच्या द्रोणी पुढीलप्रमाणे होत : 

(१)फिलिपीन्स द्रोणी : ही द्रोणी  फिलिपीन्स बेटांच्या पूर्वेस ५° उ. ते जपानच्या दक्षिण भागापर्यंत पसरली आहे. तिची खोली ५,००० ते ६,००० मी. आहे.  

(२)फिजी द्रोणी : फिजी बेटांच्या दक्षिणेस २२° द. ते ३२° द. या अक्षवृत्तांदरम्यान ती पसरली असून तिची खोली ४,००० मी. पेक्षा अधिक आहे.  

(३)पूर्व ऑस्ट्रेलियन द्रोणी: ४,००० मी. खोलीची ही द्रोणी वर्तुळाकृती असून तिच्या पूर्व बाजूस न्यूझीलंड श्रेणी आहे.  

(४)दक्षिण ऑस्ट्रेलियन द्रोणी : या द्रोणीचा विस्तार ऑस्ट्रेलिया खंडाच्या दक्षिणेस दक्षिणोत्तर असून तिची खोली सु. ५,००० मी. आहे.  

(५)पेरू-चिली द्रोणी: ४,००० मी. खोलीची ही द्रोणी बरीच रुंद असून ती द. अमेरिकेतील पेरू देशाच्या पश्चिमेला आहे.  

याशिवाय टाँगा खंदकाच्या पूर्वेस १०° द. ते ५५° द. आणि १५०° प. ते १५२° प. यांदरम्यान दक्षिणोत्तर पसरलेली सु. ५,००० मी. खोलीची द्रोणी आढळते. तसेच ब्रूक डोहाच्या उत्तरेस पूर्व-पश्चिम पसरलेली आणखी एक द्रोणी आहे.  

पॅसिफिक महासागराच्या गभीर मैदानाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या पूर्व भागात अनेक सागरतळ कडे आढळतात. सर्वसाधारणपणे पूर्व-पश्चिम पसरलेल्या या कड्यांची लांबी २,४०० ते ५,३०० किमी. यांदरम्यान आढळते. सागरतळाचे ठिकठिकाणी भूमिपात होऊन हे कडे बनले आहेत. त्यांची उंची ३०० ते १,५०० मी. असून पायऱ्यापायऱ्यांच्या स्वरूपात ते मैदानी प्रदेशाकडून महासागराच्या पूर्व किनाऱ्याकडे पसरलेले दिसतात.  

(४) सागरी खंदक आणि गर्ता : पॅसिफिक महासागराच्या तळभागाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तेथे विशेषतः महासागराच्या पश्चिम भागात खंदक आणि त्यांतील गर्ता आढळतात. हे लांब पण चिंचोळे खंदक चापाकृती बेटांच्या पूर्वेस व त्यावरील पर्वतश्रेणींना समांतर पसरलेले असून, त्यांची खोली ६,००० मी. पेक्षा अधिक आहे. या खंदकांच्या अतिखोल भागास गर्ता म्हणतात. पॅसिफिकमधील मोठ्या गर्ता पुढील तक्त्यात दिलेल्या आहेत. त्यांशिवाय मरी, रिऊक्यू, ब्रूक, बैले, प्लॅनेट इ. ६,००० मी. पेक्षा अधिक खोलीच्या गर्ता या महासागराच्या तळाशी आढळतात. अशा गर्तांची एकूण संख्या ३२ आहे.


पॅसिफिक महासागरातील महत्वाचे खंदक व गर्ता 

खंदकाचे नाव 

गर्ता  (खोली मीटरमध्ये) 

१. मेअरिॲना 

चॅलेंजर ११,०३४ 

२. टाँगा 

हॉरिझॉन १०,६३३ 

३. फिलिपीन 

केप जॉन्सन १०,४९७ 

४. कूरील 

व्हित्याझ १०,३७७ 

तस्करॉर ८,५१३ 

५. जपान 

रॅमापो १०,३७४ 

६. कर्मॅडेक (न्यूझीलंडच्या उत्तरेस) 

