परित्वचा : (लॅ. पेरिडर्म). वनस्पतींच्या अवयवांचे संरक्षण ⇨ अपित्वचा व परित्वचा अशा दोन प्रकारच्या ऊतक तंत्रांनी (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांच्या संस्थांनी) केले जाते. खालच्या दर्जाच्या वनस्पतींत [कायक वनस्पतींत म्हणजे ज्यांत मूळ, खोड, पाने, फुले,फळे आणि बीजे यांचा पूर्ण अभाव असतो अशा वनस्पतींत उदा. ⟶ कवक शैवले शैवाक शेवाळी] शरीराच्या अवयवांच्या सर्वांत बाहेरच्या कोशिकांच्या (पेशींच्या) थरामुळे पुरेसे संरक्षण मिळते वरच्या दर्जाच्या वनस्पतींना (नेचाभ म्हणजे नेचाच्या स्वरुपाच्या व बीजी वनस्पती) सुकणे, गोठणे, उष्णतेने तापणे, रोगराई, खरचटणे, चिरडणे इत्यादींमुळे होणाऱ्या दुखापतीपासून विशेष संरक्षणाची आवश्यकता असते व ते संरक्षण काही प्रमाणात अपित्वचेमुळे मिळते तथापि ते पुरेसे न मिळण्यासारख्या परिस्थितीत अपित्वचेऐवजी अधिक कार्यक्षम अशा अनेक ऊतकांच्या एकत्रित संघटनेने (तंत्राने) दिले जाते, याच तंत्रास परित्वचा म्हणतात, वनस्पतींच्या सर्व कोवळ्या भागांवर व पाने, फुले व फळे यांसारख्या अल्पकाल टिकणाऱ्या अवयवांवर प्रथमतः व नंतरही अपित्वचा असते परंतु अधिक काळ टिकणाऱ्या खोड व मुळे यांसारख्या अवयवांची आतून वाढ सुरु असल्याने मूळची प्राथमिक अपित्वचा फाटून व तुटून जाणे अपरिहार्य होते, अशा परिस्थितीत तिच्याऐवजी परित्वचेसारखी द्वितीयक संरक्षक त्वचा विकास पावते. प्रकटबीज वनस्पती [⟶ वनस्पति, प्रकटबीज उपविभाग], द्विदलिकित वनस्पती [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग], काही अपवादात्मक गणलेल्या एकदलिकित आणि नेचाभ [⟶ वनस्पति, वाहिनीवंत अबीजी विभाग] वनस्पतींमध्ये काष्ठयुक्त खोडे व मुळे यांमध्ये परित्वचेचा विकास होतो तसेच काही फळे (उदा.,चिकू) व काही ⇨ औषधींची खोडे यांवरही परित्वचा काही मर्यादित प्रमाणात बनते. काही काष्ठयुक्त एकदलिकित वनस्पतींच्या खोडावर विशिष्ट प्रकारची परित्वचा आढळते आणि तिची संरचना काहीशी ⇨ त्वक्षेसारखी (बुचासारख्या पदार्थाने भरलेल्या मृत कोशिकांच्या थरासारखी) असते तिला कोशिकांच्या मांडणीमुळे स्तरित त्वक्षा म्हणतात (उदा., हळदीचे गड्डे). काही ओषधींच्या मुळांवरील त्वक्षेचे थर म्हणजे ⇨ मध्यत्वचेच्या काही भागांतील कोशिकांत सुबेरिन हे मेदी (स्निग्ध) द्रव्य साचून बनलेले ऊतकच असते.
