पशुखाद्य : पशुपालनात पशुप्रजननाच्या (पशुपैदाशीच्या) इतकेच किंबहुना थोडे अधिक महत्त्व पशुखाद्याला देणे सयुक्तिक ठरेल. मानवी आहाराप्रमाणे पशुखाद्याचा उपयोग पशुंचे शरीरपोषण, त्यांची वाढ, उष्णता व ऊर्जा उत्पन्न करणे, क्षणोक्षणी होणारी शरीराची झीज भरून काढणे यांकरिता तर होतोच, शिवाय अप्रत्यक्षपणे दूध, मांस, अंडी व लोकर यांचे उत्पादन आणि शेतीच्या व वाहतुकीच्या कामांसाठी चलशक्ती पुरविण्यासाठीही होतो. पशुखाद्य या विषयाचा प्रत्यक्ष संबंध पशुपोषण या विषयाशी असला, तरी पर्यायाने जीवरसायनशास्त्र (सजीवामध्ये होणाऱ्‍या रासायनिक स्थित्यंराच्या अभ्यासाचे शास्त्र) व पशूंचे शरीरक्रियाविज्ञान (शरीरातील कार्य व क्रिया कशा चालतात याच्या अभ्यासाचे शास्त्र) या शास्त्रांशी येतो. शौकाकरिता पाळलेली कुत्री, मांजरे यांसारखे प्राणी सोडल्यास पशुपालन हे प्रायः उत्पादनाच्या म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून केले जात असल्यामुळे थोड्या खर्चात जास्तीत जास्त उत्पादन करणे क्रमप्राप्त होते. पशुपालनामध्ये खाद्यावर होणाऱ्‍या खर्चाचे प्रमाण ६० ते ८०% पर्यंत आहे. उत्पादनाच्या रूपाने या खर्चाचा योग्य मोबदला मिळण्यासाठी निरनिराळ्या पशूंच्या पचन तंत्रांचा (पचनसंस्थांचा) अभ्यास करून खाद्यातील कोणते पोषक घटक कोणता पशू अधिक कार्यक्षमतेने पचवू शकतो, तसेच विविध खाद्यपदार्थांत कोणते पोषक घटक किती प्रमाणात आहेत यांचा अभ्यास होणे अपरिहार्य होते . ए. थार ( १७५२—१८२८) या जर्मन संशोधकांनी गवत-कडबा या बाबतीतील असा अभ्यास प्रथमतः केला. त्यानी विविध गवतांची पोषणमूल्ये व जनावरांच्या गरजा यांसंबंधीची कोष्टके तयार केली. पुढे त्यांत सुधारणा होत जाऊन हल्लीचे पशुआहारशास्त्र अस्तित्वात आले आहे.

मानव भटक्या अवस्थेत राहत असताना स्वतःसाठी, तसेच त्याने पाळलेल्या पशूंसाठी नैसर्गिक खाद्याच्या शोधात फिरत असे. पुढे तो शेती करून राहू लागल्यावर पिकातील धान्य वगळता उरलेला भाग पशुखाद्य म्हणून वापरू लागला आणि त्याची साठवण करू लागला. उत्तर यूरोपमध्ये बीटची पाने किंवा मक्याची ताटे जमिनीत पुरून साठविण्याची पद्धत अनेक वर्षांपासून प्रचारात होती असे दिसते.

सर्वसाधारणपणे शरीरपोषणासाठी मनुष्यमात्रास लागणारे खाद्यातील पोषक घटक पशूंनाही आवश्यक आहेत [⟶ पोषण] . वस्तुतः वनस्पतींमध्ये आढळणाऱ्‍या मूलघटकद्रव्यांपासूनच पशूंची शरीरे बनलेली आहेत. ढोबळमानाने निरनिराळ्या जातींच्या पशूंच्या शरीररचनेत फारसा फरक दिसत नसला, तरी त्यांच्या पचन तंत्रातील थोड्याफार फरकामुळे खाद्यातील विविध पोषक घटकांच्या जरूरीमध्ये फरक आढळून येतो. पशुखाद्यांमध्ये अनेक पदार्थांचा समावेश होतो. या पदार्थांच्या रासायनिक रचनेमध्ये विविधता आढळते, तसेच त्यांच्या पोषणमूल्यांकामध्येही फरक असतो. असे असले, तरी सर्व पदार्थांतील पोषणोपयोगी घटक मात्र प्रथिने, कार्बोहायड्रेटे (पिष्टमय पदार्थ), वसा (स्निग्ध पदार्थ अथवा चरबी), खनिजे व जीवनसत्त्वे हेच असतात. .यांतील प्रत्येक घटकाचे पोषणातील कार्य वैशिष्ट्यपूर्ण आहेच पंरतु जीवनावश्यकही आहे. याचाच अर्थ यातील कुठल्याही घटकाची उणीव असल्यास पशूंचे योग्य पोषण होणार नाही, ते दुर्बल राहतील व त्यांच्यापासून होणारे उत्पादन घटेल. इतकेच नव्हे, तर त्यांचे आरोग्य बिघडून क्वचित ते रोगाला बळी पडण्याचा संभव आहे.

पशूंच्या आहारशास्त्राप्रमाणे त्यांच्या पोषणासाठी खाद्यामध्ये पुढील पोषक घटकांची आवश्यकता आहे : (१) पाणी, (२)प्राथिने, (३) कार्बोहायड्रेटे, (४) वसा, (५) खनिजे व (६) जीवनसत्त्वे.

पाणी :खाद्यातील इतर पोषक घटकांशिवाय पशू काही काळ जिवंत राहू शकेल पण पाण्यावाचून मात्र तो फार दिवस जगू शकणार नाही. निरनिराळ्या पशूंना लागणाऱ्‍या पाण्याचे प्रमाण त्यांचे आकारमान, वय, वजन, त्यांना मिळणारा आहार, त्यांच्यापासून अपेक्षित उत्पादन, त्यांना करावे लागणारे काम, हवेचे तापमान इ. गोष्टींवर अवलंबून असते. लहान वयाच्या जनावरांना त्यांच्या वजनाच्या मानाने वयस्क जनावरांपेक्षा अधिक पाणी लागते. कोंबडीच्या ३ आठवडे वयाच्या पिलांना दररोज त्यांच्या वजनाच्या २५ %पाणी आवश्यक असते, तर वयस्क कोंबड्यांना १०% पुरते. तसेच १५ किग्रॅ. वजनाच्या डुकराला वजनाच्या १७% पाण्याची आवश्यकता आहे, तसेच १०० किग्रॅ. वजनाच्या डुकराला १०% पुरते. गाई, म्हशी, डुकरे यांना २५ से. तापमानामध्ये १० ते १५ से तापमानापेक्षा ६० ते ८०% अधिक पाण्याची गरज लागते. शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास पाण्यामुळे मदत होते. दुग्धोत्पादनासाठी पाण्याचा पुष्कळसा भाग वापरला जातो. दुधामध्ये ८७% पाणी असते म्हणून दूध देणाऱ्‍या गाई-म्हशी इ. जानावरांना दुधाच्या प्रमाणाच्या चौपट अधिक पाण्याची आवश्यकता असते.

शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले म्हणजे रक्तातील पाण्याचा अंश कमी होऊन रक्त परिवहनात (रुधिराभिसरणात ) अडथळा निर्माण होतो. अन्नपचनाच्या क्रियेसाठी जरूर असलेले ग्रंथिरस किंवा स्त्राव यांच्या उत्पादनासाठी शरीराला पाण्याची आवश्यकता आहे. खाद्यातील पोषक घटकांचे द्रव माध्यमातून शोषण केले जाते. शिवाय शरीरात घडणाऱ्‍या विक्रिया द्रव माध्यमातच होतात. तसेच शरीराला अनावश्यक असणाऱ्‍या पदार्थांचे घाम, मूत्र यांच्याद्वारे उत्सर्जन (शरीराबाहेर टाकण्याची क्रिया) होण्यासाठीही पाण्याची जरूरी आहे. पाण्याची कमतरता असल्यास सर्वांत अनिष्ट परिणाम सर्व लहान वयाच्या जनावरांवर होतो. त्याखालोखाल डुकरे, गाई-म्हशी, मेंढ्या व शेळ्या असा क्रम लागेल.