ऑल्ड्रिच १०,०४७ 

७. अल्यूशन 

अल्यूशन ८,१०० 

८. पेरू – चिली

बारथॉलोम्यू ७,९७३ 

पृथ्वीच्या संरचनी विभागांपैकी पॅसिफिक महासागराचा तळभाग हा एक महत्त्वाचा विभाग होय. या संरचनी विभागांच्या सीमेला अँडेसाइट रेषा म्हणतात. या रेषेने वेढलेल्या तळभागांत भूखंडाचे खडक आढळत नाहीत. तेथे सिलिका अल्प असणारे अग्निजन्य खडक आढळतात. अँडेसाइट हा त्यांपैकी एक खडक होय. अँडेसाइट रेषा उत्तर व दक्षिण अमेरिका खंडांच्या किनाऱ्याजवळून आणि त्यांना समांतर राहून दक्षिणोत्तर दिशेने जाते. उत्तरेस पश्चिमेकडे वळून व अल्यूशन बेटांना दक्षिणेकडून वळसा घालून ती कॅमचॅटका द्वीपकल्प व कूरील बेटे यांच्या पूर्व बाजूने टोकिओपर्यंत नैऋत्येकडे जाते. तेथून दक्षिणेस मेअरिॲना बेटांकडे वळून ती न्यू गिनीच्या उत्तरेस येते व पुढे आग्नेयीस फिजी बेटांकडे वळते. तेथून ती टाँगा आणि कुक या बेटांमधून दक्षिणेकडे वळते. यापुढे या रेषेबद्दल फारशी माहिती नाही. फिजी आणि न्यूझीलंडची बेटे या रेषेबाहेर आहेत. या रेषेने वेढलेल्या तळभागांतील पुष्कळशी बेटे बेसाल्ट या अग्निजन्य खडकांनी बनली आहेत. हवाई बेटे त्यांपैकी सर्वांत मोठी बेटे होत. अग्निजन्य खडकांनी बनलेली काही बेटे प्रवाळ खडकांनी झाकलेली आहेत.  

या रेषेने मर्यादित केलेल्या पॅसिफिक महासागराच्या तळभागास भूभौतिक दृष्ट्या  ‘खरा तळभाग’ असे म्हणतात कारण या तळभागात संरचनी एकता किंवा संगती आढळून येते. म्हणून या रेषेस या महासागराची ‘खरी कडा’ असे म्हटले जाते. संरचनेच्या दृष्टीने खंड व महासागर यांची ही सीमारेषा होय. या रेषेवरच भूकंपाच्या नाभ्यांचे वितरण झाले आहे. या भूकंपनाभ्या प्रामुख्याने दोन भागांत आढळतात. त्यांपैकी एक भाग आशिया खंडाच्या पूर्व किनाऱ्याजवळ व दुसरा दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यास लागून आहे. हे दोन्ही तळभाग ज्वालामुखी आणि भूकंपांसाठी प्रसिद्ध आहेत.

या दोन तळभागांतील भूकंपनाभ्यांची खोली २५० ते ७०० किमी. पर्यंत असावी. या नाभ्यांची स्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ज्या पातळीवर त्या आहेत, ती पातळी किनाऱ्याकडे उतरती होत गेली असून अतिखोल असलेल्या विभंग प्रदेशांशी तिचा संबंध आहे. अँडेसाइट रेषेचा संबंध केवळ भूकंपनाभी वा विभंग प्रदेशापुरता मर्यादित नसून तो घडीच्या पर्वत-क्षेत्राशीही आढळून येतो. घडीच्या पर्वताचे क्षेत्र महासागराच्या पूर्वभागात प्रामुख्याने आढळते. या रेषेजवळ होणाऱ्या संरचनी क्रियांचा परिणाम म्हणजेच पश्चिम भागात असलेली चापाकृती बेटे आणि खोल सागरी गर्ता ही होत.  

अलीकडे मोठ्या प्रमाणात पॅसिफिक महासागराच्या या अँडेसाइट रेषेजवळ तळभागाचे विभंजन व त्याबरोबरच समुद्र काठावरील जमिनीचे उद्गमन झालेले आढळते. न्यूझीलंड व कॅलिफोर्निया या प्रदेशांचा समुद्रकिनारा या रेषेजवळच, पण एकमेकांविरुद्ध दिशेला सु. ११,२०० किमी. अंतरावर आहे. दोन्ही प्रदेशांत विदारण विभंग आहेत. तेथे भूकवचाच्या हालचाली अजूनही चालू आहेत. त्यांच्या हालचालीच्या दिशेवरून काही शास्त्रज्ञांनी असे अनुमान काढले आहे की, पॅसिफिक महासागराचा खरा तळभाग हा सभोवतालच्या खंडांच्या सापेक्षतेने अपसव्य दिशेने वळत असावा पण या अनुमानाला अजून फारसा पुरावा मिळालेला नाही.  

तळावरील निक्षेप : पॅसिफिक महासागराच्या तळावर प्रामुख्याने दोन प्रकारचे निक्षेप आढळतात : (१)खंडीय निक्षेप व (२)खोल सागरी निक्षेप.  

(१)खंडीय निक्षेप : महासागराच्या भूखंड मंचावर व उतारावर हे निक्षेप आढळतात. नदीने व वाऱ्याने वाहून आणलेल्या गाळाने हे निक्षेप बनतात. यांत खडे, वाळू आणि माती तसेच वनस्पतींचे व प्राण्यांचे अवशेष यांचे मिश्रण असले, तरी प्रवाळ व इतर जलचरांचे अवशेष, शिंपले इ. घटकही असतात. ईस्ट इंडीज बेटांभोवती आणि उत्तर पॅसिफिक महासागरात  या निक्षेपांचे क्षेत्र मोठे आहे.  

