पल्लव वंश : दक्षिण भारतातील एक प्राचीन वंश. त्याच्या मूलस्थानाविषयी तसेच वंशाच्या उत्पत्तीसंबंधी विद्वानांत मतैक्य नाही. काही विद्वानांच्या मते, पल्लव हे पार्थियन वंशाचे होते कारण क्षत्रप रुद्रदामनच्या गिरनार येथील लेखात पार्थियन अधिकाऱ्याला पहलव म्हटले आहे पण या मताला सबळ आधार नाही. पल्लव कांचीजवळच्या तोंडमंडलमवर राज्य करीत होते. तोंडै याचा अर्थ अंकुर असल्याने त्या वंशाला पल्लव असे नाव असावे, ही दुसरी उपपत्ती जास्त ग्राह्य वाटते.
पल्लव राजा सिंहवर्मा (तिसरे शतक) याचा सर्वांत प्राचीन लेख गुंतूर जिल्ह्याच्या पालनाड तालुक्यात सापडला आहे. त्यानंतर शिवस्कंदवर्म्याचे दोन ताम्रपट गुंतूर व बेल्लारी जिल्ह्यांत मिळाले आहेत. हे सर्व लेख प्राकृतात आहेत. हे राजे सातवाहनांच्या अस्तानंतर तिसऱ्या शतकाच्या उत्तरार्धात पुढे आले असावेत.
पल्लवांचे गोत्र भारद्वाज होते. शिवस्कंदवर्म्याने अग्निष्टोम, वाजपेय आणि अश्वमेध हे श्रौत याग करून धर्ममहाधिराज ही पदवी धारण केली होती. यानंतर पल्लव राजांचे संस्कृत भाषेतील अनेक ताम्रपट सापडले आहेत पण त्यांचा कालानुक्रम निश्चितपणे लावता येत नाही. ते सु. पाचव्या शतकाच्या अखेरपर्यंत राज्य करीत असावेत. त्यापैकी विष्णुगोप हा समुद्रगुप्ताचा समकालीन असून कांची येथे राज्य करीत होता. समुद्रगुप्ताने त्याचा पराभव केल्यावर त्याचे राज्य त्यास परत केल्याचा प्रयाग प्रशस्तीत उल्लेख आहे.
सहाव्या शतकाच्या शेवटच्या पादात सिंहविष्णु कांची येथे राज्य करीत होता. तेव्हापासून पल्लवांचा सुसंगत इतिहास उपलब्ध होतो. सिंहविष्णूने चोल प्रदेशावर आक्रमण करून कृष्णा ते कावेरीपर्यंतचा मुलूख काबीज केला. त्याचा पुत्र महेंद्रवर्मा याने मामल्लपुरम् ( महाबलीपुर) येथे मोठमोठ्या एकसंध पाषाणांतून देवळे (रथ) खोदून काढविली आणि मत्तविलास- प्रहसन नावाचे कापालिकांच्या जीवनावर प्रहसन लिहिले. तो स्वतः संगीतात निष्णात होता. बादामीच्या दुसऱ्या पुलकेशीने त्याचा पराभव करून त्याच्या राज्याचा उत्तरेचा भाग जिंकून घेतला. या काळापासून पल्लवांचे बादामीच्या चालुक्यांशी जे हाडवैर उत्पन्न झाले, ते पुढे कित्येक पिढ्या टिकले व नंतरच्या राष्ट्रकूटांशीही चालू राहिले. महेंद्रवर्म्याचा पुत्र पहिला नरसिंहवर्मा (सु. ६३०–६६८) याने चालुक्यांची दुसरी स्वारी परतविली एवढेच नव्हे, तर स्वतः ६४२ मध्ये वातापी (बादामी) वर आक्रमण करून ती घेतली. तेथील युद्धात पुलकेशी मारला गेला. नंतर नरसिंहवर्म्याने वातापिकोंड (वातापी घेणारा) अशी पदवी धारण केली. यापुढे सु. बारा वर्षे चालुक्यांच्या राज्यात अराजक माजले. नरसिंहवर्म्याने श्रीलंकेचा राजा मालवर्मा याला आश्रय देऊन त्याच्या साहाय्यार्थ स्वारी केली.
यानंतर दुसऱ्या पुलकेशीचा पुत्र पहिला विक्रमादित्य याने नरसिंहवर्मा आणि त्याचा पुत्र दुसरा महेंद्रवर्मा (६६८– ६७०) आणि नातू पहिला परमेश्वरवर्मा (६७० – ७००) यांचा अनेक युद्धांत पराजय केला पण परमेश्वरवर्म्याने पुऱ्हा बादामीवर स्वारी करून विक्रमादित्याचा पराभव केला. पल्लवांच्या व चालुक्यांच्या परस्परांच्या प्रदेशांवर अशा अनेक स्वाऱ्या झाल्या व त्यांत दोघांनाही विजयश्री चंचल असल्याचा प्रत्यय आला.
