पर्वत : सभोवतीच्या प्रदेशापासून सापेक्षतः बराच उंचावलेला आणि माथ्याशी थोडीशीच जागा असलेला भूभाग. सामान्यतः याची उंची पायथ्यापासून १,००० मी. पेक्षा अधिक असावी असा संकेत असला, तरी केवळ उंची हाच पर्वताचा निकष नाही. तिबेट आणि बोलिव्हिया हे पठारी प्रदेश, तसेच उत्तर अमेरिकेतील प्रचंड मैदाने यांची समुद्रसपाटीपासूनची उंची इतर भागातील कित्येक पर्वतांपेक्षा जास्त आहे. माथ्याकडे निमुळती होत जाणारी जागा हे पर्वतांचे पठारांहून वेगळेपणा दाखवणारे आवश्यक वैशिष्ट्य आहे. एकाकी, सुटे पर्वत क्वचित आढळत असले, तरी सामान्यतः पर्वतांच्या सलग रांगा आणि श्रेणी असतात. पर्वतमाथ्याच्या निमुळत्या भागाला शिखर म्हणतात. दोन किंवा अधिक शिखरे जोडणाऱ्या लांबट भागाला कटक आणि अशा अनेक सलग कटकांना डोंगररांगा म्हणतात. सामान्यतः पर्वताहून लहान उंचवट्याला डोंगर आणि डोंगराहून लहान उंचवट्याला टेकडी म्हणतात. अनेक डोंगर व पर्वत एकमेकांना जोडलेले असले म्हणजे ती पर्वतश्रेणी होते. सामान्यतः एकमेकींना समांतर असलेल्या अनेक पर्वतश्रेणींची मिळून पर्वतसंहती होते. एका संहतीमधील पर्वतश्रेणी त्यांच्या रचना, निर्मिती प्रक्रिया इ. दृष्टींनी परस्परांशी निकट संबंधित असतात. अनेक पर्वतसंहतीच्या समुदायाला पर्वतसमूह म्हणतात. एका समूहातील निरनिराळ्या पर्वतसंहतींचा निर्मितीच्या प्रक्रियांच्या दृष्टीने संबंध असतोच असे नाही.
सध्या दिसणाऱ्या सर्व मोठमोठ्या पर्वतश्रेणी सभोवतीच्या प्रदेशापेक्षा भूवैज्ञानिक दृष्ट्या अलीकडच्या काळात उंचावलेल्या आहेत. अनेक प्रकारांनी पर्वत उंचावले जाणे शक्य असते. पर्वतांचे वर्गीकरण ज्या भूवैज्ञानिक प्रक्रियांनी त्यांची निर्मिती झाली, त्यांंनुसार करण्यात येते. पर्वतांचे प्रमुख प्रकार खाली वर्णन केल्याप्रमाणे आहेत.
वलित पर्वत : (वली पर्वत). जगातील बहुतेक मोठ्या पर्वतश्रेणींची उत्पत्ती वलीकरणाच्या वा घड्या पडण्याच्या प्रक्रियेतून झालेली आहे. अत्यंत दीर्घकाल चालणाऱ्या या जटिल (गुंतागुंतीच्या) प्रक्रियेला ⇨गिरिजनन असे नाव आहे. वलित (घड्या पडून निर्माण झालेल्या) पर्वतांच्या निर्मितीच्या सुरुवातीला भूखंडानजीकच्या उथळ सागराचा तळ हळूहळू खाली वाकविला जाऊन पन्हाळीसारख्या ⇨ भूद्रोणी तयार होतात व त्यांच्यात १२ ते १५ किमी. जाडीचे अवसाद (गाळ) साचविले जातात. पृथ्वीच्या कवचाच्या ज्या हालचालीमुळे भूद्रोणी निर्माण होतात त्याच हालचालींचा पर्याप्त परिणाम म्हणून पुढे त्यांतील गाळांच्या थरांवर क्षैतिज म्हणजे आडव्या दिशेने दाब येऊन त्यांना घड्या पडतात. भूद्रोणी तयार होण्यास सुरुवात होण्यापासून तो तीतील गाळांच्या थरांना घड्या पडून ते वरच्या दिशेने उंचावले जाण्यापर्यंतचा गिरिजननाचा काळ कित्येक लक्ष वर्षांचा असू शकतो. उत्तर अमेरिकेतील ॲपालॅचिअन, यूरोपातील आल्प्स व आशियातील हिमालय ही गिरिजननाने निर्माण झालेल्या वलित पर्वतांची उत्तम उदाहरणे आहेत.