(२)खोल सागरी निक्षेप : हे निक्षेप सामान्यतः गभीर सागरी मैदानांत आढळतात. महासागरात राहणाऱ्या आणि वावरणाऱ्या निरनिराळ्या प्रकारांच्या जलचरांच्या अवशेषांपासून हे निक्षेप तयार होतात. ज्वालामुखीच्या स्फोटाने जमिनीबाहेर फेकली गेलेली व नंतर महासागराच्या पाण्यातून हळूहळू तळभागावर साचत गेलेली वस्त्रगाळ मातीदेखील या निक्षेपांत आढळते.  

पॅसिफिक महासागरातील निरनिराळ्या निक्षेपांखालील तळभागाचे क्षेत्र 

निक्षेप प्रकार 

खोल सागरी 

निक्षेपाने व्यापलेले क्षेत्र 

(दशलक्ष चौ. किमी. मध्ये) 

(अ) चुनामय सिंधुपंक 

 

(१)ग्लोबिजेरीना 

५१·९ 

(२)टेरोपॉड 

(आ)सिलिकामय सिंधुपंक 

 

(१)डायाटमी 

१४·४ 

(२)रेडिओलॅरिया 

६·६ 

(इ) तांबडी माती 

७०·३ 

एकूण क्षेत्र 

१४२·२ 

डायाटमी सिंधुपंक हे विशेषतः दक्षिण पॅसिफिक व ईशान्य पॅसिफिक महासागरांत आढळतात. १५° उ. ते ५° उ. आणि १६०° प. ते ९०°प. यांच्या दरम्यान रेडिओलॅरिया  सिंधुपंकाचा थर पसरला आहे. उत्तर पॅसिफिक महासागराच्या तळावर तांबड्या मातीचा थर आहे, तर महासागराच्या दक्षिण भागात ग्लोबिजेरीना सिंधुपंकाचे निक्षेपण मोठ्या प्रमाणात झाले आहे. निक्षेपणामुळे महासागराचा तळभाग हळूहळू भरून निघतो. पॅसिफिक महासागराचा तळही अशा रीतीने दर आठशे वर्षात १सेंमी.ने भरून निघत आहे. 

हवामान : पॅसिफिक महासागरावरील हवामान-अभ्यास अद्याप अपूर्ण आहे, पण पृथ्वीच्या हवामानाचा विचार करता महत्त्वाचा आहे. विस्तीर्ण सपाट प्रदेश असल्याने ग्रहीय भाररचना व वारे या महासागरावरच लक्षणीय स्वरूपाचे आढळतात. विशेषत: दक्षिण  पॅसिफिकमध्ये लक्षणीय पूर्व व पश्चिम वारे आढळतात.  उ. गोलार्धात मात्र विस्तीर्ण किनारी भूखंडांचा प्रभाव वाऱ्यांवर पडलेला दिसतो. पूर्व वारे साधारणतः ३०° अक्षवृत्तांच्या पट्ट्यात पूर्वेकडून वाहतात व त्यांचे तपमान सुरुवातीस कमी असते, जसजसे ते विषुववृत्तीय प्रदेशाजवळ येतात तसतसे ते उबदार व आर्द्र बनतात. ते सरासरी १३ नॉट वेगाने वाहतात. या वाऱ्यांबरोबर पाणीही ढकलले जाते. त्यामुळे पूर्व पॅसिफिक किनाऱ्यावर निम्नस्तरीय थंड पाणी वर येऊन अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर दाट धुकेसुद्धा निर्माण होते. पश्चिमी वारे दक्षिण पॅसिफिक महासागरात विना-अडथळा भयानक वेगाने वाहतात. म्हणूनच त्यांस ‘गरजणारे चाळीस’ व ‘खवळलेले पन्नास’ अशी नावे दिलेली आहेत. दक्षिणेस व उत्तरेस ध्रुवीय पूर्व वारे या उबदार वाऱ्यांच्या प्रदेशात थंड हवा आणतात, त्यांतून आवर्त वादळे निर्माण होतात व ही वादळे पश्चिमेकडून पूर्वेस जातात.


विषुववृत्तीय पश्चिम पॅसिफिक महासागरातील फिलिपीन व इंडोनेशियन समुद्रांत वेगवान विषुववृत्तीय चक्री वादळे निर्माण होतात, त्यांस ‘टायफून’ म्हणतात. ही वादळे पुढे आग्नेय आशियात व द. चीनमध्ये जातात. सागरपृष्ठीय पाण्याचे तपमान व त्याचे वितरण अनेक गोष्टींवर अवलंबून असते. त्यांत प्रामुख्याने महासागराचे स्थान आणि आकार, सौर प्रारणाचा कालावधी व तीव्रता, ऋतू व बाष्पीभवनाचे प्रमाण, ऊष्मातोल इ. गोष्टींचा समावेश होतो. पॅसिफिक महासागराची रुंदी विषुववृत्तावर फार मोठी असून उत्तरेस तो आर्क्टिक महासागरापासून बेरिंग सामुद्रधुनीने विलग झाला आहे. त्यामुळे एकीकडे त्याला मोठ्या प्रमाणात सौर प्रारण मिळते, तर दुसरीकडे उत्तरेकडून मिळणाऱ्या थंड पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे इतर महासागरांच्या तुलनेत या महासागराच्या पाण्याचे पृष्ठीय सरासरी तपमान जास्त म्हणजे १७° से. आहे.

