पल्मोनेटा :मॉलस्का (मृदुकाय) संघाच्या गॅस्ट्रोपोडा (उदरपाद) वर्गातील एक गण. या गणात जमिनीवरील गोगलगायी व पिकळ्या आणि गोड्या पाण्यातील गोगलगायी यांचा समावेश केलेला आहे. या गणातील प्राण्यांची मुख्य लक्षणे पुढे दिल्याप्रमाणे असतात. प्राणी बहुधा लहान असतात कवच साधे व कुंडलित अथवा अल्पवर्धित असते किंवा मुळीच नसते कवच असलेल्या प्राण्यांना सामान्यतः ते बंद करण्याकरिता कॅल्शियमयुक्त झाकण (प्रच्छद) नसते डोक्यावर संस्पर्शकांच्या (सांधेयुक्त स्पशेंद्रियांच्या) एक किंवा दोन जोड्या असतात डोळे दोन असतात क्लोम (कल्ले) अथवा कंकतक्लोम (फणीसारखे कल्ले) नसतात प्रावार-गुहिकेच्या (कवचाच्या लगेच खाली असणाऱ्या त्वचेच्या बाहेरच्या मऊ घडीच्या पोकळीच्या) भित्तीच्या द्वारे श्वसन होते (फुप्फुस) या गुहिकेला संकोचशील (आकुंचन पावू शकणारे)द्वार असून ते उजव्या बाजूला उघडते प्राणी उभयलिंगी (नराची व मादीची जननेंद्रिये एकाच व्यक्तीत असणारे ) असतात जनन ग्रंथी एक असून प्राणी बहुधा अंडज ( अंडी घालणारे ) असतात विकास सरळ असतो.
पल्मोनेटा गणाचे बॅसोमॅटोफोरा आणि स्टायलोमॅटोफोरा असे दोन उपगण पाडलेले आहेत. बॅसोमॅटोफोरा उपगणात संस्पर्शकांची एकच जोडी असून प्रत्येकाच्या बुडाशी एक डोळा असतो. या उपगणात बव्हंशी गोड्या पाण्यातील प्राणी व थोडे समुद्री आणी मचूळ पाण्यातील प्राणी यांचा समावेश होतो. उदा. लिम्निया आणि प्लॅनॉर्बिस ( दोन्ही गोड्या पाण्यातील). स्टायलोमॅटोफोरा उपगणात संस्पर्शकांच्या दोन जोड्या असतात आणि पश्च (मागील) जोडीच्या टोकावर डोळे असतात. या उपगणात भूचर गोगलगायी आणि पिकळ्या यांचा समावेश होतो. उदा., हीलिक्स ( गोगलगाय ) व लिमॅक्स ( पिकळी ).
गोड्या पाण्यातील पल्मोनेटा सर्व खंडांत व बहुतेक बेटांत आढळतात. स्वच्छ पाणी असलेली सरोवरे, नद्या व ओढे यांत ते विपुल असतात पण गाळ किंवा चिखल मिसळलेले पाणी असणाऱ्या नद्या किंवा ओढ्यांत ते फारच थोडे असतात. गोड्या पाण्यातील बहुतेक पल्मोनेट प्राणी श्वासोच्छ्वास करण्याकरिता ठराविक वेळाने पाण्याच्या पृष्ठभागावर येतात परंतु काही पाण्यातच राहून त्यांना लागणारा ऑक्सिजन वनस्पतींपासून अथवा प्रावाराच्या पृष्ठाच्या द्वारे प्रत्यक्ष पाण्यातून मिळवितात.
भूचर पल्मोनेटांपैकी बहुतेकांना कवच (शंख) असते. लिमॅक्ससारख्या काहींना ते मुळीच नसते, तर काहींत ते एका अगदी लहान अंतर्गत तकटासारखे असते. या कवचहीन भूचर पल्मोनेटांना सामान्यतः पिकळ्या म्हणतात.
माणसे – विशेषतः युरोप व उत्तर आफ्रिकेतील – पुष्कळ भूचर पल्मोनेटांचा खाण्याकरिता उपयोग करतात. हीलिक्स आणि ओटाला या दोन वंशांतील जातींचा मुख्यतः या कामी उपयोग केला जातो. उत्तर आफ्रिकेतून या जातींचे प्राणी फार मोठ्या प्रमाणावर अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि कॅनडा यांत पाठविण्यात येतात. तेथील मोठ्या शहरातील फ्रेंच व इटालियन लोकांत यांचा विशेष खप होतो.
पल्मोनेटा उभयलिंगी प्राणी आहेत. या प्राण्यांच्या जीवनवृत्तात (जीवनचक्रात) साधारणपणे डिंभावस्था (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी आणि प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्था) आढळत नाही. काहींमध्ये व्हेलिजर ही डिंभावस्था असते पण अंड्यातून प्राणी बाहेर पडण्यापूर्वी ही अवस्था अंड्यातच संपलेली असते.
पल्मोनेटांच्या उत्पत्तीविषयी शास्त्रज्ञांनी दोन प्रकारची विचारसरणी पुढे मांडली आहे. काही शास्त्रज्ञांच्या मताप्रमाणे हे प्राणी न्यूडिब्रँकिया या उपगणापासून निर्माण झाले असावेत. दुसऱ्या काही शास्त्रज्ञांच्या मताप्रमाणे हे ओपिस्थोब्रँकिया गणाच्या टेक्टिब्रँकिया या उपगणापासून उत्पन्न झाले असावेत. या गणातील प्राण्यांच्या शरीररचनेचा सखोल अभ्यास केला असता दुसरी उपपत्ती योग्य वाटते. उत्तर अमेरिकेत सापडलेल्या काही जीवाश्मांवरून (शिळारूप अवशेषांवरून) या प्राण्यांची उत्पत्ती कार्बाॅनिफेरस कल्पात ( सु. ३५–३१ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात ) त्यांची आधिक उत्क्रांती झाली असावी असे दिसते. एच्. सिमरॉथ या शास्त्रज्ञांच्या मताप्रमाणे व्हट्रिना, हायलिनिया यांसारख्या पूर्वजांपासून आजचे पल्मोनेटा आले असावेत.
पहा : गॅस्ट्रोपोडा गोगलगाय पिकळी.
पुरोहित, प्र. आ.
“