परमप्पपयासु: जैन दृष्टिकोणातून आत्म्याविषयीचे विवरण देणारा एक ग्रंथ. हा अपभ्रंश भाषेत रचिला असून ⇨ जोइंदु हा त्याचा कर्ता होय. जोइंदूच्या काळासंबंधी संशोधकांत मतभेद आहेत. डॉ. आ. ने. उपाध्ये त्याचा काळ इ. स. चे सहावे शतक असा मानतात, तर राहुल सांकृत्यायन ह्यांच्या मते तो इ. स. १००० मध्ये होऊन गेला असावा.
या ग्रंथाची हस्तलिखिते देवनागरी आणि कन्नड लिपीत विपुलतेने उपलब्ध आहेत. मूलग्रंथ दोन पाठांत उपलब्ध आहे मोठ्या पाठात ३४५ पद्ये (बहुतेक दोहे) आहेत आणि लहान पाठात फक्त २३३ पद्ये आहेत. जैन मुनींत हा ग्रंथ फार प्रिय आहे. कुंदकुंदाचार्य (सु. पहिले शतक) आणि पूज्यपाद (सु. पाचवे शतक) ह्यांसारख्या लेखकांची परिभाषा आणि शैली या ग्रंथात उतरलेली दिसते. हेमचंद्र (बारावे शतक), जयसेन (सु. बारावे शतक), श्रुतसागर (सोळावे शतक) ह्यांनी आणि इतरांनीही याचा उल्लेख केला आहे. रामसिंह व लक्ष्मीचंद्र यांसारख्या नंतरच्या लेखकांनीही जोइंदूच्या कल्पना आणि त्याची विवेचनपद्धती यांचे अनुकरण केले आहे.
जोइंदूच्या मते आत्मा तीन प्रकारचा आहे : बहिरात्मन्या–त देह आणि त्याच्या अवयवांचा समावेश होतो अन्तरात्मन् – ध्यानात प्रतीत होणारे अन्तःसामर्थ्य आणि परमात्मन् – कर्मकवचापासून मुक्त व स्वतंत्र झालेला आत्मा. पुढे आत्म्याच्या स्वरूपाचे जैन तत्त्वज्ञानानुसार जैन परिभाषेत विस्तृतपणे विवेचन करून आत्म्याचा परमात्म्यात कसा विकास होत जातो, ते दाखविले आहे. हा ग्रंथ धर्मनीतिपर उपदेशाने भरलेला आहे. मात्र परिचित अशा उपमांचा खुबीदारपणे उपयोग करून तो खुमासदार बनविला आहे. जोइंदूची भूमिका गूढवादी आहे. सर्वच गूढवादी स्वाभाविकपणेच आपला असा एक भ्रातृसंघ निर्माण करीत असतात. जोइंदू त्यांत सहजपणे सामील होतो. या ग्रंथात दिसून येते त्याप्रमाणे जैन अध्यात्मवाद्यांनीही गूढवादाची जोपासना केलेली आहे. ते ईश्वरास निर्माता म्हणून मानीत नाहीत. त्यांच्या मते ईश्वर म्हणजे अपरिमित ज्ञान व परमानंद लाभलेला अतिमानव आहे. तसाच तो सर्व धर्मनिष्ठांचा पारमार्थिक आदर्शही आहे. जोइंदूच्या पुष्कळशा कल्पना काण्हपा व सरहपा यांसारख्या बौद्ध लेखकांच्या आणि काही शैव गूढवाद्यांच्या कल्पनांशी जुळणाऱ्या अशा आहेत. जैन पारिभाषिक संज्ञा आणि त्यांच्या छटा सोडल्या, तर हा ग्रंथ म्हणजे पंथातीत, समदर्शी विवेचनाचा उत्तम नमुना आहे. जोइंदूच्या ⇨ योगसार ह्या दुसऱ्या अपभ्रंश ग्रंथातही हेच विषय प्रतिपादिले आहेत.
परमप्पपयासु या ग्रंथावर ब्रह्मदेवाचे (तेरावे शतक) संस्कृत भाष्य, बालचंद्राचे (सु. चौदावे शतक) कन्नड भाष्य आणि दौलतरामाचे (अठरावे शतक) हिंदी विवरण उपलब्ध आहे.
संदर्भ : १. उपाध्ये, आ. ने. परमात्म प्रकाश (नवीन आवृ. योगसारासह व इंग्रजी प्रस्तावनेसह), मुंबई, १९६०.
२. जैन, आर्. डी. परमात्म प्रकाश (इंग्रजी भाषांतरासह), आरा, १९१५.
३. मनोहरलाल, परमात्म प्रकाश (ब्रह्मदेवाचे संस्कृत भाष्य आणि दौलतरामाच्या हिंदी विवरणासह), मुंबई, १९१६.
४. वकील, एस. बी. देवबंद, परमात्म प्रकाश (हिंदी भाषांतरासह), १९०९.
उपाध्ये, आ. ने. (इं.) वि. का. (म.)