वलीकरण होत असताना भूद्रोणीच्या भागात अग्निज क्रियाही घडून येते. त्यामुळे अशा पर्वतांच्या गाभ्यात ग्रॅनाइट खडकांच्या प्रचंड राशींचे अंतर्वेशन झाल्याचे (घुसल्याचे) तसेच ज्वालामुखी क्रियेने लाव्ह्यांचे उद्रेक झाल्याचेही आढळते. बऱ्याच वलित पर्वतांमध्ये उपरिप्रणोद विभंगाने [→ विभंग, खडकांतील] खडकांच्या घड्या काटकोनात मोडल्या जाऊन हजारो मी. जाडीचे थर खालच्या थरावरून कित्येक किमी. पुढे सरकवले गेल्याचे दिसून येते.
वलित पर्वतश्रेणींचा अणुप्रस्थ (आडवा) छेद घेतल्यास दोहो बाजूंना जटिल वलीकरण झालेल्या पर्वतांच्या रांगा आणि मध्याशी त्या मानाने कमी वलीकरण झालेला, उंचावलेला पठारी प्रदेश आढळतो. मूळ भूद्रोणीच्या दोहो बाजूंना असणाऱ्या कणखर भूभागांना अग्रभूमी म्हणतात. मध्य आशियातील हिमालय पर्वत हे या रचनेचे उत्तम उदाहरण आहे. या वलित पर्वतश्रेणींच्या प्रमुख रांगा पूर्व-पश्चिम दिशेने पसरलेल्या असून त्यांपैकी उत्तरेकडे कुनलुन रांगा व दक्षिणेकडे हिमालय रांगा आहेत. त्यांच्या मधील भागात तिबेटचे पठार आहे. कुनलुनच्या उत्तरेस असणारे तारीख खोरे आणि हिमालयाच्या दक्षिणेकडचे सिंधु-गंगेचे खोरे हे अग्रभूमीचे भाग आहेत. वलित पर्वतांपैकी सध्या दिसणाऱ्या बहुतेक मोठ्या पर्वतश्रेणी क्रिटेशसपासून तो होलोसीनपर्यंतच्या (सु. १४ कोटी वर्षांपूर्वीपासून १० हजार वर्षांपूर्वीपर्यंतच्या) काळात घडून आलेल्या अल्पाइन गिरिजननाने निर्माण झालेल्या आहेत. त्यांचे आज दिसणारे उठावाचे स्थलरूप तर गेल्या ७० लक्ष वर्षांत घडून आलेल्या उत्थान (उंचावण्याच्या) व क्षरण (झीज) यांच्या क्रियांमुळे तयार झालेले आहे. भूवैज्ञानिक दृष्ट्या प्राचीन म्हणजे पुराजीव महाकल्पातील (सु.६० ते २४·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) हेर्सिनियन आणि कॅलेडोनियन गिरिजनांनी, तसेच कँब्रियन-पूर्व (सु. ६० कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील पॅन आफ्रिकन, ग्रेनव्हिल, हडसोनियन इ. गिरिजननांनी निर्माण झालेल्या पर्वतश्रेणींचे उंचावलेले भाग झिजून आता फक्त पायाचे भाग तेवढे शिल्लक राहिलेले दिसतात.
विभंग-गट (ठोकळ्या) पर्वत : कित्येक मोठे पर्वत विभंगक्रियेमुळे (मोठ्या भेगा वा तडे पडण्यामुळे), विभंगप्रतलाच्या दोन्ही बाजूंचे खडकांचे गट खालीवर सरकून तयार झालेले आहेत. विभंग प्रतल तिरपे असल्यास वर सरकणारे खडकांचे गटही तिरपे झालेले असतात. कॅलिफोर्नियातील सिएरा नेव्हाडाच्या पर्वतरांगा ६५० किमी. लांबीच्या आणि ८० ते १२० किमी. रुंदीच्या, तिरप्या झालेल्या. विभंग ठोकळ्यापासून निर्माण झालेल्या आहेत. या ठोकळ्याची पूर्व बाजू उंचावली जाऊन त्याचा माथा समुद्रसपाटीपेक्षा ४,००० मी. उंच गेला आहे. हा ठोकळा मुख्यतः या प्रदेशात पूर्वी अंतर्वेशित झालेल्या ग्रॅनाइटाचा बनलेला असला, तरी मूळच्या सिएरा नेव्हाडाच्या पर्वत रांगा ज्या भूद्रोणीतील गाळांच्या वलीकरणाने तयार झाल्या, त्या थरांचे अवशेषही त्याच्यात दिसून येतात.