प्रथिने :प्रथिने ही शरीराच्या कोशिकांचे (पेशींचे) आवश्यक घटक आहेत. ती निरनिराळ्या ⇨ मिनो अम्लांचेबनलेले जटिल (गुंतागुंतीचे) पदार्थ आहेत. यात नायट्रोजन, हायड्रोजन, कार्बन, ऑक्सिजन व बहुधा गंधक व कधीकधी फॉस्फरस असतो. चारदाण्यातील वनस्पतिजन्य प्रथिने ॲमिनो अम्लांच्या स्वरूपात पशू शोषण करतात व रक्तावाटे त्यांचा शरीरपोषणासाठी उपयोग केला जातो. सर्व पशूंना आर्जिनीन, हिस्टिडीन, आयसोल्युसीन, ल्युसीन, लायसीन, मिथिओनीन, फिनिल-ॲलॅनीन, थ्रिओनीन, ट्रिप्टोफेन व व्हॅलीन या दहा विवक्षित ॲमिनो अम्लांची जरूरी असते. कोंबड्यांना याव्यतिरिक्त ग्लायसीन आणि ग्लुटामिक या ॲमिनो अम्लांचीही जरूरी असते. ज्या प्रथिनांमध्ये शरीरपोषणाला आवश्यक अशी ही दहा ॲमिनो अम्ले योग्य प्रमाणात असतात, त्या प्रथिनांना चांगल्या दर्जाची प्रथिने म्हणतात. दूध, मांस, मासे, दुधाचे पदार्थ यांतील प्रथिनांचा यात समावेश आहे. याउलट कमी दर्जाच्या प्रथिनांमध्ये वर उल्लेखिलेल्या दहांपैकी काही ॲमिनो अम्ले कमी प्रमाणात असतात किंवा अजिबात नसतात. मका व इतर धान्यातील प्रथिने या प्रकारची आहेत. पशूंच्या शरीरात आढळणाऱ्‍या ॲमिनो अम्लांपैकी वर उल्लेखिलेली दहा ॲमिनो अम्ले त्यांच्या शरीरात तयार होऊ शकत नाहीत म्हणून ती असलेली प्रथिने खाद्यातून मिळणे जरूर असते व त्यांना आवश्यक ॲमिनो अम्ले म्हणतात. याउलट आणखी १२ ॲमिनो अम्ले त्यांच्या शरीरात तयार होऊ शकतात व त्यांना अनावश्यक ॲमिनो अम्ले म्हणतात. बहुतेक प्राथिनांमध्ये १६%नायट्रोजन असतो. कार्बनी पदार्थातील नायट्रोजनाचे मापन करून त्या पदार्थातील प्राथिनांचे प्रमाण काढता येते.

एका कप्प्याचे पोट असणाऱ्या माकड, डुक्कर, कुत्रा, ससा, कोंबड्या इ. प्राण्यांना प्रथिनांच्या प्रमाणाबरोबरच त्यांचा दर्जा चांगला असणे आवश्यक आहे. याउलट चार कप्प्यांचे पोट असणाऱ्‍या गाय, म्हैस, शेळी, मेंढी इ. रवंथ करणाऱ्‍या पशूंच्या बाबतीत खाद्यातील प्रथिनांच्या दर्जाला फारसे महत्त्व नाही. याचे कारण रोमंथिकेत (पोटाच्या चार कप्प्यांपैकी पहिल्या कप्प्यात) असलेले सूक्ष्मजंतू साध्या नायट्रोजनयुक्त पदार्थांपासून जरूर ती ॲमिनी अम्ले स्वतः साठी तयार करतात आणि त्यांचा साठा ते आपल्या शरीरात करतात. या पशूंच्या अन्नपचन क्रियेमध्ये या सूक्ष्मजंतूंचे विभाजन होऊन त्यांतील ॲमिनो अम्ले आपोआप पशूंना मिळतात. गुरे आणि मेंढ्या या पद्धतीने प्रथिनांच्या जागी यूरियाचा उपयोग करून घेतात परंतु लहान वयाची वासरे, कोकरे यांची रोमंथिका पूर्णपणे कार्यक्षम नसल्यामुळे ही सूक्ष्मजंतूंची क्रिया कार्यान्वित होईपर्यंत त्यांना चांगल्या दर्जाची प्रथिने खाद्यातून पुरविणे आवश्यक असते. शाकाहारी पशूंना हरभरा, उडीद, मूग, चवळी, डाळी डाळींची चुणी आणि तीळ, जवस, कापूस व भुईमूग यांची पेंड यांतून वनस्पतिजन्य प्रथिने मिळतात. कुत्रे, कोंबड्या आणि तत्सम मांसाहारी प्राणी मासे, अंडी, मांस यांपासून प्रणिज प्रथिने मिळवितात.


शरीराच्या चलनवलन क्रियेमध्ये स्नायू, त्वचा व इतर अवयव यांची रोज होणारी झीज भरून काढण्यासाठी प्रथिनांची आवश्यकता असते. वाढत्या वयाच्या पशूंच्या शरीराची वाढ होण्यासाठी तसेच दूध, मांस, अंडी, लोकर यांच्या उत्पादनासाठी अधिक प्राथिनांची गरज असते. काम करणाऱ्‍या बैलांनाही थोड्याफार प्रमाणात अधिक प्रथिनांची गरज असते हे खरे पण त्यांना लागणारी उर्जा ते कार्बोहायड्रेटांपासून मिळवू शकतात [⟶ प्राथिने].

कार्बोहायड्रेटे:हे पदार्थ कार्बन, ऑक्सिजन व हायड्रोजन यांच्या संयोगामुळे बनलेले असतात. वनस्पती हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड शोषून घेतात व सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने हरितद्रव्यामुळे त्याचे कार्बोहायड्रेटामध्ये रूपांतर होते. कार्बोहायड्रेटे प्रथम शर्करेच्या स्वरूपात असतात व नंतर त्यांपासून आणखी जटिल संयुगे तयार होऊन स्टार्च, डेक्स्ट्रोज यांसारख्या अधिक रेणुभार असलेल्या रूपात झाडाची पाने, डहाळ्या,कडबा यांमध्ये ती स्थिर होतात. हीच जटिल संयुगे बनविण्याची क्रिया आणखी होऊन त्यांचे सेल्युलोजामध्ये रूपांतर होते. वाळलेल्या गव्हाच्या कोंड्यामध्ये स्टार्च व सेल्युलोजासारखी जटिल कार्बोहायड्रेटे २०% पर्यंत असतात. सेल्युलोज म्हणजे वनस्पतीतील तंतुमय पदार्थ, या पदार्थामुळेच वनस्पतीमध्ये काठिण्य निर्माण होते. स्टार्च व साखर यांसारखी कार्बोहायड्रेटे पशू सहज रीत्या पचवू शकतात म्हणून अशा पदार्थांचे पोषणमूल्य चांगले असते. याउलट वनस्पतीच्या तंतुमय भागामध्ये असणारी सेल्युलोजासारखी जटिल कार्बोहायड्रेटे पचनास जड असतात. असे असले, तरी पशूंच्या खाद्यात तंतुमय पदार्थांची काही अंशी आवश्यकता आहेच. त्यांच्या पचनक्रियेत बरीच ऊर्जा खर्च होते व हे होत असताना उत्पन्न होणाऱ्‍या उष्णतेमुळे शरीराचे तापमान टिकविण्यास मदत होते. एक कप्प्याचे पोट असलेल्या कुत्रा, मांजर, डुक्कर, कोंबड्या इ. प्राण्यांमध्ये तंतुमय पदार्थांचे पचन अल्प प्रमाणात होते परंतु चार कप्प्यांचे पोट असणाऱ्‍या गाई-गुरे, शेळ्या, मेंढ्या यांसारख्या रवंथ करणाऱ्‍या प्राण्यांच्या रोमंथिकेत सूक्ष्मजंतूंच्या क्रियेमुळे तंतूतील घटकांचे विभाजन होऊन त्यांपासून अधिक प्रमाणात अन्न घटक मिळतात. याचाच अर्थ रवंथ करणारे पशू अशा तंतुमय पदार्थांचा शरीरपोषणासाठी चांगला उपयोग करू शकतात, घोड्यामध्ये हीच क्रिया अंधनालामध्ये (मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या पण एका टोकाशी बंद असलेल्या नळीसारख्या भागामध्ये) होते. केवळ तंतुमय पदार्थावरसुद्धा घोडा आपली गुजराण करू शकतो.

ज्वारी, बाजरी यांसारखी तृणधान्ये, द्विदल धान्ये , पेंड, धान्याचा कोंडा यांपासून हे पोषक घटक मिळतात. यांमध्ये तंतुमय भाग बऱ्‍याच कमी प्रमाणात असतो त्यामुळे त्यातील बराच भाग पचनीय असतो. अशा खाद्यांना खुराक किंवा सत्त्वान्ने म्हणतात. याउलट तंतुमय भाग बऱ्‍याच प्रमाणात असलेल्या खाद्यांना तंत्वान्ने किंवा वैरण म्हणतात. कार्बोहायड्रेटांचे प्रमाण कमी पडल्यास ऊर्जा व उष्णतेच्या गरजेसाठी प्रथिने व यांवर शरीराला अवलंबून राहावे लागते. प्रथिने एक तर महाग असतात आणि त्यांच्या पचनक्रियेमधून उरलेल्या टाकाऊ भागांचे शरीराबाहेर उत्सर्जन होताना मूत्रपिंडांवर अधिक भार पडल्यामुळे ती खराब होण्याचा संभव असतो. जरूरीपेक्षा जास्त कार्बोहायड्रेटे खाण्यात आल्यास त्यांचे वसेमध्ये रूपांतर होऊन त्या स्वरूपात ती साठवली जातात.

