परांडा : महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील त्याच नावाच्या तालुक्याचे व इतिहासप्रसिद्ध किल्ल्याचे ठिकाण. लोकसंख्या ८,७९८ (१९७१). बार्शीच्या पश्चिमेस सु. २७ किमी.वर सीना व तिच्या उपनद्यांदरम्यान ते वसले आहे. पुराणात याचा उल्लेख परमधामपूर या नावाने आढळतो. पुढे त्यास प्रचंडपूर म्हणू लागले आणि त्यानंतर परांडा हे नाव रूढ झाले. येथे नगरपालिका असून सर्व तहसील कार्यालये आहेत. गावाच्या मध्यवस्तीत परांडा हा भुईकोट किल्ला आहे. त्याच्याभोवती खंदक आहे आणि २६ बुरुजांच्या तटांच्या आत काही वास्तू व एक मशीद आहे. या मशिदीच्या मागे बऱ्याच अंतरावर एका तळघरात काही वीरगळ व शिल्पे आहेत. तसेच मशिदीचे स्तंभ व तीवरील जाळीकाम मुसलमानपूर्व काळातील हिंदू मंदिरांची शैली सूचित करतात. हेमाद्रीने आपल्या चतुर्वर्गचिंतामणि ग्रंथातील व्रतखंडाच्या प्रस्तावनेत यादव घराण्यातील भिल्लम राजाने प्रत्यंडकाच्या राजाला जिंकले, असे म्हटले आहे. हे प्रत्यंकड म्हणजेच परांडा असावा. परमानंद कवीच्या श्रीशिवभारत काव्यात त्याचा निर्देश प्रचंडपूर म्हणून केलेला आढळतो. बहमनी सुलतानांपैकी दुसरा महंमूदशाह याच्या महमूद गावान या मुख्यमंत्र्याने तो बांधला असावा असे एक मत आहे, तर तो महमूद ख्वाजा गावान याने बांधला असावा, असे दुसरे मत आहे. बहमनी सत्तेच्या ऱ्हासानंतर तो अहमदनगरच्या निजामशाही सत्तेखाली आला. निजामशाहीत या किल्ल्यास अधिक महत्त्व प्राप्त झाले. १३०० मध्ये मोगलांनी काही काळ त्यावर आधिपत्य गाजविले. शहाजीच्या ताब्यात हा किल्ला काही वर्षे होता. आदिलशाहाने १६३० मध्ये हा किल्ला जिंकला आणि तेथील मुलूक मैदान (मालिक मैदान) ही मोठी तोफ विजापूरला नेली. पुन्हा १६५७ मध्ये तो मोगलांकडे गेला. विजापूरची आदिलशाही व दिल्लीचे मोगल यांच्या ताब्यात आलटूनपालटून हा किल्ला राहिला. पेशवाईत त्याला फारसे महत्त्व राहिले नाही.
खरे, ग. ह.