पर्व : नैमित्तिक पुणकर्मास योग्य असा कालखंड म्हणजे पर्व. कळक, ऊस, हाताची बोटे यांचा भाग किंवा एखाद्या ग्रंथाचा विभाग या अर्थीही ‘पर्व’ हा शब्द येतो. येथे कालखंड असा अर्थ आहे. सूर्य, चंद्र, नक्षत्रे, ग्रह यांची परिभ्रमणे होत असतात, त्यांतून वेगवेगळ्या वेळी त्यांचे एकमेकांशी पुण्यकारक योग म्हणजे संबंध वा सान्निध्यसंबंध येतात. अशा पुण्यकारक योगाच्या वा अशा संबंधांच्या विशिष्ट कालखंडास पर्व म्हणतात. काही विधिनिपेधही त्यांच्याशी निगडित आहेत. अमावस्या, पौर्णिमा, चतुर्दशी, अष्टमी आणि रविसंक्रांती ही पाच पुण्यपर्वे असल्याचे विष्णुपुराणात (३·११·११८) म्हटले आहे. कल्पादी तिथी, अयन, विषुवदिन, चंद्र-सूर्य यांची ग्रहणे, अमावास्या इ. तिथी अशी अनेक पर्वे सांगितली आहेत. मन्वंतराचा आरंभही पर्वकालच मानला आहे. यांतील काही नित्य म्हणजे नियत पर्वे असतात, तर काही अनियत म्हणजे क्वचित किंवा प्रदीर्घ काळाने येणारी पर्वे असतात. भाद्रपद कृष्ण षष्ठी, मंगळवार, चंद्र रोहिणी नक्षत्रात, सूर्य हस्त नक्षत्रात आणि व्यतीपात हा योग जुळून आला, तर त्याला  ⇨कपिला षष्ठी  म्हणतात. सूर्य, चंद्र व गुरू हे विशिष्ट राशींमध्ये आले, तर त्यास कुंभपर्व असे म्हणतात. गुरूचे बारा राशींतून भ्रमण होण्यास बारा वर्षे लागतात. अर्थात हे पर्व साधारणपणे बारा वर्षांनी येते. या पर्वात प्रयाग, हरद्वार, नासिक व उज्जयिनी येथे  ⇨कुंभमेळा भरतो. यावेळी हजारो यात्रेकरू या ठिकाणी जमतात व तीर्थात स्नान करतात. कुंभपर्व हे महापर्व होय. पर्वकालात स्नान, दान, जप, होम, श्राद्ध इ. विधी करतात. भूतबाधा, विषबाधा इ. दोष दूर करणाऱ्‍या मंत्रांचा उपदेश पर्वकालात घेतात. या काळात मांसाशन व स्त्रीगमन निषिद्ध असल्याचे सांगितले आहे (बौधायन धर्मसूत्र १·२१·२१).

गजपर्व : अय्यंगार ब्राह्मणांच्या स्त्रिया कार्तिक पौर्णिमेपासून तीन दिवस हे व्रत करतात. मातीची गजलक्ष्मी तयार करून तिची पूजा, दानधर्म, भोजन व हळदीकुंकू असा विधी असतो. या पर्वाशी कुंतीची कथा निगडित आहे.

गजच्छायापर्व : भाद्रपद अमावस्येला सोमवार, हस्त नक्षत्रात सूर्य आणि चंद्र असा योग जुळून आला, तर हे पर्व असते. या पर्वात श्राद्ध व दान या गोष्टी विहित आहेत.

अर्धोदय पर्व : पौष किंवा माघ अमावस्येच्या दिवशी रविवार, श्रवणनक्षत्र व व्यतीपात हे योग एकत्र आले म्हणजे हे पर्व असते. कोटी सूर्यग्रहणांच्या तोडीचा हा योग सांगितला आहे. यात एखादा योग कमी असला, तर ते महोदय पर्व समजतात.

महोदय पर्व : पौष किंवा माघ महिन्यात सोमवती अमावस्या असून, श्रवण नक्षत्र व्यतीपात हे योग एकत्र येतील तेव्हा हे पर्व असते. हा योग दिवसा यावा लागतो.

अमावस्या व पौर्णिमा ही नित्य येणारी पर्वे होत. या दिवशी अग्निहोत्री यजमानाने वपन करून दर्श व पूर्णमास या यागांचा उपक्रम करावयाचा असतो. अमावस्येच्या दिवशी पितरांना उद्देशून पार्वण श्राद्ध करण्यास सांगितले आहे. श्राद्ध करणाऱ्याच्या तीन मृत पितरांना (पिता, पितामह व प्रपितामह) उद्देशून केलेले श्राद्ध ते पार्वण श्राद्ध होय, असे पराशरमाधवीयात (१२·१९९) म्हटले आहे. पार्वण म्हणजे त्रैपुरूषिक, असे दायभाग (११·७·१७) नावाच्या ग्रंथात सांगितले आहे. धर्मशास्त्र व ज्योतिषविषयक ग्रंथात पर्वासंबंधीची माहिती विस्तारपूर्वक दिलेली असते.

भिडे, वि. वि.