कार्बोहायड्रेटांचे ज्वलन [जैव ऑक्सिडीभवन ⟶ ऑक्सिडीभवन]होताना उत्पन्न होणाऱ्‍या उष्णतेमुळे शरीराचे तापमान स्थिर ठेवले जाते. शरीराचे वाढ होण्यासाठी आणि दूध, मांस, अंडी, लोकर  इत्यादींच्या उत्पादनासाठी ऊर्जेची जरूरी असते व ही ऊर्जा कार्बोहायड्रेटांच्या पचनामधून मिळत असते [⟶ कार्बोहायड्रेटे].

वसा :कार्बोहायड्रेटांप्रमाणेच रासायनिक पृथःकरण असणारा हा पोषक घटक शरीरात उष्णता व ऊर्जा निर्माण करण्याचे कार्य़ करतो. यातील हायड्रोजन व ऑक्सिजन यांचे प्रमाण पाण्यातील गुणोत्तराच्या प्रमाणात नसते व कार्बोहायड्रेटामध्ये ते तसे असते इतकेच. याखेरीज शरीरपोषणाला आवश्यक अशी लिनोलीइक व लिनोलीनिक ही वसाम्ले काही प्रकारच्या वसांमध्ये असतात. ग्लिसरीन व वसाम्ले यांच्या संयोगाने वसा बनते. वर उल्लेखिलेली वसाम्ले सोडून वसेमधील बाकी सर्व पोषक घटकांची गरज कार्बोहायड्रेटे भागवू शकतात. वसेमध्ये ऑक्सिजनाचे प्रमाण बरेच कमी असते त्यामुळे तिच्या पचनक्रियेत होणाऱ्‍या ज्वलनक्रियेमध्ये कार्बोहायड्रेटांच्या वजनाच्या तुलनेने सव्वादोन पट अधिक ऊर्जा मिळते. काही वेळा पशूंच्या आहारातील कार्बोहायड्रेटांचे प्रमाण कमी करून वसेचे प्रमाण वाढविणे विशेषतः कामाच्या जनावरांच्या बाबतीत फायद्याचे ठरते [⟶ तेले व वसा ].

खनिजे :पशुखाद्यामध्ये सर्व खनिज पोषक द्रव्यांचे प्रमाण अत्यल्प असले, तरी ती असणे अत्यंत आवश्यक आहे. सोडियम, क्लोरीन, कॅल्शियम, फॉस्फरस, गंधक, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फ्ल्युओरीन, मँगॅनीज, लोह, तांबे, कोबाल्ट, आयोडीन, जस्त, मॉलिब्डेनम व सिलिनियम  ही ती खनिजद्रव्ये आहेत. यांतील शेवटच्या ९ खनिजांना लेश मूलद्रव्ये म्हणतात कारण त्यांच्या बाबतीतील शरीराची गरज अत्यंत अल्प आहे. यांतील काही खनिजद्रव्यांचे खाद्यातून शोषण होण्यासाठी त्यातील एकाचे दुसऱ्‍यावर नियंत्रण असते. उदा., पशुखाद्यात कॅल्शियम व फॉस्फरस यांचे विशिष्ट प्रमाण असेल, तरच हे दोन्ही पदार्थ शरीरात शोषण केले जातात. असेच सोडियम व पोटॅशियम या खनिजांच्या बाबतीत घडते. एकाचे प्रमाण कमी असल्यास दुसरा पदार्थ खाद्यात उपलब्ध असूनही त्याच्या शोषणावर विपरीत परिणाम घडतो.

आयोडिनाच्या न्यूनतेमुळे डुकरांच्या पिलांमध्ये व कोकरांमध्ये गलगंड नावाचा  आजार होतो. लोह, तांबे, कोबाल्ट यांचे प्रमाण कमी पडल्यास या प्राण्यांना पांडुरोग (ॲनिमिया) होण्याची शक्यता असते. मँगॅनिजाच्या न्यूनतेमुळे कोंबड्यांच्या पिलांमध्ये पेरोसिस (हाडे वाकणे) हा रोग होतो, तसेच अंड्यांचे उबण्याचे प्रमाण कमी होते. जस्ताच्या न्यूनतेमूळे डुकरांमध्ये पॅरॅकेराटोसीस नावाचा त्वचारोग होतो.

पशूंच्या शरीरामध्ये खनिजांचे प्रमाण २% ते ४%इतकेच असले, तरी कंकाल (सांगाडा), स्नायू व शरीरातील मृदू ऊतकांच्या (समान रचना व कार्य असणाऱ्‍या कोशिकांच्या समूहांच्या) आरोग्यरक्षणासाठी खनिजे आवश्यक आहेत. रक्तामार्फत शरीराच्या सर्व भागांत ऑक्सिजन पोहोचविण्याचे काम त्यातील तांबड्या कोशिकांत असणाऱ्‍या लोहयुक्त प्रथिनसंयुगामुळे (हीमोग्लोबिनामुळे) होते. रक्तातील खनिज संयुगांमुळे त्यातील हायड्रोजन आयनांचे (विद्युत् भारित अणूंचे) प्रमाण, त्याचा तर्षणदाब [⟶तर्षण]. इ. गुणधर्म स्थिर केले जातात. पचन तंत्रातील पेप्सीन या एंझाइमाचे (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्‍या प्रथिनयुक्त संयुगाचे) कार्य होण्यासाठी जठररसामध्ये अम्लता असणे आवश्यक आहे. ही अम्लता प्राप्त होण्यासाठी हायड्रोक्लोरिक अम्लाचे उत्पादन रक्तातील सोडियम व इतर क्लोराइडांच्यामुळे होते.

जनावरांना देण्यात येणाऱ्‍या दाणावैरणीमधून त्यांना आवश्यक असलेली सर्व खनिजद्रव्ये योग्य प्रमाणात मिळू शकतात. तथापि काही वेळा खनिजांची न्यूनता पडू नये यासाठी खनिजमिश्रणे पशुखाद्यात घालण्याची प्रथा आहे.


जीवनसत्त्वे :मनुष्यमात्राप्रमाणेच पशूंनाही शरीरस्वास्थ्यासाठी जीवनसत्त्वांची आवश्यकता आहे, असे अभ्यासान्ती आढळून आले आहे. वनस्पती जीवनसत्त्वे तयार करतात व त्यांच्यामार्फत खाद्यातून ती पशूंना मिळतात. काही जीवनसत्त्वे पशूंच्या पचन तंत्रामध्ये सुक्ष्मजंतूंच्या क्रियाशीलतेमुळे तयार होतात. जीवनसत्त्वे ही कार्बनी संयुगे असून अल्पप्रमाणामध्ये सुद्धा पशूंचे आरोग्य, शरीराची वाढ, पचनक्रिया, रोगप्रतिकारक्षमता, उत्पादनक्षमता इ. बाबतींत परिणामकारक रीत्या उपयुक्त आहेत.

हिरव्या चाऱ्‍यामध्ये जास्त प्रमाणात असलेल्या कॅरोटीन या पूर्वगामी द्रव्याचे (ज्यापासून जीवनसत्त्व तयार होते अशा द्रव्याचे) पशू अ जीवनसत्त्वामध्ये रूपांतर करतात. या जीवनसत्त्वाच्या न्यूनमुळे वाढ खुंटणे, भूक न लागणे, खंगत जाणे व रातांधळेपणा हे दोष पशूंमध्ये दिसून येतात. जास्त प्रमाणात खाण्यात आलेले अ जीवनसत्त्व यकृतमध्ये साठवले जाते व खाद्यातील या जीवनसत्त्वाच्या अभावाच्या वेळी त्याचा उपयोग केला जातो.

रवंथ करणाऱ्‍या पशूंच्या खाद्यात ब गटातील जीवनसत्त्वांना फारसे महत्त्व नाही. त्यांच्या रोमंथिकेत असणारे सूक्ष्मजंतू ही जीवनसत्त्वे तयार करतात परंतु नवजात वासरे व डुकरे आणि कोंबड्या, कुत्रे यांसारख्या एक कप्प्याचे पोट असणाऱ्‍या प्राण्यांना खाद्यातून विशेषतः रिबोफ्लाविन, निॲसीन, पँटोथिनिक अम्ल आणि ब१२ यांचा पुरवठा करावा लागतो.