परित्वचेमध्ये (१) त्वक्षाकर (त्वक्षा बनविणारा जिवंत कोशिकांचा समूह) व त्यापासून बनणाऱ्या (२) उपत्वक्षा (द्वितीयक मध्यत्वचा) व (३) त्वक्षा यांचा अंतर्भाव होतो. त्वक्षाकर हे द्वितीयक ऊतक असल्याने सर्वच ऊतक तंत्र द्वितीयक ठरते. पूर्णपणे विकसित झालेल्या प्राथमिक ऊतकातील कोशिका पुन्हा ⇨ विभज्येप्रमाणे (सतत कोशिका विभाजनाने ऊतके बनविणाऱ्या भागाप्रमाणे) वाढून परित्वचा बनते त्या वेळी त्या कोशिकांची विभागणी अवयवाच्या पृष्ठाशी समांतर (स्पर्शिकांच्या पातळीत) असलेल्या भित्तींमुळे होते काही प्रमाणात पृष्ठाशी काटकोन करणाऱ्या भित्तीही बनतात. खोडातील वाहक रंभातील (मधल्या वाहक ऊतकयुक्त भागातील) ऊतककराच्या (विभाजी कोशिकाथराच्या) बाहेरील कोणत्याही जिवंत ऊतकांमध्ये त्वक्षाकराची निर्मिती होऊन परित्वचा बनते. त्वक्षाकरापासून आतील बाजूस बनलेल्या उपत्वक्षेतील कोशिका मध्यत्वचा किंवा परिकाष्ठ यांतील कोशिकांप्रमाणे असून जिवंत असतात व त्यांच्या कोशिकांची मांडणी त्वक्षाकर व त्वक्षा यांमधील कोशिकांच्या अरीय (किरणाप्रमाणे) रांगांत असल्याने तो परित्वचेचा भाग असावा, हे स्पष्ट होते. उपत्वक्षेला द्वितीयक मध्यत्वचा असेही कधीकधी म्हणतात. खोडातील पहिला त्वक्षाकर अपित्वचा अगर प्राथमिक मध्यत्वचेतील बाहेरील ⇨ स्थूलकोनोतकात किंवा आतील ⇨ मृदूतकात बनतो, हे आता मान्य झाले आहे. त्यानंतरचा त्वक्षाकर मध्यत्वचेत किंवा परिकाष्ठात बनतो. त्या निर्मितीची सुरुवात अपित्वचा फाटण्यापूर्वी किंवा त्याबरोबरच होते. त्याचे क्रियाशीलत्व अंत:स्थ व बाह्य परिस्थितीवर अवलंबून असते. क्रियाशीलत्व व निष्क्रियता एकाआड एक येऊ शकतात. तसेच बाहेरचा त्वक्षाकर पूर्णपणे निष्क्रिय झाल्यावर नवीन त्वक्षाकर अधिक खोलीवर बनतो. नंतर बनलेल्या त्वक्षाकराच्या क्रियाशीलतेमुळे बनलेल्या त्वक्षाथराचा आतील भाग मृत मध्यत्वक्षा व परिकाष्ठ यांना वेढून टाकतात त्याला ‘कवची वल्क’ म्हणतात. अपित्वचेखाली वरवर बनलेल्या परित्वचेमुळे पुढे पुढे झाडाची साल खवल्यांनी सोलून जाते परंतु खोलवर बनलेल्या त्वक्षाकरापासून झालेल्या परित्वचेमुळे सालीची वलये सुटून निघतात. मुळांच्या बाबतीत ⇨ परिरंभापासून (वाहक ऊतकांच्या स्तंभाबाहेरील ऊतकापासून) वा त्याच्या आसपास त्वक्षाकराची निर्मिती होते व परित्वचा बनते. काहीसे परित्वचेसारखे ऊतक वनस्पतीस जखम झाल्यास तेथेच बनते व त्याने जखम भरून येऊन संरक्षण मिळते. परित्वचेतून हवेची ये-जा चालू राहण्यास सालीवर छिद्रे [→ वल्करंध्र] बनतात.
पहा : शारीर, वनस्पतींचे.
संदर्भ : Eames, A. J. MacDaniels, L. H. Introduction to Plant Anatomy, New York, 1953.
परांडेकर, शं. आ.
“