कधीकधी कवचातील जवळजवळच्या ठिकाणी दोन समांतर विभंग निर्माण होऊन दोन्ही विभंग-प्रतलांमधला भाग वर उचलला जातो किंवा खाली दडपला जातो वा खचतो. मधला भाग वर उचलला जातो किंवा खाली दडपला जातो वा खचतो. मधला भाग वर येऊन तयार झालेल्या लांबट कटकाला ठोकळ्या पर्वत आणि मधला भाग खाली खचला असल्यास त्या भागास ⇨खचदरी म्हणतात.
आफ्रिका व आशिया मायनर येथील खचदऱ्या व त्यांच्या दोन्ही काठांवरचे डोंगर, यूरोपातील ऱ्हाइन नदीची खचदरी व तिच्या काठचे ब्लॅकफॉरेस्ट व व्होजेस हे डोंगर प्रसिद्ध आहेत. ॲपालॅचिअन हेही मूळचे वलित पर्वत असले, तरी त्यांची सध्या उंची, मूळचे उंचावलेले भाग झिजल्यानंतर घडून आलेल्या विभंगांमुळे ते भाग पुन्हा उंचावले गेल्यामुळे प्राप्त झालेली आहे. मात्र ॲपालॅचिअन हे ठोकळ्या पर्वतांचे उदाहरण नाही.
घुमटी पर्वत : भूकवचाच्या हालचालीमुळे जमिनीला विभंग न होता वरच्या बाजूने बाक येऊन किंवा स्तरित खडकांच्या थरात खालून शिलारस (मॅग्मा) घुसून ते थर घुमटाच्या आकाराच्या स्वरूपात उंचावले जातात. कालांतराने क्षरणाने माथ्यावरचे आच्छादनाचे खडक झिजून आतले गाभ्याचे अग्निज खडक डोंगर माथ्याच्या रूपात उघडे पडतात.
उत्तर अमेरिकेत दक्षिण यूटामधील हेन्री पर्वत छत्रक शैलांच्या (लॅकोलिथाच्या) अंतर्वेशनामुळे तयार झालेले आहेत. द. डकोटातील ब्लॅकहिल्स हे डोंगर आजूबाजूच्या सखल मैदानी प्रदेशापेक्षा कित्येक हजार मी. उंचावलेले असून १६० किमी. लांब व ८० किमी. रुंदीच्या लांबट घुमटाच्या आकाराचे आहेत. मात्र हा घुमट छत्रक शैलाच्या प्रकाराचा नाही. त्याचा उघडा पडलेला गाभ्याचा भाग ग्रॅनाइट व पेग्माइट खडकांचा बनलेला असून रॉकी पर्वताच्या गाभ्यातील अंतर्वेशनाशी त्याचा संबंध असल्याचे दिसते.
ज्वालामुखी पर्वत : पृथ्वीच्या कवचात काही किमी. खोलीवर तयार झालेल्या शिलारसाला भूपृष्ठाच्या चिरा-भेगांतून वाट मिळाली की, तो भूपृष्ठावर येतो. शिलारसात विरघळलेल्या वायूंच्या प्रमाणानुसार शिलारसाचा हा उद्रेक कमीअधिक स्फोटक स्वरूपाचा असतो, या क्रियेला ज्वालामुखी क्रिया म्हणतात. ज्वालामुखीच्या विवरातून लाव्हा आणि अग्निदलिक पदार्थ [→ अग्निदलिक खडक] बाहेर फेकले जाऊन त्यांचे आलटून पालटून थर त्या विवराभोवती साचू लागतात आणि त्यांचा शंकूच्या आकाराचा उंचवटा तयार होतो त्यांनाच ज्वालामुखी पर्वत म्हणतात [→ ज्वालामुखी–२]. लाव्हा व अग्निदलिक पदार्थ साचून त्यांची वाढ होत असल्यामुळे त्यांना संचयी पर्वत असेही म्हणतात. उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या द्रव्यांचा जास्तीत जास्त संचय विवराभोवती होऊन तयार होणाऱ्या पर्वताची शंकूसारखी आकृती अनेकदा सममितीय (एखाद्या अक्षाभोवती सारखे भाग होणारी) असते. जपानमधील फूजियामा हा ज्वालामुखी त्याच्या सुबक आकृतीसाठी प्रसिद्ध आहे. इटलीतील व्हीस्यूव्हिअस, अर्जेंटिनातील ॲकन्काग्वा, आफ्रिकेतील किलिमांजारो इ. ज्वालामुखी पर्वत प्रसिद्ध आहेत. मेक्सिकोतील पारीकूटीन हा ज्वालामुखी अगदी अलीकडे (१९४३ मध्ये) निर्माण झालेला असून त्याची जन्मापासून पूर्ण वाढ होईपर्यंतची सविस्तर पाहणी करण्यात आलेली आहे.
