पंतप्रधान : शासनातील कार्यकारी मंडळाच्या नेत्यास दिलेली संज्ञा. त्याचा महामंत्री, प्रधानमंत्री इ. नावांनी उल्लेख करतात. पूर्वी अमात्य, दिवाण, मुख्यप्रधान, वझीर, पेशवा या संज्ञाही या संदर्भात प्राचीन वाङ्मयातून वापरलेल्या आढळतात. राज्यसंख्या कोणत्याही स्वरूपाची असली, तरी तीत पंतप्रधानाचे पद सामान्यतः असतेच. संसदीय लोकशाहीत पंतप्रधान या पदाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
इंग्लंडमध्ये राजाला सल्ला देणारे मंत्रिमंडळ पुरातन काळापासून असले, तरी खुद्द राजाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित राहत असल्याने मंत्रिमंडळात प्रमुख असा कोणी नसे परंतु पहिल्या जॉर्जला (१७१७) इंग्रजी भाषा येत नसल्याने तो मंत्रिमंडळाच्या बैठकीस हजर राहत नसे. राजाच्या अनुपस्थितीत एखादा ज्येष्ठ मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवू लागला. कालांतराने हीच प्रथा रूढ होऊन रॉबर्ट वॉलपोलच्या कारकीर्दीपासून (१७२१–४२) पंतप्रधानपद अस्तित्वात आले. त्यावेळेपासून या (पदाबद्दल काही संकेत इंग्लंडमध्ये रूढ झाले. इंग्लंडसह राष्ट्रकुलातील सर्व देशांत तसेच इझ्राएल, फ्रान्स, रशिया, चीन, जपान वगैरे देशांत पंतप्रधानपद असून लोकशाही देशांत पंतप्रधानच वस्तुतः सर्व देशाचा शासकीय प्रमुख आहे. इंग्लंडमध्ये पंतप्रधानाची नियुक्ती औपचारिक रीत्या राजा करीत असला किंवा भारतात हा अधिकार राष्ट्रपतीस असला, तरी प्रत्यक्षात पंतप्रधान हा निवडून आलेल्या बहुमतवाल्या पक्षाचा नेता असतो आणि त्याची पंतप्रधानपदावर नियुक्ती करणे क्रमप्राप्तच असते. संसदेचा पाठिंबा असेपर्यंत त्याला त्या पदावर राहता येते. तत्त्वतः कनिष्ठ किंवा वरिष्ठ सभागृहे यांपैकी कोणत्याही सदनातील सभासदाची पंदप्रधानपदी नियुक्ती होऊ शकते पण पंतप्रधान हा लोकसभेचाच शक्य तो सभासद असावा, असा संकेत रूढ झाला आहे.
पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार मंत्रिमंडळातील इतर सभासदांची नेमणूक होते व प्रसंगी एखाद्या मंत्र्यास सेवामुक्तही करण्यात येते. पंतप्रधानाने राजीनामा दिल्यास त्याच्या सर्व मंत्रिमंडळाने त्यागपत्र दिले, असे मानले जाते.
मौर्यकाळातील चाणक्य, विजयानगरचा विद्यारण्य स्वामी, बहामनी सत्तेतील मुहम्मद गवान, मराठे अंमलातील मोरोपंत पिंगळे व बाळाजी विश्वनाथ, इंग्लंडमधील रॉबर्ट पील, ग्लॅडस्टन, डिझरेली, चर्चिल, फ्रान्समधील कार्डीनाल रिशल्यू, जर्मनीचा प्रिन्स बिस्मार्क व ऑस्ट्रियाचा मेटरनिख इ. पंतप्रधान जागतिक इतिहासात विख्यात आहेत. श्रीलंकेची सिरिमाओ बंदरनायके ही जगातील पहिली महिला पंतप्रधान असून आतापर्यंत इझ्राएलमध्ये गोल्डा मेअर (१९६९–७४) व भारतात इंदिरा गांधी (१९६६–७७) या महिलांनी पंतप्रधानपद भूषविले आहे.
संदर्भ : 1. Howard, Anthony West, Richard, The Making of the Prime Minister, London, 1965.
2. Jennings, W. I. Cabinet Government, London, 1961.
ओक, द. ह.