सागरपृष्ठीय तपमानाची वार्षिक कक्षा ही सौर प्रारणात होणाऱ्या वार्षिक बदलात, सागरी प्रवाहांवर व प्रचलित वाऱ्यांवर अवलंबून असते. उत्तर पॅसिफिक महासागरातील वार्षिक तपमानकक्षा दक्षिणेतील भागापेक्षा जास्त आहे, त्याचे कारण म्हणजे तेथे वाहणाऱ्या वाऱ्यांत आणि सागरी प्रवाहांत ऋतुमानानुसार फरक पडतो हे होय. या महासागरातील पृष्ठीय सरासरी तपमानाचे वितरण खालील तक्त्यात दाखविले आहे.  

अक्षांशानुसार पॅसिफिक महासागराच्या पृष्ठीय सरासरी 

तपमानाचे वितरण (सेल्सिअसमध्ये).

उत्तर गोलार्ध

अक्षांश

दक्षिण   गोलार्ध

७०° – ६०°

१·३०°

५·७४°

६०° – ५०°

५·००°

९·९९°

५०° – ४०°

११·१६°

१८·६२°

४०° –३०°

१६·९८°

२३·३८°

३०° – २०°

२१·५३°

२६·४२°

२०° – १०°

२५·११°

२७·२०°

१०° –  ०°

२६·०१°

पॅसिफिक महासागरात, विशेषतः त्याच्या दक्षिण भागात, पृष्ठीय समताप रेषा अक्षवृत्तांस समांतर आढळतात. या महासागराच्या पश्चिम भागात ऑस्ट्रेलिया व आशिया खंडांच्या दरम्यान २८° से. पेक्षा त्या अधिक आढळतात. विषुववृत्तीय सागरी प्रवाहांमुळे पूर्व भागातील गरम पाणी या भागात सतत वाहून येत असल्याने हे घडून येते.

सागरजल तपमानाचे उभे वितरण: इतर महासागरांप्रमाणेच या महासागराच्या वाढत्या खोलीनुसार पाण्याचे तपमान कमी होत जाते. तपमान कमी होण्याचे प्रमाण २,००० मी. खोलीपर्यंत जास्त असते. त्यापुढे ते कमी होत जाते. विषुववृत्तीय प्रदेशात खोलीनुसार तपमानात होणारा बदल ध्रुवीय क्षेत्रातील होणाऱ्या तपमानातील बदलापेक्षा निराळा असतो.

पॅसिफिकमधील पृष्ठप्रवाह : पॅसिफिकमधील प्रवाहांचे उत्तर पॅसिफिक प्रवाह व दक्षिण पॅसिफिक प्रवाह असे दोन भाग पडतात.

उत्तर पॅसिफिक प्रवाह: या महासागराचा उत्तर विषुववृत्तीय प्रवाह पूर्वेस मेक्सिकोच्या प. किनाऱ्याजवळून पश्चिमेकडे (फिलिपीन्सकडे) दिवसास सु. २४ किमी. या गतीने वाहत असून, त्याची वाहण्याची कमाल गती दर सेकंदास २० सेंमी. असते. या प्रवाहाची दक्षिण मर्यादा हिवाळ्यात ५° उ. आणि उन्हाळ्यात १०° उ. अक्षवृत्तापर्यंत असते. सु. १२,००० किमी. अंतर ओलांडल्यावर फिलिपीन्स बेटांच्या पूर्व किनाऱ्याजवळ त्यास दोन फाटे फुटतात. त्यांपैकी एक फाटा उत्तरेस व दुसरा दक्षिणेस वाहतो. उत्तरेस वाहणारा ‘कुरोसिवो’ या नावाने ओळखला जातो. तैवानच्या आखातातून ३५° उ. अक्षवृत्ताच्या पलीकडे हा प्रवाह वाहत जातो. तेथून त्याचा एक फाटा पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावाखाली येऊन पूर्वेकडे वाहू लागतो. कुरोसिवो प्रवाहची खोली ७०० मी. व कमाल गती दर सेकंदास ८९ सेंमी. पर्यंत आढळून येते. या प्रवाहातील पाण्याचे तपमान ८°से. असते.

उत्तरेकडून वाहत येणारा ‘कूरील’ हा शीत प्रवाह कॅमचॅटका द्वीपकल्पाच्या किनाऱ्याने वाहत दक्षिणेकडे येतो. हा शीत प्रवाह आणि कुरोसिवोचा उष्ण प्रवाह पश्चिमी वाऱ्यांच्या टापूत आले, म्हणजे ते वाहत उत्तर अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याकडे येतात. तेथे त्यांना दोन फाटे फुटतात. त्यांपैकी एक फाटा ‘अलास्का–कोलंबिया’ प्रवाह या नावाने वायव्येक़डे वाहत असून, तो उष्ण प्रवाह आहे. दुसरा ‘कॅलिफोर्निया’ या नावाने दक्षिणेकडे वाहतो व शेवटी उत्तर विषुववृत्तीय प्रवाहास येऊन मिळतो हा थंड प्रवाह आहे. अशा रीतीने पॅसिफिक महासागरात प्रवाहांचा फेरा पूर्ण होतो.