ज्वालामुखीचा उद्रेक जेव्हा कमी स्फोटक स्वरूपाचा असून त्याच्या विवरातून प्रामुख्याने प्रवाही वा पातळ लाव्हा बाहेर जाऊन त्यांच्यापासून कमी उताराच्या घुमटाच्या आकाराचे डोंगर तयार होतात. हवाई बेटांतील ज्वालामुखी क्रिया या प्रकारचे उत्तम उदाहरण आहे. खुद्द हवाई या बेटावरील माउनालोआ ज्वालामुखी समुद्रतळापासून सु. १०,००० मी. उंच असून समुद्रसपाटीपासून त्याची उंची ४,००० मी. आहे. समुद्रसपाटीशी त्याचा घेर १६० किमी भरतो.
अवशिष्ट पर्वत : कोणत्याही उंचावलेल्या पठारी प्रदेशाचे कालांतराने क्षरण होऊन डोंगराळ प्रदेशात रूपांतर होते. पठारावरून उतारांच्या दिशेने नद्या वाहू लागल्या म्हणजे त्या आपापल्या मार्गांत दऱ्या खोदतात. त्यामुळे दोन दऱ्यांच्या मधला कमी झीज झालेला भाग अवशिष्ट रूपाने उंचावलेला राहून त्यापासून डोंगर कटक, शिखरे व रांगा यांची निर्मिती होते. अवशिष्ट पर्वतांच्या प्रदेशात बहुतेक पर्वतांचे माथे जवळजवळ सारख्याच उंचीचे असतात. मूळचा पठारी प्रदेश जितका जास्त उंच आणि क्षरण घडवून आणणारे कारक जितके जास्त प्रभावी तितके वा डोंगररांगांचे व दऱ्यांचे स्वरूप अधिक उठावदार होते. भारतातील विंध्य, सातपुडा, सह्याद्री, पश्चिम घाट, पूर्व घाट इ. डोंगररांगा या अवशिष्ट पर्वतांचेच प्रकार आहेत. स्थलीप्राय (मैदानी) प्रदेशात एकाकी उभे राहिलेले प्रतिकारक्षम खडकांचे अवशिष्ट शैलही याच प्रकारचे होत.
पर्वतनिर्मितिविषयक सिद्धांत : पृथ्वीच्या कवचातील हालचालींमुळे होणाऱ्या पर्वतनिर्मितीच्या मूलभूत कारणांविषयी अनेक मते प्रचलित आहेत. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत पर्वतनिर्मितीच्या यंत्रणेसंबंधी सुचविण्यात आलेली स्पष्टीकरणे ‘पृथ्वी हा एक सावकाशीने निवणारा गोल आहे’. या कल्पनेवर आधारलेली होती. प्रथम बाह्यपृष्ठ निवून त्याचे कवच बनले आणि नंतर आतील भाग थंड होऊन संकोच पावला. त्यामुळे कवच संकोचित क्षेत्रफळाच्या जागेत बसवले जाऊन त्याच्य पृष्ठावर सुरकुत्या व घड्या पडल्या व त्यातून वलित पर्वतांची निर्मिती झाली. औष्णिक संकोचनाचे हे स्पष्टीकरण त्यावरील अनेक आक्षेपांमुळे त्याज्य ठरले आहे. भूखंडे व त्यांवरील पर्वत हे ग्रॅनाइटासारख्या हलक्या पदार्थांचे व सागरतळ हे बेसाल्टसारख्या जड पदार्थांचे बनलेले असून कवचाखालील द्रव्यावर तरंगणारे हे भाग त्यांच्या घनतेनुसार खालीवर होतात अशी ⇨समस्थायित्वाची कल्पना मांडण्यात आली आहे. तसेच भूद्रोणीत गाळ साचत असताना गाळाच्या वजनाने तेथील भाग दबतो व त्यामुळे उथळ समुद्रतळाशी हजारो मी. जाडीचे थर साचतात, असेही स्पष्टीकरण देण्यात आले आहे पण या दोन्हींमुळे मूळ भूद्रोणी कशा निर्माण होतात व नंतर त्यांच्यावर संपीडन (संकोचक) दाब येऊन त्यांचे वलीकरण का होते, याचे स्पष्टीकरण मिळत नाही. हे स्पष्टीकरण आता प्रावरणात (भूकवच व गाभा यांच्या मधील थरात) घडून येणाऱ्या संनयनी प्रवाहांच्या (उष्णता वाहून नेण्यासाठी निर्माण होणाऱ्या प्रत्यक्ष माध्यम कणांच्या प्रवाहांच्या अभिसरण प्रवाहांच्या) आधारे देण्यात आले आहे.