ड जीवनसत्त्व हे अ जीवनसत्त्वाप्रमाणे वसेमध्ये विरघळणारे आहे आणि कॅल्शियम व फॉस्फरस यांच्या शोषणावर यांचा अनुकूल परिणाम घडतो. सूर्यकिरणातील जंबुपार (वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य) किरणांच्या प्रक्रियेने पशूंच्या त्वचेतील पूर्वगामी द्रव्याचे ड जीवनसत्त्वात रूपांतर होते. वाळलेल्या गवतामधून पशूंना ह्या जीवनसत्त्वाचा भरपूर पुरवठा होतो. कारण हिरवे गवत वाळविताना त्यातील अरगोस्टेरॉल वा द्रव्याचे ड जीवनसत्त्वात रूपांतर होते. याच्या अभावाने वाढत्या वयाच्या पशूंमध्ये मुडदूस हा रोग होते.

अंड्यांच्या उबण्याच्या गुणधर्मावर ई जीवनसत्त्वाचा इष्ट परिणाम घडून येतो. क आणि के ही जीवनसत्त्वे पशू आपल्या शरीरात तयार करू शकतात. त्यामुळे पशुखाद्यामध्ये यांचा अंतर्भाव करण्याची जरूरी भासत नाही [⟶ जीवनसत्त्वे].

प्रतिजैव पदार्थ, हॉर्मोने व शरीरवाढीस चालना देणारे पदार्थ :हे पदार्थ खाद्यघटक नाहीत . प्रतिजैव (आँटिबायॉटिक) पदार्थांचा १९५० पासून पासून पशूंच्या खाद्यामध्ये समावेश होऊ लागला आहे. या पदार्थांमुळे पशूंची वाढ त्वरित होते व मृत्यूचे प्रमाण कमी होते. क्लोरोटेट्रासायक्लीन, ऑक्सिटेट्रासायक्लीन, बॅसिट्रॅसीन व पेनिसिलीन या प्रतिजैव पदार्थांचा वापर सर्वसाधारणपणे करतात. यांशिवाय टेस्टोस्टेरोन, प्रोजेस्टरोन, डाय-एथिल स्टिल्बेस्ट्रॉल, इस्ट्रडिऑल यांसारख्या हॉर्मोनांचा (काही इंद्रियांच्या कार्यावर विशिष्ट परिणाम करणाऱ्‍या रासायनिक द्रव्यांचा)  उपयोग गुरांच्या आणि मेंढयांच्या खाद्यांतून त्यांना लवकर गलेलठ्ठ करण्यासाठी म्हणजेच मांसोत्पादनात लवकर वाढ होण्याच्या दृष्टीने केला जातो.

पशुखाद्यातील पदार्थांचे वर्गीकरण :पशुखाद्य पदार्थांचे वर्गीकरण त्यातील घटकांच्या पोषणमूल्यानुसार सत्त्वान्ने ( खुराक ) आणि तंत्वान्ने अशा दोन वर्गांमध्ये करतात.

सत्त्वान्ने : शरीरपोषणाला आवश्यक पोषक घटक जास्त प्रमाणात असलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश सत्त्वान्नमध्ये केला जातो. याशिवाय हे पोषक घटक पचनसुलभ अशा रासायनिक संयुगांच्या स्वरूपात असतात. खालील खाद्यपदार्थांचा या वर्गामध्ये समावेश केला जातो.

(अ) धान्ये व कडधान्ये :गहू, मका, ज्वारी, बाजरी, सातू, ओट व राय ही धान्ये आणि हरभरा, तूर मूग, उडीद, कुळीथ व मटकी ही कडधान्ये व त्यांचे उपपदार्थ पशुखाद्य म्हणून वापरतात. धान्यामध्ये कार्बोहायड्रेटांचे प्रमाण अधिक असल्यामुळे ही पचनसुलभ आहेत. ही जशीच्या तशी भिजवून किंवा भरडून दिली जातात.

(आ) तेलबिया :तीळ, सोयाबीन, भुईमूग, जवत, करडई, नारळ, सूर्यफुलांच्या बिया या तैलयुक्त पदार्थांचा पशुखाद्यात उपयोग करतात. माणसाला खाण्यासाठी किंवा औद्योगिक उपयोगासाठी तेल काढण्याकरिता या बियांचा उपयोग करतात व तेल काढल्यावर उरलेली पेंढ पशुखाद्य म्हणून वापरतात. पेंड तयार करण्याच्या पद्धतीनुसार पेंडीमध्ये १ ते ५% पर्यंत चरबी व २० ते ५०%पर्यंत प्रथिने असतात. भुईमुगाच्या शेंगांचे व सरकीचे टरफल ( फोल) तंत्वात्मक असल्यामुळे या बियांचा टरफलासकट तेल काढण्यासाठी उपयोग केल्यास मिळणाऱ्‍या पेंडीमध्ये तंतुमय भाग अधिक येऊन प्रथिने व कार्बोहायड्रेटे यांचे प्रमाण कमी होते. या खाद्यापदार्थांचा वापर धान्य किंवा तंत्वात्मक आहारातील प्रथिनांचे प्रमाण वाढविण्यासाठी पूरक म्हणून करतात.

 (इ) बीट, ऊस यांपासून साखर तयार करणाऱ्‍या कारखान्यातील बीटचा लगदा, मळी लिंबाच्या जातीतील फळांपासून रस काढणाऱ्‍या कारखान्यातील चोथा गव्हाचा व तांदळाचा कोंडा स्टार्च तयार करणाऱ्‍या कारखान्यातील मक्याच्या कणसाचे दाणे काढल्यानंतर उरलेला भाग बिअर बनविणाऱ्‍या कारखान्यातील वापरलेले धान्य खाटीक खान्यातील आणि मांस व मासे डबाबंद करणाऱ्‍या कारखान्यातील वाया जाणारा भाग अननसाच्या साली इ. पदार्थांचा यामध्ये समावेश आहे.

तंत्वान्ने : या वर्गातील खाद्यपदार्थांमध्ये पोषक घटक बऱ्‍याच कमी प्रमाणात असून तंत्वात्मक भाग मोठ्या प्रमाणावर असतो. या पदार्थांमध्ये निरनिराळ्या प्रकारची गवते (उदा., अल्फाल्फा, क्लोव्हर, गजराज, लसूण घास इ.) , शिंबा, पेंढा, ज्वारी, बाजरी व मका यांचा कडबा, काही झाडांचा पाला, काही खाद्य कंद व धान्य काढून घेतल्यावर उरलेले तूस या पदार्थांचा समावेश आहे. गवतामध्ये अनेक जाती असून त्यातील पोषक घटकांचे प्रमाणही निरनिराळे आहे. फुलावर येण्यापूर्वी कापलेल्या गवतातील पोषक घटकांचे प्रमाण फुलावर आल्यावर कापलेल्या गवतापेक्षा अधिक असते. तसेच गवत व वैरण यांपासून बनविलेल्या मुरघास व मुरवैरण यांमध्ये पोषक घटक व जीवनसत्त्वे यांचे प्रमाण अधिक असते. मुरघास व मुरवैरण तयार करण्यासाठी गवत व वैरणीच्या पिकांची पूर्ण वाढ होण्याआधी व त्यांमध्ये ५० ते ६५ %पाण्याचे प्रमाण असताना ती कापण्यात येऊन त्यांची हवाबंद पेवामध्ये दडपून भरणी करतात. किण्वन (आंबविण्याच्या) क्रियेने त्यात ॲसिटिक व इतर अम्ले तयार होतात. वाळलेल्या गवतामध्ये पाण्याचे प्रमाण २२ %पेक्षा कमी असावयास पाहिजे अन्यथा ते साठविल्यावर बुरशीसारख्या वनस्पतींची वाढ होऊन त्याचा कस कमी होतो. तांदूळ, गहू, ओट व सातू यांचा पेंढा गाई-गुरे यांसारख्या रवंथ करणाऱ्‍या जनावरांना खाद्य म्हणून वापरतात. यामध्ये प्राथिनांचे प्रमाण अत्यल्प असून तंत्वात्मक भाग मोठ्या प्रमाणावर असतो [⟶ वैरण मुरघास].


