पॅव्हन : एक पाश्चिमात्य प्रभावशाली नृत्यप्रकार. सोळाव्या शतकाच्या आरंभी तो उदयास आला व सतराव्या शतकातही लोकप्रिय होता. इटली, फ्रान्स व स्पेन या देशांत तो विशेषत्वाने प्रचलित होता. ‘पाव्हो’ या स्पॅनिश शब्दापासून ‘पॅव्हन’ ही नृत्यसंज्ञा निर्माण झाली असावी. ‘पाव्हो’ म्हणजे मोर. स्त्रिया आपल्या झग्याचा झुलीसारखा भाग मयूराच्या उमलत्या पंखाप्रमाणे फडफडवीत हे नृत्य करतात. स्त्री आपल्या जोडीदाराच्या पाठीवर हात ठेवून चाल करीत जाते अगर सौंदर्यपूर्ण रीत्या मागे येत येत, गुडघ्यात वाकून प्रणाम करीत नृत्य करते. नर्तक गिरक्या घेत वर्तुळाकार फिरतात. त्यावेळी अंगातील लांब अंगरखा पक्ष्याच्या शेपटीसारखा ऐटबाज फुगवितात. ह्या नृत्याची गती संथ, भारदस्त व डौलदार अशी असते. इटली आणि जर्मनी येथे ‘पॅडोव्हाना’म्हणून ओळखला जाणारा नृत्यप्रकार पॅव्हनचाच आविष्कार होता. पॅडोव्हाना ही संज्ञा इटलीतील पॅड्युआ या गावाच्या नावावरून आली असावी. जुन्या फ्रेंच ‘बास’ नृत्याचे पॅव्हन हे उत्तरकालीन रूप मानले जाते. सतराव्या शतकात ‘गॅल्यर्ड ‘हे जोषपूर्ण नृत्य पॅव्हननंतर लगोलग करण्याची प्रथा होती. तथापि मूळ नृत्यप्रकार स्पेनमधून आला. सोळाव्या शतकाच्या आसपास ह्याच नावाचा एक वाद्यमेळाचाही प्रकार होता.
वडगावकर, सुरेंद्र