अगदी अलीकडे महासागरांच्या तळांसंबंधी झालेल्या संशोधनातून मिळालेल्या माहितीवरून आता असे मानले जाते की, पृथ्वीच्या कवचाचा पृष्ठभाग सहा मोठ्या आणि कित्येक लहान अशा फरशीसारख्या प्रचंड भूपट्टांत (तक्त्यांत वा लाद्यांत) विभागला गेलेला आहे. हे भूपट्ट प्रावरणाच्या वरच्या थराशी पोहोचतील इतक्या जाडीचे असून प्रावरणातील संनयनी प्रवाहांमुळे ते परस्परांपासून दूर किंवा एकमेकांकडे सरकत आहेत. महत्त्वाचे सागरतळ आणि भूखंडे ही या सहा भूपट्टांवर वसलेली आहेत. या भूपट्ट्यांच्या टकरीमुळे ज्वालामुखी क्रिया, भूकंप आणि गिरिजनन- क्रिया घडून येतात. कॅलिफोर्नियातील सान आंद्रे विभंग हा पॅसिफिक महासागराचा भूपट्ट उत्तर अमेरिकेच्या भूपट्टापासून वायव्य दिशेने दूर सरकत असल्याचे चिन्ह आढळून आले आहे. भूपट्ट सांरचनिकीच्या या कल्पनेमुळे ⇨खंडविप्लव, सागरतळांचे प्रसरण सागरांतर्गत प्रचंड पर्वतश्रेणी, खोल सागरदऱ्या, गिरिजननानं निर्माण होणारे वलित पर्वत, ज्वालामुखी बेटांच्या चापाकृती मालिका इत्यादींचे चांगले स्पष्टीकरण मिळते [→भूपट्ट सांरचनिकी].
भौगोलिक वाटणी : भूपृष्ठावर पर्वत कसेतरी अनियमितपणे विखुरलेले नाहीत, तसेच त्यांची वाटणी सर्वत्र समप्रमाणातही झालेली नाही. सध्या दिसून येणारे सर्व मोठे पर्वत दोन प्रमुख पट्ट्यांत समाविष्ट झालेले आहेत. एक पट्टा परि-पॅसिफिक म्हणजे पॅसिफिक महासागराभोवती कंकणाप्रमाणे पसरलेला आहे. या पट्ट्यात उत्तर अमेरिकेतील आणि पूर्व सायबीरियातील पर्वतरांगा, दक्षिण अमेरिकेतील पर्वतरांगा व पश्चिम पॅसिफिक महासागरातील चापाकृती द्वीपमालिका यांचा समावेश होतो. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर दक्षिणेस केप हॉर्नपासून उत्तरेस पनामा संयोगभूमीपर्यंत अँडीज पर्वतांची प्रचंड पर्वतश्रेणी पसरलेली आहे. तसाच पुढे जाणारा एक सलग पर्वत पट्टा मध्य अमेरिकेतून व मेक्सिकोतून पाठीच्या कण्यासारखा गेलेला आहे. उत्तर अमेरिकेतील पर्वतश्रेणींची रुंदी ६०० ते ९०० किमी. असून दक्षिणेकडे ती ३०० किमी.- पर्यंत निरुंद होते. या पर्वतश्रेणीचे पूर्व व पश्चिम असे दोन भाग होऊन त्यांच्या मध्ये कमीजास्त रुंदीचा सखल खोलगट प्रदेश आहे. या पर्वतसमूहांत रॉकी, कॅस्केड, सिएरा नेव्हाडा व कोस्टल रेंज या प्रमुख पर्वतश्रेणी असून त्यांपैकी रॉकी व कोस्टल रेंज या रांगा कॅनडातून थेट अलास्कात गेल्या आहेत. अलास्कातून पुढे पश्चिमेला गेलेल्या रांगा पॅसिफिकच्या उत्तर सीमेवर आहेत. तेथून पुढे रशियाच्या पूर्व किनाऱ्यावर सुरू