खाद्यपदार्थींंचे पोषणमूल्यांकन:पशूंच्या आहारामध्ये कोणते पदार्थ किती प्रमाणात द्यावेत हे ठरविण्यासाठी या पदार्थांचे मूल्यांकन करणे जरूर असते. असे मूल्यांकन करण्याकरिता प्रथमतः त्या पदार्थाचे रासायनिक पृथःकरण करून त्यात कोणते पोषक घटक किती प्रमाणात आहेत, ते पाहतात. सर्वसाधारणपणे रासायनिक पृथःकरण करताना शुष्कांश (सुका अन्नांश), प्रथिने, वसा, तंतुमय अंश, नायट्रोजनरहित अन्नांश (यामध्ये पिष्टमय पदार्थ व साखर म्हणजे कार्बोहायड्रेटे) व खनिजे यांचे शेकडा प्रमाण काढतात. एखाद्या खाद्यपदार्थातील विविध पोषक घटकांचे नुसते शेकडा प्रमाण किती हे समजून चालणार नाही. कारण त्यातील सर्वच्या सर्व १००% भाग पचनयोग्य असत नाही. याकरिता पशूंना ते खाद्य देऊन अनेक प्रयोगान्ती त्यातील विविध पोषक घटकांत शेकडा पचनयोग्य भाग किती आहे, हे ठरवावे लागते. उदा., ओटमधील प्रथिनांचा ७० % भागच पचनयोग्य आहे. यालाच पचनयोग्य प्रथिन गुणांक असे म्हणतात. याप्रमाणे इतर सर्व पोषक घटकांचे–नायट्रोजनरहित अन्नांश, वसा, तंतुमय अन्नांश–शेकडा पचनयोग्य प्रमाण काढतात. वसेचा जो पचनयोग्य गुणांक येतो त्याला २·२५ या आकड्याने गुणतात. कारण वसेच्या ज्वलनामुळे उत्पन्न होणारी ऊर्जा ही इतर कार्बोहायड्रेट पदार्थांपेक्षा सव्वादोन पट असते. सर्व पोषक घटकांच्या पचनयोग्य प्रमाणांची बेरीज केली असता त्या खाद्यातील पचनयोग्य पोषक घटकांचे प्रमाण समजते व त्या खाद्याचा पोषणमूल्यांक काढता येतो.

निरनिराळ्या जातींच्या पशूंना, तसेच त्यांच्या वयोमानाप्रमाणे विविध पोषक घटकांच्या पचनयोग्य प्रमाणांची किती जरूरी असते याची कोष्टके शास्त्रीय प्रयोगान्ती तयार केली आहेत. .तसेच विविध खाद्यपदार्थांच्या पोषणमूल्यांकांचीही कोष्टके तयार केली आहेत. या दोन्हींची सांगड घालून कोणत्या पशूला कोणते खाद्यपदार्थ किती प्रमाणात द्यावयाचे हे ठरविता येते आणि हाच खाद्यापदार्थांचे मूल्यांक काढण्याचा उद्देश असतो.

आहाराचे प्रमाण ठरविणे :पशुखाद्यामध्ये समाविष्ट होणाऱ्‍या खाद्यपदार्थांचे इतके विवेचन केल्यावर आता प्रत्यक्षात पशूंचा रोजचा आहार कसा तयार करतात यासंबंधीची माहिती ओघानेच येते. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून पशूंचा चयापचय ( शरीरात सतत होणाऱ्‍या भौतिक व रासायनिक घडामोडी) व त्याचे शरीरक्रियाविज्ञान यांच्या अभ्यासाच्या आधारे उपलब्ध खाद्यपदार्थ कोणत्या प्रमाणात दिले असता पशूच्या शरीरपोषणाला व त्या पशूपासून मिळणाऱ्‍या उत्पादनाला कमी पडणार नाहीत अथवा वायाही जाणार नाहीत, याचा अभ्यास चालू आहे. प्रामुख्याने असा अभ्यास पशूचे वजन व त्याला द्यावयाच्या खाद्याच्या प्रमाणामधील परिमाण ठरविण्याच्या संबंधात झाला आहे. कोणत्याही प्रकारचे काम अगर उत्पादन न करणाऱ्‍या पशूलाही सुस्थितीत जगण्यासाठी व त्याचे वजन कायम राखण्यासाठी जरूर असणाऱ्‍या खाद्याला ‘शारीरिक व्यापारासाठी लागणारे खाद्य’ असे म्हणतात. या खाद्यामध्ये साहजिकच जरूर इतकीच ऊर्जा उत्पन्न करणारी कार्बोहायड्रेटे व प्रथिने यांशिवाय पोट भरल्याचे समाधान देण्यासाठी आणि पोटाच्या व आतड्याच्या स्नायूंना उत्तेजित करून ग्रंथींना स्त्राव बाहेर टाकण्यास उद्दीपित करण्यासाठी वैरणीसारख्या पोटभरू खाद्याचाही समावेश आहे. अन्नापासून मिळणाऱ्‍या ऊर्जेतूनच काही ऊर्जा अन्नपचनाच्या कामीच खर्च पडते पण ही खर्ची पडत असताना होणाऱ्‍या ज्वलनक्रियेमुळे उष्णता उत्पन्न होते व तीमुळे शरीराचे तापमान कायम ठेवले जाते. ज्या शिध्यामध्ये (दैनंदिन आहारामध्ये) पोषणासाठी जरूर असलेले सर्व अन्नघटक योग्य त्याच प्रमाणात (जास्त नाहीत व कमीही नाहीत असे) असतात, अशा आहाराला ‘संतुलित आहार’ म्हणतात.

पशूंना द्यावयाचे खाद्य दोन कारणांसाठी द्यावे लागते : (१) शारीरिक व्यापारासाठी (स्नायूचे आकुंचन प्रसरण, अन्नपचन, रुधिरा भिसरण इ.) आणि (२) उत्पादन किंवा त्या पशूपासून अपेक्षित असलेल्या कामासाठी. दुसऱ्‍या कारणासाठी द्याव्या लागणाऱ्‍या अन्नाला ‘उत्पादनासाठी लागणारे अन्न’, म्हणतात. खाल्लेल्या चारादाण्यामधून शारीरिक व्यापाराची गरज प्रथम भागवली जाते व उरलेल्या (अर्थात उरले तर) अन्नाचा विनियोग उत्पादनासाठी केला जातो. वाढत्या वयाच्या पशूंना शरीराच्या वाढीसाठी लागणारे अन्न हेही एक प्रकारे उत्पादनास लागणारे अन्न समजावयास हवे. शारीरिक व्यापाराची गरज पशूच्या वजनावर अवलंबून असते हे जरी खरे असले, तरी ते अगदी बरोबर नाही. कारण ५०० किग्रॅ. वजनाच्या पशूची ही गरज २५० किग्रॅ. वजनाच्या पशूच्या दुप्पट असत नाही. शारीरिक व्यापारासाठी व उत्पादनासाठी लागणाऱ्‍या अन्नाची कल्पना पुढील उदाहरणावरून येईल. समजा, एखाद्या गाईस रोज ६ एकक खाद्य शरीरपोषणासाठी व ८ एकक खाद्य चार लिटर दूध देण्यासाठी लागते. तिला १२ एककच खाद्य मिळाले, तर प्रथम ६ एकक शरीरपोषणासाठी खर्च होतील व उरलेल्या ६ एककांमधून ती फक्त ३ लिटर दूध देईल. म्हणजे थोड्याशा काटकसरीने नुकसानच होईल. उलटपक्षी १६ एकक खाद्य दिले, तर जास्तीचे २ एकक हे त्या गाईची कुवत ४ लिटर दूध देण्याचीच असल्यामुळे तिच्या अंगावर वसा जमण्यामध्ये खर्ची पडतील. शिवाय ही वसा स्तनाच्या ठिकाणी साचली, तर गाय दूध कमी देईल.म्हणजे दुहेरी नुकसान होण्याचा संभव असतो. यावरून चारादाणा योग्य प्रमाणातच देणे जरूरीचे आहे, हे तत्त्व ध्यानात येईल. मात्र हे प्रमाण प्रत्यक्षात ठरविणे दिसते तितके सोपे नाही, उलट क्लिष्टच आहे. तथापि खालील मुद्यांच्या विवेचनावरून ते कसे ठरवितात, हे समजू शकेल.

खाद्यातील पाण्याचा अंश: गवत ज्या प्रमाणात वाळलेले असते त्या प्रमाणात त्यातील पाण्याचा अंश कमीअधिक असतो. आहारातील गवताचे प्रमाण वजनावर ठरविले जाते. या प्रमाणाचा विचार करताना त्यातील पाण्याचा अंश पूर्ण वजा करून उरेलेल्या सुक्या अन्नांशावरून ते ठरवितात. पेंढा, वाळलेला कडबा, धान्य यांत १०% जलांश असतो व ९०% सुका अन्नांश असतो. मुरघासामध्ये ३०% , ओला कडबा व हिरवे गवत यांत ७० %,तर हिरव्या बरसीम गवतामध्ये ८० %इतका जलांश असतो. निरनिराळ्या खाद्यपदार्थांतील सुका अन्नांश विचारात घेऊन त्याचे पोषणमूल्यांकन केले जाते.

