पद : (टर्म). ॲरिस्टॉटलप्रणीत पारंपरिक तर्कशास्त्रात पदांविषयीच्या विचाराला महत्त्वाचे स्थान आहे. पारंपरिक तर्कशास्त्रात ‘देवदत्त माणूस आहे’ किंवा ‘सर्व माणसे मर्त्य आहेत’ ह्यांसारख्या विधानाला निरपेक्ष विधान म्हणतात. निरपेक्ष विधाने मूलभूत असतात. इतर प्रकारची विधाने निरपेक्ष विधानांपासून बनविण्यात आलेली असतात. उदा., ‘जर सर्व माणसे मर्त्य असतील, तर देवदत्त मर्त्य आहे’ हे सोपाधिक विधान, ‘सर्व माणसे मर्त्य आहेत’ आणि ‘देवदत्त मर्त्य आहे’ ह्या दोन निरपेक्ष विधानांपासून ‘जर. . . तर’ ह्या अव्ययांच्या साहाय्याने बनविण्यात आले आहे. [⟶तर्कशास्त्र, पारंपरिक].
निरपेक्ष विधान हे कशाविषयी तरी करण्यात आलेले असते आणि ज्याच्याविषयी ते करण्यात आलेले असते, त्याच्याविषयी ते काहीतरी सांगते किंवा विधेयन करते, असे मानण्यात येते. ज्याच्याविषयी ते करण्यात आलेले असते त्याचा निर्देश करणाऱ्या किंवा ते व्यक्त करणाऱ्या शब्दाला किंवा शब्दप्रयोगाला त्या विधानाचे उद्देश्य-पद म्हणतात. उदा., ‘देवदत्त माणूस आहे.’ ह्या विधानाचे ‘देवदत्त’ हे उद्देश्य-पद आहे. तसेच ह्या विधानात देवदत्ताविषयी जे सांगितले आहे ते सांगणाऱ्या, त्याचे ‘विधेयन’ करणाऱ्या, शब्दाला वा शब्दप्रयोगाला ह्या विधानाचे विधेय-पद म्हणतात. ‘देवदत्त माणूस आहे’ ह्या विधानाचे ‘माणूस’ हे विधेय पद आहे. उद्देश्याविषयी विधेयाचे विधेयन करण्याची कृती असते ती ‘आहे’, ‘नाही’ ह्या क्रियापदांच्या साहाय्याने करण्यात येते, असे मानले जाते आणि ह्या क्रियापदाला विधानाचे संयोजक म्हणतात. ‘देवदत्त माणूस आहे’ ह्या विधानाचे ‘आहे’ हे संयोजक आहे. कोणत्याही निरपेक्ष विधानात उद्देश्य-पद आणि विधेयपद अशी दोन पदे आणि त्यांना जोडणारा संयोजक असतो, असा पारंपरिक तर्कशास्त्राचा सिद्धांत आहे.
व्यापक अर्थाने ‘पद’ म्हणजे विधानात उद्देश्य-पद किंवा विधेय-पद म्हणून उपस्थित असू शकेल असा शब्द किंवा शब्दप्रयोग. पदांमधील एक प्राथमिक भेद म्हणजे मूर्तपदे व गुणपदे ह्यांच्यामधील भेद. मूर्तपद हे वस्तूचे (किंवा व्यक्तीचे) नाम असते वस्तूला किंवा व्यक्तीला उद्देशून ते लावता येते. उदा., ‘देवदत्त’ हे एक मूर्तपद आहे कारण एका विशिष्ट व्यक्तीचे ते नाम आहे. तसेच ‘माणूस’ हे एक मूर्तपद आहे कारण तेसुद्धा व्यक्तींना उद्देशून-काही विशिष्ट गुणधर्म अंगी असलेल्या कोणत्याही वस्तूला उद्देशून-लावता येते. गुणपद हे वस्तूचे नाम नसते, ते एखाद्या गुणाचे किंवा धर्माचे नाव असते. उदा., ‘पांढरेपण’ किंवा ‘स्थितिस्थापकत्व’. ‘मानव’ हे पद काही विशिष्ट गुणधर्म-ॲरिस्टॉटलच्या व्याख्येप्रमाणे प्राणी असण्याचा धर्म आणि विवेकशीलता हा धर्म–अंगी असलेल्या अनेक वस्तूंना, त्यांच्यापैकी कुणाही वस्तूला वा प्रत्येक वस्तूला उद्देशून लावता येते. अशा पदाला ‘सामान्य पद’ म्हणतात. उलट “पण लक्ष्यांत कोण घेतो? ह्या कादंबरीचा कर्ता” हे पद एकाच व्यक्तीला उद्देशून लावता येते. अशा पदाला व्यक्तिपद म्हणतात. ‘देवदत्त’ ह्यासारखे एका विशिष्ट व्यक्तीचे विशेषनाम असलेले पद अर्थात व्यक्तिपद असते. पण सर्व व्यक्तिपदे विशेषनामे नसतात. “पण लक्ष्यांत कोण घेतो? चा कर्ता” हे व्यक्तिपद आहे, पण ते विशेषनाम नाही.