झालेल्या पर्वतश्रेणी आशियाच्या जवळजवळ सर्व पूर्व किनाऱ्यावर पसरलेल्या आहेत. पूर्व सायबीरियात या पर्वतश्रेणीचे दोन विभाग होऊन त्यांच्यामध्ये सखल प्रदेश आहे. एका विभागात व्हर्कोयान्स पर्वत आर्क्टिक महासागरापासून सुरू होऊन थेट ओखोटस्क समुद्रापर्यंत पसरलेला आहे. दुसरा विभाग पॅसिफिक महासागरानजीक असून त्याच्यात अनादिर ते कॅमचॅटकापर्यंत पसरलेल्या पर्वतरांगा आहेत.
पश्चिम पॅसिफिक महासागरातील चापाकृती द्वीपमालिकांचेही दोन विभाग पडतात. एका विभागात अल्यूशन, कुरील, कॅमचॅटका आणि बोनिन-मेअरिअँना या द्वीपमालिका आणि बिस्मार्क, सॉलोमन, टोंगा (टँगा), करमॅडेक व न्यूझीलंड ही बेटे येतात. दुसरा विभाग पहिल्या विभागाच्या आतील बाजूस असून त्याच्यात सॅकालीन, जपान, रिऊक्यू चाप, फिलिपीन्स चाप आणि टेथियन पर्वतश्रेणीला जोडून असणारी इंडोनेशिया बेटे ही येतात.
पर्वत समूहांच्या दुसऱ्या पट्ट्याला टेथियन पर्वत प्रणाली असेही नाव आहे. हा पट्टा उत्तर आफ्रिकेतील ॲटलास पर्वतापासून सुरू होऊन पूर्वेकडे इंडोनेशियापर्यंत पसरलेला आहे. पश्चिम भागात या पर्वत समूहांची दोन पट्ट्यांत विभागणी झाली असून त्यांच्यामध्ये सखल पठारी प्रदेश आहे. यांपैकी उत्तरेकडील विभागात सिएरा मोरेना, आल्प्स, कार्पेशियन, बाल्कन, कॉकेशस व एल्बर्झ या पर्वतरांगा असून दक्षिण भागात ॲटलास, ॲपेनाइन्स, टॉरस, झॅग्रॉस व ओमान या पर्वतरांगा येतात. बलुचिस्तान-अफगाणिस्तानापासून पुढे या समूहात दक्षिणाभिमुखी एकच पट्टा असून त्याच्यात हिंदुकुश, काराकोरम, हिमालय, पश्चिम ब्रह्यदेशाचे डोंगर व पुढे इंडोनेशिया बेटे यांचा समावेश होतो. मध्य आशियातून ईशान्येकडे जाणाऱ्या या पट्ट्याच्या एका शाखेमध्ये कुनलुन, तिएनशान, अल्ताई इ. पर्वत येतात.
सागरांतर्गत पर्वतश्रेणी : सागरी तळांचे संशोधन सुरू झाल्यापासून सागरतळावरही कित्येक जागी खऱ्या अर्थाने पर्वत म्हणता येतील, अशा पर्वतांच्या रांगा आढळल्या आहेत. यांपैकी अटलांटिक महासागरातील दक्षिणोत्तर दिशेने गेलेली जवळजवळ सलग अशी मध्य अटलांटिक पर्वतश्रेणी ही सर्वांत मोठी आहे. सु. १६,००० किमी. लांब व ८०० किमी. रुंद असलेली ही पर्वतरांग आइसलँडपासून सुरू होऊन थेट अंटार्क्टिकापर्यंत पोहोचते. या पर्वतरांगेतील बहुतेक शिखरे पाण्याखाली एक किंवा अधिक किमी. खोलीवर असून काही तुरळक शिखरे पाण्यावर बेटांच्या स्वरूपात डोकावतात. यांपैकी सर्वांत मोठे शिखर पीकू आल्टो हे समुद्रसपाटीपासून २,२८४ मी. उंच असून त्याचा पायथा पाण्याखाली ६,००० मी. खोल आहे.