दक्षिण पॅसिफिक प्रवाह: उत्तर पॅसिफिक महासागराप्रमाणे दक्षिण पॅसिफिक महासागरामध्येही प्रवाहांचे स्वतंत्र चक्र चालू असते. दक्षिण विषुववृत्तीय प्रवाहामुळे उष्ण कटिबंधातील पाणी प्रथम विषुववृत्ताजवळून पश्चिमेकडे वाहत जाते. फिलिपीन्स बेटांजवळ आल्यावर हा प्रवाह दक्षिणेस न्यू गिनी बेटाकडे व नंतर ऑस्ट्रेलिया खंडाच्या पूर्व किनाऱ्याने दक्षिणेस वाहू लागतो. त्या ठिकाणी तो ‘पूर्व ऑस्ट्रेलियन प्रवाह’ म्हणून ओळखला जातो. हा प्रवाह ३०° द. अक्षवृत्ताच्या पलीकडे गेल्यावर पूर्वेकडे वाहू लागतो. पुढे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळ पोहोचल्यावर ‘पेरू प्रवाह’ या नावाने उत्तरेकडे वाहू लागतो. या ठिकाणी अंटार्क्टिका खंडाकडून येणारा शीत प्रवाह या उष्ण प्रवाहास मिळाल्याने या भागात वादळे आणि भोवरे निर्माण होतात. उत्तर गोलार्धातील उन्हाळ्यात पेरू प्रवाहाची उत्तर मर्यादा विषुववृत्ताच्या उत्तरेकडे गेलेली दिसते. हिवाळ्यात पेरू प्रवाह विषुववृत्ताच्या दक्षिणेसच असतो व अशा वेळी एक्वादोरच्या किनाऱ्याने उत्तरेकडून उबदार हलके पाणी दक्षिणेकडे वाहते. या प्रवाहास ‘एल् निनो’ म्हणतात. या प्रवाहामुळे प्लँक्टन नष्ट होते, मासे मरतात, वादळे होतात व वाळवंटी भागात भरपूर पाऊस पडतो.

या महासागरातील विषुववृत्ताजवळील प्रतिप्रवाह बाराही महिने वाहत असतो. साधारणपणे याचे स्थान विषुववृत्ताच्या थोडे उत्तरेस असते. उत्तर गोलार्धातील उन्हाळ्यात हा प्रवाह ५° ते ६° च्या जवळून वाहत असतो.

खोल सागरी प्रवाह : दक्षिण पॅसिफिक महासागरात ५०° अक्षवृत्ताच्या जवळपास पूर्ववाहिनी जलप्रवाह सतत वाहत असतो. न्यूझीलंडच्या दक्षिणेस खोलसागरी प्रवाहाचा उगम होतो. हा खोल सागरी प्रवाह उत्तरेकडे तळभागावरून खंडांच्या पूर्व बाजूने वाहू लागतो. साधारणपणे ३०° उ. अक्षवृत्तापर्यंत पोहोचल्यावर त्यास दक्षिणेकडे वाहत येणारा प्रवाह मिळतो. या दक्षिणोत्तर वाहणाऱ्या खोल सागरी प्रवाहापासून सागरतळावर दक्षिण गोलार्धात सव्य दिशेने व उत्तर गोलार्धात अपसव्य दिशेने उपप्रवाहांचे अभिसरण सुरू होते. दक्षिणोत्तर वाहणाऱ्या मुख्य प्रवाहामुळे दक्षिण गोलार्धातील पाणी दर सेकंदास १० लक्ष घ. मी. या प्रमाणात विषुववृत्त ओलंडून पॅसिफिक महासागराच्या उत्तर गोलार्धात जातो. तेथील उर्ध्वगामी प्रवाहांमुळे सागराची पृष्ठपातळी कायम राहते.


भरती-अहोटी: पॅसिफिक महासागरातील टाँकिनचे आखात, टॉरस सामुद्रधुनी व कॅनडाच्या किनाऱ्यावरील व्हँकूव्हर बेटाजवळ दिवसातून एकच भरती व एकच ओहोटी येते. तर ताहिती बेटाजवळ भरती-अहोटी चंद्राबरोबर न येता सूर्याबरोबर येत असलेली आढळते. इतरत्र भरती–अहोटी सामान्यतः मिश्र स्वरूपाची व कमी उंचीची आढळते. ताहिती येथे तर अर्धा मीटर इतकीच भरती-ओहोटी दिसते. टोकिओजवळ केवळ १·७ मी. व तेवढीच केप हॉर्नजवळ आढळते. कॅलिफोर्निया व कोरिया यांच्या आखातांत मात्र भरतीची उंची १२ मी. पेक्षाही जास्त आढळते.