‘माणूस’ ह्यासारखे पद जर आपण घेतले, तर कित्येक वस्तूंना ते लावणे, ह्या वस्तूंमधील कुणाही वस्तूविषयी ‘ती माणूस आहे’ असे म्हणणे, बरोबर ठरते आणि इतर वस्तूंना हे पद लावणे गैर ठरते. ज्या वस्तूंना ‘माणूस’ हे पद लावणे योग्य ठरते, त्या सर्व वस्तू मिळून ह्या पदाचा वस्त्वर्थ बनतो असे म्हणतात. जे गुणधर्म एखाद्या वस्तूच्या अंगी असल्यामुळे, जे गुणधर्म एखाद्या वस्तूच्या अंगी असले तर आणि तरच ‘माणूस’ हे पद त्या वस्तूला उद्देशून वापरणे योग्य ठरते, त्या गुणधर्मांना ‘माणूस’ ह्या पदाचा गुणार्थ म्हणतात. सामान्य पदाला गुणार्थ व वस्त्वर्थ हे दोन्ही असतात हे उघड आहे. “पण लक्ष्यांत कोण घेतो? चा कर्ता” ह्यासारख्या व्यक्तिपदालाही गुणार्थ व वस्त्वर्थ हे दोन्ही असतात. एक विशिष्ट गुणधर्म एखाद्या व्यक्तीच्या अंगी असला तर आणि तरच तिला “पण लक्ष्यांत कोण घेतो? चा कर्ता” म्हणता येईल. शिवाय हा गुणधर्म एकाच व्यक्तीच्या अंगी असल्यामुळे त्या एकाच व्यक्तीला उद्देशून हे पद वापरता येते व म्हणून ते व्यक्तिपद आहे. ज्या व्यक्तिपदाला गुणार्थ असतो, पण त्या गुणार्थात सामावलेले गुणधर्म एकाच वस्तूच्या ठिकाणी असल्यामुळे ते एकाच वस्तूला उद्देशून वापरता येते, त्याला अभिधान किंवा अनन्यतया वर्णनपर पद असे म्हणतात. विशेषनामाला गुणार्थ असतो की नाही, ह्याविषयी विरोधी मते आढळतात. जॉन स्ट्यूअर्ट मिल इ. तर्कशास्त्राज्ञांच्या मते विशेषनाम हे केवळ एका विशिष्ट वस्तूचा किंवा व्यक्तीचा निर्देश करण्यासाठी म्हणून स्वैरपणे, तिच्या ठिकाणी कोणते गुण आहेत किंवा नाहीत हे लक्षाता न घेता, मुक्रर करण्यात येते आणि म्हणून त्याला गुणार्थ नसतो. कित्येक इतर तर्कशासास्त्रज्ञांच्या मते विशेषनाम हे जेव्हा टिकून राहणाऱ्या व्यक्तीचे वा वस्तूचे नाम असते, तेव्हा त्याच वस्तूचा परत निर्देश करण्यासाठी ते नाम वापरावे लागते तेव्हा त्या वस्तूच्या ठिकाणी असलेल्या ज्या गुणधर्मांच्या आधारावर आपण ते विशेषनाम त्याच वस्तूला उद्देशून वापरीत आहोत, अन्य वस्तूला उद्देशून वापरीत नाही आहोत, हे ठरविण्यात येते ते गुणधर्म त्या विशेषनामाच्या गुणार्थात सामावलेले असतात, असे मानावे लागते.
एखादे पद ज्याला उद्देशून वापरतात, तो जेव्हा वस्तूंचा समूह असतो, तेव्हा त्याला ‘समूहपद’ म्हणतात उदा., ‘थवा’, ‘सप्तर्षी’ इत्यादी. ‘थवा’ हे समूहपद आहे आणि सामान्य पद आहे कारण ते अनेक समूहांना उद्देशून वापरता येते. ‘सप्तर्षी’ हे समूहपद एकवाची आहे कारण ते एका विशिष्ट समूहाचे नाम आहे.
