पर्याप्त : योहानेस केप्लर यांच्या पहिल्या नियमानुसार [→खगोलीय यामिकी] एका मोठ्या खस्थ गोलाभोवती दुसऱ्या लहान खस्थ गोलाची फिरण्याची कक्षा, हे दोनच गोल लक्षात घेतले, तर विवृत्ताकार (लंबवर्तुळाकार) असते परंतु तिसऱ्या स्वस्थ गोलाच्या परिणामामुळे त्या कक्षेच्या आसपास लहान गोलाचे जे अल्प स्थानांतर झालेले आढळते त्याला पर्यास म्हणतात. उदा., सूर्यकुलातील कोणताही ग्रह सूर्याभोवती विवृत्त कक्षेत फिरतो. कोणत्याही क्षणी ग्रह कक्षेमध्ये कोठे असेल हे गणिताने काढता येते पण प्रत्यक्ष वेध घेतले, तर सूर्यकुलातील इतर ग्रहांच्या आकर्षणाच्या परिणामामुळे गणिताने येणाऱ्या कक्षेतील अपेक्षित स्थळी ग्रह सापडत नाही. त्याच्या स्थानात थोडा फरक आढळतो, हाच पर्यास होय. अवकाशात जेव्हा दोनपेक्षा अधिक स्वस्थ गोलांचा परस्परांशी संबंध येतो तेव्हा पर्यास घडतो (उदा., उपग्रह, ताऱ्यांचे संघ, धूमकेतू).
पर्यासाचे स्थलकालदर्शक सूत्र असून त्यातील काही पदे कालाच्या निरनिराळ्या घातांकांत असतात, तर काही पदे आवर्तनदर्शक असतात.
पर्यास दोन प्रकारचे असतात: दीर्घकालिक आवर्तनीय व आवर्तनीय. दीर्घकालिक पर्यासाचा परिणाम साचत साचत जातो. हा अवकाशातील त्या खस्थ गोलांच्या स्थानांवर अवलंबून असतो. त्यामुळे खस्थ गोलाच्या कक्षेची विकेंद्रता (वर्तुळाकार कक्षेपासून होणारे विचलन) व कल यांत आंदोलनात्मक बदल होतात आणि त्यामुळे ⇨पात व उपबिंदू (केंद्रस्थानी असेलला मोठा गोल व प्रदक्षिणा घालणारा लहान गोल यांत सर्वांत कमी अंतर असताना लहान गोलाचे स्वतःच्या कक्षेतील स्थान) यांच्या स्थानांत बदल होतो पण अशा पर्यासाचा आवर्तनकाल ५०,००० ते २०,००,००० वर्षांपर्यंत असू शकतो. यामुळे आवर्तनकाल व बृहदक्ष (विवृत्ताकार कक्षेचा मोठा अक्ष) यांमध्ये बदल होत नाहीत. पृथ्वीच्या कक्षेच्या पातळीचा सूर्यकुलाच्या ⇨ अचल प्रतलाशी असलेला १° ३५’ चा कल २० हजार वर्षांत फक्त ४७ मिनिटे होईल आणि विकेंद्रता ०.०१७ आहे ती कमी होत होत २४ हजार वर्षांत ०·००३ इतकी होईल.
आवर्तनीय पर्यास दोन्ही ग्रहांच्या कक्षेतील प्रत्यक्ष स्थानावर अवलंबून असतो. जेव्हा हे ग्रह सूर्याच्या एका बाजूस सरळ रेषेत असतात तेव्हा पर्यास कमाल असतो व विरुद्ध बाजूंस असताना किमान असतो. या पर्यासामुळे ग्रह कक्षेतच पण मागे पुढे असेल, कक्षेच्या किंचित वरखाली असेल किंवा जरा सूर्याकडील अगर विरुद्ध बाजूंस असेल.