पशूची अन्न खाण्याची कुवत :पशू दररोज किती वजनाचे खाद्य खाऊ शकेल, हे विचारात घेणे आवश्यक आहे. सामान्यपणे पशू आपल्या वजनाच्या २ ते २.५ %सुक्या अन्नांशाच्या हिशोबात खाद्य खाऊ शकतात. ४०० किग्रॅ. वजनाची गाय ८ किग्रॅ. जलांशरहित अन्नांश (सुका अन्नांश) खाऊ शकेल. हिरव्या बरसीम गवतामध्ये ८०% पाणी असल्यामुळे सुक्या अन्नांशाच्या हिशोबाने नुसतेच गवत खाण्यास दिल्यास ४० किग्रॅ. हिरवे बरसीम खाऊ शकेल, याउलट सरकी, पेंड व इतर सत्त्वान्ने यांमध्ये पाण्याचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे ती फारच कमी प्रमाणात द्यावी लागतील, परंतु पूर्वी उल्लेखिल्याप्रमाणे पशूंच्या शरीर क्रियाविज्ञानाचा विचार करता पोट भरण्यासाठी कडबा, गवत इ. तंत्वान्नांचा आहारात समावेश असणे जरूर आहे.


रोजचा शिधा तयार करणे :निरनिराळ्या खाद्यपदार्थामध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेटे व वसा यांचे प्रमाण निरनिराळे असते, तसेच त्यांतील अशुद्ध प्रथिने व पचनयोग्य पोषक द्रव्ये यांचे प्रमाणही वेगवेगळे असते. एखाद्या पशूला बरील अन्नघटकांचे किती प्रमाण द्यावयाचे हे  लक्षात घेऊन एका अगर अनेक खाद्यांतील त्या त्या अन्नघटकांची बेरीज करून कोणता पदार्थ किती द्यावयाचा हे ठरवावे लागते. खालील उदाहरणांवरून हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल. ४०० किग्रॅ. वजनाच्या १० लिटर दूध देणाऱ्‍या गाईस रोज कोणत्या खाद्यपदार्थाचा किती चारादाणा द्यावा लागेल?

प्रतिशत २ ह्या हिशोबाने ( पशूंना त्यांच्या वजनाच्या २ ते २.५ %सुका अन्नांश लागतो हे प्रयोगान्ती सिद्ध झालेले आहे ) ४०० किग्रॅ. वजनाच्या गायीस ८ किग्रॅ. सुका अन्नांश लागेल. तिला (१) शरीर पोषणास व (२) १० लिटर दूध देण्यासाठी पचनयोग्य आशुद्ध प्रथिने (डायजेस्टेबल क्रूड प्रोटीन,D.C.P.) व एकंदर पचनयोग्य पोषक घटक (टोटल डायजेस्टेबल न्यूट्रिअंट्स,T.D.N.) किती लागेल ते पाहू. यासाठी कोष्टक क्र.१ प्रमाणे कोष्टक तयार होईल.

एकंदर ८ किग्रॅ. सुक्या अन्नांशाच्या स्वरूपात चारादाणा द्यावयाचा आहे. पैकीं ६·५ किग्रॅ. कडबा दिला, तर त्यात ९०% सुका अन्नांश असतो म्हणून ६·५ किग्रॅ. कडब्याचे रूपांतर सुक्या अन्नांशाच्या हिशोबाने ५·८ किग्रॅ. होईल. साधारणतः सुक्या अन्नांशाच्या हिशोबाने  १/४ हिस्सा हिरवे गवत किंवा मुरलेली वैरण असावी. मुरलेल्या वैरणीत ३०%सुका भाग असतो, म्हणून ६·५ किग्रॅ. मुरलेल्या वैरणीतून फक्त १·९ किग्रॅ. सुका अन्नांश मिळेल. या दोन पदांर्थांपासून अन्नघटक किती मिळतील ते कोष्टक क्र.२ मध्ये दर्शविले आहे.

कोष्टक क्र. १. मधील एकंदर द्याव्या लागणाऱ्‍या आहारातून कोष्टक क्र. २ मधील वरील दोन पदार्थांतून मिळणाऱ्‍या अन्नघटकांची एकूण बेरीज वजा केल्यास जी बाकी उरते ती म्हणजे ०·२० सुका अन्नांश, ०·३५५ अशुद्ध प्रथिने व १·२ एकंदर पचनयोग्य पोषक द्रव्ये. ही ज्या पदार्थामधून मिळतील असा एक किंवा अधिक पदार्थ ठरवावे

कोष्टक क्र. १. दुभत्या जनावराला द्यावयाच्या खाद्याचे प्रमाण ठरविणे 

४०० किग्रॅ

वजनाच्या गाईस 

सुका अन्नांश

(किग्रॅ.) 

अशुद्ध प्रथिने 

( किग्रॅ.) 

एकंदर पचनयोग्य 

पोषक द्रव्ये (किग्रॅ.) 

शरीरपोषणासाठी

१० लिटर दूध देण्यासाठी 

– 

०.२६०

०.२२५ 

३.१ 

१.६ 

एकंदर आहार 

८ 

०.४८५ 

४.७ 

कोष्टक क्र. २. खाद्यातील घटकांचे प्रमाण

६.५ किग्रॅ. कडबा 

सुका अन्नांश

(किग्रॅ.) 

अशुद्ध प्रथिने

(किग्रॅ.) 

एकंदर पचनयोग्य 

पोषक द्रव्ये (किग्रॅ.) 

पाण्याचा अंश  १० % 

म्हणून

६.५ किग्रॅ. मुरलेली वैरण

५. ८५

१.९५

०.०६५

०.०६५

२.६० 

०.९७

एकूण बेरीज 

७.८० 

०.१३ 

३.५७ 

लागतील. हे अन्नघटक ०·७५ किग्रॅ. भुईमुगाची पेंड, ०·५ किग्रॅ. तुरीची चुणी व ०·५ किग्रॅ. गव्हाचा भुस्सा यांमधून मिळू शकतील. म्हणजे ४०० किग्रॅ. वजनाच्या व १० लिटर दूध देणाऱ्‍या गाईचा रोजचा आहार खालीलप्रमाणे राहील.

६·५ किग्रॅ. कडबा 

६·५ किग्रॅ. मुरलेली वैरण 

०·७५ किग्रॅ. भुईमुगाची पेंड ०·५ किग्रॅ. गव्हाचा  भुस्सा 

०·५  किग्रॅ. तुरीची चुणी 

खाद्यपदार्थांचे हे आकडे 

अगदी काटेकोरपणे बरोबर 

नसले, तरी उदाहरणादाखल 

दिलेले आहेत. 

याप्रमाणे रोजचा शिधा ठरविल्यावर तो देण्यासंबंधाचे काही ढोबळ नियम पाळणे –चारादाणा अंगी लागण्याच्या तसेच आर्थिक दृष्टीनेही – जरूर आहे.

चार कप्प्यांचे पोट असणाऱ्‍या पशूंना नुसती सत्त्वान्ने देऊन भागणार नाही. तसेच फक्त तंत्वान्ने देऊनही चालणार नाही. पहिल्या प्रकारामध्ये त्याला पोट भरल्याचे समाधान लाभणार नाही. शिवाय पचन तंत्रातील अवयवही कार्यक्षम राहणार नाहीत. दुसऱ्‍या प्रकारात आकारमान वाढल्यामुळे त्याला दिवसभर खातच राहावे लागेल. निरनिराळी धान्ये भरडून, भिजवून, मोड आणून व काही प्रसंगी शिजवून द्यावी लागतात. पेंडीचे बारीक तुकडे करून तर मका, हरबरा, तूर इ. अर्धवट भरडून देतात. पशुखाद्यामध्ये विविध प्रकारच्या पदार्थांचा समावेश केल्यामुळे एकातील काही घटकांची उणीव दुसऱ्‍या पदार्थांतील घटकामुळे भरुन निघते. रवंथ करणाऱ्‍या पशूंना चारादाणा दिल्यानंतर रवंथ करण्यासाठी वेळ मिळणे जरूरीचे आहे. म्हणूनच बैलास खाद्य दिल्यावर लगेच गाडीस अगर औतास जोडत नाहीत. घोड्याला पाणी पाजून मग थोड्या वेळाने दाणा देतात.

बहुतेक सर्व देशांमध्ये त्या त्या ठिकाणी उपलब्ध होणाऱ्‍या पशुखाद्यामध्ये उपयोगात आणल्या जाणाऱ्‍या पदार्थांचे रासायनिक पृथःकरण, त्यातील अशुद्ध प्रथिने, पचनयोग्य पोषक द्रव्यांचे प्रमाण, सुका अन्नांश इ. माहिती कोष्टकरूपाने तेथील कृषी संचालकांच्या कार्यालयामध्ये मिळू शकते. याशिवाय निरनिराळ्या जातींच्या पशूंना फक्त पोषणासाठी, १ लिटर दूध, १ किग्रॅ. मांस किंवा १ किग्रॅ. लोकर यांच्या उत्पादनासाठी कोणते पोषक घटक किती लागतात यासंबंधीची माहितीही कोष्टकरूपाने मिळू शकते. वरील दोन्ही कोष्टकांच्या आधारे योग्य सांगड घालून कुठल्याही पशूचा रोजचा संतुलीत आहार ठरविता येतो.