क्षारता: क्षारतेचे प्रमाण विषुववृत्तावर ३४·८५%o  आहे. १५० –३० अक्षवृत्तांच्या दरम्यान ते सर्वांत जास्त असते. उत्तर पॅसिफिक महासागरात ते ३५%o तर दक्षिण पॅसिफिक महासागरात ते ३६%o असते. ध्रुवप्रदेशाकडे ते कमी होत जात असून ओखोट्स्कच्या समुद्रात ते ३१%o कमी आहे. याच ठिकाणी उत्तरेकडून ‘ओयाशिवो’ या शीत प्रवाहाचे पाणी येते व कुरोसिवो हा उष्ण पाण्याचा प्रवाह नाहीसा होतो. या दोन गोष्टींचा परिणाम येथील जलक्षारतेवर झाला आहे. महासागराच्या पूर्वभागात कॅलिफोर्निया, मध्य अमेरिका आणि पेरू यांच्या पश्चिम किनाऱ्यांजवळ थंड पाणी तळभागाकडून पृष्ठभागाकडे उसळी घेत असल्याने तेथील क्षारतेचे प्रमाण कमी झालेले आहे. कोलंबिया २८%o दक्षिण चिली  १३%o  यांच्या समुद्र किनाऱ्यांजवळ क्षारतेचे प्रमाण कमी आहे. दक्षिण पॅसिफिक महासागराच्या मध्य अक्षांशीय भागात क्षारतेचे प्रमाण ३४%o आहे.व ज्या ठिकाणी मोठ्या नद्या समुद्राला येऊन मिळतात तेथेही क्षारतेचे प्रमाण कमी आढळते. उदा., ह्वांग हो व यांगत्सीकिअँग या नद्यांच्या मुखांजवळील समुद्रात क्षारतेचे प्रमाण अनुक्रमे ३०%o  व ३३ %o दिसून येते.

महासागराच्या निरनिराळ्या खोलीवरील क्षारतेचे प्रमाण भिन्न असते. सर्वसाधरणपणे उच्च अक्षवृत्तीय प्रदेशांत वाढत्या खोलीबरोबर क्षारतेचे प्रमाणही वाढते पण ही वाढ २०० फॅदम खोलीपर्यंत सीमित असते. त्यानंतर वाढत्या खोलीबरोबर क्षारतेचे प्रमाण घटत जाते. उष्ण अक्षवृत्तीय प्रदेशांत, विशेषतः विषुववृत्ताजवळ, पावसाच्या पाण्याच्या सतत पुरवठ्यामुळे पृष्ठीय क्षारतेचे प्रमाण कमी असते. त्याखालच्या थरात ते प्रमाण जास्त असते. हे प्रमाण पुढे वाढत्या खोलीबरोबर कमीकमी होत जाते. वाढत्या खोलीबरोबर क्षारतेच्या वाढीचे प्रमाण २,००० फॅदम खोलीपर्यंत अनियमित आहे. त्यानंतरच्या वाढीचे प्रमाण अत्यल्प आहे.

पॅसिफिक महासागारातील जलराशी : तपमान आणि क्षारता या दृष्टींना समान लक्षणे असणाऱ्या सागरी जलप्रदेशाला ‘जलरास’ म्हणतात. या जलराशीची क्षैतिज सीमा निश्चित करता येते. पॅसिफिक महासागरात (१) मध्यवर्ती जलरास आणि (२) उत्तर पॅसिफिक मध्य जलरास, अशा दोन महत्त्वाच्या जलराशी आहेत.

(१)मध्यवर्ती जलराशीचे क्षेत्र या महासागराच्या विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंस पसरले असून त्याचे पश्चिम आणि पूर्व–मध्ये असे उपविभाग दोन्ही गोलार्धांत पाडले आहेत. या जलराशीचा थर २०० ते ३०० मी. जाड आहे.

(२)उत्तर पॅसिफिक मध्य जलरास महासागरांच्या ईशान्य भागात सु.४०उत्तर अक्षवृत्ताजवळ आढळते. या जलराशीचे तापमान कमी असून तिच्यातील प्राणवायूचे प्रमाणही कमी आहे. या जलराशीची वैशिष्ट्ये पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे हळूहळू कमी होऊ लागतात.

बर्फ : या महासागरात बर्फयुक्त क्षेत्र फारच थोडे आहे. त्याचे एक कारण आर्क्टिक महासागराचे उत्तर पॅसिफिक महासागराशी असलेले फार मर्यादित संबंध हे होय. दक्षिण गोलार्धात अंटार्क्टिक महासागरातील हिमनग व तरंगते बर्फ, वारे व प्रवाह यांमुळे ५० द. अक्षवृत्तापर्यंत वाहत येत असून त्यांची संख्या अनिश्चित असते.