परमेश्वरवर्म्याचा पुत्र दुसरा नरसिंहवर्मा (७००–७२८) याचे नाव इतिहासात अनेक कारणांनी संस्मरणीय झाले आहे. त्याच्या काळात चालुक्य वास्तुकला पद्धती प्रचारात आली. त्याने कांची येथे कैलासनाथ अथवा राजसिंहेश्वरनामक शिवालय बांधले. संस्कृत कवी दंडी याला आश्रय दिला आणि चीनला आपला राजदूत पाठविला.
दुसऱ्या परमेश्वरवर्म्याला पुत्र नसल्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर प्रमुख लोकांनी पल्लवांच्या दुसऱ्या शाखेतील दुसरा नंदिवर्मानामक कुमाराला पल्लव गादी दिली. तो पल्लवमल्ल या बिरुदाने प्रसिद्ध आहे. याच्याही काळी पांड्य व चालुक्य घराण्यांशी पल्लवांची युद्धे चालू राहिली. ७५० च्या सुमारास चालुक्यांचा उच्छेद करून राष्ट्रकूट दंतिदुर्गाने सत्ता बळकाविली आणि त्यांचा पल्लवांशी असलेला हाडवैराचा वारसा घेतला. दंतिदुर्गाने कांचीवर स्वारी करून पल्लवांचा पराभव केला. दंतिवर्मानामक पल्लव नृपतीचा राष्ट्रकूट व पांड्य यांनी पराभव केला. त्याचा उत्तराधिकारी तिसरा नंदिवर्मा याने मलाया द्वीपकल्पावर आक्रमण करून तेथे आपल्या नावे विष्णूचे देवालय बांधले आणि तलाव खोदविला. तो पांड्यांशी झालेल्या युद्धात मारला गेला. शेवटचा पल्लव राजा अपराजित याने आपला मांडलिक चोल राजा आदित्य याच्या साहाय्याने पांड्यांचा पुरा मोड केला पण पुढे त्या आदित्याने त्याच्याविरुद्ध सु. ८९३ मध्ये बंड करून त्याला ठार मारले आणि तो स्वतः तोंडमंडलमचा अधिपती झाला.
साहित्य, कला इ. :इतर भारतीय राजवंशांप्रमाणे पल्लवांनीही विद्या व कला यांना उदार आश्रय दिला. दंडीच्या अवंतिसुंदरी -कथेत आणि तिच्या सारात त्यांच्या राजसभेचे वर्णन आले आहे. मत्त-विलास- प्रहसनाचा उल्लेख मागे आला आहेच. हे प्रहसन सध्या उपलब्ध असलेल्या प्रहसनांत पहिले आहे. पल्लवांचे नाव त्यांच्या विशिष्ट स्थापत्यशैलीमुळे सुविख्यात झाले आहे. महेंद्रवर्मा आणि नरसिंहवर्मा यांच्या काळात मामल्लपुरम्मधील खडकांतून रथ व मंडप कोरण्यात आले. जवळच एका विशाल खडकावरील सु.२८ मी. लांब आणि ६·९ मी. उंच अशा भागावर गंगावतरणाचा देखावा सुंदर रीतीने कोरला आहे. त्याचे ‘अर्जुनाची तपश्वर्या’ असे चुकीचे नाव प्रचलित झाले आहे. जवळच भगवान शंकर व तपश्वर्येने अस्थिपंजर झालेला भगीरथ यांच्या मूर्ती असलेले ते दृश्य आहे.
मूर्तिशिल्पाच्या आरंभी शिवलिंग, गणेश, ब्रह्मा, नरसिंह, विष्णू, महिषमर्दिनी, उमामहेश्वर, लक्ष्मी इ. देवतांची शिल्पे आढळतात. यांचे एक वैशिष्ट्य असे, की यांपैकी महिषमर्दिनीव्यतिरिक्त उर्वरित देवतांना मानवाप्रमाणे दोनच हात दाखविलेले आहेत. माडगूळ येथे आपल्या कुटुंबियांसह शिव व ब्रह्मा तसेच विजयवाडा (बेझवाडा) येथील संग्रहालयातील शिव या सर्वांना प्रत्येकी दोनच हात आहेत. उत्तरपल्लवकालीन उत्कृष्ट शिल्पे तिरुचिरापल्ली, महाबलीपुर, तिरुक्काळिकुंरम् इ. ठिकाणी आहेत. तिरुचिरापल्ली येथील गंगाधर शिवाचे शिल्प अप्रतिम आहे. तेथे शिवाचे अलौकिक सामर्थ्य दाखविण्यासाठी गंगा त्याच्या दोन जटांमध्येच लुप्त झाल्याचे दाखविले आहे. महाबलीपुर येथील गंगावतरणाचा देखावा अपूर्व असाच आहे. त्याचप्रमाणे सपत्नीक महेंद्रवर्मा व सिंहविष्णू आणि नरसिंहवर्मा यांचे पुतळे यांमध्ये प्रेमाचा उत्कृष्ट आविर्भाव शिल्पकाराने दाखविला आहे. कांची येथील वैकुंठपेरुमाल, ऐरावतेश्वर, मुक्तेश्वर, मातंगेश्वर आणि इतर मंदिरे यांतील शिल्पे, पल्लव शिल्पशैलीची उत्कृष्ट उदाहरणे होत. महाबलीपुर येथील एका गुहेत गवळी आणि गवळण यांचे शिल्प दाखविले असून त्यांपैकी वृद्ध गवळी आपल्या खांद्यावर लहान बालकाला घेऊन मार्ग क्रमीत असल्याचे दर्शविले आहे. यातील बालकाने डोक्याला अशा काही विशिष्ट पद्धतीने धरले आहे, की जणू तो गवळी आजच त्या मुलाला घेऊन जात आहे असे भासते. हे लोभसवाणे दृश्य लक्षणीय असून महाबलीपुर येथे इतर पल्लव शिल्पाकृतींचे अनेक उत्कृष्ट नमुने आहेत.