पर्यास घडविणाऱ्या गोलाचा आवर्तन काल व पर्यासित गोलाचा आवर्तन काल एकमेकांशी अगदी लहान आणि सोप्या गुणोत्तरात निगडित असतील, तर दोन्ही गोल ठराविक काळानंतर जवळात जवळ येतील. पर्यासाचे परिणाम साठत साठत जातील व एखादे वेळी पर्यासित गोलाच्या आवर्तन कालात कायमचा बदल होईल. गुरू व शनी यांचे आवर्तन काल २:५ असल्यामुळे गुरूच्या पाच प्रदक्षिणांनंतर ते पुन्हा जवळात जवळ येतील परंतु हे स्थान पुढे पुढे सरकत जाऊन सु. ८५० वर्षांनी मूळ पदी एका रेषेत जवळात जवळ येतील. शुक्र आणि बुध या लहान अंतर्ग्रहांच्या (पृथ्वीच्या कक्षेच्या आतील बाजूस कक्षा असलेल्या ग्रहांच्या) बाबतीत आवर्तनीय पर्यास फारच कमी असतो. बुधाच्या व शुक्राच्या बाबतीत तो अनुक्रमे जास्तीत जास्त ०’·२५ व ०’·५ असतो. पृथ्वीच्या बाबतीत तो १’ व मंगळाच्या बाबतीत २’ असतो. गुरू, शनी, प्रजापती (यूरेनस) व वरुण (नेपच्यून) या ग्रहांच्या बाबतीत आवर्तनीय पर्यास पुष्कळच जास्त असून ते अनुक्रमे ३०’, ७०’, ६०’ व ३५’ असे आढळतात.
सूर्यापासून ज्या अंतरावर भ्रमण करणाऱ्या लघुग्रहांचा (मंगळ आणि गुरू यांच्या दरम्यानच्या कक्षेत आढळणाऱ्या छोट्या ग्रहांचा) आवर्तनकाल गुरूच्या आवर्तन कालाच्या साध्या व्यस्त पटीत (१/२, १/३, २/५ इ.) येतो, त्या अंतरावर लघुग्रहच सापडत नाहीत. त्यामुळे अशा अंतरावर लघुग्रहांच्या पट्ट्यात मधून मधून रिकाम्या जागा आहेत. या रिकाम्या जागांना डॅन्यल कर्कवुड या अमेरिकन ज्योतिर्विदांच्या नावावरून ‘कर्कवुड गॅप्स’ म्हणतात. हा परिणाम गुरूच्या पर्यासाचा आहे. हॅली धूमकेतूच्या उपसूर्यी (सूर्यापासून सर्वांत जवळच्या स्थानी) येण्याच्या काळात ५ वर्षांचा फरक पर्यासामुळे पडला. जर धूमकेतू मोठ्या ग्रहाजवळून जाऊ लागला व तो अन्वस्तीय (पॅराबोलिक) कक्षेत असेल, तर तेथून पुढे त्याची कक्षा विवृत्त बनते, हा पर्यासच होय. वरुणाचे अस्तित्त्व व कक्षा, प्रजापतीच्या पर्यासामुळे व कुबेराचे (प्लुटोचे) अस्तित्व वरुणाच्या पर्यासामुळे ज्योतिर्विदांच्या लक्षात आले. हा पर्यासाच्या निरीक्षणापासून फार मोठा फायदा झालेला आहे.
आवर्तनीय पर्यासाचा परमप्रसर (स्थिर स्थितीपासून होणारे कमाल स्थानांतरण) हा पर्याय घडविणाऱ्या गोलाच्या वस्तुमानावर अवलंबून असतो. म्हणून ज्यांना उपग्रह नाहीत अशा बुध, शुक्र व कुबेर या ग्रहांची वस्तुमाने काढण्याकरिता परमप्रसाराचे वेध हे एकमेव साधन आहे.
सूर्याच्या फार मोठ्या वस्तुमानामुळे चंद्राच्या कक्षेवर पर्यास-परिणाम घडून येतो. पृथ्वी कमी अंतरावर असल्यामुळे आणि पृथ्वी कमी अंतरावर असल्यामुळे आणि पृथ्वी व चंद्र विषुववृत्तावर फुगीर असल्याने या फुगीरपणाचा सुद्धा पर्यास चंद्रावर जाणवण्याएवढा घडतो. कृत्रिम उपग्रह पृथ्वीच्या फार जवळून फिरत असल्याने पृथ्वीचा फुगीरपणा व अंतरंगाची विषम घनता यांचा या उपग्रहावर मोठा पर्यास घडतो. हा पर्यास एवढा मोठा असतो की, त्यामुळे पृथ्वीचा विषुववृत्तीय फुगीरपणा अजमाविण्याकरिता हे एक उत्कृष्ट साधन निर्माण झाले आहे. भूपृष्ठापासून ८०० किमी. उंचीपर्यंत वातावरणीय विरोध हाही कृत्रिम उपग्रहांवर पर्यास घडवून आणतो. या उंचीपर्यंत चंद्रामुळे व सूर्यामुळे कृत्रिम उपग्रहांवर निर्माण होणारा पर्याय क्षुल्लक असतो, तथापि नंतर वाढत्या उंचीबरोबर तो वाढत जातो.
गोखले, मो. ना.