पॅसिफिक महासागराचे समन्वेषण: पॅसिफिक महासागरांच्या समन्वेषणास खऱ्या अर्थाने फर्डिनंड मॅगेलन याने सुरुवात केली. तत्पूर्वी भारतीय चिनी लोकांनी पॅसिफिक महासागरातील काही बेटांवर वस्ती केल्याचे अनेक उल्लेख ठिकठिकाणी आढळत असले, तरी त्यासंबंधीची सुसंगत माहिती मिळत नाही.

कोलंबसच्या पर्यटनाने प्रोत्साहित होऊन पोर्तुगीजांनी ब्राझीलमध्ये प्रवेश केला आणि स्पॅनिश लोकांनी दक्षिण अमेरिका खंड ओलांडून त्यांच्या पश्चिम किनाऱ्यावर जाण्याच्या प्रयत्न केला. १५१३ मध्ये बॅल्बोआ या स्पॅनिशाने पनामा संयोगभूमी ओलांडली. आणि थोड्याच वर्षांनंतर कोर्तेझ याने मेक्सिको पादाक्रांत करून कॅलिफोर्नियाच्या आखाताचा शोध लावला. इंग्रज आणि फ्रेंच लोकांनी उत्तर अमेरिकेत वसाहती स्थापन केल्या व डच लोकांप्रमाणेच वायव्येकडील आर्क्टिक महासागरातून चीनकडे जाणाऱ्या मार्गाचा शोध घेण्यास सुरुवात केली. फर्डिनंड मॅगेलनने पॅसिफिक महासागरांच्या मोहिमेवर असताना (१५१९–२१) फिलिपीन्स बेटांनजीक दिसलेल्या महासागरांच्या ‘प्रशांत’ स्वरूपावरून त्या ‘पॅसिफिक’ हे नाव दिले.

नंतर शास्त्रोक्त समन्वेषणास सुरुवात झाली. या दृष्टीने कॅप्टन कुकचे (१७६८–७८) समन्वेषणाचे कार्य अधिक मोलाचे ठरते. त्याच्या तीन पर्यटनांत त्याने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांची बरीच माहिती मिळवून अंटार्क्टिका खंडाभोवती एक पूर्ण फेरी घातली.

पॅसिफिक महासागर आणि त्यातील बेटांच्या समन्वेषणाचे श्रेय मुख्यतः खालील संशोधकांकडे जाते: फर्डिनंड मॅगेलन या पोर्तुगीज समन्वेषकाने १५१९–२० मध्ये मॅगेलन सामुद्रधुनीचे, तर १६०५–०६ या काळात स्पॅनिश दर्यावर्दी पेद्रो फरेनँदीश दे कैरॉज आणि लुई व्हाएथ दे टॉरेस यांनी ताहिती, न्यू हेब्रिडीझ व फिलिपीन्स बेटांचे समन्वेषण केले. याच शतकात (सतरावे) आबेल टास्मान या डच समन्वेषकाने १६४२–४४ च्या दरम्यान टास्मानिया, न्यूझीलंड आणि फिजी बेटे यांचा शोध लावला. अठराव्या शतकातील इंग्लिश समन्वेषक जेम्स कुक, बेरिंग सामुद्रधुनी ओलांडणारा रशियन दर्यावर्दी व्हिटुस बेरिंग (१७२८–४१) यांचे कार्यही महत्त्वाचे आहे. एकोणिसाव्या शतकात ‘चॅलेंजर’(१८७२–७६) ‘तस्करॉर’ ‘पॅनेट’ , ‘प्लॅनेट’ या जहाजांच्या सफरींस शास्त्रीय दृष्ट्या फार महत्त्व प्राप्त झाले.

पॅसिफिकचा अर्वाचीन इतिहास : यूरोपियनांची पॅसिफिकमधील पहिली वसाहत १५६४ साली फिलिपीन्समध्ये स्थापन झाली व सतराव्या शतकात डचांनी इंडोनेशियात वसाहत स्थापली. एकोणिसाव्या शतकात यूरोपीय सत्तांनी पॅसिफिकमध्ये सत्तास्थाने मिळविण्यासाठी बराच संघर्ष केला. १८९४ मध्ये जपानचा उदय झाला. जपानने प्रथम चीनचे व नंतर रशियाचे आरमार नष्ट केले आणि जपान ही आशियातील एकमेव सागरी सत्ता राहिली. इग्लंडने जपानशी १९०२ मध्ये मैत्री करार केला. पहिल्या महायुद्धनंतर जपानने जर्मनीची बेटे जिंकून घेतली व आपले बळ वाढविले, पण दुसऱ्या महायुद्धातील पराभवाने जपानचे सागरी वर्चस्व संपले व आज अमेरिका हा देशच पॅसिफिक महासागरात सागरी शक्ती म्हणून राहिला आहे. फ्रेंच व रशियन आरमारेही पॅसिफिक महासागरात आपले लष्करी अस्तित्व ठेवून आहेत.


पॅसिफिकचे महत्व : ह्या महासागराचे महत्त्व बहुविध आहे.