भारतात उपलब्ध असणाऱ्‍या पशूंच्या खाद्यपदार्थांसंबंधीची ही माहिती इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली व इंडियन व्हेटरिनरी रिसर्च इन्स्टिट्यूट, इझ्झतनगर (उत्तर प्रदेश) या ठिकाणी मिळू शकते.

अशा प्रकारे पशूंना संतुलित आहार देण्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून खाद्यपदार्थांच्या पचनयोग्य अन्नघटकांच्या आधारे १८६४ मध्ये ई. व्होल्फ या जर्मन शास्त्रज्ञांनी प्रथमतः जनावरांच्या वाढीसाठी, दुग्धोत्पादनासाठी व मांसोत्पादनासाठी आहाराची प्रमाणित सूत्रे तयार केली. या सूत्रांचा मुख्य उद्देश त्या त्या पशूला इष्टतम खाद्य देणे हा होता. पुढे १८९६ मध्ये सी. लेमन व १९०७ मध्ये ओ. क्लेनर यांनीही खाद्यपदार्थांतील पचनयोग्य प्रथिने व उर्जा उत्पन्न करण्याच्या मूल्यांकावर आधारित सूत्रे तयार केली. एफ. बी. मॉरिसन यांनी १९१५ मध्ये याच तत्त्वावर सुधारित आहार सूत्रे तयार केली. आजही या सूत्रांच्या आधारे पशूंचे संतुलित आहार बनविण्यात येतात.


तयार पशुखाद्य मिश्रणे :वरील विवेचनावरून पशूंचा रोजचा संतुलित व आर्थिक दृष्टीने फायदेशीर आहार ठरविणे किती जिकिरीचे आहे, हे सहज लक्षात येते. पशुपालकांना संतुलित पशुखाद्य विनासायास उपलब्ध होण्याची सोय होण्याच्या दृष्टीने योग्य प्रक्रिया केलेली पशुखाद्य मिश्रणे तयार करण्याचे कारखाने अलीकडे काढण्यात आले आहेत. निरनिराळ्या जातींच्या व वयांच्या पशूंना व कोंबड्यांना दूध, मांस व अंडी यांच्या उत्पादनासाठी लागणारी प्रथिने, कार्बोहायड्रेटे, वसा, खनिजे व जीवनसत्त्वे हे पोषक घटक संतुलित प्रमाणात मिळून उत्पादनात वाढ व्हावी व खाद्यपदार्थांचा अपव्यय थांबावा या उद्देशाने ही खाद्यमिश्रणे तयार करण्यात येतात. पारंपरिक पद्धतीने देण्यात येणाऱ्‍या पशुखाद्याऐवजी कारखान्यात प्रक्रिया केलेल्या पशुखाद्य मिश्रणांचा वापर प्रथमतः पहिल्या महायुद्धाच्या काळात जर्मनीमध्ये धान्य टंचाईमुळे सुरु झाला. तथापि दुसरे महायुद्ध संपेपर्यंतच्या काळापर्यंत त्याचा फारसा प्रसार झालेला नव्हता. त्यानंतर मात्र पशूंच्या पोषण शास्त्रात झालेली प्रगती, जीवनसत्त्वांचे कळून आलेले महत्त्व व प्रथिनयुक्त पदार्थ मिळविण्याचे अनेक नवे मार्ग उपलब्ध झाल्यामुळे पशूंची खाद्यमिश्रणे तयार करण्याच्या उद्योगामध्ये यूरोप व अमेरिकेमध्ये बरीच प्रगती झाली.

पशुखाद्य मिश्रणे तयार करण्यात येणाऱ्‍या कारखान्यात वापरण्यात येणाऱ्‍या कच्च्या मालामध्ये विविध धान्ये व कडधान्ये, धान्य दळणाच्या गिरण्यांमधील कोंड्यासारखे पदार्थ, तेलबियांपासून तेल तयार करण्याच्या कारखान्यातील तेल काढल्यावर राहिलेली पेंड इ. उप-उत्पादने या प्रचलित पदार्थांखेरीज मद्य बनविण्याच्या कारखान्यातील मळीसारखे पदार्थ, साखर कारखान्यातील उसाची चिपाडे किंवा बिटचा लगदा, बिअरच्या कारखान्यातील वापरलेले धान्य, अननसाच्या सालीचा भाग, खाटीकखान्यातील आणि मांस डबाबंद करणाऱ्‍या कारखान्यांतील वाया जाणारा भाग, आंब्याच्या कोयी, मोहाची फुले, टॅपिओका, रेशमाच्या किड्यांचे कोश इ. अनेक अप्रचलित पदार्थांचा समावेश आहे. यांशिवाय हाडांची भुकटी, चुनखडी, शिंपल्यांची पूड, सोडियम क्लोराइड (मीठ) यांसारखे खनिज पदार्थ, जीवनसत्त्वे व काही हॉर्मोने व प्रतिजैव पदार्थ यांचाही अशा खाद्यांमध्ये समावेश केला जातो.

अशा खाद्यमिश्रणांचा एक फायदा म्हणजे पशुपालकाला संतुलित आहार बनविण्यासाठी निरनिराळे खाद्यपदार्थ  बाजारात शोधत बसावे लागत नाहीत व वरील विवेचनात सांगितल्याप्रमाणे या खाद्यपदार्थांचे प्रमाण किती द्यावयाचे याबद्दलचे फारसे शास्त्रीय ज्ञान नसले, तरी संतुलित आहार आपल्या जनावरांना देणे शक्य होते. पशूंच्या खाद्यमिश्रणांचा वापर अद्याप मर्यदित स्वरूपात असला, तरी दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. कोंबड्यांची खाद्यमिश्रणे मात्र मोठ्या प्रमाणात वापरात आहेत.

तयार करण्याची पद्धत :प्रथम कच्च्या मालाचे रासायनिक पृथःकरण करण्यात येते व त्यानुसार कोणते पदार्थ किती प्रमाणात घ्यावयाचे याचे सूत्र ठरविण्यात येते . हा माल चाळून साफ करणे, दळणे, त्याचे वजन करणे इ. प्रक्रिया केल्यावर सूत्रानुसार विविध पदार्थांचे मिश्रण तयार करतात. खाद्यमिश्रण तयार करण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिल्या पद्धतीमध्ये एकएक पदार्थ एकामागून एक टाकले जातात व ताबडतोब मिसळले जाऊन सरकणाऱ्‍या पट्ट्यावरून पुढे सरकत जातात व खाद्यमिश्रण एकसारखे तयार होत राहते. दुसऱ्‍या पद्धतीमध्ये एका हौदात सर्व पदार्थ एकाच वेळी ओतले जाऊन रवी सारख्या यंत्राने मिसळले जातात व खाद्यमिश्रण गटागटाने तयार होते. ही खाद्यमिश्रणे भुकटी, रवाळ, दाणेदार, गुलिका (लहान गोळ्या) किंवा वड्यांच्या स्वरूपात तयार केली जातात. गोळ्या किंवा वड्या केल्यामुळे खाद्य वाया जात नाही, शिवाय प्रत्येक जनावराला मिश्रणातील सर्व अन्नघटक निश्चितपणे मिळू शकतात. पशुखाद्य खराब न होता बरेच दिवस चांगल्या स्थितीत रहावे यासाठी ते कागदाच्या, जलरोधक गोणपाटाच्या किंवा पॉलिथीन पिशव्यांमध्ये भरण्यात येते.

उत्पादन :अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत पशुखाद्य मिश्रणे तयार करण्याचे २,००० कारखाने आहेत व १९६१ साली तेथे ४.२ कोटी टन पशुखाद्य मिश्रणे तयार करण्यात आली. ब्रिटन, जपान, प. जर्मनी व कॅनडा या देशांमध्ये १९६४ मध्ये अनुक्रमे ९.३, ६.४, ४.२ व २.१ दशलक्ष टन पशुखाद्य मिश्रणे तयार झाली.