पर्वतांचे परिणाम : पृथ्वीवरील भूप्रदेशांच्या जलवायुमानावर (दीर्घकालीन सरासरी हवामानावर) पर्वतांचा महत्त्वाचा परिणाम झालेला आहे. आशियातील हिंदुकुश, काराकोरम, हिमालय, कुनलुन, तिएनशान इ. पर्वतरांगा सामान्यतः पूर्व-पश्चिम दिशेने गेलेल्या असून जलवायुमान सौम्य करणाऱ्या वाऱ्यांना हे पर्वत थोपवितात. त्यामुळे सायबीरियात कडक थंडी आणि गंगा-सिंधूच्या मैदानात कडक उष्णता असा अनुभव येतो. फ्रान्स व इटली यांच्या रिव्हिएरा भागातील उबदार हिवाळ्याचे कारण आल्प्स पर्वतरांगा हेच आहे. उत्तर अमेरिकेतील पर्वतांची दिशा दक्षिणोत्तर असल्यामुळे उत्तरेकडील थंड वारे थेट मेक्सिकोच्या आखातापर्यंत येऊ शकतात. पृथ्वीवरील पावसाच्या वाटणीवरही पर्वतांचा परिणाम होतो. भारतात सह्याद्री व हिमालय यांच्या वाताभिमुख उतारावर मॉन्सून वाऱ्यांपासून भरपूर पाऊस पडतो आणि वातपराङ्मुख बाजूवर पर्जन्यछायेमुळे कमी पाऊस मिळतो. अँडीज व रॉकी पर्वतांमुळेही पर्जन्यमानावर असाच परिणाम होतो. चिलीत भरपूर पाऊस होतो, तर पॅटागोनिया हा निमओसाड प्रदेश झाला आहे. ब्रह्यदेशातील आराकान योमाच्या पश्चिम उतारावर भरपूर पाऊस, तर इरावतीच्या खोऱ्यात त्या मानाने कमी पाऊस पडतो. इंग्लंडमध्ये कमी उंचीच्या पेनाइन पर्वताच्याही पश्चिम उतारावर जास्त पाऊस पडल्यामुळे तेथे गुरांना उपयुक्त असे उंच गवत वाढते, तर पूर्व उतारावर कमी पावसामुळे मेंढ्यांना योग्य असे बुटके गवत होते. मेंढ्या पाळणे व लोकर उत्पादन यांत अग्रेसर असलेल्या ऑस्ट्रेलियात ग्रेट डिव्हायडिंग रेंजच्या पश्चिम भागा कमी पावसामुळे बुटके गवत होते. स्वित्झर्लंडमधील ईडेलवाइझ, लेबानन मध्ये सीडार व सीएरा नेव्हाडाचे राक्षसी उंचीचे सेक्कोया वृक्ष तसेच यूरोपातील शॅमॉय, आशियाच्या उंचावलेल्या प्रदेशातील याक व उत्तर अमेरिकेतील मोठ्या शिंगांच्या मेंढ्या इ. वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती व प्राणी यांचा संबंधही पर्वतांमुळे जलवायुमानावर घडून आलेल्या परिणामाशी आहे.
मानवी इतिहास व संस्कृती यांवरही पर्वतश्रेणींचा महत्त्वाचा परिणाम झालेला आहे. मध्य व पश्चिम आशियातील लोकांनी पर्वतांच्या अनुरोधाने मार्ग काढून यूरोपात स्थलांतर केले, तर हेलेनिक राज्यांभोवतीच्या पर्वतामुळे ती राज्ये एकाकी राहिली. पर्वतांच्या अडसरामुळे पर्वताच्या दोन्ही बाजूंचे लोकसमूह अलग राहतात व त्यांच्यात चालीरीती, धर्म, व्यापार, तत्त्वज्ञान, नवीन कल्पना यांची नवीन मुक्त देवघेव होत नाही. त्याचबरोबर पर्वत हे नैसर्गिक संरक्षणाचे साधन म्हणून काम करतात. हिमालयाने भारताचे ज्याप्रमाणे दीर्घकाल संरक्षण केले तसेच आल्प्सनेही रोमची बाह्य तटबंदी म्हणून काम केले. पर्वत भागात राहणारे लोक सामान्यतः काटक व स्वातंत्र्ययप्रिय असतात. तसेच ते संशयी आणि गतानुगतिक विचारांचे, जुन्या रूढींना चिकटून राहणारे असतात.