(१)महासागर आणि वातावरण यांतील अन्योन्य संबंध : उष्णताग्राहक या दृष्टीने जमीन आणि महासागर यांत मूलभूत फरक असल्याने समुद्रकाठच्या प्रदेशावरील हावामानावर, विशेषतः हिवाळ्यातील हवामानावर, महासागराचा परिणाम जाणवतो. जलचक्रातील पॅसिफिक महासागराचे स्थान महत्त्वाचे आहे. जपान, चीन ऑस्ट्रेलियाचा पूर्व किनारा व इतर बेटे यांवरील पर्जन्याचे जादा प्रमाण, कुरोसिवो या उष्ण प्रवाहाचा कोरिया आणि जपानच्या बेटांवरील हवामानावर होणारा परिणाम या दृष्टीने विचारात घेण्यासारखा आहे.

(२)समुद्रसपाटीत होणारा बदल : बाष्पीभवन आणि पर्जन्यमान यांच्या प्रमाणत बदल झाल्यास समुद्रसपाटीची उंची कमीजास्त होते. पॅसिफिक महासागराची समुद्रसपाटी अटलांटिकपेक्षा २० सेंमी. ने जास्त असते. पॅसिफिक महासागरातील पाण्याची क्षारता व घनता कमी असल्याने हे घडते. वाऱ्यांचा वेग, दिशा व लाटा यांच्या परिणामामुळे कँटन बेटाभोवती समुद्रपातळी दर चार दिवसांनी नियमितपणे बदलते. पॅसिफिक महासागराची पातळी हळूहळू उंचावत आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम किनाऱ्यावर होतो.

(३)समन्वेषणाचे आणि वाहतुकीचे मार्ग : दळवळणाच्या दृष्टीने महासागर हा अडसर नसून तो एक महत्त्वाचे व सुलभ साधन आहे. पूर्वीच्या काळी प्रवाहांच्या दिशेने होड्या आणि लहान बोटी सहज वल्हविल्या जात. पेरू प्रवाहामुळे या बोटी आणि होड्या दक्षिण विषुववृत्तीय प्रवाहांच्या टप्प्यात येत आणि तेथून त्या प्रवाहांबरोबर दिवसाला ६८ किमी. या वेगाने पश्चिमेकडे जाऊ लागत. आजही जपान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांचे उत्तर आणि दक्षिण अमेरिका यांच्याशी असलेले व्यापारी संबंध पॅसिफिक महासागरामुळे सुलभ झाले आहेत. १९१४ साली पनामा कालव्याने अटलांटिक व पॅसिफिक महासागर जोडण्यात आल्याने दळणवळण अधिकच सुलभ झाले.

(४)महासागर-खाद्यपदार्थांचा एक साठा : पॅसिफिक महासागराच्या काही भागांत मत्स्यक्षेत्रे निर्माण झाली आहेत. त्यांपैकी एक जपानच्या पूर्वेस, दुसरे उ. कॅलिफोर्निया आणि बेरिंग समुद्राच्या दरम्यान आणि तिसरे पेरूच्या किनाऱ्यावर आहे. दरवर्षी जपानच्या मत्स्यक्षेत्रातून हेरिंग, सार्डिन व सॅमन, बोनिटो तसेच कवचधारी मासे, खेकडे, शेवंडा व झिंगे मोठ्या प्रमाणात सापडतात. या माशांचे ३६,९०० मे. टन ट्यूना व बोनिटो या माशांचे १,७८,५०० मे. टन व हेरिंग माशांचे १,०५,७०० मे. टन उत्पन्न मिळते. कॅनडाच्या पश्चिम किनाऱ्यावर सॅमन, हॅलिबट आणि हेरिंग हे मासे मोठ्या प्रमाणावर आढळतात तर द. अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर पेरूमध्ये अँकोव्हेता मासेमारी फार झाली आहे. सांप्रत पेरूचे मत्स्योत्पादन प्रथम क्रमांकाचे आहे. इंडोनेशिया, फिलिपीन्स, तैवान यांची मासेमारीही मोठी आहे.

खनिज संपत्ती : आज सागरतळावरील संपत्ती काढता येणे शक्य होत असल्याने पॅसिफिक महासागराचे महत्त्व वाढत आहे. पाण्यातच मीठ, ब्रोमीन, मॅग्नेशियम यांचे उत्पादन तर होतेच, पण या सागराच्या तळाशी मँगॅनीजचे साठे गाठींच्या स्वरूपात आढळतात. अमेरिकेच्या व आशियाच्या किनाऱ्यांवर खनिजे तेल मोठ्या प्रमाणात सापडण्याची शक्यता आहे.

संदर्भ : 1.Monkhouse, F. J. Principles of physical Geography, London, 1962.

   2. Pirie, R. G. Ed, Oceanography, London, 1973.

   3. Sharma, R. C. Vatal, M. Oceanography for Geographers, Allahabad, 1962.

   4. Sverdrup, H. U, Johnson, M. W. Fleming, R. H. The Oceans, Bombay, 1962.

वाघ, दि. मु. डिसूझा, आ. रे.