पराप्रत्यक्ष : (क्लेअरव्हॉयन्स). बाह्येंद्रियांच्या साहाय्यावाचून बाह्य वस्तूंचे वा घटनांचे होणारे संवेदन (पर्सेप्शन) म्हणजे पराप्रत्यक्ष. ⇨ परचित्तज्ञान (टिलेपथी) किंवा ⇨ पूर्वज्ञान (प्रीकॉग्निशन) ह्या प्रकारांसारखाच हा अतींद्रिय संवेदनाचा (एक्स्ट्रॉसेन्सरी पर्सेप्शन) एक प्रकार आहे. पराप्रत्यक्ष हे जागृतावस्थेत, स्वप्नरूपाने वा संमोहित अवस्थेतही होऊ शकते. दूर अंतरावर घडून येणारा अपघात, मृत्यू इत्यादींसारख्या घटनांचे, त्या घटना प्रत्यक्ष पाहत आहोत अशा स्वरूपाचे, आकस्मिकपणे ज्ञान होणे व त्याचा पडताळा येणे किंवा स्वप्नात एखादे दूरस्थ दृश्य दिसणे इ. पराप्रत्यक्षाची उदाहरणे म्हणता येतील. ह्या प्रकारचे ज्ञान होऊ शकते, यास केवळ काही व्यक्तींना आलेले व खरे ठरलेले उत्स्फूर्त अनुभव एवढाच पुरावा आहे असे नाही. गेल्या शंभर वर्षांत अनेक देशांमध्ये कित्येक चिकित्सक वृत्तीच्या विद्वानांनी, मानसशास्त्रज्ञांनी तसेच इतर वैज्ञानिकांनी केलेल्या प्रयोगांवरून पराप्रत्यक्ष या ज्ञानप्रकाराचे अस्तित्व मान्य झालेले आहे. अमेरिकेतील ड्यूक विद्यापीठात डॉ. जे. बी. राइन यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी, कोणत्याही शंकेस जागा राहणार नाही, अशा रीतीने आणि सर्वमान्य असे सांख्यिकीय निकष लावून केलेल्या प्रयोगांनी पाश्चात्त्य मानसशास्त्राच्या गृहितकांचा संकुचितपणा दाखवून दिला आहे.
पराप्रत्यक्षज्ञानक्षमता ही काही व्यक्तींच्याच ठिकाणी असते असे नसून, ती सर्वांच्याच ठिकाणी कमीअधिक प्रमाणात असते. असे प्रयोगांच्या आधारे म्हणण्यास जागा आहे. ती एक प्राथमिक (प्रमिटिव्ह) कोटीची क्षमता असावी आणि परिसराशी संपर्क साधण्यासाठी बाह्येंद्रिये अस्तित्वात आल्यामुळे ती मागे पडली असावी, असे प्राण्यांचे निरीक्षण व प्राण्यांवर करण्यात आलेले काही प्रयोग यांच्या आधारे काही परामानसशास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
पराप्रत्यक्षाशी संबंधित असलेले घटक निश्चित करणे, हे वर्तमान प्रायोगिक संशोधनाचे उद्दिष्ट आहे. शारीरिक व मानसिक दृष्ट्या निकोप व्यक्तिमत्त्व, स्वत:च्या ठिकाणी पराप्रत्यक्षक्षमता असावी असा विश्वास, ध्यानसदृश आणि शैथिल्यपूर्ण चित्तस्थिती, संमोहित अवस्था, विशिष्ट औषधिद्रव्यांचे सेवन इ. घटकांच्या बाबतीत बरेच संशोधन झालेले आहे व चालूही आहे.
संदर्भ : 1. Leadbeater, C. W. Clairvoyance, Adyar, Madras, 1965.
2. Murphy, Gardner, Challenge of Psychical Research, New York, 1961.
अकोलकर, व. वि.