कला, साहित्य व धर्म यांच्या संबंधातही पर्वतांचे स्थान महत्त्वाचे आहे. ग्रीसमधील ऑलिंपस, भारत व नेपाळमध्ये हिमालय, जपानमध्ये फूजी हे पर्वत देवतासमान किंवा देवांची वसतिस्थाने म्हणून पूजनीय मानले जातात. भारतात डोंगरांच्या माथ्यावर देवळे बांधलेली बहुधा आढळतात. गिरिविहार म्हणून त्यांचा उपयोग अगदी अलीकडचा आहे. आल्प्समध्येही कित्येक उंच शिखरांवर ख्रिस्ती प्रार्थनामंदिरे बांधलेली आहेत. ऐतिहासिक महत्त्वाच्या अशा थर्माॅपिली, पावनखिंड, हळदीघाट, हाजीपीर इ. खिंडीना इतिहासात कायमचे स्थान मिळाले आहे. उत्तुंग गिरिशिखरे चढून जाण्याचा ⇨ गिर्यारोहणाचा क्रीडाप्रकार आता अधिकाधिक लोकप्रिय होत आहे.
आर्थिक दृष्ट्या पर्वताचे महत्त्व फारच आहे. पर्वत प्रदेशातील गवतावर गुरे व मेंढ्या चारता येतात. पर्वताच्या उतारावरील वृक्षांपासून मौल्यवान लाकूड, औषधी द्रव्ये व उपयुक्त रसायने मिळतात. चहा, कॉफी व केशर यांची लागवड विशिष्ट पर्वत प्रदेशांतच यशस्वी होते. पर्वतावरून येणाऱ्या जलप्रवाहाच्या शक्तीवर निर्माण केलेली जलविद्युत् ही उद्योगधंद्यासाठी महत्त्वाचे शक्ति साधन म्हणून उपयोगी पडते. पर्वतावरून वाहून आणलेल्या गाळामुळे नद्यांच्या खोऱ्यांतील मैदाने सुपीक होतात. हिमाच्छादित पर्वतांवरून आलेल्या वितळलेल्या बर्फाच्या पाण्यामुळे उन्हाळ्यातही नद्यांना पाणीपुरवठा होतो. पर्वतांच्या निर्मिति प्रक्रियांशी संबंधित असलेल्या अग्निज राशींच्या अनुषंगाने अनेक मौल्यवान धातुकांचे (कच्च्या धातूंचे) निक्षेप पर्वत प्रदेशात तयार झालेले आढळतात. कॉकेशसमध्ये मँगॅनीज, अँडीजमध्ये तांबे व चांदी आणि उरल पर्वतात प्लॅटिनम यांचे निक्षेप ही याची उदाहरणे आहेत.
पर्वतावरील रम्य वनश्री, तेथील ताजी व थंड हवा, रोजच्या धावपळीच्या जीवनापासून अलिप्तता व शांतता यांमुळे पर्वतांचे प्रदेश हौशी प्रवाशांचे मोठे आकर्षण होत आहेत. बर्फाच्छादित पर्वत प्रदेशात मनुष्याच्या क्रीडाप्रवृत्तीलाही वाव मिळतो. प्रवाशांना सुखसोयी पुरवणे हा पर्वत प्रदेशातील लोकांचा किफायतीचा व्यवसाय होत आहे आणि अशा सौंदर्यस्थळांची व क्रीडास्थानांची वाढ ही देशाच्या उत्पन्नात मोलाची भर घालणारी बाब ठरत आहे.
संदर्भ : 1. Emmons, W. H. and others, Geology, Principles and Processes, New York, 1960.
2. Milne, M. The Mountains, New York, 1963.
3. Ramsey, W. L. Burckley, R. A. Modern Earth Science, New York, 1965.
कुमठेकर, ज. ब. सोवनी, प्र. वि.
“