भारतामध्ये पशूंच्या खाद्यपदार्थांची टंचाई असली, तरी दुसऱ्‍या महायुद्धानंतरच्या काळामध्ये पशूंच्या व कोंबड्यांच्या संतुलित आहाराकडे लक्ष पुरविण्यात येऊ लागले. त्यामुळे पशुखाद्य मिश्रणे तयार करण्याचे कारखाने काढण्यात येऊ लागले. अशा तऱ्‍हेचा पहिला कारखाना १९६० साली काढण्यात आला. त्यानंतर खासगी व सरकारी क्षेत्रामध्ये छोटे-मोठे बरेच कारखाने काढण्यात आले आहेत. अशा कारखान्यांमध्ये हिंदुस्थान लिव्हर, मुंबई, भंडारी क्रॉसफील्डस, इंदूर म्हैसूर फिडस, बंगलोर शॉ वॅलेस आणि कंपनी, मद्रास कैरा (खेडा) जिल्हा सहकारी दुग्धोत्पादक संघ, आणंद (गुजरात) हे काही प्रमुख मोठे कारखाने असून ते आधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज असे आहेत. यांशिवाय सरकारी क्षेत्रामध्ये जवळजवळ सर्व राज्यांमध्ये खाद्यमिश्रणे तयार करण्यासाठी कमीअधिक धारणक्षमता असलेली संयंत्रे बसविण्यात आली आहेत. पशुखाद्य तयार करणाऱ्‍या कारखानदारांची एक संघटना कम्पौंड लाइव्हस्टॉक फीड मॅन्युफॅक्चरर्स ॲसोसिएशन या नावाने अस्तित्वात आहे. या संघटनेकडे नोंदविण्यात आलेल्या २८ मोठ्या कारखान्यांमध्ये १९६९ मध्ये १,८९,००० टन पशुखाद्य मिश्रणे तयार झाली.

भारतीय मानकसंस्थेने गाईगुरांच्या व कोंबड्यांच्या खाद्यमिश्रणात वापरण्यात येणाऱ्‍या खाद्यपदार्थांचे रासायनिक पृथःकरण व तयार  खाद्यमिश्रणांच्या पोषणमूल्याबाबतची मानके ठरविली आहेत. गाईगुरांच्या व म्हशींच्या खाद्यमिश्रणमध्ये ( मानक क्र. आय एस–२०५२—१९६८ ) जरूर ते सर्व खनिज पदार्थ घालण्यात येतात हे जरी खरे असले, तरी गाईगुरांना व म्हशींना लागणारे खनिज पदार्थ अधिक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र खनिज मिश्रणे ( आय एस—१६६४—१९६८ ) तयार करण्यात येतात आणि ही वरील पशुखाद्य मिश्रणांच्या २ ते ३ प्रतिशत प्रमाणात जरूरीप्रमाणे वापरतात. वरील खाद्यमिश्रण गाईम्हशींना त्यांच्या नेहमीच्या तंत्त्वान्नाव्यतिरिक्त उत्पादनाच्या प्रमाणात देतात. गायींना दर २.५ लिटर व म्हशींना दर २ लिटर दुग्धोत्पादनासाठी १ किग्रॅ. , तर काम करणाऱ्‍या बैलांना त्यांच्या वजनानुसार ३ ते ४ किग्रॅ. खाद्यमिश्रणाची जरूरी असते.

कोंबड्यांकरिता बनविण्यात येणारे खाद्यमिश्रण ( आय एस–१३७४—१९६८ ) हे संपूर्ण खाद्य आहे. याचा अर्थ त्यांना याशिवाय आणखी काही खाद्यपदार्थ देण्याची गरज नसते. या खाद्यमिश्रणाचे पिलांसाठी (८ आठवडे वयापर्यंत), वाढीला लागलेल्या पिलांसाठी (८ ते २० आठवडे वयापर्यंत) व अंडी देणाऱ्‍या कोंबड्यांसाठी (२० आठवडे वयापुढील कोंबड्या) असे तीन प्रकार आहेत. याशिवाय कोंबड्यांसाठी आणखी एक खाद्यमिश्रण (आय एस—४०१८—१९६८) तयार करण्यात येते आणि त्याचे गलेलठ्ठ करण्याच्या कोंबड्यांच्या ( ब्रॉयलर ) पिलांसाठी (६ आठवडे वयापर्यंत) व सहा ते बारा आठवडे वयापर्यंत असे दोन प्रकार आहेत.

शौकाकरिता पाळण्यात येणाऱ्‍या कुत्री, मांजरे, पक्षी यांच्याकरिता तसेच प्रयोगशाळेतील प्राणी यांच्यासाठी खाद्यमिश्रणे तयार करण्यात येतात. कुत्री, मांजरे यांची खाद्यमिश्रणे बहुधा मांस, मासे, दुधाची भुकटी, हाडाची पूड आणि धान्यांचे पीठ यांच्या मिश्रणापासून तयार करतात आणि त्यात जरूर ती जीवनसत्त्वे व खनिजे योग्य प्रमाणात घातली जातात. असे खाद्य हवाबंद डब्यातून गोठविलेल्या अगर शुष्क अवस्थेत उपलब्ध आहे.


भारतातील प्रचलित पशुखाद्य पदार्थ :मका, जव, ज्वारी, बाजरी, अरगड, राय ही धान्ये तूर हरभरा, उडीद, मटकी, कुळीथ, गवार ही कडधान्ये गव्हाचा व तांदळाचा कोंडा करडई, तीळ, शेंगदाणा, अळशी, तेलमाड, खोबरे व सरकी या तेलबियांची पेंड या पदार्थांचा खुराकात समावेश होतो.

शाळू, मका, नाचणी, बाजरी, ओट या धान्य पिकांची तसेच बरसीम, लसूण घास, गजराज, गिनी गवत, नेपीअर गवत, पॅरा गवत या रसाळ गवतांची पशूंना ओला चारा मिळण्यासाठी मुद्दाम लागवड काही प्रमाणात करण्यात येते. घेवड्याचे व भुईमुगाचे वेल यांचा ओला चारा म्हणून उपयोग करतात. यांतील काही मुरघास करण्यासाठीही उपयोगात आणतात.

कुरणामध्ये नैसर्गिक रित्या उगवणारी कुर्सळी, बोरू यांसारख्या जातीची ओली अगर वाळलेली गवते तसेच ज्वारी, मका बाजरी यांच्या ताटांचाही वैरण म्हणून उपयोग केला जातो. पशूंना चराऊ राने म्हणून उपयोगात आणण्यासाठी मुद्दाम तयार केलेली कुराणे करण्याचा भारतामध्ये फारसा प्रघात नाही पण पाश्चात्त्य देशांमध्ये हा पशूपालनाचा आवश्यक भाग समजतात.

अप्रचलित पशुखाद्य पदार्थ :पशूंच्या पोषणासाठी अलीकडे अप्रचलित खाद्यपदार्थांचा विचार होऊ लागला आहे. अशा काही पदार्थांमध्ये प्रथिनांचे प्रमाण बरेच असून प्रक्रिया केल्यानंतर त्यांचा पशुखाद्यामध्ये समावेश होऊ शकेल, असे प्रयोगान्ती दिसून आले आहे. जांभळाच्या बिया, टाकळ्याचे बी, बाभळीच्या शेंगा, कासे गवत, करडईच्या जातीचे तण, शण (एक प्रकारचा ताग), वर्षा वृक्षाच्या शेंगा, आंब्याच्या कोयी इ. पदार्थांचा यात समावेश आहे. अलीकडे कागदाचा लगदाही वापरण्यात येऊ लागला आहे.

पशुखाद्याची सुरक्षितता :पशुखाद्य लवकर खराब होऊ शकते हे लक्षात घेऊन बुरशी, कीड यांमुळे ते खराब न होऊ देण्याची काळजी घेणे आवश्यक आहे . मुरघास किंवा मुरलेली वैरण तयार करताना सर्व पथ्ये योग्य रीतीने पाळली गेली नाहीत, तर ती कुजून जाऊन जनावरांना खाण्यास निरुपयोगी होते. धान्ये व कडधान्ये साठविताना कीटकनाशके वापरल्यास कीटकांपासून होणारा नाश थांबतो. मात्र कीटकनाशके योग्य प्रमाणात वापरणे जरूर आहे. मनुष्याला खाण्यास अयोग्य असलेला—खराब झालेला—प्रत्येक पदार्थ पशूंना खाण्यालायक असेलच असे नाही परंतु असा गैरसमज बऱ्‍याच प्रमाणात आढळतो.

पहा : पोषण वैरण.

संदर्भ :1. C.S.I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VI, Supplement Livestock ( including poultry), New Delhi, 1970.

     2. I.C.A. R. Handbook of Animal Husbandry, New Delhi, 1967.

     3 . MacDowell , R. E. Improvement of Livestock production in Warm climates, San Francisco,1972.

     4. Maynard, L.A. Loosli, J. k. Animal Nutrition, New York, 1956.

     5. Morrison, F.B. Feeds and Feeding, Clinton, 1956.

     6. Williamson, G. Payne, W.J. A. An Introduction to Animal Husbandry in the Tropics, London, 1960.

गद्रे,य. त्र्यं. दीक्षित, श्री. गं.