ज्या पदाच्या गुणार्थात ज्या वस्तूला उद्देशून ते पद वापरण्यात येते, ती वस्तू दुसऱ्या वस्तूशी एका विशिष्ट संबंधाने संबंधित आहे असे अभिप्रेत असते, त्या पदाला सापेक्ष पद म्हणतात उदा., ‘पिता’. समजा प हे सापेक्ष पद अ ह्या वस्तूला उद्देशून लावता येते आणि अ चा दुसऱ्याकोणत्यातरी वस्तूशी–समजा ब शी–एक विशिष्ट संबंध आहे, असे त्याच्या गुणार्थात अभिप्रेत आहे. मग ब चा अ शी उलट संबंध असणार. आता ब चा निर्देश करणारे आणि ब चा अ शी असा संबंध आहे असे अभिप्रेत करणारे जे पद असते, त्याला अ चे संसंबंधी पद म्हणतात. उदा., ‘पिता – अपत्य’, ‘मालक-नोकर’ ह्या संसंबंधी पदांच्या जोड्या आहेत. सापेक्ष नसलेल्या पदाला निरपेक्ष पद म्हणतात.
ज्या पदाच्या गुणार्थात एखाद्या धर्माची किंवा धर्मांची वस्तूच्या ठिकाणी असलेली उपस्थिती अभिप्रेत असते, त्या पदाला भावपद म्हणतात. उदा., ‘मर्त्य’ हे पद भावपत आहे. कारण ज्या वस्तूला उद्देशून हे पद आपण लावू तिच्या ठिकाणी कधी ना कधी मरण पावण्याचा धर्म उपस्थित आहे, असे ह्या पदाच्या अर्थात अभिप्रेत आहे. उलट ‘अमर’ हे अभावपद आहे कारण ज्या वस्तूला उद्देशून आपण हे पद लावू तिच्या ठिकाणी कधी ना कधी मरण पावण्याचा धर्म उपस्थित नसतो, असे त्याच्या अर्थात अभिप्रेत आहे.
आधुनिक तर्कशास्त्रात ‘पद’ ही संकल्पना वेगळ्या अर्थाने वापरण्यात येते. पारंपरिक तर्कशास्त्रात ‘देवदत्त माणूस आहे’ आणि ‘सर्व माणसे मर्त्य आहेत’ ही विधाने एकाच प्रकारची आहेत–दोन्ही निरपेक्ष विधाने आहेत–असे जे मानण्यात येते, ते आधुनिक तर्कशास्त्राला अमान्य आहे. त्याच्यात विधानांचे जे वर्गीकरण करण्यात येते, त्याप्रमाणे प्राथमिक विधाने ही विशिष्ट वस्तूविषयीची विधाने असतात. अशा विधानात एका विशिष्ट वस्तूचा निर्देश करण्यात आलेला असतो आणि तिच्या ठिकाणी अमुक एक गुण आहे किंवा इतर अमुक वस्तूंशी तिचा अमुक संबंध आहे असे सांगण्यात आलेले असते. उदा., ‘देवदत्त माणूस आहे’ किंवा ‘देवदत्त ब्रह्मदत्ताचा पिता आहे’ ही
प्राथमिक विधाने आहेत. प्राथमिक विधानात विशिष्ट वस्तूचा निर्देश करणारा जो शब्द किंवा शब्द प्रयोग असतो त्याला ‘पद’ म्हणतात आणि त्याच्यातील जो गुणवाचक किंवा संबंधवाचक शब्दप्रयोग असतो त्याला विधेय म्हणतात. पण विधेय हे पद मानीत नाहीत. विशिष्ट वस्तूचा निर्देश करणाऱ्या शब्दाला किंवा शब्दप्रयोगालाच पद म्हणतात. उदा., ‘देवदत्त’, “पण लक्ष्यांत कोण घेतो? चा कर्ता” ही पदे आहेत. ‘माणूस’, ‘कादंबरीकार’ ही पदे नाहीत. ती विधेये आहेत. ‘सर्व माणसे मर्त्य आहेत’ ह्यासारखी एका विशिष्ट वस्तूविषयी नसलेली तर वस्तूंच्या एका वर्गाविषयी असलेली विधाने चलचिन्हांच्या साहाय्याने मांडतात. उदा., ‘सर्व माणसे मर्त्य आहेत’ हे विधान ‘कोणताही क्ष घ्या, जर तो क्ष माणूस असेल तर तो क्ष मर्त्य असतो’, असे मांडतात. अशा मांडणीत निरपेक्ष विधानात उद्देश्य-पद म्हणून असलेला ‘माणूस’ हा शब्द विधेयस्थानी येतो. ते एक पद–उद्देश्यपद–आहे असे मानायचे कारण उरत नाही ते एक विधेय आहे हे स्पष्ट होते.
पहा : तर्कशास्त्र, आकारिक.
संदर्भ :1. y3wuoeph, H. W. B. An Introduction to Logic, Oxford, 1961.
2. Suppes, Patrick, Introduction to Logic, New York, 1963.
३. वाडेकर, दे. द. तर्कशास्त्राचीं मूलतत्त्वें : भाग १ : निगमन, पुणे, १९६३.
रेगे, मे.पुं.