पॅपॅव्हरेसी: (अहिफेन कुल अफू कुल). फुलझाडांच्या [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग ] ऱ्हीडेलीझ ह्या गणातील एक कुल. ⇨ निंफिएसी (कमल कुल), ⇨ क्रुसिफेरी (मोहरी कुल), ⇨ कॅपॅरिडेसी (वरुण कुल), ⇨ रॅनन्क्युलेसी (मोरवेल कुल), फ्यूमॅरिएसी [पर्पट कुल ⟶ पित्तपापडा] इ. कुलांशी याचे निकट संबंध आहेत. ह्या कुलात ए. बी. रेंडल यांच्या पद्धतीनुसार सु. २८ वंश व ७०० जाती (जे. सी. विलिस यांच्या मते २६ वंश व २०० जाती जी. एच्. एम्. लॉरेन्स यांच्या मते २८ वंश व २५० जाती) असून त्यांचा प्रसार उष्ण कटिबंधेतर व समशीतोष्ण प्रदेशांत आहे. भूमध्य सामुद्रिक प्रदेशांत काही वंश आढळतात. बहुतेक सर्व जाती ⇨ ओषधी, काही झुडपे व फारच थोडे वृक्ष असून सर्वांत ⇨ चीक असतो. काही जाती (उदा., पॉपी, एशोल्टझिया) बागेत लावतात. ⇨ अफूच्या झाडांची मोठी लागवड खसखस व अफूकरिता करतात. पिवळा धोतरा [ ⟶ धोतरा] हे काटेरी तण औषधी आहे. ह्या कुलातील जातींत पाने साधी, एकाआड एक, कधी मूलज (जमिनीतून मुळापासून आल्यासारखी दिसणारी) व गुच्छाकृती (झुबक्याप्रमाणे) असून त्यांची किनार कमीजास्त विभागलेली असते. फुले मोठी, नियमित, आकर्षक, द्विलिंगी, अवकिंज, क्वचित परिकिंज,एकेकटी व अनेक असल्यास मंजरीवर किवा कुंठित (मर्यादित) फुलोऱ्यावर [⟶ पुष्पबंध] येतात. संदले दोन ते तीन, सुटी व लवकर गळणारी प्रदले चार ते सहा किंवा आठ ते बारा व सुटी केसरदले बहुधा अनेक, कधी दोन ते चार किंजदले दोन किंवा अधिक किंजपुट ऊर्ध्वस्थ व बहुधा त्यात एकच कप्पा असून बीजकविन्यास (बीजकांची मांडणी) तटलग्न असतो किंजलाचा अभाव असून किंजल्क विभागून पसरलेला असतो [⟶ फूल]. बोंडातून छिद्रावाटे किंवा शकले होऊन लहान, गोलसर किंवा मूत्रपिंडाकृती तैलयुक्त बिया बाहेर पडतात. काहींची फळे तडकत नाहीत. फुलांतील मधाचा अभाव भरपूर परागाने भरून काढल्याने कीटक त्याकरिताच फुलांवर येतात.
परांडेकर, शं. आ.