पट्टभिसीतारामय्या, भोगराजू : (२४ डिसेंबर १८८०–१७ डिसेंबर १९५९). अखिल भारतीय काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते आणि इतिहासकार. त्यांचा जन्म आंध्रमधील गुंडुगोलनू (ता. एल्लोरे–गोदावरी जिल्हा) या खेड्यात एका गरीब नियोगी ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील सुब्रह्मण्यम् हे पुजारी (कर्णम) होते. पट्टाभी चारपाच वर्षांचे असतानाच सुब्रह्मण्यम् निधन पावले. त्यामुळे त्यांची आई गंगम्मा हिने त्यांचे सर्व शिक्षण केले. प्राथमिक शिक्षण जन्मगावी पूर्ण करून एल्लोरे येथून ते मॅट्रिक झाले (१८९४). त्यांचे उच्च शिक्षण मच्छलीपटनम् व मद्रास येथे झाले. विद्यार्थिदशेत त्यांचा विवाह राजेश्वरम्मा या गंजाम वेंकटरत्नम पंतुलू या श्रीमंत वकिलाच्या मुलीशी झाला. त्यामुळे पुढील उच्च शिक्षणास त्यांना मदत झाली व त्यांनी एम्.बी. अँड सी.एम्. ही वैद्यकातील पदवी मिळविली (१९०१). सुरुवातीस काही वर्षे त्यांनी मच्छलीपटनम् येथे वैद्यकीय व्यवसाय केला. या काळात लाल, बाल व पाल (लाला लजपतराय, लो. बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल) या त्रयींच्या राजकारणी विचारांची त्यांच्यावर छाप पडली. १९०५ साली बंगालची फाळणी झाली व देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटली. परिणामतः पट्टाभींनी राष्ट्रीय महाविद्यालयासाठी पैसे गोळा केले आणि आंध्र जातीय कलाशाला स्थापन केली (१९१०). त्यांनी आपल्या राजकीय कार्याचे मच्छलीपटनम् हे केंद्र मानले. जन्मभूमी (इंग्रजी) राष्ट्रीय साप्ताहिक सुरू केले (१९१९). त्या पत्राद्वारे सत्याग्रह, अहिंसा, बहिष्कार इत्यादींचा त्यांनी प्रसार केला. पुढे म. गांधींंच्या विचारसरणीने प्रभावित होऊन ते गांधीवादी बनले. त्यांनी राष्ट्रीय हितासाठी आंध्र बँक (१९२३), भारत लक्ष्मी बँक (१९२९), द आंध्र इन्सुअरन्स कंपनी (१९२५), हिंदुस्थान इन्सुअरन्स कंपनी (१९३५) इ. संस्था स्थापन केल्या. त्यांनी आंध्र सहकार पत्रिकेमधून आंध्रमधील सहकारी चळवळीचा पुरस्कार केला. तत्पूर्वी त्यांनी आंध्रसाठी स्वतंत्र विद्यापीठ व तेलगूंसाठी स्वतंत्र आंध्र प्रांत यांकरिता चळवळ आरंभली होती. यापूर्वी हिंदू पत्रातून त्यांनी प्रचार केला व द रीडिस्ट्रिब्यूशन ऑफ इंडिया प्रॉव्हिंसेस ऑन लिंग्विस्टिक बेसिस हे पुस्तक प्रसिद्ध केले (१९१६). पुढे वैद्यकीय व्यवसाय सोडून ते काँग्रेसचे क्रियाशील सभासद झाले. १९५२ पर्यंत ते सभासद होते. काँग्रेसच्या कार्यकारिणीचेही ते अनेक वर्षे सदस्य होते.
म. गांधींनी असहकाराची चळवळ सुरू केली (१९२०), त्या वेळी पट्टाभींनी नॉन कोऑपरेशन (१९२१) ही पुस्तिका लिहिली आणि गांधीजींचा कार्यक्रम राबविण्यात पुढाकार घेतला. सायमन आयोगाविरुद्धच्या आंदोलनात भाग घेतल्याने पट्टाभींनाही मद्रासमध्ये अटक झाली (१९२८). वसाहतीचे स्वराज्य की पूर्ण स्वातंत्र्य, या वादात पट्टाभींनी जवाहरलाल यांची बाजू घेऊन पूर्ण स्वातंत्र्यास पाठिंबा दिला (१९२८). मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतल्याने त्यांना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला. १९३८ मध्ये गांधीजींनी त्यांचे नाव काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सुचविले होते पण त्यावेळी सुभाषचंद्र बोस निवडून आले. छोडो भारत आंदोलनात ते सहभागी झाले आणि त्यांना १९४२–४५ या काळात तुरुंगवास भोगावा लागला. त्यांची घटना समितीवर नियुक्ती झाली. जयपूरच्या काँग्रेसचे ते अध्यक्ष झाले (१९४८). त्यानंतर त्यांना मध्य प्रदेशच्या राज्यपालपदी नेमण्यात आले. ते १९५७ पर्यंत त्या पदावर होते.
पट्टाभी निष्ठावान गांधीवादी कार्यकर्ते होते. ते विधायक कार्यातील कुशल संघटक असले, तरी राजकीय सत्तास्पर्धेपासून ते नेहमीच दूर राहिले. त्यांनी वृत्तपत्रीय लेखनाबरोबरच ग्रंथलेखनही केले. त्यांपैकी काँग्रेसच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त लिहिलेल्या हिस्टरी ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस (दोन खंड – १९३५ व १९४७) हा बृहत् ग्रंथ महत्त्वाचा असून तो त्यांच्या साक्षेपी, वस्तुनिष्ठ व अखंड व्यासांगाचा निदर्शक आहे. काँग्रेसचा अधिकृत इतिहास म्हणून त्यास सर्वत्र मान्यता प्राप्त झाली आहे. याशिवाय द काँस्टिट्यूशन्स ऑफ द वर्ल्ड, इंडियन
नॅशनॅलिझम (१९१३) खद्दर (१९३१), गांधी अँड गांधीझम, व्हाय व्होट काँग्रेस इ. इतरही पुस्तके त्यांच्या नावावर मोडतात.
देशपांडे, सु. र.
“