पल्लव वास्तुशिल्पाचे कालदृष्ट्या पूर्व व उत्तर असे दोन भाग कल्पावे लागतात. पूर्वकालात पुन्हा दोन उपविभाग होतात. या दोन्ही उपविभागांतील वास्तुशिल्प खडकात किंवा मोठ्या एकसंध पाषाणात खोदलेल्या मंडपयुक्त गाभाऱ्यांचे बनलेले आहे. या पूर्वकालाच्या प्रारंभकाळात मुख्यतः मंडप व त्या मंडपाच्या आतील भिंतींमध्ये एखादे गर्भगृह असते. पुढे मंंडपाच्या पाठीमागे खोदलेल्या गर्भगृहांची संख्या वाढल्याचे दिसते. मंडगपट्टू येथील मंडपाच्या मागील भागात ब्रह्मा, विष्णू व ईश्वर म्हणजे शिव या तिघांच्यासाठी तीन स्वतंत्र गर्भगृहे खोदलेली आहेत पण पुढे पूजनीय देवतांची संख्या वाढल्यावर एका एकसंध अवाढव्य पाषाणात एका देवतेसाठी गर्भगृह आणि त्यापुढे लहानसा मंडप, असे खोदकाम करू लागले. महाबलीपुर येथील ब्रह्मा, विष्णू, महेश, गणेश, कार्तिकेय, महिषमर्दिनी आणि सूर्य या सात देवतांचे सात रथ किंवा मंदिरे असल्याची समजूत असली, तरी वस्तुतः तेथे द्रौपदीचा म्हटला जाणारा आणखी एक रथ किंवा मंदिर आहे. उत्तर पल्लवकालीन मंदिरे ही पाषाणरचित मंदिरे आहेत. त्यांपैकी कांचीतील राजसिंहेश्वर, कैलासनाथ, वैकुंठपेरुमाल, मुक्तेश्वर ही मंदिरे प्रसिद्ध आहेत. ऐहोळे येथील दुर्गामंदिराप्रमाणे कांचीचे कैलासनाथ मंदिर हे मागील बाजूने अर्धवर्तुळाकार आहे. त्यावर अर्धवर्तुळाकार चैत्यशिल्पाचा परिणाम झाला असावा, असे काही तज्ञ मानतात. नंतरची मंदिरे गर्भगृह व मंडप यांनी युक्त आहेत. वैकुंठपेरुमाल मंदिराच्या मंडपामध्ये महाभारत, रामायण आणि पुराणे यांतील कथा चित्रित केलेली अनेक शिल्पे आहेत.
पल्लवकालीन चित्रकला पुदुकोट्टई संस्थानातील सित्तन्नवासल या ठिकाणी मुख्यतः पहावयास सापडते. येथील चित्रे प्रायः जैन पुराणकथांशी संबद्ध असून वैकुंठपेरुमाल मंदिरातील शिल्पांप्रमाणे येथील चित्रे आढळतात.
मामल्लपुरम् येथील रथांत वराह, वामन, सूर्य, दुर्गा, गोवर्धनधारी कृष्ण इत्यादींच्या मूर्ती कोरल्या आहेत. तेथेच पल्लवनृपती सिंहविष्णू आणि महेंद्रवर्मा यांचे पुतळे इतर परिवारांसह कोरले आहेत.
पल्लवांच्या उत्तर काळी बांधीव देवळांची पद्धती सुरू झाली. उदा., कैलासनाथ आणि वैकुंठपेरुमाल. ती अद्यापि कांची येथे सुस्थितीत आहेत. वैकुंठपेरुमाल देवळात दुसऱ्या नंदिवर्म्यापर्यंतचा पल्लवांचा इतिहास शिल्पपट्टांनी दाखविला आहे. कांची येथील मुक्तेश्वर आणि मातंगेश्वर देवालये नंतरची असून त्यांमध्ये पल्लव कलेची किंचित अवनतावस्था दृष्टीस पडते. याशिवाय गायन-वादन ललितकलांचेही काही अवशेष आढळतात. रागदारीतील गायनाची स्वरलिपी करून दाखविली आहे.
संदर्भ :1. Majumdar, R.C. Ed. The Classical Age, Bombay, 1970.
2. Yazdani, G. Ed. The Early History of the Deccan, 2 Vols., London, 1960.
मिराशी, वा.वि. खरे.,ग.ह.
“