पहाडवेल : (पहाडमूळ, पाठा हिं. निर्विषी गु. वेणीवेल सं. अंबष्ठा, यूथिका, वेणीवल्ली इं. व्हेल्वेट लीफ, फॉल्स परेरा ब्रॅव्हा लॅ. सिसँपेलॉस परेरा कुल-मेनिस्पर्मेसी).⇨गुळवेल, ⇨ वसनवेल, ⇨ काकमारी इत्यादींचा समावेश असलेल्या द्विदलिकित फुलझाडांच्या कुलातील ही साधारण लवदार झुडुपवजा वेल आशिया, पू. आफ्रिका, श्रीलंका, अमेरिका व भारतातील उष्ण प्रदेश इत्यादींत सामान्यपणे आढळते पाने साधी, एकांतरित (एकाआड एक), छत्राकार, गोलसर किंवा मूत्रपिंडाकृती, लांब देठाची, ३·८–१० सेंमी. आणि कोवळेपणी लवदार असतात. फुले एकलिंगी, लहान, पिवळट व स्वतंत्र फुलोऱ्यावर आणि भिन्न वेलींवर असतात. पुं-पुष्पे कुंठित (मर्यादित) फुलोऱ्यावर आणि स्त्री-पुष्पे मंजऱ्यांवर [⟶ पुष्पबंध]. जुलै-सप्टेंबरात येतात. पुं-पुष्पात चार संदले, चार प्रदले आणि दोन ते चार केसरदले व पेल्यासारखा लहान पुष्पमुकुट असतो. स्त्री-पुष्पात संदल व प्रदल एकेक असून किंजल आखूड आणि किंजल्क त्रिखंडित असतो [⟶ फूल]. फळ अश्मगर्भी (आठळीयुक्त), लाल, केसाळ व किंचित चपटे असून बिया अर्धवलयाकृती असतात इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ मेनिस्पर्मेसी अथवा गुडूची (गुळवेल) कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. या वेलीचे मूळ दीपक (भूक वाढविणारे), मूत्रल (लघवी साफ करणारे), रेचक असून अतिसार, अग्निमांद्य, जलशोफ (पाणी साचून सूज येणे), कफ, गर्भाशयभ्रंश, मूत्रमार्गदाह (मूत्रमार्गाची जलजळ) इत्यादींवर गुणकारी असते. पाने शीतक (थंडावा देणारी) असून ती वाटून जखमांवर लावल्यास चांगली असतात. या वनस्पतीपासून बळकट धागा मिळतो. मुळात पेलोसीन हे अल्कलॉइड (०·५%) असते. शिवाय ह्या वनस्पतीत सॅपोनीन असते. ह्या वनस्पतीच्या खोडात द्वितीयक वाढ असंगत प्रकारची असते [⟶ शारीर, वनस्पतींचे]. सुश्रुतसंहितेत गुडूचीबरोबरच ‘यूथिके’चा उल्लेख शाक वर्गात केलेला आढळतो.
पाटील, शा. दा.
“